चंद्रपूरच्या आदिवासी मुलांनी फडकावला एव्हरेस्टवर तिरंगा, पंतप्रधानांनीही केलं कौतुक

एव्हरेस्ट

फोटो स्रोत, Chaya Atram

    • Author, जयदीप हर्डीकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी

चंद्रपूर जिल्ह्यातल्या दुर्गम भागातील आदिवासी आश्रम शाळांमधील चार मुलं आणि एक मुलीनं माऊंट एव्हरेस्ट सर करत आपल्या कर्तृत्वानं इतिहासात आपलं नाव कोरलं. शून्यातून सुरू होऊन जगाच्या सगळ्यात कठीण शिखरापर्यंतचा दहा महिने सुरू असणारा हा प्रवास अद्भूत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात चंद्रपूरच्या या लेकरांचं कौतुक केलं.

"या आदिवासी मुलांनी एव्हरेस्टवर तिरंगा फडकावला आणि त्याची शान वाढवली," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

कशी होती ही आदिवासी मुलामुलींची एव्हरेस्टला गवसणी घालण्याची मोहिम.

या संपूर्ण मोहिमेसाठी त्यांनी नागपूरजवळील वर्ध्यात प्रशिक्षण घेतलं. तेव्हाच हे शिखर सर करणार असा निश्चय त्यांनी केला होता. लहानपणापासून आईवडिलांपासून दूर राहिलेले आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थी ते यशस्वी गिर्यारोहक होण्यापर्यंतचा हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे.

मागच्या वर्षीपर्यंत यापैकी कोणत्याही मुलीने किंवा मुलाने बस किंवा विमानातून प्रवास केला नव्हता. सुकामेवा खाल्ला नव्हता. पर्वत चढणं तर आणखी दूरची गोष्ट. त्यामुळे आज या सगळ्या गोष्टींकडे मागे वळून पाहताना त्यांनाच विश्वास बसत नाही.

"हे अजूनही स्वप्न आहे असं मला वाटतं," छोट्या चणीची, लाजाळू, पण तंदुरुस्त असलेली मनिषा धुर्वे सांगते. चंद्रपूर जिल्ह्यातील दक्षिण भागात असलेल्या देव्हाडामधल्या आश्रमशाळेत ताठ मानेनं एका खुर्चीवर बसली होती. "मला अजूनही हे खरं आहे यावर विश्वास बसत नाही," हे सांगताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज जाणवतं. तिला ज्या शिक्षकांनी शिकवलं ते तिच्या आजूबाजूलाच उभे होते. त्यांच्या डोळ्यात तिच्याबद्दल अभिमान जाणवत होता.

मनीषा आता बारावीत आहे. तिनं 16 मे 2018 ला एव्हरेस्टच्या शिखरावर सकाळी 4.35 वाजता भारताचा झेंडा रोवला. तिच्याआधी याच दिवशी पहाटे 3.10 वाजता कविदास काटमोडे आणि उमाकांत मडावी यांनी शिखर सर केलं. त्यानंतर 4.25 वाजता परमेश आळेनं शिखर सर केलं. ही कामगिरी करणारी मनिषा या गटातील चौथी व्यक्ती होती. त्यानंतर 17 मे रोजी ही कामगिरी विकास सोयम यांनी पार पाडली. शिखर सर करताना मनीषाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. तेव्हा विकासने तिचा जीव वाचवला.

"त्या एका क्षणात मला माझे आईबाबा, माझे बहीण भाऊ, माझा समाज, माझी झोपडी, आमचं जंगल, माझे मित्रमैत्रिणी सगळं आठवलं," मनीषा सांगते.

