तुम्ही खूप वाद घालता का? चांगलंय, त्याने तुमच्या मेंदूची धार वाढते

वाद घाला, पण भांडण नको
फोटो कॅप्शन, वाद घाला, पण भांडण नको

"आपल्यापैकी सगळ्यांनाच वाद टाळायचे असतात. बहुतांश वेळा आपण लोकांशी आपलं कसं पटेल हे पाहतो," असं एका UKच्या विद्यापीठात संवाद विश्लेषणाच्या प्रोफेसर असलेल्या लीझ स्टोको सांगतात.

"एखाद्या संभाषणादरम्यान आपले जेव्हा दुसऱ्याशी मतभेद होत असले तरीही आपण आपल्या भाषेतून, शब्दातून, हावभावांमधून दुसरी व्यक्ती दुखावणार नाही, याची काळजी घेत असतो. आपण काही तडजोड करायचा प्रयत्न करतो. आपण दुसऱ्याशी काय आणि कसं बोलतोय, याकडे आपलं सतत लक्ष असतं. त्यांना आपलं म्हणण पटावं, तेही न वाद घालता, यासाठी हा सगळा खटाटोप चाललेला असतो," त्या सांगतात.

तुम्हीही अनेकदा असेच वागत असाल, हो ना?

कामाच्या ठिकाणी खटके उडू नये, हा आपला सगळ्यांचाच प्रयत्न असतो. ज्या व्यक्तीच्या शेजारी जवळजवळ दररोज आठ तास बसायचं आहे, तिच्याशी कुणाला वाद घालवासा वाटेल.

जर तुमचे मतभेद तुमच्या बॉसशी असतील तर मग तुमचे वाद घालण्याचे चान्सेस अजूनच कमी होतील. पण कामाच्या ठिकाणी वाद टाळणं योग्य नाही, असं Harvard Business Review Guide to Dealing with Conflict at Work च्या लेखिका एमी गॅलो सांगतात.

"सगळ्यांनाच वाटतं की आपलं कामाचं ठिकाण एकदम आदर्श असावं, जिथे कुणाचंच कुणाशीच भांडण नाही, कुठलाही वाद नाही. पण जर आपण वाद घातला नाही, मतभेद व्यक्त केले नाहीत तर आपण चांगलं काम करूच शकत नाही. ते शक्यच नाहीये," असं त्या सांगतात.

वेगवेगळ्या विचारसरणीची माणसं एकत्र आली की त्यांच्यात मतभेद असणारच.

गॅलो पुढे सांगतात, "अनेक संस्था सर्वसमावेशक धोरणाविषयी बोलतात. त्यांना वेगवेगळ्या विचारसरणीची माणसं हवी असतात. पण जेव्हा त्या संस्था कर्मचाऱ्यांमधल्या मतभेदांना महत्त्व देत नाहीत, तेव्हा असा संदेश जातो की आम्हाला वेगवेगळी मतं ऐकायची नाहीत."

आता विज्ञानाचंच उदाहरण घ्या. नवनवे सिद्धांत फक्त प्रयोगांनीच सिद्ध होतात, असं नाही. कधीकधी दुसऱ्या एका संशोधकाने त्यांना आव्हान दिलं तरीही काही थिअरीज सिद्ध होतात, किंवा काही नवीन संशोधन पुढे येतं.

ऑफिसमध्ये वाद घाला, पण पुढच्याचा आदर ठेवा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ऑफिसमध्ये वाद घाला, पण पुढच्याचा आदर ठेवा

कोलंबिया विद्यापीठातले प्राध्यापक स्टुअर्ट फायरस्टीन यांना वाटतं की अशी आव्हानं आवश्यक आहेत, अगदी ज्याला आव्हान दिलं गेलं त्याच्यासाठीही.

"माझ्या प्रयोगशाळेत असे अनेक प्रसंग घडलेत, जेव्हा मी एखादं संशोधन प्रसिद्धीला देण्यापूर्वी त्याचा पहिला मसूदा कुणाला तरी वाचायला दिला आणि त्या आढावा घेणाऱ्याने त्यातल्या काही मोठ्या चुका माझ्या लक्षात आणून दिल्या. यावरून मी नाराज तर होणार नाहीच, उलट मी त्या माणसाचे आभार मानले पाहिजेत. नाहीतर ते तसंच प्रसिद्ध झालं असतं आणि अख्ख्या गावासमोर माझं पितळ उघडं पडलं असतं. आता फक्त मला आणि त्या आढावा घेणाऱ्यालाच माहितीये की मी काय मूर्खपणा केला होता ते."

वाद-प्रतिवादाने फायदाच होतो, हे विज्ञानाने सिद्ध केलं आहे.

"विज्ञानाची रचनाच अशी आहे की वाद प्रतिवाद होत राहावेत. मला अजूनही त्या मीटिंग आठवतात जिथे लोक कुत्र्या-मांजरांसारखे भांडतात, पण मीटिंगनंतर तेच लोक गळ्यात गळे घालून बारमध्ये जाताना दिसतात. हे असंच असायला हवं. तुमच्यात कितीही मतभेद असले तरी एकमेकांप्रती आदर हवाच."

