स्कॉट मॉरिसन: ऑस्ट्रेलियातील वणव्याबद्दल पंतप्रधानांनी मागितली माफी

ऑस्ट्रेलियातील वणवा

फोटो स्रोत, Getty Images

सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियात सतत वणवा धगधगतोय. आतापर्यंत 1200 घरं या आगीत जळून खाक झाली असून 18 जणांचा बळी गेला आहे..

न्यू साऊथ वेल्स राज्याला या वणव्यांचा सगळ्यात जास्त फटका बसला असून इथला मोठा भूभाग आतापर्यंत आगीच्या विळख्यात सापडलेला आहे.

ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या आगीत 28 लोकांचा मृत्यू झाला आहे. दोन हजार घरांचं नुकसान झालं असून परिस्थिती आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत.

या आगीमुळे वातावरणात प्रचंड प्रमाणात बदल घडत आहेत. या महिन्यात सिडनेचं तापमान 49 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलं आ. 2017 पासून साऊथ वेल्स आमि क्वीन्सलँड भागात पावसाचं प्रमाण सातत्याने कमी होत आहे. पाऊस कमी झाल्यामुळे तिथल्या शेती उत्पादनावर फरक पडलाय आणि यामुळे आग प्रचंड पसरली.

या आगीमुळे ऑस्ट्रेलियातील जनता पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. सध्या वातावरण प्रचंड भावनिक आहे तसंच हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळता आलं असतं अशी कबुली त्यांनी दिली आहे.

का पेटताहेत वणवे?

कोरडी हवा, दीर्घकाळापासून असलेला दुष्काळ, वाढलेलं तापमान आणि जोरदार वारे या सगळ्या गोष्टींचा एकत्र परिणाम म्हणून हे वणवे लागत आहेत आणि झपाट्याने पसरत आहेत.

यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे Indian Ocean Dipole. म्हणजे हिंदी महासागरामध्ये निर्माण झालेले दोन भिन्न तापमानाचे प्रवाह. यामध्ये हिंदी महासागराच्या आफ्रिकेकडील बाजूचं पाणी हे तुलनेने गरम आहे.

यामुळे याभागातल्या पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. पूर्व आफ्रिकेच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा 300 टक्के जास्त पाऊस पडलेला आहे. परिणामी इथे पुराची समस्या निर्माण झाली आहे.

याच्या अगदी उलट हिंदी महासागराच्या ऑस्ट्रेलियाजवळच्या भागातलं पाणी थंड आहे. याचा परिणाम इथल्या मान्सूनवर झालाय. ऑस्ट्रेलियातला मान्सून मंदावलेला आहे.

वणवा

फोटो स्रोत, EU COPERNICUS SENTINEL DATA/REUTERS

हा वसंत ऋतू (Spring) ऑस्ट्रेलियातला गेल्या काही वर्षांतला सर्वात कोरडा आणि सर्वात उष्ण कालावधी होता.

गेल्या अनेक वर्षांपासून ऑस्ट्रेलियाच्या काही भागांमध्ये दुष्काळ आहे. शिवाय सध्या या काळात ऑस्ट्रेलियात दिवस मोठा असतो. त्यामुळे सूर्यप्रकाश जास्त तासांसाठी असतो. परिणामी आधीच कोरडी असणारी जमीन जास्त तापते.

दुसरी गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेकडून वाहणारे वारे. एरवी हे वारे ऑस्ट्रेलियाच्या भूभागाच्या दक्षिणेकडील समुद्रावरून वाहतात.

पण यावर्षी हे वारे (Southern Annular Mode) बऱ्याच वरच्या बाजूला आणि आस्ट्रेलियाच्या दक्षिण भूभागाच्या अगदी जवळून वाहत आहेत.

व्हीडिओ कॅप्शन, वणव्यात सापडलेल्या कोआलाला कसं वाचवलं?

पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या या कोरड्या आणि जोरदार वाऱ्यांमुळेही वणवे झपाट्याने पसरत आहेत.

वाढतं तापमान

गेल्या शतकभरामध्ये (1910 -2018) ऑस्ट्रेलियाच्या एकूण सरासरी तापमानामध्ये 1 अंश सेल्सियसची वाढ झाल्याचं आढळलंय.

एरवी जानेवारी आणि फेब्रुवारी या उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये ऑस्ट्रेलियामधलं दिवसातलं तापमान वाढतं. पण यावर्षी मात्र डिसेंबर 2019 मध्येच उच्चांकी तापमान नोंदवण्यात आलं होतं. 18 डिसेंबरला Nullarbor इथे 49.9 अंश सेल्शियस तापमानाची नोंद झाली.

वणव्यांचा परिणाम

वणवे नियंत्रणाबाहेर गेल्याने अनेक शहरांमध्ये अग्निशामक दलाने धोक्याचे इशारे दिले आहेत.

आतापर्यंत हजारो लोकांनी आपलं घर सोडून शहरातून बाहेरचा रस्ता धरला आहे. तर ज्यांनी आता रस्त्याच्यामार्गे बाहेर पडण्याचा प्रयत्न करणं धोक्याचं ठरू शकतं, अशांना बीचवर वा किनारपट्टीजवळ आसरा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

व्हिक्टोरियातल्या मालाकूटाजवळ मंगळवारी अशा हजारो लोकांनी आसरा घेतला होता. नौदलाच्या बोटीने या सगळ्यांची सुटका करण्यात येणार होती.

बोटीद्वारे पोलिसांनी या लोकांना 1.6 टन पाणी, अन्न, औषधं पोहोचवली आहेत. वणव्यांमुळे अनेक ठिकाणी दिवसाढवळ्या आकाश काळवंडलेलं आहे.

ऑस्ट्रेलियातील वणवा

फोटो स्रोत, VICTORIA POLICE

या वणव्यांचा धूर जोरदार वाऱ्यांमुळे दूरवर पोहोचत असल्याने कॅनबेरामधल्या हवेचा दर्जा खालावलेला आहे.

ऑस्ट्रेलियामधली टपाल सेवा अनिश्चित कालावधीपर्यंत थांबवण्यात आलेली आहे.

बुधवारी लागलेले काही वणवे तर इतके मोठे आहेत की 2000 किलोमीटर्सपेक्षाही जास्त दूर असणाऱ्या न्यूझीलंडच्या साऊथ आयलंड भागातून हे वणवे दिसत होते.

या वणव्यांमुळे साऊथ आयलंडमधलं आकाश नारिंगी रंगाचं झालं होतं.

फेब्रुवारी 2009मध्ये ऑस्ट्रेलियात सर्वात भयानक वणवा पेटला. या दुर्घटनेत व्हिक्टोरियामध्ये 180 जणांचा बळी गेला होता. या दुर्घटनेला - ब्लॅक सॅटर्डे म्हटलं जातं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)