Pakistan Air Force: IAFला तोंड देण्यासाठी पाकिस्तानच्या वायुदलाची भिस्त अमेरिकी विमानांवर

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जुगल पुरोहित
- Role, बीबीसी प्रतिनिधी
तो दिवस होता 13 एप्रिल 1948. पाकिस्तानातल्या रिसालपूरमध्ये मोहम्मद अली जिन्ना रॉयल पाकिस्तान आर्मी फोर्सच्या म्हणजेच RPFच्या सदस्यांना भेटले.
त्यावेळेस जिन्ना म्हणाले होते, "पाकिस्तानने आपलं वायुदल शक्य तितक्या लवकर तयार केलं पाहिजे. तसंच ते एक सक्षम वायुदल असलं पाहिजे. पाकिस्तानच्या संरक्षणासाठी नौदल आणि लष्कराबरोबर ते सज्ज राहिलं पाहिजे."
त्यांच्या या वक्तव्यानंतर जवळपास 70 वर्षांनी पाकिस्तानचं वायुदल (पीएएफ) चर्चेत आलं आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्या वायुदलांची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. बालाकोटमध्ये भारताने केलेला हल्ला आणि भारताची दोन विमानं पाकिस्ताननं पाडली आहेत. त्यानिमित्तानं पाकिस्तानच्या वायूदलावर टाकलेला हा दृष्टीक्षेप.
जगातील चौथ्या क्रमांकाचं मोठं संरक्षण दल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय वायूदलात फायटर विमानांचे 31ताफे आहेत (प्रत्येक ताफ्यात 17 फायटर विमानं असतात).
पाकिस्तानच्या वायूदलामध्ये 20 ताफे आहेत. पण अशा प्रकारच्या तुलनेमुळे खरी स्थिती समोर येत नाही.
पाकिस्तानी वायूदल हे सध्या त्यांच्या सुरूवातीच्या काळातील अवघड परिस्थितीमध्येच असल्याचं आता दिसून येत आहे.
फाळणीनंतरची स्थिती आणि वर्तमान
या वायूदलाच्या इतिहासात लिहून ठेवलं आहे, "त्यांनी (भारतानं) शस्त्र आणि विमानांचा इंग्रजांनी ठरवलेला वाटाही पाकिस्तान वायुदलाला दिला नाही. भारतानं जो वाटा दिला तो अत्यंत अयोग्य होता. तसंच उपकरणं म्हणून फक्त भंगारच दिलं होतं."
1947-48मध्ये भारताविरुद्ध संघर्ष झाल्यावर या नवजात वायुदलानं पहिल्यांदा उड्डाण केलं.

फोटो स्रोत, Getty Images
1965 आणि 1971च्या युद्धामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या वायुदलांनी यात सहभाग घेतला होता. त्यामध्ये सहभागी झालेल्या लोकांच्या अनुभवांवरून त्यावेळेस ही दोन्ही वायुदलं तेव्हा किती व्यग्र होती याचा अंदाज येईल.
सध्या पाकिस्तानच्या वायुदलामध्ये दोन प्रकारची विमानं आहेत. यामध्ये अमेरिकन बनावटीची F-16 आणि नुकतीच चीन-पाकिस्तान संबंधांना गती आल्यावर JF-17 थंडर विमानं समाविष्ट करण्यात आली आहेत.
सिंगल इंजिन फोर्थ जनरेशन असणाऱ्या आणि F-16 पीएएफ अशी अक्षरं रंगवलेली ही विमानं 1982 साली पाक वायुदलात सामिल झाली होती. त्या तुलनेत JF-17 विमानं हलकी, सर्व प्रकारच्या वातावरणात काम करणारी आहेत.
कामरा येथील पाकिस्तान एरोनॉटिकल कॉम्प्लेक्स (पीएसी) आणि चीनमधील चंग्दू एअरक्राफ्ट इंडस्ट्री कॉर्पोरेशन (सीएसी)ने ते विकसित केलं आहे.
पण गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानच्या वायुदलाची मदार सिंगल इंजिन F-16 वरच आहे. काही काळानंतर जुन्या विमानांची जागा फ्रेंच बनावटीची मिराज विमानं घेतील.
पाकिस्तानचं वायुदल स्वदेशी बनावटीची आणि JF-17 पेक्षा अद्यायावत आणि फिफ्थ जनरेशन विमानं तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र त्यात फारशी प्रगती झालेली नाही.
पाकिस्तान वायुदलाचे पेशावर, लाहोर आणि कराची इथं तळ असून रावळपिंडीमध्ये एअरडिफेन्स कमांड असून त्याच्या धोरणाचं केंद्र इस्लामाबाद आहे.
तिथं एअर डिफेन्स रडार, दुरुस्तीची सेवा आणि ते सांभाळणारं मोठं प्रशासन असल्याचं सांगितलं जातं.
पण या दाव्यांमधला फोलपणा 2011 साली मे महिन्यात पाकिस्तानात अबोटाबादमध्ये उतरून अमेरिकच्या नौदलाच्या जवानांनी अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनला मारल्यानंतर उघडकीस आला.
हे अतिक्रमण वेळेवर लक्षात न येणं सर्वांच्या भुवया उंचावणारं होतं. पण याची एक वेगळी बाजूसुद्धा आहे.
पाकिस्तान वायूदलाचे निर्णय कोण घेतं?
गेल्या वर्षी कॅलिफोर्नियाच्या RAND या थिंक टँकने सांगितलं होतं, "पाकिस्तानी वायुदलाचे निर्णय चिफ ऑफ एअर स्टाफने दिलेल्या माहितीनुसार चिफ ऑफ आर्मी स्टाफ घेत असतात. त्यामुळे शेवटचा निर्णय चिफ ऑफ एअर स्टाफऐवजी चिफ ऑफ आर्मी स्टाफकडून घेतला जातो."

