थायलंड : गुहेत अडकलेल्या मुलांच्या सुटकेसाठी अनाठायी धोका पत्करणार नाही - लष्कर

फोटो स्रोत, Getty Images
या बातमीत बऱ्याच अपडेट्स आल्या असून सर्वांत ताज्या बातमी इथे वाचा.
16 दिवसांपासून एका गुहेत अडकलेली 12 मुलं आणि त्यांच्या फुटबॉल संघाचे प्रशिक्षक असे 13 जण अखेर सापडले. थाई लष्कर यांना वाचवण्यासाठी शर्थ करत आहे. पण हे काम सोपं नाही. पुराचं पाणी ओसरेपर्यंत म्हणजे काही महिनेसुद्धा त्यांना बाहेर काढण्यासाठी लागू शकतात.
ही 12 मुलं आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या सुटकेसाठी अवास्तव धोका पत्करणार नसल्याचं मदत यंत्रणेनं स्पष्ट केलं आहे.
दहा दिवसांनंतर पहिल्यांदाच या सगळ्यांना अन्न तसंच वैद्यकीय उपचार मिळाले.
सोमवारी या सगळ्यांपर्यंत पोहोचण्यात मदत यंत्रणेला यश आलं. डॉक्टर, नर्स आणि डायव्हर्स अशा सातजणांच्या पथकानं 12 मुलं आणि प्रशिक्षकांना आवश्यक गोष्टी पुरवल्या.
सुरक्षित पद्धतीनं या सगळ्यांना गुहेबाहेर कसं काढता येईल याबाबत मदत पथकं वेगवेगळे पर्याय आजमावत आहे.
या सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी कोणतीही घाई केली जाणार नाही. कमीत कमी धोका पत्करून त्यांना बाहेर काढलं जाईल, कारण या सगळ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे, असं चिआंग रायचे गर्व्हनर नारोंगस्क ओसोथथनकोरन यांनी सांगितलं.
पावसाचा जोर वाढत असल्यानं गुहेतली पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. 12 मुलं आणि त्यांच्या प्रशिक्षकांनी गुहेच्या ज्या बाजूला आश्रय घेतला आहे ते ठिकाण सुरक्षित आहे का? याची खातरजमा करण्यात येत आहे.
मुलं तसंच प्रशिक्षकांना पटकन ऊर्जा मिळेल असे खाद्यपदार्थ तसंच एनर्जी ड्रिंक देण्यात आल्याचं मदत पथकानं सांगितलं.
मुलं तसंच प्रशिक्षकांपैकी बहुतांशांना पोहता येत नसल्याने मदत कार्यातल्या अडचणी वाढल्या आहेत. बाहेर येण्यासाठी या सगळयांना पोहता येणं किंवा डायव्हिंग येणं आवश्यक असल्याचं थायलंडच्या लष्करानं स्पष्ट केलं होतं. अन्यथा चार महिने गुहेतली पाण्याची पातळी कमी होईपर्यंत त्यांना गुहेतच राहावं लागेल.
पाण्याची पातळी कमी करण्यासाठी बाहेर पंप लावून पाणी उपसण्याचे कामही हाती घेण्यात आलं आहे.
धुवांवार पावसामुळे गुहेतील पाण्याची पातळी झपाट्यानं वाढल्यामुळे ही मुलं आणि त्यांचे प्रशिक्षक आत अडकले. मदत पथकाच्या अथक परिश्रमानंतर या सगळ्यांपर्यंत पोहोचण्यात यश आलं. मात्र पाण्याची पातळी ओसरेपर्यंत या सगळ्यांना बाहेर यायला काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अशी अडकली मुलं
फुटबॉल खेळणारी ही मुलं 9 दिवसांपूर्वी सरावानंतर थायलंडमधल्या या मोठ्या गुहेत शिरली होती. त्यानंतर, जोरदार पाऊस झाल्यानं या गुहेत पुराचं पाणी शिरलं. मुलांचा परतायचा रस्ता बंद झाला. दरम्यान थायलंड लष्कर आणि ब्रिटीश पाणबुड्यांनी खूप शोध घेऊन या मुलांना शोधून काढलं. ही मुलं पाणी वाढल्यामुळे गुहेच्या आत एका कोरड्या उंचवट्यावर बसलेली आढळली.
बचाव पथकाला या मुलांपर्यंत मदत पोहोचवायची असली तरी, त्यांच्यापर्यंत ती सहजी पोहोचणार नाही. कारण पुराच्या वाढत्या पाण्यानं गुहा वेढलेली आहे. त्या मुलांना अन्नाची गरज असून लष्करी सूत्रांच्या मते, त्यांना पुढील चार महिन्यांसाठीचं अन्न पुरवावं लागणार आहे.
कारण गुहेतून बाहेर येण्यासाठी मुलांना 4 महिनेही लागू शकतात.
"गुहेत वीज आणि टेलिफोनची यंत्रणा पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून या मुलांना त्यांच्या पालकांसोबत बोलता येईल," असं नारोंगसाक ओसोथॅनकॉनचे गर्व्हनर चियांग राय यांनी सांगितलं.
मुलं सापडली कशी?
दोन ब्रिटीश पाणबुडे या शोधकार्यात सहभागी झाल्यानंतर सोमवारी रात्री ही मुलं सापडली. मुलं सापडल्याचा पहिला व्हीडिओ थाई नौदलानं प्रथम फेसबुकवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. या व्हीडिओत बॅटरीच्या प्रकाशात ही मुलं दिसत आहेत. ही मुलं गुहेत वर एका कोनाड्यात बसल्याचं दिसत आहे. या मुलांनी पाणबुड्यांना आम्ही 13 जण इथे आहोत आणि आम्हाला प्रचंड भूक लागल्याचं सांगितलं.
आमची सुटका होण्यासाठी किती वेळ लागेल, असंही या मुलांनी त्या पाणबुड्यांना यावेळी विचारलं. पाणबुड्यांनी त्यांना धीर देत अजून वेळ लागेल असं सांगितलं. तुम्हाला घ्यायला अजून काही लोक येतील असंही सांगितलं.
"चालेल. उद्या भेटू या", एक मुलगा म्हणाला.
या मुलांच्या शोधाबद्दल संपूर्ण थायलंडसह जगभरात चर्चा होत होती. ती मुलं जिवंत आहेत की त्यांचा मृत्यू झाला आहे, यावरच सर्वाधिक चर्चा होत होती.
मुलं गुहेत पोहोचली कशी?
11 ते 16 वयोगटातली ही 12 मुलं आणि त्यांचे 25 वर्षीय प्रशिक्षक 23 जूनला गायब झाले. ते या गुहेत गेले असावेत आणि त्यानंतर पुराचं पाणी वाढल्यानं त्यांनी गुहेत एका सुरक्षित ठिकाणी आसरा शोधला असावा असं बचावपथकाला वाटत होतं.
त्यांचा शोध घेत गुहेत जवळपास 4 किलोमीटर आत गेलेल्या शोधकर्त्यांना ही मुलं एका कोरड्या आणि पाण्यापासून दूर असलेल्या उंच भागात सापडली.
गुहा कोरडी असताना या मुलांनी आत प्रवेश केला. पण, पुराचं पाणी आणि चिखल यामुळे त्यांना सुरक्षित आसरा शोधावा लागला.
पाणबुड्यांना शोध घेताना हे एक दिव्यही पार पाडावं लागलं. या गुहेत पट्टाया बीच नावाचा एक भाग आहे. जो उंच आणि खांबाप्रमाणे सरळ आहे. पाण्यापासून वाचण्यासाठी ही मुलं हा भाग चढून वर जाऊन बसली.

