ऑनलाइन सेक्स पार्टी म्हणजे काय, प्रत्यक्ष संपर्कातील पोकळी ती भरून काढू शकते?

फोटो स्रोत, Getty Images
सामाजिक अलगीकरणामुळे शारीरिक जवळीक शोधू पाहणाऱ्या लोकांना लैंगिक अलगीकरणालाही सामोरं जावं लागलं. अशा वेळी आभासी लैंगिक व्यवहार पुरेसे आहेत- की आपल्याला स्पर्शाची गरज असते?
युनायटेड किंगडममध्ये राहणारी 26 वर्षीय एमा विद्यार्थिनी आहे. टाळेबंदीचे तीन महिने होत आले तेव्हा ती 'झूम' अॅपद्वारे एका संवादगटात सहभागी झाली.
यात सहभागी मंडळी केवळ ऑनलाइन संभाषणांसाठीच एकमेकांच्या संपर्कात आली होती, आणि एमाही तेवढ्यापुरतीच त्यांच्या संपर्कात येणार होती. 'किलिंग किटन्स' या कंपनीने या ऑनलाइन संवादाचं आयोजन केलं होतं.
कोव्हिडपूर्व काळात ही कंपनी प्रत्यक्षातील सेक्स पार्ट्यांचं आयोजन करत असे आणि त्यात महिला सबलीकरणावर भर होता. त्यांनीच आयोजित केलेली ही 'व्हर्चुअल हाऊस पार्टी' मद्यपानाच्या खेळांनी सुरू झाली. हा अनुभव एमासाठी पूर्णतः नवीन होता.
"आम्ही 'नेव्हर हॅव आय एव्हर' हा गेम खेळलो," ती सांगते, "आणि संयोजकांनी आम्हाला काही प्रश्न विचारले, म्हणजे 'किलिंग किटन्सच्या पार्टीसाठी कोणती सेलिब्रिटी व्यक्ती यावी असं तुम्हाला वाटतं?' यामुळे संवादात सहभागी झालेल्या व्यक्ती आपापल्या स्वप्नरंजनाबद्दल आणि आवडीनिवडींबद्दल बोलायला लागले. विशेष रचना वगैरे न ठरवलेल्या पुढच्या भागाकडे जाण्यासाठी ही सहज सुरुवात होती. या दरम्यान काही सहभागी व्यक्तींनी कपडे काढले, खूप मस्त वाटत होतं, इतर लोकांशी असं बोलताना सेक्सी समाधान वाटलं."

फोटो स्रोत, Getty Images
एमाला अशा संवादाची ओढ वाटत होती. घरात तिच्यासोबत राहणारी व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत राहायला गेली होती आणि मार्च महिन्यात एमाची नोकरीही गेली, त्यामुळे कोव्हिड साथीचा बहुतांश काळ तिने शारीरिकदृष्ट्या अलगीकरण सहन करत काढला. "काही वेळा खूपच एकटं वाटायचं," ती म्हणाली.
पूर्वी ती सेक्स पार्ट्यांमध्ये सहभागी झालेली आहे, पण किलिंग किटन्समध्ये मात्र ती अगदी अलीकडे, नोव्हेंबर 2019मध्ये दाखल झाली. "यात पूर्णपणे सहभागी होताना जरा अवघडल्यासारखं वाटत होतं," असं ती सांगते.
कोव्हिडच्या जागतिक साथीचा आघात झाल्यावर मात्र आपली संधी गेली की काय, अशी चिंता तिला भेडसावू लागली. त्यामुळे ती आधी किलिंग किटन्सच्या एकास-एक पद्धतीने संवाद साधू देणाऱ्या चॅट-ग्रुपमध्ये सहभागी झाली आणि जवळचे मित्रमैत्रिणी मिळवले. यातून थोडी आश्वस्तता आल्यावर संख्या वाढवण्यासाठी तिने आभासी पार्टीमध्ये सहभागी होण्याचं ठरवलं.
जागतिक साथीदरम्यान सामाजिक अलगीकरणामुळे शारीरिक जवळीक शोधू पाहणाऱ्या व्यक्तींना आणि जोडप्यांना लैंगिक अलगीकरणही भोगायला लागत होतं. सेक्सचा स्पर्शसदृश अनुभव ऑनलाइन पातळीवर निर्माण करणं सरळसोपं नसतं.
