फेसबुकवरील खासगी संभाषणाबाबत मार्क झुकरबर्ग यांचा मोठा निर्णय

फोटो स्रोत, Getty Images
गोपनीयता जपणारा प्लॅटफॉर्म म्हणून फेसबुकची ओळख प्रस्थापित करण्यासंदर्भात मार्क झकबर्ग यांनी ब्लॉगच्या माध्यमातून रुपरेषा मांडली.
फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांनी म्हटलं की सुरक्षित आणि खाजगी स्वरूपाच्या मेसेजिंग प्रणाली खुल्या मेसेजिंग प्रणालींपेक्षा दिवसेंदिवस जास्त लोकप्रिय होत जातील, असा त्यांना विश्वास आहे.
मेसेंजर आणि व्हॉट्सअप या मेसेजिंग अॅपची मालकी फेसबुककडे आहे. मेसेज एन्क्रिप्शन प्रणालीमुळे या दोन्ही मेसेजिंग अपच्या माध्यमातून जाहिरातींद्वारे फेसबुकला पैसे कमावण्यावर मर्यादा आहेत.
काही दिवसांपापूर्वी गोपनीयतेच्या कलमांचा भंग केल्याप्रकरणी फेसबुकवर जोरदार टीका झाली होती.
50 दशलक्ष युझर्सनी फेसबुकला दिलेली गोपनीय माहिती गहाळ करण्यात येऊन राजकीय सल्ला पुरवणाऱ्या कंपनीला देण्यात आली होती.
झुकरबर्ग नक्की काय म्हणाले?
फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लोक डिजिटल विश्वात आपले मित्रमैत्रिणी, विविध ग्रुप्स, आवडीनिवडींची व्यासपीठं यांच्याशी जोडले गेले आहेत.
मात्र आता लोकांना कनेक्ट होताना वैयक्तिकपणा असावा आणि प्रायव्हसी जपली जावी असं वाटतं, असं त्यांनी पुढे सांगितलं.
लोकांच्या गोपनीय माहितीची जपणूक आणि डेटा सुरक्षिततेला प्राधान्य असेल असं सोशल मीडिया नेटवर्क विकसित करायचं आहे, असं झुकरबर्ग यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, facebook
प्रायव्हसी गोल्स अर्थात गोपनीयतेसंदर्भात झुकरबर्ग आणि पर्यायाने फेसबुकने काही उद्दिष्टं पक्की केली आहेत.
मानवाधिकारांचं उल्लंघन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंदर्भात सजग नसणाऱ्या देशांमध्ये युझर्सनी दिलेली संवेदनशील गोपनीय माहिती फेसबुक साठवणार नाही, असं झुकरबर्ग यांनी सांगितलं आहे.
हे उद्दिष्ट अंमलात आणलं तर काही देशांमध्ये आमची सेवा खंडित केली जाईल. काही देशांमध्ये आम्हाला प्रवेशच करता येणार नाही. आमच्यासाठी हे तोट्याचं ठरू शकतं. पण आम्ही यासाठी तयार आहोत असं त्यांना वाटतं.
एन्क्रिप्टेड सेवांमुळे ऑनलाइन पेमेंट आणि व्यापारासाठी संधी वाढू शकतात. फेसबुकची ही उद्दिष्टं नेमकी केव्हा अमलात येतील हे झुकरबर्ग यांनी सांगितलं नाही. मात्र येत्या काही वर्षांत डेटा सेक्युरिटी हे सर्वोच्च प्राधान्य समोर ठेऊन अंमलबजावणी होईल असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Reuters
लोक डिजिटल विश्वात एकमेकांशी खाजगीत बोलू शकतील आणि त्यांची गोपनीय माहिती त्यांची अनुमती असलेल्या लोकांनाच दिसेल आणि हे कायमस्वरुपी असेल असं झकरबर्ग यांनी स्पष्ट केलं.
संपूर्ण जगाला असा विचार देऊ शकलो तर ते अभिमानास्पद असेल,असं झकरबर्ग म्हणाले.
पार्श्वभूमी काय?
युझर्सची गोपनीय माहिती गहाळ करून तटस्थ यंत्रणांना पुरवल्याबद्दल तसंच फेक न्यूजचा प्रसार केला म्हणून फेसबुकवर जोरदार टीका झाली होती.
केंब्रिज अनालिटिका घोटाळा उघड झाल्यानंतर फेसबुकच्या शेअर्समध्ये 80 बिलिअन डॉलर्सची घसरण झाली होती.
अमेरिकेतल्या लाखो फेसबुक युझर्सच्या डेटाचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करण्यात आल्याचं स्पष्ट झालं होतं.
2016 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणूक मोहिमेत या डेटाचा वापर झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र केंब्रिज अनालिटिकाने हा आरोप फेटाळला आहे. फेसबुकच्या धोरणांनुसार ही माहिती डिलिट करण्यात आली.
मात्र आरोपांच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं.
घोटाळ्यानंतरही युझर्सच्या संख्येत वाढ झाल्याचं फेसबुकनं म्हटलं आहे. दर महिन्याला फेसबुकवर लॉग इन करणाऱ्या युझर्सचं प्रमाण 9 टक्क्यांनी वाढलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








