FinCEN फाईल्स : HSBC नं इशारा मिळूनही पॉँझी स्कीमचे लाखो डॉलर हस्तांतरित का केले?

- Author, फिन-सीईएन फाईल्स वार्तांकन टीम
- Role, बीबीसी पॅनोरामा
घोटाळ्याबद्दल माहिती मिळालेली असतानाही एचएसबीसीने संबंधित घोटाळेबाजांना लाखो डॉलर लंपास करायला मोकळीक दिली, असं बाहेर आलेल्या गोपनीय दस्तावेजांवरून स्पष्ट होतं.
ब्रिटनमधील या सर्वांत मोठ्या बँकेने अमेरिकेतील आपल्या शाखांमधील पैसा 2013 व 2014 साली एचएसबीसीच्या हाँगकाँगमधील खात्यांकडे फिरवला.
या आठ कोटी डॉलरांच्या घोटाळ्यातील बँकेची भूमिका अलीकडेच बाहेर आलेल्या दस्तावेजांवरून- बँकांच्या "संशयास्पद व्यवहारांसंबंधीचे अहवाल"- उघड झाली असून या दस्तावेजांना 'फिन-सीईएन फाइल्स' (FinCEN Files) असं म्हटलं जातं आहे.
पूर्वीपासूनच अशा प्रकारच्या व्यवहारांबाबत माहिती देऊन आपण आपलं कायदेशीर कर्तव्य बजावलेलं आहे, असं एचएसबीसी म्हणते.
अमेरिकेमध्ये आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणात या बँकेला 1.9 अब्ज डॉलर्सचा दंड झाल्यानंतर लगेचच या गुंतवणूकविषयक घोटाळ्याची सुरुवात झाली, असं संबंधित दस्तावेजांवरून कळतं (बनावट गुंतवणुकीची अशी योजना पॉन्झी स्किम / Ponzi Scheme म्हणून ओळखली जाते). अशा प्रकारच्या व्यवहारांविरोधात कारवाई केली जाईल, असं आश्वासन बँकेने दिलं होतं.
फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांच्या वकिलांचं म्हणणं आहे की, "घोटाळेबाजांची खाती बंद करण्यासाठी बँकेने लवकर कारवाई करायला हवी होती."
बाहेर आलेल्या गोपनीय दस्तावेजांमधून आणखीही काही गौप्यस्फोट झाले आहेत- उदाहरणार्थ, एक अब्ज डॉलरांहून अधिक रक्कम हस्तांतरीत करण्यासाठी एका कुख्यात टोळीतील सदस्याला एका सर्वांत मोठ्या अमेरिकन बँकेने मदत केली असण्याची शक्यता आहे.
फिन-सीईएन फाईल्स म्हणजे काय?
फिन-सीईएन फाइल्स म्हणजे बाहेर फुटलेले 2657 दस्तावेज आहेत, त्यांमध्ये संशयास्पद व्यवहारांसंबंधीचे 2100 अहवाल आहेत.
संशयास्पद व्यवहारांसंबंधीचे अहवाल हे गैरव्यवहाराचा पुरावा नसतात, तर बँकांना त्यांच्या कोणा ग्राहकांचा व्यवहार योग्य वाटला नाही, तर असे अहवाल बँकेकडून अधिकारीसंस्थांकडे पाठवले जातात.
कायद्यानुसार, आपले ग्राहक कोण आहेत, हे बँकांना माहीत हवं- एकीकडे संशयास्पद व्यवहारांबद्दल अहवाल द्यायचे, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांनी ही समस्या हाताळावी अशी अपेक्षा ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला संबंधित ग्राहकांकडून काळा पैसा घेत राहायचा, हे बरोबर नाही. गुन्हेगारी कृत्याचा पुरावा असेल, तर बँकांनी रोकड हस्तांतरित करणं थांबवायला हवं.
जगातील काही सर्वांत मोठ्या बँकांद्वारे पैशांची अफरातफर कशी झाली आणि गुन्हेगारांनी त्यांचा पैसा लपवण्यासाठी निनावी ब्रिटिश कंपन्यांचा वापर कसा केला, हे या बाहेर आलेल्या दस्तावेजांवरून दिसतं.