मनीषा पाच वर्षांची असताना देव्हाडा येथील आश्रमशाळेत आली असं तिचे शिक्षक वासुदेव राजपुरोहित यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

त्यांना हिमालयसुद्धा माहिती नव्हता

बिमला नेगी देऊस्कर या ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत. 1993मध्ये माऊंट एव्हरेस्ट मोहिमेवर गेलेल्या भारतीय महिलांच्या चमूतील त्या एक सदस्य होत्या. त्या गेल्या तीस वर्षांपासून गिर्यारोहण, साहसी खेळ प्रशिक्षक आहेत. बिमला आणि त्यांचे पती अविनाश देऊस्कर नागपूरात अॅडव्हेंचर अकॅडमी चालवतात. त्यांचं वर्ध्याला प्रशिक्षण केंद्र आहे. त्यांनी या मुलांना दहा महिने गिर्यारोहणाचं प्रशिक्षण दिलं आणि माऊंट एव्हरेस्टच्य मोहिमेसाठी तयार केलं. बिमल जेव्हा या मुलांना पहिल्यांदा भेटल्या तेव्हा त्या मुलांना हिमालय काय आहे हेसुद्धा माहिती नव्हतं.

आता मात्र मुलांच्या प्रेरणेमुळे अनेकजण इथे शिकायला आले आहेत आणि यावर्षी पटसंख्येत वाढ झाली आहे, असं त्यांनी सांगितलं.

एव्हरेस्ट

फोटो स्रोत, Chaya Atram

मनीषाविषयी सांगताना अविनाश देऊस्कर सांगतात, "मला आठवतं आम्ही जेव्हा निवासी आश्रमशाळांमध्ये मुलांचा शोध घेत होतो तेव्हा आम्ही तिथल्या मुलांना धावायला सांगितलं. पण थांबा असं सांगायलाच विसरलो आणि आम्हाला असं लक्षात आलं की मनीषा अजून धावतच होती कारण आम्ही तिला थांबायलाच सांगितलं नव्हतं. तिची तयारी आम्हाला तेव्हाच दिसली होती."

मनीषा फार जास्त उपक्रमांमध्ये भाग घ्यायची नाही. पण ती कणखर आहे आणि मुलांपेक्षा कोणत्याही पावलावर ती मागे नाही असंही त्यांनी सांगितलं.

प्रशिक्षणाचा काळ

या मोहिमेसाठी वेगवेगळ्या टप्प्यात झालेल्या प्रशिक्षणाची माहिती देउस्कर दांपत्यानं बीबीसी मराठीला दिली. पहिल्या टप्प्यात जुलै महिन्यात 47 विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली. 25 दिवसांच्या प्रशिक्षणानंतर 27 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. एक महिन्यानंतर हैदराबाद येथील भोंगीर टेकडीवर अत्यंत कठीण अशा रॉक क्लायंबिंगसाठी पाठवण्यात आलं. या टप्प्यात 22 जणांमध्ये स्पर्धा होती.

चौथ्या टप्प्यात 21 विद्यार्थ्यांना हिमालयाचा अंदाज येण्यासाठी दार्जिलिंग येथील Himalayan Mountaineering Institute (HMI) या संस्थेत गिर्यारोहणाला पाठवण्यात आलं जेणेकरून त्यांना हिमालयाचा अंदाज येईल. पाचव्या आणि अंतिम टप्प्यात 13 विद्यार्थ्यांना या टप्प्यात कडाक्याच्या थंडीत लेह लडाखला पाठवण्यात आलं.

एव्हरेस्ट

फोटो स्रोत, BBC/Jaideep Hardikar

फोटो कॅप्शन, छाया आत्राम कुटुंबीयांसमवेत

अंतिम चाचणीत दहा मुलं निवडली गेली. त्यांची बोर्डाची परीक्षा झाली आणि एव्हरेस्टच्या मोहिमेवर ते नेपाळच्या बाजूने एप्रिल महिन्यात निघाले. पुढच्या दीड महिन्यात या मुलांनी ज्या परिस्थितीला तोंड दिलं त्याची त्यांच्या पालकांना कल्पना सुद्धा नव्हती.

