निदर्शकांवर गोळीबार होत असताना गदारोळातच का होणार सुदानमध्ये निवडणुका?

फोटो स्रोत, AFP
सध्याच्या प्रमुख विरोधी आघाडीसोबतचे सगळे करार आपण संपुष्टात आणत असल्याचं सांगत येत्या नऊ महिन्यांत निवडणुका घेणार असल्याचं सुदानच्या लष्करी नेत्यांनी म्हटलं आहे.
देशाची राजधानी खारतुममध्ये निदर्शकांवर हल्ले केल्यामुळे लष्करावर सध्या जगभरातून टीका होत आहे. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. लष्कराने आंदोलकांवर केलेल्या या हल्ल्यांमध्ये 30 जण ठार झाले.
हा 'क्रूर हल्ला' असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे.
येत्या तीन वर्षांमध्ये हळूहळू लष्कराकडून सत्ता हस्तांतरित होऊन नागरी सत्ता प्रस्थापित होईल असा करार लष्कर आणि निदर्शकांमध्ये झाला होता. पण हा करार झाल्यानंतर लगेचच लष्कराने ही भूमिका घेतली आहे.
एप्रिलमध्ये अध्यक्ष ओमर अल-बशीर यांची सत्ता उलथवून टाकल्यापासून सुदानमध्ये द ट्रान्झिशनल मिलिटरी काऊन्सिल (TMC)ची राजवट आहे. त्यांच्यामध्ये आणि सार्वभौम सत्तेसाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये नवीन सरकारच्या आखणीविषयीची बोलणी देखील झाली होती.
पण TMCचे प्रमुख जनरल अब्देल फतह अल-बुरहान यांनी राष्ट्रीय वाहिनीवर जाहीर केलं की, आम्ही ''मुक्ती मोर्चा (अलायन्स फॉर फ्रीडम)सोबतची सगळी बोलणी थांबवत असून जे काही ठरलं होतं ते रद्द करत आहोत."
पुढच्या नऊ महिन्यांमध्ये प्रादेशिक तसंच आंतरराष्ट्रीय पर्यवेक्षकांच्या देखरेखीखाली निवडणुका घेतल्या जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
देशाच्या कारभाराची सूत्रं नागरी सरकारकडे देण्यात यावीत असं म्हणत प्रजासत्ताकाची मागणी करणाऱ्या गटाने आपण TMCसोबतची सगळी बोलणी थांबवत असल्याचं जाहीर केलं आणि बंदचं आवाहन केलं. त्यानंतर TMCकडून ही घोषणा करण्यात आली.
आंदोलन स्थळी काय घडलं?
निदर्शकांच्या सांगण्यानुसार सोमवारी पहाटे सुरक्षा पथकं मुख्य आंदोलन स्थळी दाखल झाली. या घटनेच्या व्हीडिओमध्ये जोरदार गोळीबार ऐकू येतो आहे.
लष्करी मुख्यालयाच्या समोरच्या चौकामध्ये निदर्शक 6 एप्रिलपासून ठाण मांडून आहेत. या नंतर केवळ 5 दिवसांमध्ये बशीर यांचं सरकार उलथवून टाकण्यात आलं.
राष्ट्रीय वाहिनीवर जाहीर करण्यात आलेल्या एका निवेदनामध्ये लष्करी काऊन्सिलने 'ज्याप्रकारे घटना घडत गेल्या' त्या विषयी खेद व्यक्त केला. हे हल्ले गोंधळ करणारे निदर्शक तसंच लहान मुलांना लक्ष्य करून करण्यात आले असंही सांगण्यात आलं.
''हे घडत असताना काही मोठ्या गटांनी लष्करी चौक्यांमध्ये आसरा घेतला. यामुळे या अधिकाऱ्यांनी या लोकांचा पाठलाग केला, यातून काहींचा जीव गेला तर काही जखमी झाले," असं या निवेदनात म्हटलं आहे. लष्कराचं मुख्य ध्येय हे नागरिकांचं रक्षण करण्याचं असल्याचं त्यात म्हटलं होतं.
या आधी सुरक्षा दलांनी खारतुममधल्या एका हॉस्पिटलला वेढलं होतं तर दुसऱ्या एका हॉस्पिटलवर गोळीबार करण्यात आल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे.
एका 8 वर्षांच्या मुलासह 30 जण ठार झाले असून सगळ्या मृतांविषयी माहिती देण्यात न आल्याने हा आकडा अधिक असण्याची शक्यता असल्याचं निदर्शकांबरोबर असणाऱ्या सुदानमधल्या डॉक्टर्सच्या केंद्रीय कमिटीने म्हटलं आहे.
शेकडो लोक जखमी झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, AFP
यामागे कुख्यात रॅपिड सपोर्ट फोर्सेस या पॅरामिलिटरी गटाचा हात असल्याचं काही नागरिकांचं म्हणणं आहे. बशीर यांना सत्तेत कायम ठेवण्यासाठी या गटाची निर्मिती झाली होती. आणि पश्चिम सुदानमधील दारफुरमध्ये 2003मध्ये सुरु झालेल्या संघर्षातही हा गट सामील होता.
त्यावेळी हा गट 'जन्जावीद' म्हणून ओळखला जायचा आणि त्यांनी अनेक ठिकाणी रक्तपात घडवून आणला होता.
देशभरामध्ये सुरू असलेल्या आंदोलनांचं नेतृत्त्वं करणाऱ्या सुदानीज प्रोफेशनल्स असोसिएशन (SPA)ने 'विश्वासघातकी आणि खुनी लष्करी राजवट उलथवून टाकण्यासाठी नागरी असहकार' मोहीम सुरू करण्याचं आवाहन केलं आहे.
प्रतिक्रिया काय उमटल्या?
सुदानच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची स्वतंत्र चौकशी करून त्यासाठी जबाबदार कोण हे ठरवावं असं आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाचे सेक्रेटरी जनरल यांनी केलं आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाचे सेक्रेटरी जनरल अंतोनिओ गटेरेस यांनी स्वतंत्र चौकशीची मागणी करत, हॉस्पिटलमध्ये गोळीबार करण्यात आल्याच्या बातम्यांनी आपण सावध झालो असल्याचं म्हटलंय.
"धरणं देणाऱ्या निदर्शकांना हटवण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्यात आला आणि त्याचा आम्ही निषेध करत आहोत" असं गटेरेस यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
इतर प्रतिक्रिया :
- युकेचे परराष्ट्र सचिव जेरेमी हंट यांनी म्हटलंय की ''या नियमबाह्य कारवाईमुळे अधिक ध्रुवीकरण आणि हिंसाचार होईल आणि याला मिलिटरी काऊन्सिल पूर्णपणे जबाबदार आहे.''
- आफ्रिकेसाठीचे अमेरिकेचे सह सचिव टायबर नॅगी यांनी म्हटलंय : ''हा हल्ला क्रूर आणि पूर्वनियोजित होता ज्याचं नेतृत्त्व रॅपिड सपोर्ट फोर्सेसच्या सशस्त्र गटाने केलं. बशीर यांच्या राजवटीमध्ये या गटाने अतिशय वाईट गोष्टी केल्या आहेत.''
- या घटनेची त्वरित आणि पारदर्शक पद्धतीने चौकशी व्हावी अशी मागणी आफ्रिकन युनियनने केली आहे.
- युके आणि जर्मनी या देशांनी विनंती केल्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीची बैठक मंगळवारी होत आहे.
- सरकारी वकिलांनी या हल्ल्याचा तपास करण्यासाठी समितीची स्थापना केली असल्याचं सुदानच्या राष्ट्रीय वृत्त वाहिनीने म्हटलंय.

