55 वर्षांनंतर भौतिकशास्त्रातलं नोबेल मिळवणारी महिला

डोना स्ट्रिकलँड

फोटो स्रोत, UNI WATERLOO

भौतिकशास्त्रात तब्बल 55 वर्षांनंतर एका महिलेला भौतिकशास्त्रात नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

कॅनडाच्या डोना स्ट्रिकलँड या भौतिकशास्त्रातलं नोबेल जिंकणाऱ्या तिसऱ्या महिला ठरल्या आहेत. याआधी मेरी क्युरी यांना 1903मध्ये आणि गोपर्ट-मेयर यांना 1963मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता.

यावर्षी स्ट्रिकलँड यांना हा पुरस्कार अमेरिकेचे आर्थर अश्किन आणि फ्रान्सचे जेरार्ड मरू यांच्याबरोबर विभागून देण्यात आला आहे.

स्ट्रिकलँड यांना लेसर फिजिक्स या क्षेत्रातल्या त्यांच्या योगदानाबद्दल नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे.

नोबेल पुरस्कार विजेत्यांना नव्वद लाख स्वीडिश क्रोनोर म्हणजेच जवळपास सात कोटी रूपये मिळतात.

कशासाठी मिळाला हा पुरस्कार?

डॉ. अश्किन यांनी ऑप्टिकल ट्वीझर्स नावाचं एक तंत्रज्ञान विकसित केलं आहे. त्याचा उपयोग जीवशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी केला जातो.

डॉ. मरू आणि डॉ. स्ट्रिकलँड यांनी अतिशय छोटी पण वेगवान लेसर बनवण्यात योगदान दिलं आहे.

त्यांनी चर्प्ड पल्स अॅप्लिकेशन (CPA) नावाचं हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. त्याचा वापर कॅन्सर उपचार आणि डोळ्यांच्या सर्जरीसाठी केला जातो.

आर्थर अश्किन आणि जेरार्ड मरू

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, आर्थर अश्किन आणि जेरार्ड मरू

कॅनडाच्या वॉटरलू विद्यापिठाच्या डॉक्टर स्ट्रिकलँड यांनी पुरस्काराची घोषणा झाल्यावर म्हटलं की, "सुरूवातीला माझा विश्वासच नाही बसला. जेरार्ड यांच्यासोबत पुरस्कार विभागून मिळण्याविषयी त्या म्हणतात की ते माझे सुपरवायझर आहेत.

त्यांनी CPAला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. त्यांना हा पुरस्कार मिळायलाच हवा होता. अश्किन यांनाही हा पुरस्कार मिळाला याचा मला आनंद आहे."

'मला नेहमीच समानतेने वागवलं गेलं'

बीबीसीशी बोलताना डॉक्टर स्ट्रिकलँड यांनी सांगितलं की, इतक्या वर्षांत कोणत्याही महिलेला भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार मिळाला नव्हता, हे ऐकून त्यांना फार आश्चर्य वाटलं. "पण मला कधीच भेदभावाचा सामना करावा लागला नाही. माझ्याबरोबर ज्यांना हा पुरस्कार मिळाला तेही या पुरस्काराच्या योग्यतेचे आहेत."

काही दिवसांपूर्वीच एका भौतिकशास्त्रज्ञाने जिनीव्हातल्या सर्नमधल्या पार्टिकल फिजिक्स प्रयोगशाळेत 'आक्षेपार्ह' भाषण दिलं. त्यात म्हटलं होतं की 'फिजिक्स पुरूषांनी बनवलं आहे आणि पुरूष वैज्ञानिकांबरोबर भेदभाव होत आहे."

चर्प्ड पल्स अॅप्लिकेशन (CPA)

फोटो स्रोत, SPL

फोटो कॅप्शन, चर्प्ड पल्स अॅप्लिकेशन (CPA) तंत्रज्ञानाचा उपयोग कॅन्सर उपचार आणि डोळ्यांच्या सर्जरीसाठी केला जातो.

यानंतर रिसर्च सेंटरनी त्या शास्त्रज्ञाला निलंबित केलं. अशा गोष्टी मी मनावर घेत नाही, असं स्ट्रिकलँड यांनी सांगितलं.

याआधी भौतिकशास्त्रातलं शेवटचं नोबेल जर्मन वंशाच्या भौतिकशास्त्रज्ञ मारिया गोपर्ट-मेयर यांना मिळालं होतं. त्यांना अणूच्या केंद्रभागासंबंधी शोध लावल्याबद्दल हा पुरस्कार मिळाला होता.

मेरी क्यूरी आणि पिअरे क्यूरी

फोटो स्रोत, GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, मेरी क्यूरी आणि पिअरे क्यूरी

त्यांच्या आधी पोलंडमध्ये जन्मलेल्या भौतिकशास्त्रज्ञ मेरी क्यूरी यांना हा पुरस्कार 1903 मध्ये त्यांचे पती पिअरे क्यूरी आणि अॅटोईन हेन्री बॅकेरल यांच्यासोबत विभागून मिळाला होता.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)