'झूम'वरील स्वैर लैंगिक गप्पांपासून ते एमा सहभागी झाली त्यासारख्या सेक्स पार्ट्या- यांसारख्या आभासी अनुभवांद्वारे अनेकांच्या जीवनातली जवळिकीची पोकळी भरून काढायला मदत झाली. किमान काही प्रमाणात तरी याचा उपयोग झाला. सहभागी व्यक्ती आणि संयोजकांच्या दृष्टीने ऑनलाइन लैंगिक संपर्क प्रत्यक्षातील अनुभवांची 'नक्कल' करू शकतो आणि अत्यंत गरजेचा मानसिक आधार पुरवतो, पण शारीरिक स्पर्शाला थेट पर्याय असा नाही.
साथीच्या दरम्यान सेक्सला पर्याय म्हणून आभासी अनुभव घेतले गेले असले, तरी त्यातून आणखीही काही गोष्टी आपल्या समोर उलगडतात- आपण अलगीकरणात असतो तेव्हा आणि पुन्हा एकमेकांना स्पर्श करणं आपल्याला शक्य होईल तेव्हादेखील जवळिकीमध्ये कोणती गोष्ट महत्त्वाची असते, हे यातून आपल्याला कळतं.
डिजीटल जवळीक साधताना
कोव्हिडची साथ सुरू झाली त्याला आता जवळपास वर्ष होतं आहे. दरम्यान अनेकांनी ऑनलाइन ओळख करून संबंध जुळवायचे मार्ग शोधले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
'बम्बल'सारखी डेटिंग-अॅप वापरकर्त्यांना 'केवळ आभासी' किंवा 'सामाजिक अंतर राखून' संवाद साधण्याचे पर्याय उपलब्ध करून देतात.
बम्बलच्या एका प्रतिनिधीने सांगितल्यानुसार, टाळेबंदी सुरू होण्याआधी मार्चची आकडेवारी पाहिली, तर त्या तुलनेत मे 2020 मध्ये या अॅपद्वारे व्हीडिओ कॉलची संख्या 42 टक्क्यांनी वाढली.
पण ऑनलाइन लैंगिक अनुभवांची पुनर्निर्मिती करण्यापेक्षा पहिली ओळखभेटच व्हीडिओ-चॅटद्वारे घडवणं खूपच वेगळं होतं. शारीरिक स्पर्शासारख्या महत्त्वाच्या घटकांना सरळसोट ऑनलाइन पर्याय नाहीत.
तरीही, लोक आभासी जवळीक साधत आहेत. ऑक्टोबर महिन्यात बेसिक या हार्ड-सेल्ट्झर प्रकारातील पेय विकणाऱ्या कंपनीने एक सर्वेक्षण केलं. अमेरिकेतील 35 वर्षांखालील वयाच्या दोन हजार एकल व्यक्तींचा यात सहभाग होता.
या सहभागी व्यक्तींपैकी 58 टक्के लोकांनी कोव्हिड साथीदरम्यान आभासी सेक्स केला होता. त्यातील 77 टक्के लोकांनी अशा व्यक्तींसोबत लैंगिक अनुभव घेतला ज्यांच्यासोबत प्रत्यक्षात त्यांनी असा अनुभव कधीच घेतलेला नाही.
बम्बलने युनायटेड किंगडममधील पाच हजार एकल व्यक्तींचं सर्वेक्षण केलं त्यानुसार, 'टाळेबंदीच्या काळात आणि टाळेबंदी उठवल्यानंतरही' नातेसंबंधांमध्ये 'डिजीटल जवळीक' महत्त्वाची आहे, असं 32 टक्के लोक म्हणाले.
गेल्या वर्षामध्ये ऑनलाइन लैंगिक भेटीगाठींमध्ये सहभागी झालेल्या एमा आणि इतर व्यक्तींसाठी आभासी सेक्स पार्ट्या, 'झूम'द्वारे शैक्षणिक कार्यशाळा, दूरस्थ नियंत्रण असलेली सेक्सची खेळणी आणि सेक्समध्ये रस असलेल्या समुदायांशी साधा संवाद साधणं, हे सगळंच लैंगिकदृष्ट्या तृप्त करणारं आणि शारीरिक जवळिकीला पर्याय देणारं ठरलं आहे.
"कोणाला तरी पाहण्यात आणि आपण स्वतः दाखवण्यात खूप लैंगिक तृप्तता मिळते," असं एमा म्हणते. ती स्वतःचं वर्णन 'एक्झिबिशनिस्ट' - (शारीरिक) प्रदर्शनातून आनंद मिळवणारी- असं करते.
