आण्विक नि:शस्त्रीकरण होईस्तोवर उत्तर कोरियावरील निर्बंध कायम - अमेरिका

फोटो स्रोत, Reuters
संपूर्ण आण्विक नि:शस्त्रीकरण झाल्याशिवाय उत्तर कोरियावरील निर्बंध उठवले जाणार नाहीत असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ सांगितलं आहे.
दक्षिण कोरियात झालेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्याबरोबर दक्षिण कोरिया आणि जपानचे परराष्ट्र मंत्री देखील उपस्थित होते.
प्याँगयांगनं आण्विक नि:शस्त्रीकरण करणार असल्याचं वचन दिल्याचं त्यांनी सांगितलं.
2020 पर्यंत आण्विक नि:शस्त्रीकरण
उत्तर कोरियानं पुढच्या अडीच वर्षांत म्हणजेच 2020 पर्यंत आण्विक नि:शस्त्रीकरण करावं अशी अमेरिकेची इच्छा आहे, असंही ते म्हणाले आहेत.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ सध्या दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उत्तर कोरियाबरोबर आणखी एक मोठा करार व्हायचा आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं.
ते म्हणाले, "मोठ्या प्रमाणावर नि:शस्त्रीकरण... आम्हाला अपेक्षा आहे की पुढच्या अडीच वर्षांत हे होऊ शकतं."

फोटो स्रोत, KCNA
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांच्या ऐतिहासिक सिंगापूर भेटीच्या एक दिवसानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
सिंगापूरमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये कोरियाच्या द्विपकल्पात आण्विक नि:शस्त्रीकरण करण्याच्या अनुषंगानं मोठी पावलं उचलण्यावर सहमती झाली आहे.
पण या भेटीचा तपशील अजूनही बाहेर आलेला नाही. त्यामुळे उत्तर कोरिया हे नि:शस्त्रीकरण कधी करणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे या बैठकीवर टीका होत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
उत्तर कोरियाकडून आता अण्वस्त्रांचा धोका नाही, त्यामुळे प्रत्येकाला अधिक सुरक्षित वाटेल असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी याआधी केलं होतं.
परंतू या वक्तव्याच्या विश्वसनीयतेवर शंका व्यक्त केली जात आहे, कारण करारानुसार उत्तर कोरिया आपली अण्वस्त्र आणि त्यांना लाँच करण्यासाठी लागणारी क्षेपणास्त्र स्वत:कडे ठेवणार आहे असं बोललं जातं.
तसंच या नि:शस्त्रीकरणविषयी उत्तर कोरियानं कोणत्याही प्रकियेवर सहमती दर्शवलेली नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