पण, मुलांना शोधण्यासाठी पाणबुड्यांना काळाखोत यातले चकवे चुकवत आत जावं लागलं. पूर्वी कोरडा असलेला हा पट्टाया बीचचा भाग जोरदार पावसानंतर पाण्यानं भरला. त्यामुळे पाण्याबुड्यांना खालून पोहत वरपर्यंत जावं लागलं. 400 मीटर वरपर्यंत पोहोचल्यानंतर पाणबुड्यांना ही मुलं दिसली.
मुलं बाहेर कशी पडणार?
सध्याची परिस्थिती पाहता या मुलांना सुरक्षित स्थळी आणण्याचं काम सर्वाधिक धोकादायक आहे. ही गुहा दरवर्षीच्या पावसात पाण्यानं भरुन जाते. या गुहेतलं पाणी सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान बाहेर पडतं.
त्यामुळे जर मुलांना खाली आणायचं असेल, तर त्यांना पाणबुड्यांना अवगत असलेली काही कौशल्यं शिकून घ्यावी लागतील.
पण, नवशिक्यांना किंवा अनभुव नसलेल्या मुलांना चिखल, दृश्यमानता नसलेल्या भागातून आणायचं हे काम खूप धोकादायक ठरू शकतं असं तज्ज्ञांना वाटतं.

फोटो स्रोत, EPA
पंपद्वारे पाणी काढणं आणि पाण्याची पातळी कमी करणं हा प्रयोग अजून तरी यशस्वी झालेला नाही.
त्यामुळे या मुलांना पाणी ओसरेपर्यंत थांबावं लागण्याची शक्यता आहे. असं झालंच तर पुढचे काही महिने या मुलांना गुहेत थांबावं लागेल. त्यांना सातत्यानं पाण्याचा व अन्नाचा पुरवठा करावा लागणार आहे.
पुढील काही दिवसांत प्रशिक्षित डॉक्टर या मुलांच्या वैद्यकीय तपासणीसाठी आणि उपचारासाठी या गुहेत जाणार आहेत.
थाई लष्कराकडे पाणबुड्यांचं तंत्र अवगत असलेले काही डॉक्टर असल्याची माहिती बीबीसी आग्नेय आशियाचे प्रतिनिधी जोनॅथन हेड यांनी दिली. हेड सध्या घटनास्थळी आहेत.

फोटो स्रोत, Reuters
हेड पुढे सांगतात, "त्या मुलांना घेऊन पुरानं भरलेल्या गुहेतून बाहेर काढणं ही सध्या खूप मोठी आव्हानाची बाब आहे. पावसाळा इथे नुकताच सुरू झाला असून पाण्याची पातळी वाढण्याचीच शक्यता आहे."
दुसरी एक टीम गुहेवरील डोंगरातून गुहेत शिरण्याचा मार्ग शोधण्यात सध्या व्यस्त आहे.
मुलं नेमकी आहेत कोण?
ही 12 मुलं एका स्थानिक फुटबॉल टीमचे सदस्य आहेत. त्यांच्या 25 वर्षीय कोचनं त्यांना फील्ड ट्रीपसाठी या गुहेत आणलं होतं.
टिनॅकॉर्न बूनपिम यांचा 12 वर्षीय मुलगा या 13 जणांमध्ये आहे. मुलं सुखरुप असल्याचं कळल्यानं आनंद झाल्याचं त्यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितलं.
"फक्त तो मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या ठीक असायला हवा," असं त्या म्हणाल्या.
"मी खूप आनंदी असून माझा आनंद शब्दांत व्यक्त करू शकत नाही," असे उद्गार अजून एका मुलाच्या पालकांनी पत्रकारांसमोर काढले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









