आईनस्टाईनचं 'गॉड लेटर': 'देव हा शब्द मानवी दुर्बलतेची अभिव्यक्ती आहे'

पत्र

फोटो स्रोत, Reuters

सापेक्षवादाचा सिद्धांत मांडून विज्ञान क्षेत्रात क्रांती घडवणारे महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी धर्माविषयी लिहिलेल्या एका पत्राचा काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये लिलाव करण्यात आला. हे पत्र तब्बल 20 कोटी रुपयांना (2.9 दशलक्ष डॉलर्सना) विकण्यात आलं. या पत्राला 'गॉड लेटर' म्हणजेच 'देवाचं पत्र' असंही म्हणण्यात आलं आहे.

नोबेल पारितोषिक विजेते भौतिक शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी मृत्यूच्या वर्षभरापूर्वी वयाच्या 74व्या वर्षी जर्मन तत्त्ववत्ते इरिक गटकिंड यांना हे पत्र लिहिलं आहे. धर्म आणि विज्ञान यांच्यातल्या वादात हे पत्र महत्त्वाचं मानलं जातं. धर्म आणि तत्त्वज्ञानाबद्दल आईनस्टाईन यांची काय मतं होती, हे या पत्रातून स्पष्ट होतं.

बघूया पत्रात अल्बर्ट आईनस्टाईन यांनी काय म्हटलं आहे.

line

प्रिन्स्टन, 3. 1. 1954

प्रियगटकिंड,

ब्रुवर यांच्या सततच्या आग्रहानं प्रेरित होऊन मी गेल्या काही दिवसात तुमचं पुस्तक वाचलं. हे पुस्तक पाठवण्यासाठी तुमचे आभार. यात मला सर्वांत जास्त भिडलं ते म्हणजे - आयुष्य आणि मानवी समाजाकडे बघण्याचा आपला दोघांचा वास्तविक दृष्टिकोन जवळपास सारखा आहे.

जो स्वहितापलिकडे जाणारा आहे, जो अहंकार केंद्रित इच्छांपासून मुक्त होण्यासाठी प्रयत्नशील आहे, मानवी जीवन अधिक सुधारण्यासाठी आणि संस्कारक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे, ज्यात शुद्ध मानवी तत्त्वावर भर देण्यात आला आहे, ज्याद्वारे निर्जीव वस्तू या केवळ साधन समजल्या गेल्या आहेत, ज्याला कुठलंही प्रभावी कार्य जबाबदार नाही. (हाच तो दृष्टिकोन आहे जो आपल्या दोघांना अस्सल "बिगर-अमेरिकी दृष्टिकोन" "un-American attitude"म्हणून एकत्र जोडतो. )

अल्बर्ट आइन्स्टाईन

फोटो स्रोत, Getty Images

असं असलं तरीसुद्धा ब्रुवरने प्रोत्साहन दिलं नसतं तर मी तुमचं पुस्तक इतकं मन लावून वाचलं नसतं. कारण माझ्यासाठी अगम्य असणाऱ्या भाषेत ते लिहिलेलं आहे. देव हा शब्द म्हणजे केवळ मानवी दुर्बलतेची अभिव्यक्ती आहे. बायबल एक वंदनीय संग्रह असला तरी माझ्या दृष्टीने ती आदीम दंतकथा आहे. कितीही मार्मिक शब्दांत त्याचा अर्थ सांगितला तरीसुद्धा यात (या मतात) काही बदल होऊ शकत नाही.

या सुसंस्कृत व्याख्या निसर्गतःच भिन्न आहेत आणि मूळ संग्रहाशी त्याचा प्रत्यक्षात काहीही संबंध नाही. माझ्यासाठी मूळ यहुदी धर्म हा इतर कुठल्याही धर्माप्रमाणे आदीम काळातील अंधश्रद्धांचा अवतार आहे. आणि मी ज्या ज्यू समाजातून आलो आहे, ज्याचा मला आनंद आहे आणि ज्यांच्या मानसिकतेत मला गच्च आवळल्यासारखं वाटतं,माझ्यासाठी ते ज्यूसुद्धा इतर लोकांपेक्षा वेगळे नाही. माझा अनुभव असा सांगतो की ते काही इतर समूहांपेक्षा उत्तम नाहीत. मग भलेही सत्तेअभावी तयार होणाऱ्या दुर्गणांपासून ते चार हात लांब आहेत. तसं असलं तरी मला त्यांच्यामध्ये काही विशेष आढळलं नाही. त्यामुळे मला ते 'ईश्वराने निवडलेले' वाटत नाहीत.

अल्बर्ट आइन्स्टाईन

फोटो स्रोत, Getty Images

सामान्यपणे मला एका गोष्टीने वेदना होतात - ती म्हणजे तुम्ही एका उच्चपदाचा दावा करता आणि गर्वाच्या दोन भिंतींनी त्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न करता. बाहेरची भिंत म्हणजे मनुष्य म्हणून आणि आतली भिंत म्हणजे ज्यू म्हणून. मनुष्य म्हणून तुम्ही, काही प्रमाणात, कार्यकारणभावापासून मुक्ततेचा दावा करता, जो अन्यथा तुम्ही स्वीकारला असता आणि ज्यू म्हणून एकेश्वरवादासाठी विशेष दर्जा. मात्र मर्यादित कार्यकारणभाव हा मुळात कार्यकारणभावच नसतो.

आपले महान स्पिनोझा (सतराव्या शतकातील ज्यू-डच तत्त्ववेत्ते) यांना हे अत्यंत स्पष्टपणे हे कळलं होतं. आणि नैसर्गिक धर्मांची जी तात्त्विक संकल्पना आहे ती एकाधिकाराने तत्त्वतः रद्द केलेली नाही. अशा भिंतींमुळे आपण एक प्रकारे स्वतःची फसवणूक करत असतो, मात्र त्यामुळे आपले नैतिक प्रयत्न पुढे जात नाहीत. दुर्दैवाने तुम्हाला वाटतं हे त्याच्या उलट आहे.

आपल्या बौद्धिक निश्चयातले मतभेद मी पूर्णपणे उघड केले असले तरीसुद्धा एका महत्त्वाच्या गोष्टीबाबत आपण दोघं एकमेकांच्या खूप जवळ आहोत, हे मला अगदी स्पष्ट आहे आणि ते म्हणजे मानवी स्वभावाचं आपण केलेलं मूल्यांकन. आपल्या बुद्धीला असलेलं आवरण आपल्याला वेगळं करते. फ्रॉईडच्या भाषेत सांगायचं तर "तर्कसंगतता". म्हणूनच आपण ठोस गोष्टींविषयी बोललो तर एकमेकांना नीट समजून घेऊ, असं मला वाटतं.

मैत्रीपूर्ण धन्यवाद आणि शुभेच्छांसह.

line

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)