आंतरराष्ट्रीय बेपत्ता बालक दिन: पाकिस्तानातून परतलेल्या गीताला तिचं घर मिळालं आहे का?

गीता

फोटो स्रोत, Amol langar

फोटो कॅप्शन, गीता
    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

(25 मे हा आंतरराष्ट्रीय बेपत्ता बालक दिन आहे. त्यानिमित्त पाकिस्तानमधून भारतात परतलेल्या गीताचा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.)

'I love mother father' - तुला तुझ्या आईबाबांची आठवण येते का? असं विचारल्यावर बाजूलाच असलेल्या खडूने गीताने फळ्यावर ही अक्षरं लिहिली. गेल्या कित्येक वर्षांपासून ती तिच्या घरापासून दूर आहे पण आपल्याला आपले आई-वडील नक्की भेटतील असा विश्वास तिच्या डोळ्यात दिसतो.

2015 मध्ये पाकिस्तानमधून भारतात आलेल्या मूकबधिर गीताचं स्वप्नच आहे की तिची आणि तिच्या आई-वडिलांची परत भेट होईल.

सलमान खानच्या बजरंगी भाईजान या चित्रपटात पाकिस्तानमधून भारतात चुकून आलेल्या एका मूक मुलीला सलमान खान सीमेपलीकडे नेऊन सोडतो अशी कथा दाखवण्यात आली आहे. ही कथा गीताच्या आयुष्याचं झलक दाखवते. चित्रपटात ती तिच्या पालकांना पुन्हा भेटते असं दाखवण्यात आलं आहे पण प्रत्यक्षात गीता अद्यापही तिच्या खऱ्या पालकांच्या प्रतीक्षेत आहे.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्राने म्हटले की गीताला तिचं घर मिळालं आहे. गीता ही मूळची राधा वाघमारे असून ती महाराष्ट्रातील आहे. गीता पाकिस्तानमध्ये असताना तिचा सांभाळ करणाऱ्या ईधी फाउंडेशनच्या संचालिकांनी असं म्हटलं की गीताला तिची आई मिळाली आणि तिने सांगितले की ती खूप खुश आहे.

या वृत्तानंतर गीताला खरंच तिचं घर मिळाले की नाही, गीता सध्या काय करते, ती तिच्या घरी कधी जाणार असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात येत आहेत. त्याच उत्तरांचा शोध घेण्यासाठी बीबीसी मराठीने गीताची आणि तिची आई असल्याचा दावा करणाऱ्या मीना वाघमारे-पांढरे यांची भेट घेतली. गीताने तिची उत्तरं साईन लँग्वेजमध्ये दिली. त्याचा अर्थ पहल फाउंडेशनच्या मीनल धावंडकर यांनी सांगितला आहे.

गीता भारतातून पाकिस्तानमध्ये कशी पोहोचली?

गीता सध्या परभणीतील पहल फाउंडेशनकडे आहे. मूकबधिर व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं उद्दिष्ट ठेऊन ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. ती तिथेच राहते आणि तिचं शिक्षण घेत आहे.

गीताला भेटल्यानंतर तिने हसून नमस्कार केला आणि तुमचं स्वागत आहे अशी खूण केली. इंटरप्रीटरच्या माध्यमातून तिनं आपला जीवन प्रवास सांगितला.

गीता

फोटो स्रोत, Amol Langar

तू भारतातून थेट पाकिस्तानला कशी पोहोचलीस विचारल्यावर तिने सांगितले, "मी लहान होते. साधारणतः 7-8 वर्षांची तेव्हा मी खेळत माझ्या मित्र-मैत्रिणींसोबत एका शेतात खेळत होते. तेव्हा मला एक रेल्वे थांबलेली दिसली. तेव्हा मी जाऊन रेल्वेत बसले. रेल्वे सुरू झाली लोकांनी मला विचारलं तू कुठून आलीस, तुझे आई-वडील कुठे आहेत पण मला काहीच सांगता येत नव्हतं. मी रडत होते. मी माझ्या ठिकाणाहून अमृतसरला पोहोचले. तिथून परत येण्याच्या उद्देशाने मी दुसऱ्या रेल्वेत बसले आणि ती रेल्वे मला कराचीला घेऊन गेली."