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तान वायूदलाचे माजी डायरेक्टर ऑफ एअर ऑपरेशन्स एअर कमोडोर कैसर तुफैल (निवृत्त) लिहितात, "जे हवंय ते सर्व काही मिळालं आहे असं जगात कोणतंही वायूदल नाही. अर्थसंकल्पीय तरतुदीतून मिळणारा आधार पुरेसा कधीच नसतो. पण पाकिस्तानी वायुदलाला अपेक्षित मदत मिळत नाही याबाबत मात्र मी सहमत होणार नाही.
पाकिस्तानच्या वायुदलाच्या प्रगतीबाबत ते म्हणतात, "पीएएफचा आजवरचा प्रवास तीन टप्प्यांमधून झाला आहे. पहिल्या टप्प्यात ब्रिटिश सत्तेतून बाहेर पडून प्रजासत्ताक होण्याचा काळ होता. तेव्हा पाकिस्तानने दुसऱ्यांनी वापरलेली (सेकंड हँड) आयुधं-उपकरणं वापरली होती, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पाकिस्तानने सेंटो (सेंट्रल ट्रिटी ऑर्गनायजेशन) आणि सिएटो (साउथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायजेशन) मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता.
1965च्या युद्धात भारताकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या वायूदलात F-86 साब्र आणि F104 स्टार फायटर या अमेरिकन विमानांचा समावेश झाला.
त्यानंतर बहुतांश वैमानिकांचे प्रशिक्षण अमेरिकन वायूदलातर्फे झाले, इतक्या पातळीवर अमेरिका-पाकिस्तान यांच्यात सहकार्य झालं होतं. तिसरा टप्पा 1965नंतर पाकिस्तानावर निर्बंध लादण्यात आल्यानंतर सुरू झाला. विविधतेसाठी त्यावेळी सुरू झालेले प्रयत्न अजूनही सुरूच आहेत."
पाकिस्तानचं वायुदल अजूनही विकसित झालेलं नाही, असं भारतीय वायूदलातील काही लोकांना वाटतं.
एअर मार्शल एस. बी. देव गेल्या वर्षी भारतीय वायुदलाच्या व्हाईस चिफपदावरून निवृत्त झाले आहेत.
ते म्हणतात, "पाकिस्तानचं वायुदल आमची बरोबरी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांचे वैमानिक अगदीच वाईट नाहीत. पण माझ्या माहितीनुसार निधीच्या तुटवड्यामुळे ते दल अडखळत चालत आहे.
त्यांच्याकडे एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल प्रणालीही मोठ्या प्रमाणावर आहे. पण प्रदेशाचे संरक्षण करण्याच्या क्षमतेबाबत मला खात्री वाटत नाही.
त्यामुळेच अद्ययावतीकरण आणि वाढीसाठी पाकिस्तान चीनच्या अधिकाधिक जवळ जात आहे."
पाकिस्तानच्या वायुदलाला भारतीय वायूदल कमी लेखतं का?
पाकिस्तानच्या वायूदलाला भारतीय वायुदल कमी लेखतम का, असं विचारल्यावर एअर व्हाइस मार्शल (निवृत्त) आणि लष्कर इतिहासकार आणि फायटर पायलट अर्जुन सुब्रमणियम यांनी नाही असं उत्तर दिलं.
"केवळ बालाकोटच्या एका हल्ल्यावर पाकिस्तानच्या वायुदलाला जोखणं योग्य नाही," असं त्यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, "भारतानं केलेला हल्ला माझ्या मतानुसार होऊ न देण्यासाठी प्रयत्न करणं कठिण होतं. अर्थात भारतीय वायुदलानेही अचूक कामगिरी केली आहे."
पाकिस्तानच्या वायुलावर बोलताना ते म्हणाले, "वायुसंरक्षणाबाबतीत त्यांच्या कार्यक्षमतेबाबत मला शंका नाही, पण माझ्या मतानुसार F-16 सर्वोच्च दर्जाची नाहीत. तसंच JF-17 अजूनही लढाईत सिद्ध झालेली नाहीत."
याबाबत तुफैल म्हणतात, "पाकिस्तानकडे सध्या कमी प्रकारची विमानं आहेत. भारतापेक्षा विमानांच्या संख्येने आणि आकाराने लहान असलो तरी आम्ही अत्यंत शिस्तबद्ध होतो."
पाकिस्तान वायुदल आणि चीन यांच्या एकत्रित संघटनेला संबोधित करताना ते म्हणाले होते, "JF 17 असो वा भविष्यात येणारी फिप्थ जनरेशन विमानं, आम्ही योग्य मार्गावर आहोत, ...आणि लक्षात ठेवा आम्ही आमची उपकरणं स्वतःच तयार करत आहोत तीही वेगानं..."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








