#HowdyModi: नरेंद्र मोदींचं अमेरिकेत होणार भव्य स्वागत, 'हाऊडी मोदी'चा ट्रेंड

फोटो स्रोत, Reuters
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रंप हे अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये 22 सप्टेंबरला होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात एकत्र सहभागी होणार आहेत.
'हाऊडी, मोदी!' ( Howdy, Modi!) नावाच्या या कार्यक्रमामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही सामील होणार असल्याचं व्हाईट हाऊसने रविवारी सांगितलं.
अमेरिकेत एकमेकांना खेळकरपणे वा मित्रत्वाने अभिवादन करण्यासाठी हाऊडी (Howdy) हा शब्द वापरला जातो.
'हाऊडी, मोदी!' नावाचा हा कार्यक्रम ह्यूस्टनमधल्या एनआरजी स्टेडियममध्ये होणार असून यामध्ये पन्नास हजार भारतीय वंशाचे अमेरिकन सहभागी होणार असल्याचं म्हटलं जातंय. अमेरिकेमध्ये होणाऱ्या कोणत्याही परदेशी नेत्याच्या कार्यक्रमासाठी येणारी ही सर्वांत मोठी प्रेक्षक संख्या असल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Reuters
ट्रंप यांच्या सहभागाविषयी जाहीर करताना व्हाइट हाऊसने म्हटलं, "दोन्ही देशांतल्या लोकांदरम्यानचे संबंध मजबूत करण्यावर भर देण्यासाठी, जगातल्या सर्वांत जुन्या लोकशाहीसोबत धोरणात्मक संबंध दृढ करण्यासाठी आणि ऊर्जा आणि व्यापारी संबंध मजबूत करण्यासाठीच्या पर्यायांचा विचार करण्यासाठी ही चांगली संधी असेल."
अमेरिकेत पुढच्या वर्षी निवडणूक होणार आहे आणि भारतीय - अमेरिकन लोकांचं मन वळवण्याचा प्रयत्न ट्रंप करतील.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं हे पाऊल म्हणजे अमेरिका आणि भारतामधल्या विशेष मैत्रीचं प्रतीक असल्याचं नरेंद्र मोदींनी ट्वीट केलंय.

फोटो स्रोत, @NarendraModi
या कार्यक्रमासाठी ट्रंप येणार असल्याने आपण खुश असून भारतीय वंशाच्या लोकांसोबत त्यांचं स्वागत करण्याची आपल्याला आशा असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
भारतीय समाजाचं अमेरिकन समाज आणि अर्थव्यवस्थेतलं योगदान यावरून दिसून येत असल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
सोमवार सकाळपासून ट्विटरवर #HowdyModi आणि Houston हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. मे महिन्यामध्ये पंतप्रधानपदी परत निवडून आल्यानंतर नरेंद्र मोदींचा हा अमेरिकेतला अशा प्रकारचा पहिला कार्यक्रम आहे. याआधी 2014मध्ये न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअरमध्ये दोन कार्यक्रम झाले होते. तर 2016मध्ये सिलिकॉन व्हॅलीमध्ये एक कार्यक्रम झाला होता.
मोदी आणि ट्रंप यांची या वर्षातली तिसरी भेट असेल. गेल्या महिन्यात फ्रान्समध्ये जी-7 परिषदेदरम्यानही या दोन नेत्यांची भेट झाली होती.
अमेरिकेतल्या पहिल्या हिंदू खासदार तुलसी गबार्ड आणि लोकप्रतिनिधी राजा कृष्णमूर्ती यांच्यासोबत गव्हर्नर्सचं एक प्रतिनिधी मंडळ, अमेरिकन काँग्रेसचे काही सदस्य, मेयर आणि इतर अधिकारी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असल्याचं सांगितलं जातंय.
यादरम्यान एखाद्या मोठ्या व्यापारी कराराची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि ट्रेड टॅरिफमध्ये झालेल्या वाढीमुळे गेल्या काही महिन्यांपासून दोन देशांमध्ये आलेली कटुता यामुळे संपुष्टात येईल असं काही भारतीय वृत्त संस्थांचं म्हणणं आहे.
अमेरिकेतल्या गॅस उत्पादकांचं लक्षही या कार्यक्रमाकडे असून भारत अमेरिकेकडून गॅस विकत घेण्यास तयार होईल असा अंदाज ब्लूमबर्गमध्ये छापण्यात आलेल्या एका लेखात व्यक्त करण्यात आलाय. अमेरिकेतल्या द्रव नॅचरल गॅसचा भारत हा सहावा मोठ्या क्रमांकाचा ग्राहक आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