"तिथल्या पोलिसांनी मला विचारलं. तू कुठून आलीस पण मला काहीच बोलता येत नसल्यामुळे त्यांनी मला अधिकाऱ्यांच्या हवाली केलं आणि मग मला पाकिस्तानमध्ये राहावं लागलं."

गीताने पाकिस्तानमध्ये 15 वर्षं काढली. तेथील ईधी सेंटरमध्ये ती राहत होती. कराचीतील ईधी सेंटरच्या बिल्किस आणि फैजल ईधी यांनी तिचा सांभाळ केला. तिकडून भारतात यावं का वाटलं असता गीता सांगते की "माझं मन तिकडे लागत नव्हतं. मला सतत माझ्या आई-वडिलांची आठवण यायची. मला माझं गाव आठवतं. आमच्या गावात नदी होती, मंदिर होतं, शेतं होती त्या सगळ्यांची ओढ मला लागलेली होती."

भिंतीवर असलेल्या विठ्ठल-रुखमाईच्या फोटोकडून पाहून हात जोडत ती म्हणते "तिथे हे देव नव्हते." गीताच्या इंटरप्रिटरने सांगितले की "धार्मिक प्रवृत्तीची आहे. तिला मंदिरांची, देवाची आवड आहे. पाकिस्तानमध्ये मंदिरामध्ये जात येत नसल्यामुळेही तिला करमत नसे." ईधी सेंटरच्या बिल्कीस यांनी डॉनला देखील हे सांगितलं आहे की "ती धार्मिक प्रवृत्तीची होती. तिला त्या स्वामी नारायण मंदिरात घेऊन जात असत पण लोक सातत्याने आमच्याकडे बघत असत तेव्हा तिच्याच खोलीत आम्ही देवांचे फोटो लावले होते."

गीता पाकिस्तानमधून भारतात कशी आली?

गीताला भारतातून पाकिस्तानमध्ये येण्याची इच्छा आहे ही गोष्ट तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना कळली. त्यांनी तिला भारतात आणण्याची व्यवस्था केली.

जर गीता 15-16 वर्षं पाकिस्तानमध्ये राहिली तर ती भारतात कशी आली हा प्रश्न सर्वांना पडतो. इंदूरच्या आनंद सर्व्हिस सोसायटी या एनजीओचे सचिव ज्ञानेंद्र पुरोहित यांनी गीता भारतात यावी यासाठी प्रयत्न करणाऱ्यांपैकी एक होते. ज्ञानेंद्र पुरोहित यांची संस्था हरवलेल्या मूकबधिर लोकांना त्यांच्या कुटुंबीयांना परत भेटवून देण्याचं काम करते. बीबीसी मराठीने त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले.

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासोबत गीता

फोटो स्रोत, SAJJAD HUSSAIN/AFP VIA GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासोबत गीता

ईधी सेंटरचे फैजल ईधी यांनी इंटरनेटवर गीताच्या नावाने एक पेज तयार केलं होतं. गीता ही मूकबधिर असून ती भारतातली असल्याचं सांगते, तिची ओळख पटवून घेऊ, तिला तिच्या आई-वडिलांकडे जाण्यास मदत करण्याचं आवाहन त्यांनी भारतीयांना केलं होतं. पाकिस्तानी कार्यकर्ते अंसार बर्नी यांनी सुषमा स्वराज यांना टॅग केले आणि या आवाहनाकडे त्यांचे लक्ष आकर्षित केले. त्या ट्विटला रिप्लाय करत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे तत्कालीन उच्चायुक्त टी. सी. ए. राघवन यांना गीताची भेट घेण्यास सांगितले.

या भेटीचा तपशील टी. सी. ए. राघवन यांनी बीबीसी मराठीला सांगितला, "सुषमा स्वराज यांनी मला जबाबदारी दिली की गीता ही भारतीय नागरिक आहे की नाही याची तपासणी करावी. मी जेव्हा तिला भेटलो तेव्हा माझी खात्री झाली की गीता ही भारतीयच आहे. त्याबाबत माझ्या मनात कोणताही किंतु नव्हता. कारण तिला भारतात जाण्याची प्रचंड इच्छा होती. त्यानंतर आम्ही विविध पद्धतीने पडताळणी केली आणि भारतीय परराष्ट्र खात्याला कळवलं की गीता ही भारतीयच आहे. त्यानंतर तिला भारतात येण्यासाठी ट्रॅव्हल डॉक्युमेंट देण्यात आल्या.

