'परवडत नसल्यामुळे गर्भधारणेच्या उपचारांसाठी आम्ही फेसबुकहून स्पर्म डोनर शोधला'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, डॉ. फाये किर्कलँड
- Role, बीबीसी न्यूज
ज्या लोकांना नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) कडून गर्भधारणेसाठीचे उपचार मिळणं अशक्य झालं ते लोक फेसबुक ग्रुप्सच्या मदतीने कुणी पुरुष स्पर्म डोनर सापडतोय का किंवा स्पर्म विक्रेता आहे का, हे शोधतात.
इंग्लंडमधील Human Fertilization and Embryology authority (एचएफइए) या संस्थेच्या म्हणण्यानुसार, अशा मार्गामुळे अडचणी वाढतात आणि हे बेकायदेशीरही असू शकतं. मात्र, दोन महिलांनी बीबीसीला सांगितलं की, आमच्याकडे दुसरा कुठला पर्यायच उपलब्ध नव्हता.
क्लोई आणि तिचा जोडीदार वर्षभरापासून गर्भधारणेसाठी प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना त्यात यश आलं नाही. अखेर त्यांच्या फॅमिली डॉक्टरानं एनएचएसच्या स्थानिक फर्टिलिटी क्लिनिकमध्ये जाण्यास सांगितलं. तिथं काही चाचण्या करण्यात आल्या. त्यात असं स्पष्ट झालं की, क्लोईच्या जोडीदाराच्या स्पर्ममध्येच समस्या आहे आणि त्यांना बाळासाठी इतर कुणाचे तरी स्पर्म वापरावे लागतील.
या क्लिनिककडूनच काही स्पर्म डोनर्सची यादी दिली गेली. मात्र, त्या यादीत त्यांच्या पारंपरिक समाजातला एकचजण होता आणि त्याचीही निवड आणखी कुणीतरी केली होती. उत्साह आणि नाराजी अशा दोन्ही भावनांच्या मिश्रणातून जात असतानाच त्यांनी त्यांच्या पहिल्या IVF ला ऑक्टोबर 2017 मध्ये सुरुवात केली. मात्र, त्यावेळी अपयशच पदरात पडलं.
त्यानंतर क्लिनिकनं गर्भधारणेसाठीच्या दुसऱ्या उपचार पद्धतीकडे वळण्यास सांगितलं. ICSI असं तिचं नाव. या पद्धतीत अंड्यांमध्ये स्पर्म सोडले जातात. ही पद्धत IVF पेक्षा अधिक महागडी असते. कारण यात NHS च्या गर्भधारणा उपचाराची एक फेरी आधीच झालेली असते आणि त्याचेही पैसे उपचार घेणाऱ्याला द्यावे लागतात.

"आम्ही काहीसे निराश झालो. कारण हे जर यशस्वी झालं नाही आणि पुन्हा उपचार करावे लागले, तर हजारो पाऊंड्स गोळा करावे लागतील. आमचं लग्न तीन महिन्यात होणार होतं. त्यामुळे त्यासाठी सर्व पैसे जमा केले होते. हे सर्व पाहता आम्हाला उपचार परवडणारे नव्हते," असं क्लोई सांगतात.
साधारण वर्षभर क्लोई यांनी क्लिनिकल कमिशनिंग ग्रुपसोबत चर्चा केली. NHS कडूनच उपचार मिळवण्यासाठी प्रयत्न केले. आपल्याला योग्य संधी दिली गेली नसल्याचं त्या सांगत राहिल्या.
त्यानंतर क्लोई यांच्या जोडीदाराने सूचवलं की, आपण स्पर्म दात्याचा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून शोध घेतला पाहिजे.
क्लोई फेसबुकवरील काही ग्रुप्सला जोडल्या गेल्या. त्यासाठी त्यांनी खोट्या नावाचा वापर केला. कारण मित्र आणि कुटुंब यांना कळू नये की, हे नेमके काय करत आहेत. शिवाय, योग्य दाता मिळावा हाही यामागे उद्देश होता.
दात्याने त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी, वैद्यकीय इतिहास सांगितला, तसंच लैंगिक संसर्गाची तपासणी करून घेतली, त्यानंतर तिने त्याला भेटण्याचं नियोजन केलं. त्याच्या घराजवळीला कार पार्किंमध्ये भेटायचं ठरलं.
"हे सर्व आदर्शवत वाटत नाही. ते सॅम्पल देईल आणि त्यानंतर मी जवळील टॉयलेटमध्ये जाऊन जे करायचं ते करेन," असं क्लोई सांगतात.