शिवाय, खरीखुरी जोडपी सेक्स करताना पाहणं, हे पोर्नोग्राफी बघण्यापेक्षा वेगळं असतं. यात खाजगीपणाचा भाग असतो आणि सेक्समध्ये रस असलेल्या या अवकाशांमध्ये एमाने जुळवलेले संबंध खाजगीच आहेत. ती आणि इतर एकल सहभागी व्यक्तींचे एकमेकांशी "घनिष्ठ नातेबंध" निर्माण झाल्याचं ती सांगते, "कारण आम्ही एकसारख्याच स्तरावर हा अनुभव घेतलाय."
डेव्हिड लंडनमध्ये 'ली बोदोइ' हा प्रौढ जीवनशैलीशी निगडित क्लब चालवतात. ऑक्टोबर महिन्यात त्यांनी पर्पल मम्बासारख्या लंडनमधील इतर क्लबच्या साथीने आभासी सेक्स पार्ट्यांचं आयोजन करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, अशा उपक्रमात पहिल्यांदाच सहभागी होणारे लोक प्रत्यक्षातील अवकाशांमध्ये जसे वागतात तसे वागत आहेत.
कोपऱ्यात मुटकुळी बसण्याऐवजी सुरुवातीला ते इतरांशी आभासी संवाद साधण्याबाबत कचरत होते, पण "संध्याकाळचा तो पूर्ण वेळ ते उबदार अवस्थेत असल्याचं स्पष्टपणे कळत होतं," असं डेव्हिड सांगतात.
किलिंग किटन्सप्रमाणे हे उपक्रमही वातावरण मोकळं करणाऱ्या खेळांनी आणि सादरीकरणांनी (लैंगिक उद्दिपक नृत्य) सुरू होतात, त्यामुळे लोकांना मूडमध्ये यायला मदत होते. या पार्ट्यांचा पुढील घटनाक्रम वास्तव जीवनाप्रमाणेच असल्याचं दिसतं. "तंत्रज्ञानाने वास्तव जीवनाची नक्कल करावी तसाच हा प्रकार असतो," असं डेव्हिड म्हणतात.
सुरक्षितता
या उपक्रमांच्या ऑनलाइन स्वरूपामुळे सहभागी व्यक्तींचे वयोगटही विस्तारतात, त्यांची भौगोलिक स्थानंही दूरची असतात आणि अनुभवांच्या पातळ्याही वृद्धिंगत होतात.

फोटो स्रोत, Getty Images
इस्रायल, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका इथले लोक बोदोइ आणि पर्पल मम्बाच्या उपक्रमांमध्ये सहभागी होतात. युनायटेड किंगडमच्या वेळेनुसार शनिवारी संध्याकाळी सुरू झालेली पार्टी अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील आणि अमेरिकेतील वेळेनुसार संध्याकाळपर्यंत चालते. या उपक्रमांमध्ये अधिक तरुण व्यक्ती सहभागी होत असल्याचं सेयली यांनी नमूद केलं.
हे उपक्रम ऑनलाइन असतात आणि तरुण पिढी याच मार्गाने संवाद साधते, एवढंच यामागचं कारण नाही. प्रत्यक्षातील पार्ट्यांमध्ये आर्थिक कारणामुळे मर्यादा येतात, ती मर्यादा ऑनलाइन उपक्रमांना तितकीशी जाचक नसते. किलिंग किटन्सच्या ऑनलाइन पार्टीसाठी 20 पौंड इतकं शुल्क असतं, तर प्रत्यक्षातील पार्टीसाठी तब्बल 350 पौंडांपर्यंत शुल्क भरावं लागू शकतं.
एमा मोठ्या शहरात राहत नाही, त्यामुळे एखाद्या कार्यक्रमासाठी लंडनपर्यंत प्रवास करायचा, तिथे एखाद्या हॉटेलात राहायचं, बाहेर जेवायचं आणि नवीन कपडे घ्यायचे, यावरचा खर्च करण्यापेक्षा ऑनलाइन कार्यक्रम तिला किफायतशीर ठरतात. "विद्यार्थिनी म्हणून विचार केला, तर हे खूप बरं वाटतं," असं ती सांगते.
