अमेरिका हिंसाचार: जॉर्ज फ्लॉईड यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल, पण हिंसाचार सुरूच

फोटो स्रोत, Reuters
एका कृष्णवर्णीय अमेरिकन व्यक्तीचा पोलिसांकडून मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेत अनेक शहरांमध्ये हिंसाचार पेटला आहे.
सोमवारी मिनिआपोलिस शहरात 46 वर्षीय जॉर्ज फ्लॉइड यांच्या गळ्यावर गुडघा ठेऊन बसलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा व्हीडिओ बाहेर आल्यानंतर व्हायरल झाला होता. यामध्ये जॉर्ज आपल्याला श्वास घेता येत नसल्याचं या पोलिसाला सांगतानाही दिसत आहेत.
या प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलंय. तर डेरेक शॉविन या 44 वर्षीय श्वतेवर्णीय अधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शॉविन यांना सोमवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, अमेरिकेत मिनेसोटा, न्यू यॉर्क आणि अटलांटा भागात मोठा हिंसाचार उफाळला असून, काही काळासाठी व्हाईट हाऊस परिसरही लॉकडाऊन करण्यात आला होता.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ही घटना "खूप, खूप भयंकर" असल्याचं म्हटलं असून, ते म्हणाले की ते मृत फ्लॉईड यांच्या घरच्यांशी बोलले आहेत.
अमेरिकेत पोलिसांकडून कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिकांवर होणारे अत्याचार नेहमीच तणावाचा विषय राहिले आहेत, आणि या घटनांविषयीची खदखद या प्रकरणामुळे पुन्हा एकदा उफाळून आलीय. काही दिवसांपूर्वी केंटकीमध्येही असंच ब्रिओना टेलर प्रकरण घडलं होतं.
'अतोनात नासधूस'
अमेरिकेत मिनेसोटा हे हिंसाचाराचं प्रमुख केंद्र बनलेलं आहे. इथल्या मिनिआपोलिस-सेंट पॉल या दोन शेजारी शहरांमध्ये शनिवारपर्यंत संचारबंदी लादण्यात आली आहे.
पण आंदोलकांनी हा कर्फ्यू मोडत शुक्रवारी मिनिआपोलिसमधलं एक पोलीस स्टेशन पेटवून दिलं. तसंच अनेक गाड्या पेटवून दिल्या. काही ठिकाणी जमाव दुकानं लुटतानाचे व्हीडिओ व्हायरल झाले असून, या परिसरात पोलीस फार कमी प्रमाणात दिसत होते.

फोटो स्रोत, Getty Images
"हे आंदोलक जॉर्ज यांच्या नावाला काळिमा फासण्याचं कृत्य करत आहेत," असं म्हणत राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी नॅशनल गार्डला परिस्थिती नियंत्रणात आणायला सांगितलंय.
तर मिनेसोटाच्या गव्हर्नरनी "ही परिस्थिती मूळ घटनेपासून आता भलतीकडेच चालली आहे, लोक अतोनात नासधूस करत आहेत," असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, EPA
या प्रकरणाचं वार्तांकन करणाऱ्या CNNच्या पत्रकारांना शुक्रवारी ते लाईव्ह असतानाच अटक करण्यात आली. पोलिसांनी सूचना देऊनही ते जागेवरून न हलल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. मिनिआपोलिसच्या गव्हर्नरनी या अटकेबद्दल माफी मागितल्यानंतर तासाभराने या टीमला सोडून देण्यात आलं.
या घटनेचा निषेध अमेरिकेच्या न्यूयॉर्क, लॉस अँजेलिस, शिकागो, डेन्व्हर, फिनीक्स आणि मेम्फीस या शहरांमध्येही करण्यात आलाय.
डोनाल्ड ट्रंप यांचं ट्वीट वादात
तर डोनाल्ड ट्रंप यांनी याविषयी केलेलं ट्वीट वादात सापडलंय. 'When the looting starts, the shooting starts' असं ट्वीट ट्रंप यांनी केलं होतं. हे ट्वीट "हिंसाचाराचं उदात्तीकरण" करत असल्याचं ट्विटरने म्हटलं, मात्र "जनहितार्थ" ते काढलं नाही.
युनाटेड नेशन्सच्या मानवी हक्क प्रमुख मिशेल बॅशलेट यांनीही फ्लॉईड यांच्या मृत्यूचा निषेध केलाय.

फोटो स्रोत, Twitter Ruth Richardson
तर फ्लॉईड यांचा व्हिडिओ पाहून राष्ट्राध्यक्ष ट्रंप व्यथित झाल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कायली मॅकएनानी यांनी पत्रकारांना सांगितलं होतं. "या प्रकरणी न्याय मिळावा अशी त्यांची इच्छा आहे," त्यांनी सांगितलं.
जॉन बोएगा, लब्रॉन जेम्स, बियॉन्से आणि जस्टीन बिबर या सेलिब्रिटींनीही या घटनेचा निषेध केलाय.
जॉर्ज फ्लॉईड यांच्यासोबत काय घडलं?
बनावट चलनाविषयीची एक तक्रार मिनिआपोलिसच्या पोलिसांकडे आली होती. यावर कारवाई करणाऱ्या पोलिसांनी सोमवारी फ्लॉईड यांची गाडी रोखली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार - त्यांना कारपासून दूर जाण्यास सांगण्यात आलं, याचा त्यांनी प्रतिकार केल्यानंतर त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या.

फोटो स्रोत, Getty Images
या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा वाद नेमका सुरू कसा झाला हे दिसत नाही. पण जॉर्ज फ्लॉईड जमिनीवर पडलेले आहेत आणि एक श्वेतवर्णीय अधिकारी त्यांच्या गळ्यावर गुडघा दाबून बसल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. "प्लीज, मला श्वास घेता येत नाहीये," आणि "माझा जीव घेऊ नका," अशी विनवणी फ्लॉईड करत आहेत.
डेरीक शॉव्हिन, टू थाओ, थॉमस लेन आणि जे अलेक्झांडर क्युएंग हे चौघे ऑफिसर या घटनेशी संबंधित असल्याचं उघडकीला आलंय.
यापैकी डेरीक शॉव्हिन हे फ्लॉईड यांच्या अंगावर गुडघा दाबून बसल्याचं स्थानिक माध्यमांनी म्हटलंय.
हे सगळे पोलीस अधिकारी चौकशीसाठी सहकार्य करत असल्याचं मिनिआपोलिस पोलीस ऑफिसर्स फेडरेशनने म्हटलंय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