"भारतात आल्यावर तिचं भविष्य कसं राहील याचा विचार स्वतः स्वराज यांनी केला होता. कारण भारतात आल्यावर तिचे कुटुंब मिळाले नाही तर तिचे कुठलेही नुकसान व्हायला नको याची काळजी त्यांनी घेतली होती. सुषमा स्वराज यांनी गीताकडे केवळ राजकीय किंवा माध्यमांमध्ये होत असलेल्या चर्चेच्या आधारावर न पाहता गीता ही त्यांची वैयक्तिक जबाबदारी आहे या दृष्टिकोनातून पाहिलं होतं," राघवन सांगतात.ज्या ईधी फाउंडेशनमध्ये गीता राहत होती तिथे गीताची उत्तमरीत्या काळजी घेण्यात आली होती. फैजल ईधी हे अत्यंत निर्मळ स्वभावाचे गृहस्थ आहेत. त्यांनी तिला तिच्या रुममध्येच प्रार्थनेसाठी देवीदेवतांच्या फोटोची व्यवस्था करून दिली होती असं देखील राघवन यांनी सांगितलं.

सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नांमुळे गीताला भारतात आणण्याची कारवाई लवकर घडली, असं पुरोहित सांगतात, "गीता भारतात आल्यावर मूकबधिर संघटन नावाच्या एनजीओकडे राहिली. त्यांनी 2015 ते जुलै 2020 पर्यंत तिचा सांभाळ केला. त्यानंतर ती आमच्या आनंद सर्व्हिस सोसायटीकडे आली. त्या वेळी आम्ही तिला देशातल्या विविध भागात फिरवून त्यांची ओळख गीताला पटते की नाही याचा प्रयत्न केला. तिचे पालक शोधण्याचा प्रयत्न केला. माझा असा अंदाज आहे की गीता मराठवाड्याची आहे त्यामुळे परभणीतील अनिकेत सेलगावकर यांच्या पहल फाउंडेशनकडे तिला सुपूर्त करण्यात आलं. ती पुढील शिक्षण घेऊन आत्मनिर्भर बनत आहे."

गीता मुळची कुठली आहे?

गीता सध्या परभणीत असली तरी हा प्रश्न येतोच की ती मूळची कुठली आहे. "गीता जेव्हा आमच्याकडे आली तेव्हा तिने सांगितलेल्या माहितीच्या आधारावर आम्ही तिचं घर शोधण्याचा प्रयत्न केला," असं पुरोहित सांगतात.

"गीताला आठवत होतं की ती डिझेल इंजिनच्या रेल्वेत बसली होती. गावात नदी आहे, ऊसाची आणि भुईमुगाची शेतं आहेत. तिला देशातल्या विविध भागांचे फोटो दाखवण्यात आले. अमृतसरला पोहोचणाऱ्या त्या काळातील सर्व डिझेल इंजिनचे ट्रॅक तपासण्यात आले."

"तिने सांगितले होतं की ती सकाळच्या वेळी रेल्वेत बसली होती. या सर्व गोष्टी एकत्रित केल्या असता आमच्या लक्षात आलं की ती सचखंड एक्सप्रेसने अमृतसरला पोहोचली आणि तिथून पुढे पाकिस्तानला गेली. नांदेड ते मनमाड या ट्रॅकवर असलेली शेती ऊस किंवा भुईमूग अशीच आहे. तिला तिथले फोटो दाखवले तेव्हा तिला तो भाग ओळखीचा वाटला. या गोष्टींच्या आधारावर एक गोष्ट मी सांगू शकतो की मराठवाड्याची आहे."

"तिला घेऊन आम्ही विविध रेल्वे स्टेशन दाखवली. तिने सांगितलेल्या माहितीशी मराठवाड्यातले या ट्रॅकवरचे अनेक स्टेशन साधर्म्य जुळतं," असं पुरोहित सांगतात.