बोदोइ आणि पर्पल मम्बा यांच्या आभासी सेक्स पार्ट्यांमध्ये आता कोणत्याही शनिवारी सुमारे 150 लोक सहभाग होतात. किलिंग किटन्सच्या उपक्रमांमध्येही अशीच संख्या असल्याचं सेयली म्हणतात.
"यात सहभागी होणारे बरेच लोक पूर्णतः नवीन आहे, त्यांनी आधी कधी सेक्स पार्टीला जायचा विचारही केला नसता," असं सेयली सांगतात.
व्हीडिओ चॅटद्वारे संपर्क साधण्यात 'सुरक्षितता' आहे. "कोणत्याही क्षणी तुम्ही स्क्रिन बंद करू शकता," असं त्या सांगतात.
युनायटेड किंगडममधील मॅट (31) आणि एमिली (29) हे जोडपं कोव्हिड साथीदरम्यान पहिल्यांदाच सेक्स पार्टीत सहभागी झालं. बोदोइ आणि पर्पल मम्बा यांनी आयोजित केलेल्या ऑनलाइन पार्टीत ते सहभागी झाले.
"आपण आपल्याच घरात असतो. त्यामुळे सुरक्षित वाटतं," असं मॅट सांगतात. 'आम्हाला दोघांनाही कधीतरी प्रत्यक्षातल्या पार्टीला जायला आवडलं असतं', असं ते सांगतात, "पण त्यासाठी थोडा जास्त वेळ लागला असता," असं एमिली म्हणतात.
सध्या तरी ऑनलाइन उपक्रमांद्वारे ते लैंगिकता आणि संबंध अनुभवत आहेत. प्रत्येकाची "वेगळी शैली" यातून अनुभवायला मिळते, त्यामुळे दुसऱ्या जोडप्यासोबत वास्तवातला, सामायिक अनुभव घेता येतो, असं मॅट सांगतात.
कोव्हिड साथीपूर्वी त्यांनी असा अनुभव घ्यायचा विचार केला नव्हता. नंतर त्यांचा विचार बदलला. आभासी संवादांमुळे मॅट आणि एमिली यांना त्यांच्या इच्छा व्यक्त करायचा मार्ग सापडला. इतरांशी दूरस्थ रितीने संवाद साधावा लागत असल्यामुळे आपली पसंती कळवण्याच्या काही विशिष्ट संज्ञा ते शिकले आहेत.
मिशिगनस्थिती लैंगिकतातज्ज्ञ मेगन स्टब्स यांनी नमूद केलेल्या निरीक्षणाशी हे जुळणारं आहे. "संवादाच्या आणखी वाटा मोकळ्या झाल्या आहेत. लोक अधिक बोलत आहेत, स्वतःच्या गरजांविषयी अधिक स्पष्टपणे व्यक्त होत आहेत."
अंतरामुळे हे होत जातं. तुमचे लैंगिक भागीदार आणि तुम्ही एकाच खोलीत नसाल, तर देहबोलीवर आणि सूक्ष्म खुणांवर विसंबून राहता येत नाही. शिवाय, "आपल्यातील अंतर खूप जास्त असलं, तरी आपण करत असलेली कृती प्रत्यक्षाहून कमी पडणारी असते, असं मात्र नाही," असं त्या म्हणतात.
'स्पर्शाचा अभाव'
तरीही, प्रत्यक्ष शारीर स्पर्शाला पूर्णतः पर्यायी ठरणारं काहीही नाही, यावर तज्ज्ञांची आणि आभासी सेक्स करणाऱ्यांची सहमती आहे. "ऑनलाइन ऑर्गीसारखे प्रकार असू शकत नाहीत," असं सेयली म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
व्यक्तीला स्पर्श होतो तेव्हा घडणाऱ्या शारीर प्रक्रिया याला अंशतः कारणीभूत आहेत. मिआमी विद्यापीठातील मिलर स्कूल ऑफ मेडिसीनमधील 'टच रिसर्च इन्स्टिट्यूट'च्या प्रमुख टिफनी फिल्ड म्हणतात की, "मध्यम दाबाच्या स्पर्शा"ने त्वचेखालचे दाबग्राहक घटक उत्तेजित होतात. "यातून प्रतिक्रियांची साखळी सुरू होते, त्यातून मज्जाव्यवस्था संथ होते," असं त्या सांगतात. "हृदयाचे ठोके मंदावतात, रक्तदाब कमी होतो, आणि मेंदूतील लहरी थिटाच्या दिशेने जातात, थिटा ही निवांतस्थिती असते."
