काश्मीर, कलाम 370, आणि गोऱ्या हिजाबवाल्या मुली

प्रतिकात्मक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिकात्मक फोटो
    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

कलम 370 हटवण्याची चर्चा सुरू झाली आणि काश्मीरी मुलींवरून उलटसुलट मेसेज सोशल मीडियावर प्रसिद्ध होऊ लागले होते.

'भावा, आज तरी हिलाच घरी आणणार', 'सिंगल लोकांनो, टेन्शन घेऊ नका 370 रद्द झालंय,' #काश्मिरीबहू, 'आता सफरचंद आणि सफरचंदी गाल दोन्ही आपलेच.!'

हे किंवा असे मेसेज तुम्हाला आले असतील, तुम्हाला आवडले असतील किंवा तुम्ही कदाचित लाईकही केले असतील. एखाद्या काश्मिरी गोऱ्याचिट्ट्या मुलीचा चेहरा असलेला फोटो आणि खाली कॅप्शन 'हीच माझ्या आईची सूनबाई' असले मेसेज पाहून तुम्हाला मनातल्या मनात गुदगुल्याही झाल्या असतील.

पुरुष असाल तर म्हणाल, जाऊ द्या ना, जोक आहे हा. सेन्स ऑफ ह्युमर नावाची गोष्ट नाही तुम्हा फेमिनिस्टांना. बाई असाल तर मनातून तुम्हालाही ही जोक पटले नसतील, पण कुठे वाद घाला.. म्हणून गप्प बसल्या असाल.

सर्वसामान्य नाही तर राजकीय नेत्यांनीही अशा प्रकारची वक्तव्यं केली आहेत. आता लग्नासाठी काश्मीरहून मुली आणता येतील, असं वक्तव्य हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केलं.

मनोहर लाल खट्टर

फोटो स्रोत, Getty Images

"बिहारहून सून आणावी लागेल, असं आमचे मंत्री ओ. पी. धनकर नेहमी म्हणायचे. आता मात्र काश्मीरसाठीचा मार्ग मोकळा झाला आहे, असं लोक म्हणत आहेत. आता आपण काश्मीरहून मुली आणू शकतो," असं खट्टर यांनी म्हटलं होतं.

बरं, वर लिहिलेली सगळी वाक्य निदान उच्चारण्यासारखी तरी आहेत. हिजाबमधल्या गोऱ्या मुलींचे फोटो फिरवून काय वाट्टेल ते लिहिलं जातंय. अश्लील आणि घाणेरड्या मेसेजेसची गणतीच नाही.

काश्मिरी मुली आपल्याकडे प्रचलित असलेल्या सौंदर्यांच्या मापदंडात फिट्ट बसतात. गोऱ्या, नाजूक, घाऱ्या डोळ्यांच्या आणि हिजाबमध्ये असल्या की त्या सौंदर्याला अजून गूढरम्य वलय लाभतं.

'ये चांदसा रोशन चेहरा, झुल्फोका रंग सुनहरा,

ये झीलसी नीली आंखे, कोई राज हे इनमे गहरा,

तारीफ करू क्या उसकी, जिसने तुम्हे बनाया.'

असं शम्मी कपूर 1964 मध्ये काश्मीर की कलीमध्ये गातो. तेव्हापासून आजपर्यंत आरस्पानी काश्मिरी सौंदर्याविषयी असणार आकर्षण तसूभरही कमी झालेलं नाही.

पुरुषच कशाला महिलांनाही या सौंदर्याचं आकर्षण आहे - कारण प्रत्येकीला तसं दिसायचंय. जरा गुगलवर 'कश्मिरी लडकी' टाईप करून पाहा. लगोलग काश्मिरी मुलींच्या सौदर्यांची गुपितं अशा 50 लिंक्स येतील. इथपर्यंत ठीक आहे.

पण कालपासून काश्मीरची जमीन आणि काश्मीरच्या मुली आपल्या तीर्थरूपांची जहागिरी असल्याचा भास बऱ्याच लोकांना होत आहे. 65 रुपये किलोने टोमॅटो घेताना कासावीस होणारे काश्मिरात जमीन घेता येणार म्हणून पेढे वाटत आहेत. जमीन जशी प्रॉपर्टी असते, तशी बायकांकडेही 'प्रॉपर्टी' म्हणून काही जण पाहत आहेत.

SM व्हायरल पोस्ट

फोटो स्रोत, SM व्हायरल पोस्ट

370 हवं की नको, पॉलिसी म्हणून हा निर्णय देशावर, काश्मीरवर काय परिणाम करणार यावर मी चर्चा करत नाहीये. त्यावर देशात सगळ्या बाजूंनी चर्चा होतेय आणि होत राहील. प्रश्न आहे आपल्या पुरुषी मानसिकतेचं काय करायचं हा आहे. महिला ही कुणाची मालमत्ता कशी असू शकेल?

अधिकाधिक जमीन पादाक्रांत करण्याची आणि बाईला प्रॉपर्टी समजायची मानसिकता मध्ययुगीन आहे. आज तिचा जाहीर उच्चार करता येत नाही म्हणून अनेक जण चेष्टा-मस्करीच्या आड या गोष्टी बोलतात.

इतिहास शोधूयात का जरा?

