Mary Somerville: गुगलद्वारे डुडलचा सन्मान मिळालेल्या मेरी सॉमरविलेविषयी 9 गोष्टी

फोटो स्रोत, Google
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
गणितज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ज्ञ मेरी सॉमरविल यांच्यावर गूगलनं होमपेजवर डूडल प्रकाशित केलाय.
विज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये मेरी सॉमरविल यांनी बहुमूल्य काम केलं, संशोधन केलं, त्यावर आधारित पुस्तकं लिहिली. 19व्या शतकातील 'क्वीन ऑफ सायन्स' म्हणून मेरी सॉमरविल यांना ओळखलं जातं.
विज्ञानच नव्हे तर त्यांनी अनेक क्षेत्रात योगदान दिलं आहे. त्याविषयी आपण जाणून घेऊ.
1. शोधनिबंध सादर करणारी पहिली महिला
आजच्या दिवशी 194 वर्षांपूर्वी म्हणजे 2 फेब्रुवारी 1826 रोजी ब्रिटनमधील राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या रॉयल सोसायटी ऑफ लंडननं मेरी सॉमरविले यांची भौतिकशास्त्रावरील संशोधन वाचलं गेलं.
हे संशोधनपर लेखन पुढे 'फिलॉसॉफिकल ट्रान्झॅक्शन्स' या नियतकालिकात प्रकाशित झालं. हे नियतकालिक जगातील सर्वांत जुनं आणि मानाचं समजलं जातं. अजूनही हे नियतकालिक प्रकाशित होतं. या नियतकालिकात संशोधन प्रकाशित झालेल्या मेरी सॉमरविल या जगातील पहिल्या महिला लेखिका ठरल्या.
2. कौटुंबिक पार्श्वभूमी
मेरी सॉमरविल यांचा स्कॉटलंडच्या जेडबर्ग इथं 26 डिसेंबर 1790 साली झाला. अत्यंत हुशार आणि बुद्धिमान समजल्या जाणाऱ्या मेरी सॉमरविल या युनायटेड किंग्डमच्या नौसेनेचे (रॉयल नेव्ही) व्हाईस अॅडमिरल राहिलेले सर विल्यम जॉर्ज फेअरफॅक्स हे मेरी सॉमरविल यांचे वडील. मात्र आई-वडिलांनी मेरी यांच्या शिक्षणाला पाठिंबा दिला नव्हता.
मेरी सॉमरविल या बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांना भूमितीची आवड निर्माण झाली होती. पुढे खगोलशास्त्र आणि गणित या विषयांमधील रस वाढत गेला आणि त्यातच संशोधन करण्याचं त्यांनी ठरवलं.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, आधी आई-वडील आणि लग्नानंतर पहिल्या पतीनेही मेरी यांना त्यांच्या संशोधनासाठी, शिक्षणासाठी पुरेसा पाठिंबा दिला नाही.
3. दुसऱ्या लग्नानंतर संशोधनाला गती
1804 साली नातेवाईक असलेल्या लेफ्टनंट सॅम्युअल ग्रेग यांच्याशी मेरी यांचं लग्न झालं आणि त्या लंडनमध्ये स्थायिक झाल्या. त्यांना दोन मुलं झाली. मेरी यांच्या शिक्षणाबाबत पती सॅम्युअल हे फारसे सकारात्मक नव्हते. महिलांच्या शिक्षणाच्या क्षमतेबाबत ते काही प्रमाणात संकुचित होते.
1807 साली सॅम्युअल ग्रेग यांचा मृत्यू झाला. सॅम्युअल यांच्या मृत्यूनंतर मेरी सॉमरविल आपल्या मुलांसह स्कॉटलंडला परतल्या आणि त्यांनी विल्यम सॉमरविल यांच्याशी दुसरं लग्न केलं. त्यानंतर खऱ्या अर्थानं मेरी यांना त्यांच्या संशोधनासाठी प्रोत्साहन मिळालं.
मेरी सॉमरविल यांना शिक्षण आणि आपल्या आवडीच्या संशोधनासाठी सुरुवातीला अडथळे आले असले, तरी दुसऱ्या लग्नानंतर त्यांचा संशोधनाचा वेग वाढला. त्या एडिनबर्ग, लंडन येथील बुद्धिवंतांना भेटल्या.
4. नेपच्युनबाबत अंदाज
युरेनस ग्रहाच्या कक्षेत आणखी काहीतरी गोष्ट आहे, जे कदाचित आणखी एक ग्रह असू शकेल, असं मेरी सॉमरविल यांनी म्हटलं होतं आणि पुढे त्यांचा अंदाज खराही ठरला. तो नेपच्युन ग्रह असल्याचं पुढे कळलं.

फोटो स्रोत, Getty Images
5. सौर ऊर्जेवर पुस्तक
मेरी सॉमरविल यांच्या पुस्तकांची सर्वाधिक चर्चा तेव्हाही झाली आणि आजही होते. 1831 साली लिहिलेल्या 'The Mechanism of the Heavens' पुस्तकानं सौर यंत्रणा समजून घेण्यास मदत झाली.
1834 साली प्रकाशित झालेलं 'The Connection of the Physical Sciences' हे पुस्तक तर 19 व्या शतकातील बेस्ट सेलर ठरलं. याच पुस्तकातील मांडणीतून नेपच्युन ग्रहाचे संकेत मिळाले होते.
6. महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी चळवळ
मेरी सॉमरविल या स्त्री हक्कांच्या पुरस्कर्त्या होत्या. 1866 साली ज्यावेळी तत्त्वज्ञ आणि विचारवंत जॉन स्टुअर्ट मिल यांनी महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी यूकेच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये याचिका सादर केली. या याचिकेवर सर्वात पहिली स्वाक्षरी मेरी सॉमरविल यांनी केली होती.
7. रॉयल सोसायटीच्या पहिल्या महिला सभासद
जर्मन भौतिकशास्त्रज्ज्ञ कॅरोलिन हर्शेल यांच्यासह मेरी सॉमरविले या रॉयल अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या सदस्या बनल्या. या दोघीही या सोसायटीच्या पहिल्या महिला सदस्या ठरल्या.
8. महिला शिक्षणाच्या पुरस्कर्त्या
महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रचंड प्रयत्न केले. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार त्यांनी केला. 1872 साली मेरी सॉमरविले यांचं निधन झाल्यानतर त्याच वर्षी ऑक्स्फर्ड विद्यापीठाच्या एका महाविद्यालयाचे नाव 'सॉमरविल कॉलेज' असं करण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
याच कॉलेजमध्ये भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थेचर शिकल्या.
9. रॉयल जिओग्राफिकल सोसायटीकडून सन्मान
लेखिका, भौतिकशास्त्रज्ज्ञ, गणितज्ज्ञ अशा विविध पदव्यांनी हयातीत आणि त्यानंतर जगभर परिचयाच्या झालेल्या मेरी सॉमरविले यांनी 29 नोव्हेंबर 1872 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
मेरी सॉमरविल यांना 1869 साली रॉयल जिओग्राफिकल सोसायटीचं मरणोत्तर पॅट्रोन्स मेडलनं गौरवण्यात आलं.

(मेरी सॉमरविले यांच्याविषयी या लेखात देण्यात आलेली माहिती बीबीसीच्या रेडिओ 4 या कार्यक्रमातून घेण्यात आली आहे.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