हे गोपनीय दस्तावेज 'बझफीड' या संकेतस्थळाला पुरवण्यात आले आणि 'इंटरनॅशनल कन्सोर्टिअम ऑफ इनव्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स' (आयसीआयजे) या शोधपत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडेही देण्यात आले. या संदर्भात जागतिक तपासाचा भाग म्हणून पॅनोरामाने बीबीसीकरिता संशोधन केलं.
पनामा पेपर्स व पॅरेडाइस पेपर्स या संदर्भातील वार्तांकन आयसीआयजेच्या पुढाकाराने झालं होतं- श्रीमंत व प्रसिद्ध व्यक्तींच्या परदेशांमधील आर्थिक कारभारांचा तपशील देणारी ही कागदपत्रं होती.
"जगभरातील काळ्या पैशाच्या प्रचंड प्रवाहांबद्दल बँकांना काय माहीत आहे याबद्दलची काही अंतर्दृष्टी फिन-सीईएन फाइल्समधून मिळते. काळ्या पैशाच्या प्रवाहांचं नियमन करण्यासाठी असलेली व्यवस्था मोडून पडली आहे", असं आयसीआयजे या संस्थेतील फर्ग्यूस शिएल यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेच्या फायनान्शिअल क्राइम्स एन्फोर्समेन्ट नेटवर्ककडे सादर करण्यात आलेल्या गोपनीय कागदपत्रांमध्ये किंवा फिन-सीईएनमध्ये 2000 ते 2017 या कालावधीमधील सुमारे दोन ट्रिलियन डॉलर इतकं मूल्य असलेल्या व्यवहारांचा समावेश आहे.
या गौप्यस्फोटाचा परिणाम अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेवर होऊ शकतो, तपासामधील धोका वाढू शकतो आणि हे अहवाल सादर केलेल्यांची सुरक्षितताही गोत्यात येऊ शकते.
पण आपल्या आर्थिक अफरातफरविरोधी कार्यक्रमांमध्ये सुधारणा करण्यासाठीचे प्रस्ताव त्यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केले.
घोटाळे आणि आर्थिक अफरातफर यांवर कारवाई करण्यासाठी कंपनीविषयक माहितीच्या नोंदपटामध्ये सुधारणा करण्याची योजनाही युनायटेड किंगडमने जाहीर केली आहे.
बनावट योजना काय होती?
एचएसबीसीला ज्या गुंतवणूकविषयक घोटाळ्याची माहिती मिळाली होती, त्याला 'डब्ल्यूसीएम777' असं संबोधलं होतं. या प्रकरणामध्ये गुंतवणूकदार रेनाल्डो पाशिको यांचा मृत्यू झाला. एप्रिल 2014 मध्ये कॅलिफोर्नियातील नापा इथे एका वाइन इस्टेटीत त्यांचं शव पाण्याखाली बुडाल्याचं आढळलं होतं.

फोटो स्रोत, HANDOUT
त्यांना दगडांनी वारंवार मारहाण झाली होती, असं पोलीस म्हणाले.
त्यांनी या योजनेवर स्वाक्षरी केली होती आणि इतर गुंतवणूकदारांनाही ते यात सहभागी करून घेणार होते. प्रत्येक जण श्रीमंत होईल, असं आश्वासन देण्यात आलं होतं.
पाशेको (वय 44) यांनी सदर योजनेमध्ये सहभागी करून घेतलेल्या एका महिलेने सुमारे तीन हजार डॉलर गमावले. या संदर्भात त्यांचं अपहरण करण्यासाठी आलेल्या भाडोत्री गुंडांनी पाशेको यांची हत्या केली.
"ते खरोखरच लोकांचं जीवन अधिक चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करत होते, पण त्यांनाच घोटाळ्यात अडकवण्यात आलं आणि फसवण्यात आलं. दुर्दैवाने त्यांना स्वतःची जीव गमावून याची किंमत मोजावी लागली," असं या खुनाचा तपास करणारे एक अधिकारी सार्जन्ट ख्रिस पाशेको (मृताशी नातं नाही) यांनी सांगितलं.
