अमेरिका निवडणूकः डोनाल्ड ट्रंप यांनी पराभव स्वीकारला नाही तर काय होईल?

फोटो स्रोत, Getty Images
अनेक दिवस सुरू असलेल्या मतमोजणीनंतर जो बायडन यांनी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना नमवत बाजी मारली आहे.
जो बायडन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकत असल्याचं पेन्सिल्वेनियातल्या निकालानंतर स्पष्ट झालं. व्हाईट हाऊसच्या शर्यतीत डोनाल्ड ट्रंप यांच्यावर मात करण्यासाठी 270 इलेक्टोरल मतांची गरज असताना, बायडन यांना 273 इलेक्टोरल मतं मिळत आहेत.
पण बायडन यांनी निवडणूक जिंकल्यावर आता पुढे काय होणार?
निर्वाचित राष्ट्राध्यक्ष बायडन आता काही लगेचच व्हाइट हाऊसमध्ये राहायला जाणार नाही. अमेरिकेतल्या नियमांनुसार त्याआधी काही गोष्टी घडणं आवश्यक आहे.
एरवी ही सगळी प्रक्रिया सरळ सोपी असते. पण यंदाची निवडणूक कोर्टाच्या फेऱ्यांत अडकली तर काही अडचणी निर्माण होऊ शकतात.
जो बायडन कधी राष्ट्राध्यक्ष बनतील?
अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार नव्या राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ 20 जानेवारीला दुपारी बारा वाजता सुरू होतो.
त्यासाठी अमेरिकन संसदभवन म्हणजे वॉशिंग्टन डीसीमधल्या कॅपिटॉल इमारतीत 'प्रेसिडेन्शिय इनॉग्युरेशन' म्हणजे शपथविधी सोहळ्याचं आयोजन केलं जातं. या सोहळ्यात नवे राष्ट्राध्यक्ष आणि नवे उपराष्ट्राध्यक्ष यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पदाची शपथ देतात.

फोटो स्रोत, Getty Images
म्हणजे 20 जानेवारी 2021रोजी जो बायडन आणि कमला हॅरिस पदभार स्वीकारतील.
या वेळापत्रकात काही अपवादात्मक बदलच होतात. एखाद्या राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाळ सुरू असताना मृत्यू झाला किंवा त्यानं राजीनामा दिला तर उपराष्ट्राध्यक्षांना लगेचच राष्ट्राध्यक्षपदाची शपथ दिली जाते.
'प्रेसिडेन्शियल ट्रान्झिशन' म्हणजे काय?
निवडणुकीचा निकाल लागल्यापासून 20 जानेवारीला नवे राष्ट्राध्यक्ष शपथ घेईपर्यंतचा काळ म्हणजे 'प्रेसिडेन्शियल ट्रान्झिशन'चा काळ अर्थात सत्तांतरणाचा काळ होय.
निर्वाचित राष्ट्राध्यक्ष या काळात आपली ट्रान्झिशन टीम तयार करतात, म्हणजे शपथ घेतल्यावर लगेचच त्यांना लगेचच काम सुरू करता येतं. बायडन यांनी आपली सत्तांतरण वेबसाईटही https://buildbackbetter.com/ तयार केली आहे.
ही टीम मंत्रीमंडळातले सदस्य निवडणं, तसंच कुठल्या धोरणांना प्राथमिकता द्यायची आणि कसं राज्य चालवायचं यावर चर्चा करते
या टीमचे सदस्य अमेरिकेतल्या राष्ट्रीय स्तरावरील मंत्रालयं आणि विभागांमध्ये जातात आणि कुठली कामं कधी करायची आहेत, त्यांचा आर्थिक ताळमेळ, तिथले अधिकारी यांची माहिती घेतात.
कोणते अधिकारी नव्या राष्ट्राध्यक्षांच्या हाताखालीही काम करत राहणार आहेत याचीही ते माहिती घेतात. या टीमचे काही सदस्य नंतर सरकारसोबत काम करत राहतात.
2016 साली तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची तेव्हाचे निर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी भेट झाली, तेव्हा दोघांमधला फोटोत थंडपणा स्पष्टपणे दिसून आला.
कुठले शब्द आपल्या कानावर पडत राहतील?
प्रेसिडेंट इलेक्ट - निर्वाचित राष्ट्राध्यक्ष
जेव्हा एक उमेदवार निवडणूक जिंकतो पण त्यानं अजून राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतलेली नसते, तेव्हा त्यांना निर्वाचित राष्ट्राध्यक्ष किंवा प्रेसिडेंट इलेक्ट म्हटलं जातं
कॅबिनेट :
जो बायडेन लवकरच आपल्या कॅबिनेटमध्ये म्हणजे मंत्रीमंडळात कोण कोण असेल हे जाहीर करतील. अमेरिकेचा राज्यकारभार चालवणारी ही सर्वोच्च टीम असेल. त्यात महत्त्वाच्या विभागांच्या प्रमुखांचा समावेश असेल.
कन्फर्मेशन हियरिंग :
सरकारमधील महत्त्वाच्या जागी नियुक्ती करताना राष्ट्राध्यक्षांना सिनेटची म्हणजे अमेरिकन संसदेतील वरिष्ठ सभागृहाची सहमती घ्यावी लागते. बायडन यांनी निवडलेल्या लोकांची सिनेटच्या समित्यांकडून मुलाखत घेतली जाईल, त्यालाच कन्फर्मेशन हियरिंग असं म्हणतात. या मुलाखतीनंतरच त्यांची निवड होणार की नाही यावर शिक्कामोर्तब केलं जातं.