लोकशक्तीचा झटका
टोमी ओलाडिपो, सुरक्षा प्रतिनिधी- बीबीसी आफ्रिका
सुदानमधल्या राजकीय घडामोडींबाबत पुन्हा एकदा जैसे-थे परिस्थिती उद्भवली आहे. आंदोलकांचे गट आणि TMC यांनी घेतलेल्या ठाम पवित्र्यामुळे बोलणी थांबली आहेत.
आता विरोधकांची आंदोलनं जास्त प्रखर होतीस तसंच त्यांच्यावर वर्दीतल्या लोकांकडून (सुरक्षा दलं) आणखीन क्रूर हल्ले होण्याची शक्यता आहे. सध्या इथे लष्करी वर्दीतल्या लोकांचं राज्य आहे. या सुरक्षा यंत्रणांमधल्या कोणत्या गटाचं वर्चस्व TMCमध्ये आहे हे आता महत्त्वाचं ठरेल.

सध्या तरी या राजवटीचे उप-प्रमुख असणाऱ्या मोहम्मद 'हेमेती' हमदान दागलो यांच्या नेतृत्त्वाखालील रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RPA) या TMCचं प्रतिनिधित्व करत आहेत. ते सर्वाधिक क्रूर वागण्याची शक्यता आहे.
खारतुममध्ये सगळ्या गोष्टी पूर्णपणे ठप्प झाल्या असून राजवटीमध्ये काही घडामोडी झाल्याचे हे संकेत आहेत. 'लोकशक्ती' मोठा झटका बसलेला असला, तरी मोठा धोका पत्करण्याची आंदोलकांची तयारी आहे.

महत्त्वाच्या घडामोडी
- 19 डिसेंबर 2018 - इंधन आणि ब्रेडच्या किंमती वाढल्याची घोषणा करण्यात आल्यानंतर ठिकठिकाणी आंदोलनांना सुरुवात.
- 22 फेब्रुवारी 2019 - अध्यक्ष बशीर यांनी सरकार बरखास्त केलं.
- 24 फेब्रुवारी - सुरक्षा यंत्रणांकडून गोळीबार सुरू असतानाही आंदोलनं सुरूच
- 6 एप्रिल - लष्करी मुख्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू. बशीर पायउतार होत नाहीत तोपर्यंत न हलण्याचा निर्धार
- 11 एप्रिल - बशीर सरकार उलथवून टाकल्याची लष्कर प्रमुखांची घोषणा, पण नागरी राजवटीची मागणी करत धरणं आंदोलन सुरूच.
- 20 एप्रिल - नागरिकांचे प्रतिनिधी आणि लष्करी राजवट यांच्यात वाटाघाटींना सुरुवात
- 13 मे - लष्करी मुख्यालयाच्या बाहेर गोळीबार. 6 ठार
- 14 मे - 3 वर्षांमध्ये बदल घडवून आणण्याचा ठराव लष्कर आणि नागरिकांकडून जाहीर
- 16 मे - बॅरिकेड्स काढण्याची मागणी लष्कराने केल्याने बोलणी रद्द
- 3 जून - धरणं आंदोलन मोडून काढण्यासाठी बळाचा वापर केल्याचा आरोप करत लष्करासोबतच्या वाटाघाटी थांबवत असल्याची आंदोलकांची घोषणा
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)