क्लोईच्या सुरक्षिततेसाठी तिचा जोडीदार सोबत आला होता. मात्र, कारमध्येच थांबला होता. त्यांनी हे सहा वेळा केलं. एकदा क्लोई गरोदरही राहिली होती. मात्र, गर्भपात करावा लागला.
प्रत्येक खेपेला क्लोई आणि तिचा जोडीदार स्पर्म दात्याला स्पर्मचे 50 पाऊंड आणि त्याच्या प्रवासाच्या खर्चासाठी 10 पाऊंड्स देत असत.
अधिकृत क्लिनिक्स दात्यांना जास्तीत जास्त 35 पाऊंड्स इतकी रक्कम प्रवासाचा खर्च म्हणून देतात. मात्र, दात्यांना त्यांच्या स्पर्मसाठी पैसे देणे हे Human Fertilisation and Embryology Authority (HFEA) या संस्थेनुसार बेकायदेशीर आहे. HFEA ही संस्था युकेतील गर्भधारणा नियमनाचं काम करते.

स्पर्मचे पैसे आकारण्याबाबत Human Fertilisation and Embryology Act 1990 या कायद्यात तितकीशी स्पष्टता नाही. जी व्यक्ती एकावेळेला 50 पाऊंड्सना स्पर्मची विक्री करते, तेव्हा तो व्यवसाय म्हणून या कायद्यात गणलं जात नाही.
जेव्हा कोरोनाचं संकट गडद झालं आणि प्रवासावरील बंधनं वाढवण्यात आली, तेव्हा आधीच्या दात्याला भेटणं अशक्य बनलं. त्यामुळे क्लोई आणि तिच्या जोडीदारानं फेसबुकच्या माध्यमातूनच नवा दाता शोधला.
यावेळी दाता तिच्या घराकडे येण्यास तयार झाल्यानं क्लोईला अधिक सोयीस्कर बनलं.
"मी माझ्या वेळेत करू शकलो. मला कुठलीही धावपळ करण्याची गरज नव्हती. कुठल्याही टॉयलेटमध्ये जाण्याची गरज नव्हती. यावेळी मला अधिक आरामदायी वाटलं. कारण मी माझ्या घरात होते," असं क्लोई सांगतात.
आणि यावेळी हे सर्व प्रयत्न यशस्वी झाले - क्लोई आता गरोदर आहे.
"आम्हा आता खूप खूप आनंदी आहोत. आम्हाला हा अनुभव गेल्या अनेक दिवसांपासून घ्यायचा होता. आणि आता आम्ही खूप नशीबवान आहोत की, आम्हाला बाळ होणार आहे. आमचं कुटुंब असेल, ज्याची आम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत होतो," असं क्लोई सांगतात.
क्लोई आणि तिच्या जोडीदाराने मित्रपरिवार आणि कुटुंबाला अद्याप दात्याबाबत सांगितलं नाही. कारण जोडीदारामुळे आपल्याला बाळ होणं शक्य नाही, हे कुणाला कळावं असं क्लोईला वाटत नाही. शिवाय, याला आणखी एक कारण आहे, ते म्हणजे, बाहेर असे अनेक लोक आहेत, ज्यांना वाटतं की, दात्याचे स्पर्म घेऊन गरोदर राहणं चूक आहे.
क्लोई आणि तिच्या जोडीदाराने स्पर्म दात्याला गरोदर असल्याबाबत माहिती दिली. मात्र, त्याला होणाऱ्या बाळावर अधिकार नसेल, याची तिला खात्री आहे. शिवाय, बाळाच्या जन्मदाखल्यावरही क्लोईच्या जोडीजाराचेच नाव असेल.
क्लोईला स्पर्म देणाऱ्या व्यक्तीने याआधी नियमांअंतर्गत येणाऱ्या क्लिनिकच्या माध्यमातून स्पर्मचं दान केलं होतं. मात्र, नियमानुसार, एक दाता जास्तीत जास्त 10 कुटुंबांना स्पर्म दान करू शकतो आणि या दात्याने ही मर्यादा आधीच पार केली होती. त्याच्या स्पर्मद्वारे त्याला आणखी तीन मुलं आहेत. त्या महिलांशीही त्याचा सोशल मीडियाद्वारेच संपर्क झाला होता.
युकेत 2005 साली आलेल्या कायद्यानुसार, जी मुलं दात्याच्या स्पर्मद्वारे जन्माला आली आहेत, त्यांना वयाच्या 18 वर्षांनंतर दात्याशी संपर्क साधण्याचा अधिकार देण्यात आला आहे. मात्र, क्लोई आणि तिच्या जोडीदाराने ठरवलं आहे की, जर कुठलेही वैद्यकीय कारण नसेल, तर बाळाला याबाबत काहीच माहिती द्यायची नाही.
