ट्रेडवॉरनंतर चीनचं चलन घसरलं; पण चीनला चलनावर नियंत्रण ठेवणं जमतं तरी कसं?

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेसोबत सुरू असलेलं ट्रेडवॉर आणि अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती यामुळे चीनचं चलन युआन डॉलरच्या तुलनेत कमकुवत झालं आहे. 1 नोव्हेंबरला ही किंमत 6.97 डॉलर प्रति युआन झाली होती. मे 2008नंतरची युआनची ही सर्वांत खालची पातळी होती.
डिसेंबर 2016मध्ये 6.65 डॉलर, 2017च्या पूर्वार्धात 6.5 डॉलर, फेब्रुवारी ते एप्रिल 2018मध्ये 6.26 डॉलर अशी युआनची किंमत होती. त्यानंतर अमेरिका आणि चीनमधील ट्रेडवॉरचा परिणाम दिसू लागला.
ट्रंप सरकारचं मत असं आहे की निर्यात वाढावी यासाठी चीन सरकार जाणीवपूर्वक आपल्या चलनाचं मूल्य कमी ठेवतं.
तर चीनचं मत असं आहे की युआन स्थिर ठेवण्यासाठी हे प्रयत्न केले जातात.
या पार्श्वभूमीवर युआन काम कसं करतं आणि युआनचं मूल्य घसरण्याचे काय परिणाम होतील या प्रश्नांची उत्तरं शोधणं आवश्यक ठरतं.
युआनचं काम कसं चालतं?
महत्त्वाची बाब म्हणजे युआनची कार्यपद्धती आणि इतर देशांतील चलनाची कार्यपद्धती यात फार मोठा फरक आहे. त्यातील काही असे.
1. चीनची मध्यवर्ती बँक दररोज युआनची किंमत ठरवते.
2. मिडपॉईंट नावाची एक कार्यपद्धती आहे, त्या माध्यमातून हे नियंत्रण ठेवलं जातं.
3. बाजारानुरूप विनियम दर असावा यासाठी हे धोरण स्वीकारण्यात आलं आहे.
4. युआन कमकुवत होणं म्हणजे चीनपासून निर्यात स्वस्त होणार.
चीन आणि अमेरिकेत सुरू आहे करांचं युद्ध
चीन हा अमेरिकेचा मोठा ट्रेडिंग पार्टनर आहे. अमेरिकेच्या एकूण व्यापारात चीनचा वाटा 16.4 टक्के आहे. पण गेली काही दिवस दोन्ही देश एकमेकांच्या वस्तूंवरील करांत वाढ करत आहेत. यातून व्यापारात अडचणी येत आहेत. या करांच्या युद्धात एक देश दुसऱ्या देशाच्या वस्तूंवर कर लादतं. जेणेकरून स्थानिक वस्तूंच्या किंमतीच्या तुलनेत संबंधित देशांच्या वस्तूंच्या किंमती वाढतात आणि त्या बाजारात स्पर्धा करू शकत नाहीत.
युआनचं मूल्य कमी का ठेवलं जातं?
कन्स्ल्टन्सी कॅपिटल इकॉनॉमिक्सचे ज्युलियन इवान्स प्रिचर्ड सांगतात येत्या काही महिन्यात युआनवर दबाव असेल आणि त्याचं मूल्य 7 डॉलरपर्यंत जाईल.
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरांत वाढ केली आहे, तसेच चीनची अर्थव्यवस्था मंदावली आहे. या आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत चीनचा जीडीपी 6.5% इतका - म्हणजे गेल्या 10 वर्षांत सर्वांत कमी, होता.

फोटो स्रोत, Reuters
अमेरिका आणि चीनच्या चलन धोरणात फरक आहे. त्यामुळे चीन त्यांच्या नियंत्रणात असलेल्या एक्सचेंज दरात आवश्यक तसा बदल करत असतं.
विरोधाभास असा आहे की युआनचं मूल्य कमी असलं की चीनमधून निर्यात करणं इतर देशांना आकर्षक ठरतं.
पण चीन गोत्यात सापडला आहे. चीनने जर युआनची किंमत कमी होऊ दिली तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल आणि ट्रेडवॉर अधिकच गंभीर बनेल.
ट्रंप आणि क्षी जिनपिंग जी-20 परिषदेत सहभागी होतील. तिथं ट्रेडवॉरवर चर्चा होणं आणि मार्ग निघणं अपेक्षित आहे. पण जर युआनमध्ये घसरण झाली तर ही चर्चा सुरू होण्याआधीच बिनसू शकते.
विश्लेषकांचं मत असं आहे की चीनकडे दुसरा पर्यायही नाही. अमेरिकेने चीनच्या सर्वच वस्तूंवर कर लावले तर ही शक्यता जास्तच असेल.
चीनच्या विकासाची गती जर मंदावली तर ते तिथल्या आर्थिक आणि राजकीय स्थैर्यासाठी धोकादायक असले. चीनच्या सरकारला यापासून वाचायचं आहे.
चीनची अर्थव्यवस्था किती बळकट?
आतापर्यंत चीन अमेरिकेसमोर झुकण्यास नकार देत होता. याला दोन बाबी कारणीभूत होत्या. एक म्हणजे आर्थिक रचना आणि विदेशी चलनाचा प्रचंड साठा.
विदेशी चलनाच्या साठ्यात आज चीन जगातील सर्वांत शक्तिशाली देश आहे. चीनजवळ जगातल सर्वाधिक 3.12 खरब डॉलर विदेशी चलनाचा साठा आहे.
जीडीपीच्या बाबतीत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. इतकंच नाही तर विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात चीनचा तिसरा क्रमांक लागतो.
चीनच्या आर्थिक यशाचं मॉडेल
दुसऱ्या महायुद्धानंतर चीनच्या अर्थव्यवस्थेत जी सुधारणा झाली ती बाजारावरील विश्वासामुळे झाली नाही.
विदेशी गुंतवणूक कुठे आणि कशी वापरायची हे चीननं सर्वप्रथम ठरवलं.

फोटो स्रोत, Getty Images
यासाठी विशेष आर्थिक क्षेत्रांची अर्थात SEZची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी दक्षिणेच्या तटावरील प्रांत निवडण्यात आले.
1978 ते 2016 दरम्यान चीनचा जीडीपी झपाट्यानं वाढला.
याच काळात 70 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात आलं आणि 38.5 कोटी लोकांचा समावेश मध्यम वर्गात झाला.
चीनचा परकीय व्यापार 17,500 टक्क्यांनी वाढला आणि 2015मध्ये परकीय व्यापारात चीन जगाचा नेता म्हणून समोर आला.
1978मध्ये वर्षभरात चीननं जितका व्यापार केला होता तितका चीन आज 2 दिवसांत करतो.
असं असलं तरी अमेरिकेसोबत चालत असलेल्या ट्रेड वॉरमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. कारण युरोपियन युनियननंतर अमेरिका चीनचा सर्वांत मोठा पार्टनर आहे. आता जर युआनचं मूल्य 7 रुपये प्रति डॉलरच्या खाली घसरलं तर यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होईल, असं विश्लेषकांना वाटतं.
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