90 च्या दशकात झालेल्या बोस्नियन युद्धात अनेक स्त्रियांवर अत्याचार झाले. तीन वर्ष चाललेल्या या युद्धात 50 हजार बोस्नियन स्त्रियांवर बलात्कार झाला. आणि तरीही असं म्हणतात की खरा आकडा कधीच समोर येणार नाही, कारण कित्येकींनी कधीच तोंड उघडलं नाही.

सुदानमध्ये अनेक वर्षांपासून गृहयुद्ध सुरू होतं. त्याची परिणीती देशाचं विभाजन होऊन दोन देश निर्माण होण्यात झाली. तिथे आजही आईवर होणारे बलात्कार मुलांना पाहायची सक्ती केली जाते.

आपल्या विरोधात असणाऱ्यांना नामोहरम करायचा एक पाशवी मार्ग म्हणजे त्यांच्या बायकांवर बलात्कार करणं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सुमारे 2 लाख स्त्रियांना 'कम्फर्ट वुमन' असं गोंडस नाव देऊन त्यांच्यावर सतत बलात्कार झाले.

बोस्नियात बलात्कार आणि लैंगिक छळवणूकीला तोंड दिलेल्या लेजाने आपले अनुभव बीबीसीला सांगितले.
फोटो कॅप्शन, बोस्नियात बलात्कार आणि लैंगिक छळवणूकीला तोंड दिलेल्या लेजाने आपले अनुभव बीबीसीला सांगितले.

जो जिंकतो तो हरणाऱ्याच्या जमिनीवर कब्जा करतो आणि हरणाऱ्याच्या बाईवर बलात्कार करतो. इतिहासाने हे वारंवार सिद्ध केलं आहे. पण याची सुरुवात कुठून होते? 'आपले' आणि 'त्यांचे' या विभाजनाने. काश्मिरी महिलांबद्दल असे मेसेज शेअर करणाऱ्या लोकांनी आधी ठरवायला हवं की काश्मिरी 'आपले' आहेत की 'परके?

मुळात माझी समज कमी असल्याने मला बेसिक प्रश्न पडलाय. कलम 370 रद्द करण्याचं कारण भारताला एक करणं होतं ना? हे कलम लोकांना एकमेकांपासून वेगळं करतं त्यामुळे ते काढायचं होतं ना? मग आता ही विकृत मानसिकता आपण 'आपल्याच' घरातल्या महिलांविषयी दाखवत आहोत.

आपल्यापासून लांब गेलेल्या सामान्य काश्मिरी माणसाला हे पाहून काय वाटेल याचा विचार नाही. कारण काय तर 'त्यांना' अद्दल घडली याचा आनंद. जणूकाही युद्ध जिंकलंय, मग मिळवा त्यांच्या बायका! काय म्हणता? प्रत्यक्षात शक्य नाही, मग इंटरनेटच्या माध्यमातून करा.

या सगळ्यात एक गोष्ट त्यातल्या त्यात सुखावणारी वाटली ती म्हणजे काही जणांनी याविरोधात पवित्रा घेतला. अनेक जणांनी सोशल मीडियावर या गोष्टी समाजमन कसं कलुषित करत आहेत याविषयी सांगितलं.

फेसबुक

फोटो स्रोत, Facebook

अनेकांनी हेही लिहिलं की काश्मिरी पुरुषही सुंदर असतात. मग तुमच्या घरातल्या पोरीबाळींनी त्यांना जावई करून घरात आणलं तर तुम्हाला चालेल का? ('तुम्हाला चालेल का, या वक्तव्यावर आक्षेप आहेच!) विरोधी स्वर होता पण या गदारोळात कुठेतरी दबून गेला असं वाटलं.

राहाता राहिला प्रश्न काश्मीरच्या पुरुषांचा. तेही प्रचलित हँडसम असण्याच्या व्याखेत बसतातच. मागच्या वर्षी श्रीनगरला गेले होते तेव्हा माझा कॅब ड्रायव्हर एक उमदा तरुण होता. उंचपुरा, गोराघारा.

SM व्हायरल पोस्ट

फोटो स्रोत, SM व्हायरल पोस्ट

मोजकं बोलायचा, पण उर्दू शायरीमध्ये माहीर होता, त्याला त्याच्या झेलम नदीचा अभिमान होता. गाडीतून फोटो काढत होते, तर त्याने गाडी थांबवली आणि म्हणाला नदीला आवडेल असे फोटो काढा. झेलमचं कौतुक करणाऱ्या कवितेच्या 2 ओळीही ऐकवल्या.

खरं सांगायचं तर I was impressed. कुणीही झाली असती. काश्मीरला फिरायला जाणाऱ्या अनेकींचा कलेजा तिथल्या कोणा पुरुषाला पाहून खलास झाला असणार यात वाद नाही. मग यातल्याच एकीने,

'एक चीज कयामत भी है, लोग कहा करते थे,

तुम्हे देख के मैंने माना, वो ठीक कहा करते थे.

ए चाल में तेरी जालीम, कुछ ऐसी अदा का जादू,

सौ बार संभाला दिलको, पर होके रहा बेकाबू'

असं म्हटलं, तर काय करतील राव हे लोकं?

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा..)