"मला वाटतं लोकांना या स्थितीत आणून ठेवायला नको. पण आपल्याकडे IVF परवडत नसेल, तर फारसे पर्याय उपलब्ध नाहीत," असं क्लोई सांगतात.
शेवटी क्लोई यांच्या धडपडीला यश आलं. मात्र, हे सर्व जोखीम पत्करल्याशिवाय शक्य नसल्याचं क्लोई सांगतात.
क्लोई यांना अशाही काही महिला माहित आहेत, ज्या स्पर्म घेण्याऐवजी त्या पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवण्यास तयार होतात.
सोशल मीडियावरील हे ग्रुप दात्यांवर लक्षही ठेवतात.
लॉरेन या फेसबुकच्या क्लोज्ड ग्रुपच्या आणखी एक सदस्या आहेत. त्यांनाही दात्यांकडून असाच एक वाईट अनुभव आला.

फोटो स्रोत, Nadia Akingbule
लॉरेन 38 वर्षांच्या होत्या, तेव्हा त्या आणि त्यांच्या महिला जोडीदाराने कुटुंबाचा विचार केला. मात्र, समलिंगी असल्याने कमीत कमी सहा कृत्रिम गर्भधान फेऱ्या झाल्याशिवाय त्यांना NHS द्वारे उपचार मिळणं अशक्य होतं.
खासगी क्लिनिक्समध्येही लॉरेन आणि तिच्या जोडीदारासाठी काहीच पर्याय उपलब्ध नव्हता. स्पर्म्स खरेदी करणं फार महागात पडलं असतं. लॉरेन सांगतात, "स्पर्म बँकेतून स्पर्म प्रत्येक सॅम्पलमागे 600 पाऊंड्स ते 1300 पाऊंड्स इतकी रक्कम मोजावी लागत होती. त्यात देशनिहाय या रकमेत कमी-जास्त असा फरक पडत होता."
त्यामुळे लॉरेन या फेसबुककडे वळल्या. त्यांनी प्रोफाईलमध्ये लिहिलं की, त्यांना एआय-आर्टिफिशियल इन्सेमिनेशन हवंय.
तिने दात्यांशी संपर्क करण्यास सुरुवात केली. "त्यातले काही दाते खरंच प्रेमळ होते. तर काही जण तितके प्रेमळ नव्हते. काहीजणांना मनापासून मदत करण्याची इच्छा होती. काहीजण विचित्रच वागले," असं लॉरेन सांगतात.
एका प्रसंगी एका दात्याने मदतीची इच्छा व्यक्त करताना म्हटलं, "तू खरंच सुंदर दिसतेस." त्या दात्याने नैसर्गिक इन्सेमिनेशनऐवजी लैंगिक संबंधांचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर त्याने काही आक्षेपार्ह फोटोही पाठवले.
काही दात्यांनी तर तिच्याशी फारच निष्ठूरपणा केला. लॉरेनं सर्व माहिती गोळा केली, वैद्यकीय साधनं गोळा केली, सर्व तयारी झाल्यानंतर जेव्हा मदतीची गरज होती, तेव्हा नेमकं ते दाते मेसेजला उत्तर देत नसत.
जेव्हा तुम्हाला मदतीची अपेक्षा असते, तेव्हा सगळे भुतासारखे बेपत्ता होत, असं लॉरेन सांगते.
"प्रत्येक तासाला तुम्ही वेड्यासारखे त्यांना मेसेज करतात. हॅलो, तुम्ही आहात का? आणि काही काळाने ते तुम्हाला ब्लॉक करतात."
हे लॉरेनशी बऱ्याचदा घडलं. "मला याचा खूप त्रास झाला. हे सर्व सोडून द्यावंही वाटलं. कारण या सगळ्याचा मी सामना करू शकत नाही, असं वाटत होतं," असं लॉरेन सांगतात.
मग एका रात्री लॉरेन फेसबुक स्क्रोल करत बसली होती. एका पुरुषाने मोठीच्या मोठी पोस्ट लिहीत सांगितलं होतं की, "त्याला का स्पर्म दान करायचे आहेत. त्याचा भाऊ गे होता आणि त्यामुळे त्याच्या भावाला बाळ नव्हतं. यामुळे त्याला इतरांना मदत करण्याची इच्छा होती."

लॉरेनने त्याच्याशी संपर्क साधला आणि त्यावेळी त्याने तिला अनेक प्रश्न विचारले. पण यामुळे लॉरेनलाही बरं वाटलं. त्याचे काही कडक नियम होते. ड्रग्ज घेत नसलेल्या, धुम्रपान करत नसलेल्या जोडप्यालाचा स्पर्म दान करण्याची त्याची इच्छा होती.
