संशयित रशियन गुप्तहेरांनी जगभरात सायबर हल्ले केल्याचा आरोप

फोटो स्रोत, Thinkstock
रशियाच्या गुप्तचर विभागानं जगभरात अनेक ठिकाणी सायबर हल्ले केल्याचा आरोप युरोपिय देशांनी केला आहे.
महत्त्वाच्या संस्थांवर सायबर हल्ले केल्याचं अमेरिका, इंग्लंड आणि नेदरलँड्सनं म्हटलं आहे.
फिफा, वर्ल्ड अँटी डोपिंग एजंसी आणि अमेरिकेची अणू उर्जा कंपनी या त्यांच्या निशाण्यावर होत्या, असा दावा अमेरिकेनं केला आहे.
या आधी इंग्लंडमध्ये राहणाऱ्या माजी रशियन गुप्तहेरावर नर्व्ह एजंट हल्ला झाला होता. त्या हल्ल्याची चौकशी करणाऱ्या Organisation for the Prohibition of Chemical Weapons (OPCW) या संस्थेची कंप्युटर सिस्टिम हॅक केल्याचा आरोप संशयित रशियन नागरिकांवर आहे.
दरम्यान, रशियानं सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. रशियाला बदनाम करण्याचा हा डाव आहे, असं रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, DUTCH GOVERNMENT

रशियावर काय आरोप आहेत?
- नर्व्ह एजंट हल्ल्याची चौकशी करणाऱ्या OPCWया संस्थेची कंप्युटर सिस्टिम हॅक केल्याचा आरोप नेदरलँड्सनं चार रशियन नागरिकांवर केला आहे.
- इंग्लडनं चार हाय-प्रोफाईल सायबर हल्ल्यामागे रशियाच्या गुप्तचर संस्थेचा हात असल्याचं म्हटलं आहे. हल्ला झालेल्यांमध्ये युक्रेनच्या काही कंपन्या, अमेरिकेची डेमोक्रॅटिक पार्टी आणि इंग्लडमधल्या एका छोट्या टीव्ही नेटवर्कचा समावेश आहे.
- अमेरिकेने अँटी-डोपिंग एजंसी आणि उणुउर्जा कंपनी वेस्टिंगहाउसवर रशियाच्या गुप्तचर संस्थेनं सायबर हल्ला केल्याचा आरोप केला आहे.
- कॅनडानही त्यांच्या सेंटर फॉर इथिक्स इन स्पोर्ट्स आणि अँटी डोपिंग एजंसीवर रशियानं हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

फोटो स्रोत, MINISTRIE VAN DEFENSIE
एप्रिलमध्ये चार संशयित रशियन नागरिकांकडून एक लॅपटॉप हस्तगत करण्यात आला होता. त्याचा वापर ब्राझिल, स्वित्झर्लंड आणि मलेशियात करण्यात आला होता, असा नेदरलँड्स सरकारचा दावा आहे.
तसंच MH-17 विमान अपघाताच्या तपासावर प्रभाव टाकण्यासाठी मलेशियावर सायबर हल्ला केल्याचा नेदरलँड्सने आरोप केला आहे.
2014 मध्ये MH-17 विमान हे युक्रेनमध्ये पाडण्यात आलं होतं. त्यावेळी विमानातल्या सर्व 289 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
रशियाचं काय म्हणणं आहे?
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने इंग्लड आणि नेदरलँड्सचे आरोप तातडीनं फेटाळले आहेत. रशियाने अधिकृतरित्या जारी केलेल्या पत्रकात हा योजनाबद्ध पद्धतीनं रशियाच्या विरोधात अपप्रचार करण्याचा डाव असल्याचं म्हटलं आहे.
मोबाईल वापरणाऱ्या कोणत्याही रशियन नागरिकाला गुप्तहेर ठरवलं जात आहे, असं रशियानं म्हटलं आहे.
अमेरिकेने 7 रशियन नागरिकांवर सायबर हल्ला केल्याचा केला आहे. त्यापैकी चारजणांची नेदरलँड्समधून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर इतर तिघांवर 2016च्या अमेरिकन निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे.

फोटो स्रोत, FBI
इंग्लड आणि नेदरलँड्सच्या पंतप्रधानांनी संयुक्त परिपत्रक प्रसिद्ध केलं. यामध्ये OPCW वर सायबर हल्ल्याचा कट रचून रशियन गुप्तचर संस्थेनं वैश्विक मुल्ल्यांची पायमल्ली केल्याचा आरोप केला आहे.
मित्र राष्ट्रांशी चर्चा करून रशियावर निर्बंध लादण्याचा इंग्लड विचार करत आहे, असं इंग्लडचे परराष्ट्र सचिव जर्मी हंट म्हणाले आहेत.
संयुक्त राष्ट्रानं ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