सेल्टिक :
निर्वाचित राष्ट्राध्यक्ष या नात्यानं बायडन यांना हेरखातं आणि सुरक्षाविभागाकडून. संरक्षण दिलं जातं. त्यांचं कोडनेम असेल सेल्टिक. ही नावं स्वतः उमेदवारच निवडत असतात. कमला हॅरिस यांनी 'पायोनियर' हे नाव निवडल्याचं वृत्त आहे.
ट्रंप कोर्टात आव्हान देतील?
डोनाल्ड ट्रंप यांनी या निकालाला आव्हान देण्याचे संकेत आधीच दिले होते. बायडन अलीकडील ज्या राज्यांत जिंकले आहेत त्या सगळ्या राज्यांत निकालांना आव्हान देणार असल्याचं ट्रंप यांनी म्हटलं होतं. त्यांनी घोटाळा झाल्याचा आरोप केला होता, पण तसा कुठलाही पुरावा दिलेला नाही.
ट्रंप यांचे प्रतिनिधी कोर्टात हा खटला चालवण्यासाठी वकील शोधत असल्याचं वृत्त आहे. टपालानं आलेल्या मतांना आव्हान देण्याचे त्यांचे प्रयत्न राज्यांच्या पातळीवरील न्यायालयात सुरू होतील, पण त्यानंतर ते राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. पण या खटल्यानं निकालावर मोठा परिणाम होणार नाही, असं अनेक कायदेतज्ज्ञांचं म्हणणं आहे.
काही राज्यांत ट्रंप यांच्या टीमनं फेरमोजणीची विनंती केली आहे पण त्यामुळे निकालावर फारसा परिणाम होण्याची चिन्हं नाहीत.
ट्रंप यांनी पराभव स्वीकारला नाही तर? - बीबीसी नॉर्थ अमेरिका प्रतिनिधी अँथनी झर्कर
डोनाल्ड ट्रंप यांनी आधीच आपण निकालाला आव्हान देऊ असं म्हटलं होतं. हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत, तर त्यांच्यावर सार्वजनिकरित्या पराभव स्वीकारण्याचा दबाव वाढेल. पण त्यांना हे करणं बंधनकारक आहे का?
निवडणुकीत पराभव स्वीकारणाऱ्या उमेदवारानं विजेत्या उमेदवाराला फोन करणं ही अमेरिकन राजकारणातली आदरणीय परंपरा आहे. पण असं करणं बंधनकारक नाही.
2018 साली डेमोक्रॅटिक पक्षाच्या स्टेसी अडम्स यांनी गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता आणि रिपब्लिकन पक्षाच्या ब्रायन केंप यांच्याकडून झालेला पराभव स्वीकारला नव्हता. पण राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र असं झालेलं नाही.
पण जसं जॉर्जियात झालं, तसंच जोवर निकालाची प्रक्रिया कायदेशीरपणे झाली आहे, तोवर सरकारी यंत्रणा ठरल्याप्रमाणेच काम करेल, ट्रंप यांनी काहीही केलं तरी.
ट्रंप यांना पराभव स्वीकारणं किंवा बायडन यांच्या शपथविधीला हजर राहणं बंधनकारक नसलं, तरी त्यांना काही कायदेशीर जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील.
ट्रंप यांना आपल्या प्रशासनाला बायडन यांच्या टीमला सत्तांतरणासाठी तयारी करण्याची परवानगी द्यावी लागेल. ते ट्रंप यांनी आधीच केलं असल्याचं काही अधिकारी सांगतात.
डोनाल्ड ट्रंप यांनी काहीशा अपारंपरिकपणे राष्ट्राध्यक्षपद मिळवलं होतं आणि आपल्या कार्यकाळातही प्रशासनातल्या अनेक परंपरा आणि प्रघात मोडताना दिसले. त्यांनी ठरवलं, तर ते पद सोडतानाही तसंच काही करू शकतात.
कमला हॅरिस सत्तांतरणादरम्यान काय करतील?
कमला हॅरिस, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला बनणार आहेत. त्या या काळात आपल्या हाताखालील कर्मचार्यांची निवड करतील तसंच आधीच्या प्रशासनाकडून त्यांच्या कामाचं स्वरूप समजून घेतील.
उपराष्ट्राध्यक्षाचं कार्यालय व्हाईट हाऊसच्या वेस्ट विंगमध्ये असतं, पण ते तिथे राहात नाही. परंपरेनुसार उपराष्ट्राध्यक्ष यूएस नेव्हल ऑब्झर्वेटरीच्या परिसरातील निवासस्थानी राहतात, जे व्हाईट हाऊसपासून दहा मिनिटांवर आहे.
कमला यांचे पती डग एमहॉफ वकील असून ते मनोरंजन उद्योगत काम करतात. डग यांन पहिल्या पत्नीपासून दोन मुलं झाली आहेत. कोल आणि एला. ते दोघंही कमला यांना प्रेमानं 'मॉमला' अशी हाक मारतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