तीन तास चॅटिंग केल्यानंतर लॉरेननं त्याला सांगितलं की, पुढच्या 24 तासांत स्पर्मची आवश्यकता आहे. दुसऱ्याच दिवशी तो पुरुष लंडनहून ट्रेनने निघाला. त्याला स्पर्मचे पैसे नको होते. त्यामुळे लॉरेन आणि तिच्या जोडीदाराने केवळ ट्रेनचा प्रवास खर्च म्हणून 36 पाऊंड्स दिले.
तीन प्रयत्नानंतर लॉरेन गरोदर राहिली. लॉरेन आणि तिच्या जोडीदाराला आता आठ महिन्यांची मुलगी आहे. तिने दात्याला तिचा फोटोही पाठवला आणि तिच्या परवानगीने फेसबुकवरही सांगितले.
लॉरेनला स्पर्म दान करणाऱ्या पुरुषाबाबत प्रत्येकवेळी यशच मिळाल्याचं लॉरेनला नंतर कळलं. लॉरेनला मुलगी झाली, तेव्हा त्या दात्याला इतर 14 मुलं अशीच स्पर्मच्या माध्यमातून होती.
लॉरेन आणि तिच्या जोडीदाराने त्यांच्या मुलीला स्पर्म दात्याबद्दल सर्व माहिती दिली. फोटोही दाखवला.
त्यांनी स्पर्म दात्यासोबत 16 पानी लिखित करार केला आणि मुलीशी त्याचं काहीही घेणंदेणं नाही असं लिहून घेतलं. मात्र, हा करार कोर्टात टिकू शकत नाही. कारण हा करार कुठल्याही वकिलामार्फत केला गेला नाहीय.
HFEA च्या अध्यक्षा सॅली चेशायर इशारा देतात की, अशा प्रकारच्या करारासाठी कुठल्याही प्रकारचे संरक्षण नाही.
"जर सहमती नीट घेतली नाही आणि योग्यवेळी घेतली नाही, पालकत्व दुसऱ्याकडे जाऊ शकत नाही. पर्यायाने कायद्याने दाता हाच त्या बाळाचा पालक ठरतो. तसंच, पालकाच्या जबाबदाऱ्या आणि आर्थिक जबाबदाऱ्याही त्याच्याकडे जातात."
स्पर्म दात्याची नीट आरोग्य तपासणी न केल्यास जोखीम वाढते.
"ब्रिटनच्या नियमन केलेल्या क्लिनिकमध्ये अनेक प्रकारचे रोग आणि अनुवांशिक आजारांची शुक्राणूंची तपासणी करणे आवश्यक आहे, जे एखाद्या दात्याला चुकून असू शकतात आणि त्यामुळे आई-बाळाला धोका होऊ शकतो."
नियमन केलेल्या क्लिनिकबाहेर स्पर्मची खरेदी-विक्री किती होते, याबाबत किती तक्रारी नोंदवल्या गेल्यात, याबाबत बीबीसीने माहिती घेतली असता, या प्रश्नाला HFEA ने उत्तरात माहिती दिली नाही. पोलिसांनी याबाबत कुठली तक्रार नोंदवली गेली नसल्याचं म्हटलं.
फेसबुकच्या प्रवक्त्यांनी म्हटलं, "स्पर्म दानाची चर्चा करण्यास आम्ही फेसबुकवर परवानगी दिलीय. मात्र, कायद्याचं उल्लंघन होऊ नये यासाठी बारीक नजर ठेवून असतो."
खासगी क्लिनिकमध्ये स्पर्मची किंमत कमालीची महाग असल्याचं लॉरेन सांगतात. त्यामुळे स्पर्म NHS द्वारेही उपलब्ध झाले पाहिजेत.
"मला विचाराल तर हे पैसे वाचवण्यासाठी आहे. त्यामुळे लोक टॉयलेटमध्ये स्पर्मची घेवाणदेवाण करतात. कारण लोकांकडे क्लिनिकमध्ये जाण्यास पैसे नाहीत," असं लॉरेन म्हणते.
गर्भधारणेसाठीच्या उपचारपद्धतीबाबत लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं, याबाबत बीबीसीने NHS इंग्लंडला विचारलं असता ते म्हणाले, "क्लिनिकल कमिशनिंग ग्रुप्सच्या शेवटी हे कायदेशीरदृष्ट्या निर्णय आहेत, जे एनएचएसवरील विविध स्पर्धात्मक मागण्यांना स्थानिक पातळीवर संतुलित ठेवण्याचं काम करतं. यासाठी संसदीय बजेटमध्ये तरतूद करण्यात येते."

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)