मीना वाघमारे

फोटो स्रोत, Amol Langar

फोटो कॅप्शन, मीना वाघमारे

मीना वाघमारे यांचा दावा गीता ही आमचा राधा आहे

जिंतूरच्या मीना वाघमारे यांनी दावा केला आहे की गीता ही आमची राधा आहे. मीना वाघमारे आणि गीता यांची जिंतूर मध्ये भेट झाली होती. त्यावेळी मला ती माझीच मुलगी आहे अशी खात्री पटल्याचं मीना सांगतात.

मीना यांनी बीबीसी मराठीला सांगितले, "राधा ही मूकबधिर होती आणि तिला बस किंवा इतर वाहनांमध्ये बसण्याची आवड होती. कित्येकदा तिला लोकांनी बस स्टँडहून घरी आणून सोडलेलं आहे. आमची मुलगी चार-पाच वर्षांची होती तेव्हा हरवली होती. तिचा आम्ही खूप शोध घेतला. ज्योतिषींना विचारलं, गोंधळींना विचारलं की आमची मुलगी कुठे गेली आहे ते म्हणाले ती परत येईल. पण आम्ही अडाणी असल्यामुळे काही पोलिसांकडे गेलो नाही. तिचा फोटो पण नव्हता आमच्याकडे."

मीना यांचे पहिले पती सुधाकर वाघमारे हे गीताचे वडील होते असं त्या सांगतात. सुधाकर यांच्या निधनानंतर त्यांनी दिनकर पांढरे यांच्याशी लग्न केले आणि आता त्या वाळूजला राहतात.

गीता ही तुमची मुलगी आहे असं तुम्हाला का वाटतं असं विचारलं असता मीना वाघमारे सांगतात की आमच्या मुलीच्या पोटावर भाजल्याची खूण होती. गीताच्या पोटावरही ती आहे.

गीता

फोटो स्रोत, Amol Langar

गीता आणि मीना वाघमारे यांच्या बोलण्यात किती साधर्म्य आणि किती फरक?

मीना वाघमारे यांनी म्हटलं आहे की राधाच्या पोटावर जळाल्याची खूण होती, ती मूकबधिर होती या गोष्टी बरोबर आहेत. गीताचं म्हणणं आहे की "ती मुलांसोबत खेळता खेळता रेल्वेत बसले. तेव्हा रेल्वे एका शेतात थांबलेली होती." पण मीना वाघमारे सांगतात की "ती जिंतूरहून बसमध्ये बसली असावी आणि परभणीहून तिने रेल्वे प्रवास केला."

गीता सांगते की ती सात आठ वर्षांची असताना पाकिस्तानला गेली होती. मीना वाघमारे सांगतात की ती चार पाच वर्षांची असताना गेली. गीताचं वय 32 असल्याचं त्या सांगतात कारण मोठ्या मुलीच्या 2 जन्मानंतर गीता 2 वर्षांनी जन्मली. मोठ्या मुलीचं वय 34 वर्षं आहे. पण गीता सांगते तिचं वय 29 वर्षं आहे. ती आठ वर्षांची असताना गेली होती. 15 वर्षं पाकिस्तानात राहिली पण मीना वाघमारे यांनी त्यांच्या मुलीचं जे वय सांगितलं आहे आणि ती घरातून निघून गेल्यावरचं वय सांगितलं आहे ते पाहिलं तर गीताने पाकिस्तानात 22 वर्षं घालवली असती. मीना वाघमारे आणि गीताने सांगितलेले संदर्भ या ठिकाणी जुळत नाहीयेत.

गावात रेल्वे स्टेशन होतं असं गीता सांगते पण जिंतूरला रेल्वे स्टेशन नाही. गावात मंदिर आणि नदी असल्याचं ती सांगते या गोष्टी जिंतूरमध्ये आहेत.

मीना वाघमारे या गीताच्या आई आहेत की नाहीत?

