वितळणाऱ्या हिमनद्यांमुळे एव्हरेस्टवर सापडत आहेत गिर्यारोहकांचे मृतदेह

खुंबू

फोटो स्रोत, FRANK BIENEWALD

फोटो कॅप्शन, खुंबू हिमनदीत सर्वाधिक मृतदेह सापडत आहेत.
    • Author, नवीन सिंग खडका
    • Role, पर्यावरण प्रतिनिधी

एव्हरेस्ट शिखरावर हिमनद्या वितळत असल्याने तिथं गिर्यारोहकांचे मृतदेह सापडत आहेत. हे शिखर सर करण्यासाठी पहिली मोहीम हाती घेतल्यानंतर आजवर तिथं 300 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. यातील दोन तृतीयांश मृतदेह बर्फाखाली गाडले गेले आहेत.

वसंत ऋतू सुरू झाल्याने या शिखराच्या चीनच्या बाजूच्या दिशेने मृतदेह काढण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. आतापर्यंत 4,800 गिर्यारोहकांनी हे जगातील सर्वोच्चा शिखर सर केलं आहे.

नेपाल माऊंटिनिअरिंग असोसिएशनचे माजी अध्यक्ष अंग शेरिंग शेर्पा म्हणाले, "जागतिक तापमान वाढीमुळे इथला बर्फ आणि हिमनद्या वितळू लागल्या आहेत. त्यामुळे वर्षांनुवर्षं बर्फाखाली राहिलेले मृतदेह आता सापडू लागले आहेत. गेल्या काही वर्षांत हा शिखरावर मृत्युमुखी पडलेल्या गिर्यारोहकांचे मृतदेह आम्ही खाली आणले आहेत. पण बर्फा खाली गाडले गेलेले मृतदेहही आता दिसू लागले आहेत."

एका सरकारी अधिकाऱ्याने गेल्या काही वर्षांत 10 मृतदेह या शिखरावरून खाली आणल्याचं म्हटलं आहे.

Expedition Operators Association of Nepalचे अधिकारी म्हणाले, "शिखराच्या उंच ठिकाणावर असलेल्या कँप परिसरातील दोरखंड काढले आहेत. पण मृतदेह खाली आणणं सोपं नाही." मृतदेहांशी संबंधित नेपाळमधील कायदे कठोर आहेत.

2017मध्ये कँप 1वर एक गिर्यारोहकाचा हात मिळाला होता. त्याच दिवशी कुंभू या हिमनदीत एक मृतदेह सापडला होता. याच परिसरात अधिकाधिक मृतहेद सापडत आहेत. साऊथ कोल इथंही जास्त संख्येने मृतदेह सापडत आहेत. बेस कँपनजीक बर्फाचा थर कमी होत असल्याने तिथंही मृतदेह सापडत आहेत, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.

हिमनद्यांचं वितळणं

एव्हरेस्ट परिसरात हिमनद्या वितळत असल्याचं अनेक वेळा निदर्शनास आलं आहे. बर्फ वितळत असल्याने खुंबू ही हिमनदी विस्तारल्याचं 2015ला दिसून आलं आहे. तर नेपाळच्या लष्करानं एव्हरेस्टनजीक असलेल्या इमजा या सरोवरातील वाढलेलं पाणी कमी करण्यासाठी मोहीम राबवली होती.

या हिमनदीजवळ किमान तापमान फक्त -3.3 डिग्री असल्याचं दिसून आलं आहे.

कँप 4

फोटो स्रोत, DOMA SHERPA

फोटो कॅप्शन, कँप 4 नजीकही मृतदेह सापडत आहेत.

या हिमनदीच्या हालचालींमुळेही गाडले गेलेले काही मृतदेह दृष्टीस पडत असल्याचं गिर्यारोहकांचं मत आहे. पण अशा घटनांसाठी गिर्योरोहक मानसिक दृष्ट्या तयार असतात, असं Nepal National Mountain Guides Associationचे उपाध्यक्ष शेरिंग पांडे भोते यांन म्हटलं आहे.

मृतदेह बनले लँडमार्क

काही मृतदेह लँडमार्क बनले आहेत. समिटनजीक एका लँडमार्कचं नाव ग्रीन बूट आहे. इथं एका गिर्यरोहकाचा मृत्यू झाला होता. या गिर्यारोहकाने परिधान केलेला हिरवा बूट अजून त्या मृतदेहाच्या पायात असल्याने हे नाव मिळालं आहे. तज्ज्ञांनी ही मृतदेह हटवल्याचं म्हटलं आहे, तर नेपाळ सरकारने या मृतदेहाचे काही अवशेष उरले असले तर त्याची कल्पना नाही, असं म्हटलं आहे.

मृतदेह

फोटो स्रोत, ANG TASHI SHERPA

एक मृतदेह खाली आणण्यासाठी 40,000 ते 80,000 डॉलर इतका खर्च येतो.

समिटजवळ 8,700 मीटर उंचीवरून एक मृतदेह आणण्यात आला होता. बर्फात पूर्ण गोठलेल्या या मृतदेहाचं वजन 150 किलो इतकं झालं होतं. हा मृतदेह अत्यंत धोकादायक ठिकाणावरून खाली आणण्यात आला होता.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)