"या घोटाळ्यामधील एक पीडित असल्यामुळे रेनाल्डो यांचा खून झाला," असं हे अधिकारी म्हणाले.
या योजनेमध्ये कशाचं आश्वासन देण्यात आलं होतं?
चिनी नागरिक मिंग क्शू याने ही योजना सुरू केली. तो अमेरिकेत राहायला कसा आला याबद्दल फारशी माहिती नाही. पण कॅलिफोर्नियामध्ये आपण एम. ए. चा अभ्यास केल्याचा दावा तो करतो.
लॉस एंजेलीसमध्ये तळ ठोकून क्शू याने- किंवा त्याने धारण केलेल्या नावानुसार "डॉ. फिल"ने- ख्रिस्ती चर्चचा धर्मोपदेशक असल्याची बतावणी केली.
वर्ल्ड कॅपिटल मार्केट अशी एक जागतिक गुंतवणूक बँक आपण चालवतो आहोत, आणि त्या अंतर्गत शंभर दिवसांमध्ये शंभर टक्के नफा दिला जाईल, असं क्शूने सांगितलं होतं. वास्तवामध्ये तो 'डब्ल्यूसीएम777' ही बनावट गुंतवणूक योजना चालवत होता.

फोटो स्रोत, FACEBOOK
विविध परिसंवादांसाठी प्रवास करून, फेसबुकवरून आणि यू-ट्यूबवरच्या व्याख्यानांमधून या योजनेखाली क्लाउड कम्प्युटिंगमधील कथित गुंतवणुकीच्या संधी विकून आठ कोटी डॉलर उभे करण्यात आले.
आशियाई व लॅटिन समुदायांमधील हजारो लोकांनी यात सहभाग घेतला. घोटाळेबाजांनी ख्रिस्ती प्रतिमांचा वापर केला आणि अमेरिका, कोलंबिया व पेरू इथल्या गरीब समुदायांना लक्ष्य केलं. युनायटेड किंगडमसह इतर देशांमध्येही या योजनेतील पीडित लोक आहेत.
'डब्ल्यूसीएम777'चा तपास आपण सप्टेंबर २०१२पासून करत होतो आणि आपल्या भागातील रहिवाशांना या घोटाळ्याबद्दल सावधही केलं होतं, असं कॅलिफोर्नियातील नियामकांनी एचएसबीसीला सांगितलं
नोंदणीकृत नसलेल्या गुंतवणुकी विकल्याबद्दल डब्ल्यूसीएमविरोधात कॅलिफोर्निया, आणि कोलॅराडो व मॅसेच्युसेट्स इथे कारवाई करण्यात आली.
आपल्या व्यवस्थेतून शंकास्पद व्यवहार होत असल्याचं एचएसबीसीच्या लक्षात आलं होतं. पण अनेरिकेतील वित्तीय नियामकसंस्था 'सिक्युरिटीज् अँड एक्सेन्ज कमिशन'ने या प्रकरणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर, एप्रिल 2014 मध्ये एचएसबीसीने हाँगकाँगच्या आपल्या शाखेतील 'डब्ल्यूसीएम777'ची खाती बंद केली.
तोवर ही खाती रिकामी झालेली होती.
संशयास्पद व्यवहारांसंबंधीच्या अहवालांमधून काय दिसतं?
या घोटाळ्यासंदर्भात पहिला 'संशयास्पद व्यवहारांसंबंधीचा अहवाल' एचएसबीसीने 20 ऑक्टोबर 2013 रोजी दाखल केला. हाँगकाँगमधील घोटाळेबाजांच्या खात्यांवर 60 लाख डॉलरांहून अधिक रक्कम पाठवण्यात आल्याची माहिती या अहवालात दिलेली होती.
या व्यवहारांमागे "सकृत्दर्शनी कोणताही आर्थिक, व्यावसायिक किंवा कायदेशीर उद्देश नव्हता", असं बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि "बनावट गुंतवणूक योजनेतील व्यवहारां"संदर्भातील आरोपही त्यांनी नमूद केले होते.