समुद्रसपाटीपासून 5900 मीटर अंतरावरून त्यांना एव्हरेस्ट सर करण्यासाठी एक महिना लागला. नॉर्थ कॉल, अॅडव्हान्स कँप आणि शिखर असा 8850 मीटर अंतराचा प्रवास त्यांनी केला. यावेळी खरी कसोटी असते कारण तेव्हा ऑक्सिजनचा पुरवठा नसतो आणि तापमान उणे 45 डिग्री सेल्सिअस असतं. तिथे प्रचंड थकवा येतो, विशिष्ट प्रकारचे भास होतात, शरीरात वेगवेगळे बदल होतात. इतक्या उंचीवर तहान लागत नाही, भूक लागत नाही. नशीबाने ही टीम तिथे असताना बर्फाचं वादळ आलं नाही.

आम्ही इथे काळजीत होतो

या विद्यार्थांच्या गटातील आणखी एक विद्यार्थिनी होती. छाया तिचं नाव. आजारी पडल्यामुळे तिला ही मोहीम पूर्ण करता आली नाही. तिचे वडील सुरेश आत्राम सांगतात, "कितीतरी दिवस आम्ही इथे काळजी करत बसलो होतो. तिची तब्येत खराब झाली होती हे आम्हाला खूप नंतर कळलं."

मला जरा वाईट वाटलं पण एक टीम म्हणून एक खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं याचा मला आनंद झाला असं छायाने मला सांगितलं.

छाया ही मनीषासारखीच छोट्या चणीची आहे. पण तिच्यात असलेली निश्चयी वृत्ती तिच्या बोलण्यातून दिसत होती. तिला भेट म्हणून मिळालेल्या आयपॅडवर ती आम्हाला फोटो दाखवत होती.

"मला जर संधी मिळाली ना तर मी या वेळी शिखरावर जाईनच," छाया सांगत होती.

"कठोर मानसिक आणि शारीरिक कवायतीसाठी तयार करणं हे खरं तर मोठं आव्हान नव्हतं. या मुलामुलींचा आहार हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. कारण त्यांना सकस आहार मिळत नाही. प्रशिक्षणाच्या पहिल्या काही दिवसांतच ते आमच्या लक्षात आलं होतं," अविनाश देऊस्कर सांगत होते.

एव्हरेस्ट

फोटो स्रोत, Chaya Atram

फोटो कॅप्शन, चंद्रपूरच्या शालेय मुलामुलींनी माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर केलं.

ज्या मुलांची प्रशिक्षणासाठी निवड झाली त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही सुकामेवा पाहिला नव्हता. त्यांना रोज दूध, मांस अशा गोष्टी परवडत नाहीत.

"पण मुलांनी ज्या प्रकारे हे स्वीकारलं ते खरोखर आश्चर्यकारक होतं. ते आपापलं शिकले आणि आपल्या बुद्धीला जे पटेल त्याच्या आधारावर त्यांनी हे यश मिळवलं. भल्याभल्या गिर्यारोहकांनाही जे जमत नाही ते यांनी करून दाखवलं आहे. संघभावना हे या मुलांचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य " बिमल नेगी सांगतात.

हातातोंडाशी आलेला घास

याच गटात इंदू कन्नके ही मुलगी होती. या मोहिमेत तिला अशा वळणावरून परत यावं लागलं जिथून शिखर अगदी हाकेच्या अंतरावर होतं. "आम्ही शिखरापासून फक्त 1348 मी दूर होतो."

आंध्र प्रदेशचा एक गिर्यारोहकसुद्धा याच मोहिमेवर होता. पण तो आजारी पडला. इंदूने त्याचा जीव वाचवण्यात मदत केली. त्यामुळे त्या गिर्यारोहकाचा जीव वाचवल्याचं तरी समाधान आहे, असं ती म्हणाली. इंदूबरोबर आशय आत्राम, शुभम पेन्डोर, आकाश मडावी यांनासुद्धा आजारपणामुळे ही मोहीम पूर्ण करता आली नाही.

मनीषाच्या मते मोहिमेचा शेवटचा टप्पा निर्णायक असतो. शेवटच्या टप्प्यावर असताना तिला एका गिर्यारोहकाचा मृतदेह दिसला. मात्र अशा परिस्थितीतही तिने मोहीम सुरूच ठेवली आणि अशक्यप्राय असं यश मिळवलं आहे.