तुम्हाला असं वाटू शकतं की ही सततचे वाद आणि कधीकधी भांडणं सहन करण्यासाठी गेंड्याची कातडी असावी लागते. साहाजिकच एका ऑफिसमध्ये असताना सगळे एका ध्येयाने प्रेरित असता, कुणी नवनवीन कल्पना पुढे आणत असतं तर कुणाला वैज्ञानिक तथ्यं शोधून काढायची असतात. पण या सगळ्यात आपण कुठेतरी चुकीचे आहोत, हे कुणालाच ऐकायला आवडत नाही. त्यामुळे वाद होतात, तर त्यातून कुणा ना कुणाला त्रासही होतोच.

भांडण
फोटो कॅप्शन, वाद घातल्याने तुम्ही 'आपल्याला इगो नाही,' असं म्हणत त्याला नाकारण्यापेक्षा तुम्ही तुमच्या इगोचा चांगला वापर करू शकता, असं क्लेअर फॉक्स सांगतात.

पण हा त्रास करून घेणं फायद्याचं नक्कीच फायदा आहे. "पहिलं म्हणजे तुमच्या आयडिया दुसऱ्यांच्या तुलनेत कितपत चांगल्या किंवा वाईट आहेत, ते कळतं. त्या लॉजिकल आहेत की नाही, हे कळतं," असं अॅकेडमी ऑफ आयडियाजच्या क्लेअर फॉक्स म्हणतात.

"एकतर यामुळे तुमची कल्पनाशक्ती आणखी विकसित होते. म्हणजे तुम्ही तुमच्या विरोधकाला तुमची आयडिया पटवून देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न कराल, त्या आयडियावर आणकी काम कराल," फॉक्स सांगतात. "किंवा असंही होऊ शकतं की पुढची व्यक्ती तो वाद जिंकेल कारण तुम्हाला त्याचे मुद्दे पटलेले असतील, म्हणजे तुमचंही मनपरिवर्तन झालेलं असेल."

"दुसरं म्हणजे, असं केल्याने तुम्ही 'आपल्याला इगो नाही,' असं म्हणत त्याला नाकारण्यापेक्षा तुम्ही तुमच्या इगोचा चांगला वापर करू शकता," त्या पुढे नमुद करतात.

"पूर्वग्रह, हेकेखोरपणा आणि ठामपणा हे गुण तुमच्या चांगल्या कल्पनांना पुढे नेतात," असं लेखक जॉनथन राँच म्हणतात. "पण त्यामुळे एखाद्या मीटिंगमध्ये दुसऱ्यांनी आपल्या कल्पना ठामपणे मांडूच नये, असं व्हायला नाही. उलट त्यांनी आपली एखादी आयडिया अशा मीटिंगमध्ये ठामपणे मांडावी, जेणेकरून बाकी लोक त्या आयडियाची समीक्षा करतील आणि त्या व्यक्तीच्या ठामपणातून आणखी काही चांगलं शोधू शकतील."

तिसरं म्हणजे, माणसांच्या विचारातल्या ज्या गोष्टी आधी विचित्र वाटतात त्याच गोष्टी नंतर फायदेशीर वाटू लागतात. पूर्वग्रहाचेच उदाहरण घ्या ना. आपण अनेकदा अशा पुराव्यांच्या शोधात असतो, जे आपल्या मताला किंवा आपल्या आयडियाला दुजोरा देतात. पर्यायाने त्या कल्पनेला अधिकाधिक विकसित करतो.

"तुम्ही जर एकटेच काम करत असाल किंवा तुमच्या विचारांच्याच लोकांसोबत काम करत असाल तर तुम्हाला तुमच्यासारखीच मतं ऐकायला मिळतील. त्याला प्रतिवाद करणारं, चॅलेंज करणारं कुणीच नसेल. अशा वेळेस तुम्ही अतिआत्मविश्वासी बनू शकता आणि तुमच्या मतांचं ध्रुवीकरण होतं," असं आकलनशक्तीचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ ह्युगो मर्सिअर सांगतात. त्यांनी प्राध्यापक डॅन स्पर्बर यांच्याबरोबर The Enigma of Reason (कारणांचं रहस्य) हे पुस्तक लिहिलं आहे.

"यापेक्षा वाद-प्रतिवाद करताना आपल्या वक्तव्यांना धार येते. आपल्याला आपल्याच तर्कातले दोष पटकन दिसत नाहीत, पण इतरांना नक्की दिसतात. तसंच आपण आपल्यापेक्षा इतरांच्या बोलण्याचं जास्त चांगलं विश्लेषण करू शकतो," ते म्हणतात.

भांडण

एकटे असू तर आपण आळशीपणाने विचार करतो आणि फक्त आपल्याला पटणाऱ्या गोष्टींसाठी पुरावे जमवतो. इतरांना आपलं म्हणणं पटवणं, त्याच्या प्रतिवादात चुका शोधणं आणि त्यांना तुमच्या तर्कात चुका शोधू देणं, यानेच खरं तुमच्या कल्पनांची परीक्षा होऊ शकते.

म्हणूनच तुमच्या स्वतःच्या, तुमच्या सहकाऱ्यांच्या आणि समाजाच्या भल्यासाठी दिवसभरातून एकदा का होईना, मस्तपैकी चांगल्या प्रकारचा वाद घाला. चांगला वाद म्हणजे आपल्या मतांशी ठाम असणारा, पण दुसऱ्याचा आदर करणारा वाद.

जसं लेखिका गॅलो म्हणतात, "मतभेद खूनशीच असावेत, असं नाही. तुम्ही प्रेमानेही आणि समजदारीनेही आपले मतभेद दर्शवू शकता."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)