मीना वाघमारे या गीताच्या आई आहेत की नाही हे आताच ठामपणे सांगता येणार नाही असं पहल फाउंडेशनच्या संचालिका मीनल धावंडकर सांगतात. त्या सांगतात की "भारतात आतापर्यंत सात-आठ कुटुंबीयांनी गीता त्यांचीच मुलगी असल्याचा दावा केला आहे. सर्व गोष्टींचा योग्य तपास झाल्याशिवाय आणि डीएनए चाचणीशिवाय सांगता येणार नाही की गीताचे खरे आई-वडील कोण आहेत."

"डीएनए चाचणी ही परराष्ट्र खातेच करणार आहे. ते जेव्हा ठरवतील तेव्हाच या गोष्टीची शहानिशा होऊ शकते," असं धावंडकर सांगतात.

गीता आणि मीना वाघमारे यांनी सांगितलेली काही तथ्यं जुळत नाही तेव्हा नेमकं कसं ठरवायचं गीता हीच राधा आहे याबाबत ज्ञानेंद्र पुरोहित सांगतात की "मीना वाघमारे या अशिक्षित आहेत आणि गीता खूप लहान असताना घरातून गेली होती. त्यामुळे त्यांच्या दोघींच्या बोलण्यात चार पाच वर्षांचा फरक किंवा काही फॅक्टस जुळत नसल्यातरी त्यांनी सांगितलेली जन्मखूण बरोबर आली आहे. त्यामुळे मीना वाघमारेंचे डीएनए सँपल घेऊन ते परराष्ट्र खात्याकडे पाठवण्यात यावेत. गीताचे डीएनए सँपल परराष्ट्र खात्याकडे अगोदरच आहेत. त्यामुळे त्यांचा निकाल आल्यावरच गीता ही मीना वाघमारे यांची मुलगी आहे की नाही याचा निर्णय होऊ शकेल."

गीता

फोटो स्रोत, Amol Langar

गीता सध्या काय करते?

गीताने पाचवीची परीक्षा पास केल्याचं मीनल सांगतात. "इथं तिला गणित, विज्ञान, मराठी, इंग्रजी आणि साईन लँग्वेज शिकवली जाते. ती सकाळी उठते तिचं आवरल्यानंतर पूजा करते. मग तिचे ऑनलाइन क्लास असतात. पहल फाउंडेशनमध्ये सात मूकबधिर विद्यार्थी आहेत. त्यांच्यासोबत तिला साईन लँग्वेज शिकवली जाते."

"ती त्यांच्यात चांगली मिसळली आहे. ती त्यांच्याशी संवाद साधू शकते. तिचा आत्मविश्वास वाढला आहे. तिची अभ्यासातली प्रगती चांगली आहे त्यामुळे तिला एक्स्टर्नलने दहावीची परीक्षाला बसवलं जाईल आणि एकदा तिची शालेय शिक्षण पूर्ण झालं तर तिच्या इच्छेनुसार पुढील शिक्षण दिलं जाईल," धावंडकर सांगतात.

गीता

फोटो स्रोत, Amol Langar

गीताला पुढे काय करायचं आहे?

पुढे काय करायचं आहे असं विचारल्यावर गीता सांगते की "जेव्हा मी सुषमा स्वराज यांना भेटले तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की तू खूप शिक आणि खूप मोठी हो. मला ते करून स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. माझे आई-वडील भेटले तरी मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे. त्यानंतरच मी त्यांच्याकडे जाईल."

आतापर्यंत अनेक जणांनी दावे केले की तेच तिचे आई-वडील आहेत पण पुढे वेगवेगळ्या कारणांनी ते दावे टिकले नाहीत. या गोष्टीमुळे अनेकवेळा निराशा पदरी पडल्याचं ती सांगते. आई वडिलांच्या आठवणींनी मन व्याकुळ होतं अनेक वेळा रडावंसं वाटतं हे देखील ती सांगते. ज्या दिवशी आई-वडिलांकडे जाईल तेव्हा मी खूप आराम करणार आहे असं ती सांगते. गेल्या 21 वर्षांपासून गीता आपल्या घरी गेलेली नाही. तेव्हा घरी जाणं आणि तिथल्या ऊबदार मायेच्या वातावरणात आराम करणं यापेक्षा सुखाची वेगळी कल्पना सध्या तरी गीताकडे नाहीये.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)