एव्हरेस्ट

फोटो स्रोत, BBC/ Jaideep Hardikar

फोटो कॅप्शन, मनिषा धुर्वे

आंध्रप्रदेशची 13 वर्षीय प्रेरणा एव्हरेस्ट सर करणारी सगळ्यात लहान मुलगी होती. तीच या मोहिमेचं खरं प्रेरणास्थान होतं.

मनीषासारखंच परमेश आळेला सुद्धा वाटेत एक मृतदेह दिसला. "एका चुकीच्या पावलामुळे तुमचा जीव जाऊ शकतो. दगडात अडकलेले मृतदेह पाहून आम्ही हादरून गेलो होतो. एका मृतदेहावरचं घड्याळ तसंच होतं."

विकास सोयमचाही हा प्रवास अनेक अर्थाने उल्लेखनीय होता. त्यानी 21000 फूट अंतर दोनदा पार केलं. वाटेत त्याचा मित्र आजारी पडला. त्यामुळे तो मित्राला घेऊन बेस कँप वर आला. आणखी दोन तीन तास वाट पाहिली असती तर तो मित्र गेला असता अशी भीती विकासला वाटली.

लहानपणापासून शेळ्या चरण्याची सवय असलेल्या कवीदासला गिर्यारोहण हे तुलनेने सोपं वाटतं. त्याला अनेकदा श्वास घेताना त्रास झाला. पण श्वसनाचे व्यायाम, योग यामुळे फायदा झाल्याचं त्यांनी नमूद केलं.

सरकारचं सहकार्य

या मोहिमेसाठी सरकारचंही सहकार्य लाभलं. आदिवासी विद्यार्थ्यांना पहिल्याच प्रयत्नात माऊंट एव्हरेस्ट वर पाठवण्याचा धाडसी प्रकल्प आखण्याचा सरकारचा मानस होता. त्याअंतर्गत आदिवासी विकास विभाग आणि जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर शौर्य अभियानासाठी दहा विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली.

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी ही कल्पना आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनीषा वर्मा यांच्यासमोर मांडली. त्यांनीही या प्रस्तावाला ताबडतोब होकार दिला. सरकारने या मोहिमेसाठी 3-4 कोटी रुपये मंजूरही केले.

"आदिवासी मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा हा एक उत्तम मार्ग होता आणि त्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळणार होती," असं आशुतोष सलील बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले. "या अनुभवातून बरंच काही शिकण्यासारखं आहे. हे असंच पुढे सुरू ठेवण्याचा आमचा मानस आहे. आदिवासी मुलांची प्रतिकार क्षमता पाहता आदिवासी मुलांसाठी विशेष धोरण राबवण्याचा सरकार विचार करत आहे," ते पुढे म्हणाले.

ही मोहीम पूर्ण केलेल्या मुलामुलींना सरकारतर्फे 25 लाख रुपयाचं बक्षीस मिळालं. जे मोहिमेला गेले मात्र शिखर सर करू शकले नाहीत त्यांना 10 लाखाचं बक्षीस सरकारतर्फे देण्यात आलं.

कविदास आणि परमेश ही रक्कम घराची डागडुजी करण्यासाठी वापरणार आहेत. उमाकांत या रकमेतून कबड्डीसाठी मैदान उभारणार आहे. मनीषा आणि छाया ही रक्कम शिक्षणासाठी वापरणार आहे. त्यांच्या टीमपैकी पाच मुलं एव्हरेस्टचं शिखर सर करू शकले नाहीत. पण ते एक आत्मविश्वास घेऊन परतले आहेत.

चंद्रपूरसारख्या एका दुर्गम भागात राहणाऱ्या हा एक छोटा समुदाय आहे. हे स्वप्न साकारल्यामुळे आदिवासी समाजासाठी ही मुलं एक प्रेरणास्थान म्हणून समोर आले आहेत. त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.

एखादं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले तर अशक्य असं काहीच नाही हे त्यांना आता कळून चुकलं आहे.

ही कथा त्यांच्या दृढ निश्चयाची आहे, धैर्याची आणि परिस्थितीतून आलेल्या शहाणपणाची आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)