रोगप्रतिकारक पेशींना मारणाऱ्या कॉर्टिसॉल या दबावसंबंधित हार्मोनांची पातळी स्पर्श झाल्यावर कमी होते, आणि नैसर्गिक मारक पेशी (जीवाणू, विषाणू आणि कर्क पेशींना मारणाऱ्या पेशी) वाढतात, असं फिल्ड यांच्या संशोधनातून समोर आलं आहे.
या संशोधनामध्ये विशेषतः मसाज थेरपीचा अभ्यास केला गेला. "सध्या मोठ्या प्रमाणात स्पर्शाचा अभाव जाणवत असताना आपल्याला विषाणू पेशी मारणाऱ्या नैसर्गिक मारक पेशींचं संरक्षणही लाभत नाहीये, हा एक दुर्दैवी उपरोधच आहे," असं त्या म्हणतात.
"मध्यम दाबाच्या स्पर्शा"बाबत त्यांनी केलेल्या संशोधनानुसार फिल्ड म्हणतात की, एकटं राहणाऱ्या लोकांना स्पर्शाच्या अभावावर उपाय म्हणून स्वतःला स्पर्श करण्याचा पर्याय असतो. थोडे हात-पाय हलवणं, चालणं यांसारख्या कृतींचाही यात समावेश होतो. यातून पायाच्या तळव्यापाशी असणारे दाबग्राहक घटक उद्दिपित होतात. आभासी सेक्समध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींना सक्रिय व्हायचं असेल तर हा सहभागही अर्थातच याच प्रकारात मोडतो.
सखोल समज
या ऑनलाइन लैंगिक अनुभवांसाठी संयोजन करणारे आणि यात सहभागी होणारे सर्वच जण असं स्पष्ट करतात की, कालांतराने अनोळखी लोकांमध्ये मिसळणं सुरक्षित ठरलं, तरीही आभासी अनुभव सुरू ठेवण्याची त्यांची इच्छा आहे. डिजिटल जवळिकीमुळे काहीएक अनन्यसाधारण अनुभव घेता येतो. घरातच राहूनसुद्धा तृप्त करणाऱ्या कृतीत सहभागी होता येतं, भौगोलिकदृष्ट्या दूर असलेल्या लोकांशी जवळीक साधता येते आणि त्यासाठी अत्यल्प किंवा शून्य खर्च येतो.
प्रत्यक्षातील उपक्रमांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. "साथीचे रोग ओसरल्यानंतर किंवा युद्ध संपल्यानंतर लोक काय करतात, याचा हजारो वर्षांचा इतिहास पाहिला, तर संभोगात वाढ झाल्याचं दिसतं. आताही तेच होईल," असं सेयली सांगतात.
कोव्हिड साथीचा आणखी एक परिणाम होण्याची शक्यता आहे- आपल्या जीवनात स्पर्शाचा किती अभाव आहे, हे आपल्याला जाणवेल. कोव्हिड-19 येण्याआधी स्पर्श तज्ज्ञ फिल्ड आणि त्यांचे सहकारी एक अभ्यास करत होते. विमानतळावरील येण्या-जाण्याच्या दारांपाशी लोक एकमेकांना किती स्पर्श करतात, याचं निरीक्षण या अभ्यासांमध्ये केलं जात होतं.
केवळ 4 टक्के वेळा लोक एकमेकांना स्पर्श करत होते, असं फिल्ड सांगतात. 68 टक्के वेळा ते स्वतःच्या फोनवर बोलत किंवा चिटचॅट करत होते. ऑनलाइन मंचांमुळे आणि समाजमाध्यमांमुळे आपण कोव्हिडपूर्व काळात एकमेकांपासून शारीरदृष्ट्या दुरावलो होतो. आता हीच माध्यमं लोकांना जवळ आणण्यासाठी पूरक ठरत आहेत.
"कोव्हिडने स्पर्शाचा अभाव आणखी वाढवला आहे. आपल्याला आधी मिळत असलेला स्पर्शानुभव आता मिळत नाहीये, ही समज बहुधा लोकांमध्ये आता निर्माण होत असावी," असं फिल्ड म्हणतात.
एमा, डेव्हिड, मॅट आणि एमिली यांची आडनावं खाजगीपणा जपण्यासाठी इथे नोंदवलेली नाहीत.

हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)