दुसरा 'संशयास्पद व्यवहारांसंबंधीचा अहवाल' फेब्रुवारी 2014मध्ये सादर झाला, त्यात 154 लाख डॉलर संशयास्पद व्यवहारांची नोंद होती आणि "संभाव्य बनावट गुंतवणूक योजना" असा उल्लेख होता.
तिसरा अहवाल मार्च महिन्यात सादर झाला, तो 'डब्ल्यूसीएम 777' या कंपनीशी निगडित होता आणि त्यात जवळपास 92 लाख डॉलरांच्या व्यवहाराची माहिती होती. अमेरिकेतील राज्यांमध्ये या संदर्भात नियामक कारवाई झाली आहे आणि कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांनी या संदर्भात तपासाचे आदेश दिले आहेत, असंही अहवालात नमूद केलं होतं.
एचएसबीसीने काय केलं?
मेक्सिकन अंमली पदार्थातील शक्तिशाली घटकांनी आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी एचएसबीसीला अमेरिकेमध्ये फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागलं, त्यानंतर काही महिन्यांमध्येच 'डब्ल्यूसीएम777 गुंतवणूक योजनेचा घोटाळा सुरू झाला. आपल्या प्रक्रियेमध्ये सुधारणा केली जाईल, असं आश्वासन दिल्यानंतरही बँकेने हे कृत्य केलं.
हाँगकाँगमधील खात्यांमधून 2011 ते 2017 या कालावधीमध्ये 1.5 अब्ज डॉलरहून अधिक रकमेचे संशयास्पद व्यवहार होत असल्याचं एचएसबीसीने ओळखलं होतं, आणि त्यातील सुमारे 90 कोटी डॉलर एकंदरित गुन्हेगारी कृत्यांशी संबंधित होते, असं आयसीआयजेच्या विश्लेषणातून दिसून येतं.
परंतु, ग्राहकांविषयीची कळीची माहिती बँकेच्या अहवालांमध्ये समाविष्ट केलेली नव्हती. या खात्यांचे अंतिम लाभधारक कोण आणि हा पैसा कुठून आला, असा तपशील त्यात नव्हता.
संशयास्पद व्यवहारांसंबंधीच्या अहवालांबाबत बोलायची मुभा बँकांना नसते.
एचएसबीसीने म्हटलं आहे की: "साठहून अधिक कार्यक्षेत्रांमध्ये वित्तीय गुन्ह्यांविरोधात लढण्याची आपली क्षमता सुधारण्याचा काही वर्षांचा प्रवास एचएसबीसीने 2012 सालापासून सुरू केला... (त्यामुळे) 2012पेक्षा आता एचएसबीसी ही अधिक सुरक्षित संस्था झालेली आहे."
"(अमेरिकी कायदासंस्थांशी केलेल्या करारानुसार) सर्व दायित्वांची पूर्तता बँकेने केली होती," असं अमेरिकेतील अधिकारीसंस्थांनी स्पष्ट केल्याचंही बँकेने म्हटलं होतं.
शेवटी 2017 साली चिनी प्रशासनाने क्शूला अटक केलं आणि या घोटाळ्यासंदर्भात तीन वर्षांचा तुरुंगवास ठोठावला.

फोटो स्रोत, FBI
चीनवरून आयसीआयजेशी बोलताना क्शू म्हणाला की, त्याच्या व्यवहारासंदर्भात एचएसबीसीने त्याच्याशी संपर्क साधला नव्हता. 'डब्ल्यूसीएम777' ही बनावट गुंतवणुकीची योजना असल्याचं त्याने नाकारलं. अमेरिकेतील सिक्युरिटी अँड एक्सेंज कमिशनने या योजनेला चुकीच्या रितीने लक्ष्य केलं; कॅलिफोर्नियात 400 एकरांदरम्यान विस्तार असलेल्या जमिनीवर धार्मिक समुदाय निर्माण करण्याचं आपलं ध्येय होतं, असं क्शूचं म्हणणं आहे.
'पॉन्झी स्किम' म्हणजे काय?
विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा एक लफंगा इसम चार्ल्स पॉन्झी याच्या नावावरून पॉन्झी स्किम या शब्दप्रयोगाची सुरुवात झाली. या योजनेखाली जमा करण्यात आलेल्या रोख रकमेवर नफा कमावला जात नाही, तर नवीन गुंतवणूकदारांकडून येणाऱ्या पैशातून आधीच्या गुंतवणूकदारांना मोबदला दिला जातो.
हा व्यवहार तारून नेण्यासाठी अधिकाधिक गुंतवणूकदार गरजेचे असतात. दरम्यान, योजनेचे कर्ते हा पैसा स्वतःच्या खात्यांवर टाकत राहतात.
पुरेसे नवीन गुंतवणूकदार मिळाले नाहीत, तर अशी 'पॉन्झी योजना' कोसळून पडते.
गौप्यस्फोटांमधून आणखी काय सापडलं?
रशियन माफियातील एका बड्या धेंडाला आपल्या वित्तीय व्यवस्थेद्वारे एक अब्ज डॉलरांहून अधिक रक्कम फिरवण्यासाठी जेपी मॉर्गन या बहुराष्ट्रीय बँकेने मदत केली असावी, असं फिन-सीईएन फाइल्समधून स्पष्ट झालं.
बंदुकी व अंमली पदार्थांची तस्करी आणि खून अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या सेमिअन मॉगिलेविच असं या रशियन माफियाचं नाव आहे.
त्याला वित्तीय व्यवस्थेचा वापर करू देता कामा नये, पण त्याचं खातं बंद झाल्यानंतर 2015 साली जेपी मॉर्गनने दाखल केलेल्या 'संशयास्पद व्यवहारासंबंधीच्या अहवाला'नुसार या बँकेच्या लंडनमधील कार्यालतून काही रक्कम मॉगिलेविचच्या खात्यावर पाठवण्यात आली होती.
एबीएसआय एन्टरप्रायझेस या नावाच्या एका गोपनीय परदेशी कंपनीला 2012 ते 2013 या कालावधीमध्ये जेपी मॉर्गनने बँकिंगची सेवा पुरवली, पण संबंधित कंपनीच्या मालकीविषयी पुरेशी स्पष्ट माहिती बँकेला नव्हती, हेही या अहवालामध्ये नमूद केलं आहे.
पाच वर्षांच्या एका विशिष्ट कालटप्प्यामध्ये जेपी मॉर्गनने एकूण 1.02 अब्ज डॉलर इतकी रक्कम वायर ट्रान्सफरद्वारे पाठवली व स्वीकारली, असं बँकेने म्हटलं आहे.
एबीएसआयची पालक कंपनी "एफबीआयच्या 'टॉप 10 मोस्ट वॉन्टेड' यादीमधील सेमिअन मोगिलेविच या इसमाशी संबंधित असण्याची शक्यता आहे," असं सदर 'संशयास्पद व्यवहारासंबंधीच्या अहवाला'मध्ये म्हटलं आहे.
जेपी मॉर्गनने या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की: "वित्तीय गुन्हेगारीशी लढण्यासाठी सरकारी कामाला पाठबळ देणारे सर्व कायदे व नियमनं आम्ही पाळतो. या महत्त्वाच्या कामासाठी आम्ही हजारो लोक ठेवले आहेत आणि यावर आम्ही लाखो डॉलर खर्च करतो."
जगभरात प्रमुख बँका गुन्हेगारांना गलिच्छ पैसा फिरवण्याची मुभा कशी देतात, हे फिन-सीईएन फाइल्स या दस्तावेजांच्या गौप्यस्फोटातून स्पष्ट झालं आहे. या वित्तीय व्यवस्थेमध्ये युनायटेड किंगडम हा अनेकदा दुबळा दुवा ठरतो आणि लंडनमध्ये रशियन रक्कम भरलेली आहे, हे यातून उघड झालं.
'बझफीड'ने या फाइल्स मिळवल्या आणि 'इंटरनॅशनल कन्सॉर्टिअम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स' (आयसीआयजे) या शोधपत्रकारांच्या संस्थेला व जगभरातील 400 पत्रकारांना हा तपशील उपलब्ध करून दिला. बीबीसीच्या वतीने या संदर्भात संशोधन करण्याचं काम पॅनोरामाने केलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








