फक्त किम-ट्रंप सिंगापूर भेटच नव्हे, हे 10 हँडशेकही अजरामर झाले

फोटो स्रोत, Getty Images
उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची भेट जगभरात गाजली. उत्तर कोरिया आणि अमेरिकेच्या पदावर असणाऱ्या नेत्यांनी भेटण्याची ही पहिलीच वेळ होती.
सिंगापूरमध्ये कॅमेऱ्यांसमोर एकमेकांना भेटतानाचे त्यांचे फोटोही क्लिक करताच ऐतिहासिक झाले. त्यांनी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य केलं, हँडशेक केले आणि मग एका बैठकीच्या हॉलकडे दोघंही रवाना झाले.
मैत्रीचं निदर्शक असणारा हँडशेकचा हा फोटो खास होताच, आणि प्रत्येक वेळी असे हस्तांदोलनाचे फोटो खास असतातच. कारण त्यांच्याद्वारे काहीतरी मोठा बदल घडत असल्याची चिन्हं स्पष्ट कळवली जातात.
अशी हायप्रोफाईल हस्तांदोलनं अखेरपर्यंत जगाच्या लक्षात राहून जातात.
पाहूयात इतिहासात नोंद झालेली 10 हस्तांदोलनं.
चेंबरलिन आणि हिटलर
22 सप्टेंबर 1938 - जर्मनीचे हुकूमशहा अडॉल्फ हिटलर आणि ब्रिटिश पंतप्रधान नेव्हल चेंबरलिन यांच्या हस्तांदोलनाची इतिहासात नोंद झाली.
जर्मनीमधील बोन इथून जवळच असलेल्या हॉटेल ड्रीसेनमध्ये ही भेट झाली होती. जर्मनीने सुडेटनलॅंडचा ताबा घेतल्यामुळे ही चर्चा भेट झाली होती.

फोटो स्रोत, Getty Images
चेंबरलिन यांना शांतता प्रस्थापित केल्याचा आत्मविश्वास होता. पण पुढच्या वर्षीच दुसरं महायुद्ध सुरू झालं.
2. चर्चिल, ट्रुमन आणि स्टॅलिन
23 जुलै 1945 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन, ब्रिटिश पंतप्रधान विन्सटन चर्चिल, सोव्हिएट नेते जोसेफ स्टॅलिन यांनी हस्तांदोलन केलं. पोट्सडॅम परिषदेनंतर त्यांनी एकमेकांचे हात हातात घेतले.

फोटो स्रोत, Getty Images
दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपचं, विशेष करून जर्मनीच भवितव्य ठरवण्यासाठी ही परिषद झाली. या परिषदेला फ्रान्सचे नेते चार्ल दे गोल यांना बोलवण्यात आलं नव्हतं.
3. जॉन्सन आणि ल्युथर किंग ज्युनिअर
2 जुलै 1964 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन आणि डॉ. मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर यांच्यातील हस्तांदोलन इतिहासाच्या पानात नोंद झालं आहे. व्हाईट हाऊसमध्ये सिव्हिल राईट्स अॅक्टवर सही केल्यानंतर त्यांनी हे हस्तांदोलन केलं.

फोटो स्रोत, Getty Images
या कायद्याने वर्ण, रंग, धर्म, लिंग आणि देश यांवर आधारित सार्वजनिक ठिकाणचा आणि रोजगारांमधील भेदभाव संपवण्यात आला.
4. माओ आणि निक्सन
21 फेब्रुवारी 1972 - कम्युनिस्ट चीनचे नेत माओ झेडाँग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यातील बीजिंगमधील हस्तांदोलनाची इतिहासाने दखल घेतली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
चीन आणि अमेरिका यांच्यातील 23 वर्षांच्या ताणलेल्या संबंधांनंतर ही भेट झाली. या भेटीमुळे दोन देशांतील अनेक वर्षांची कटुता आणि अविश्वास संपला. शिवाय पुढच्या वर्षांसाठी व्यापाराची दारंही खुली झाली.
5. गोर्बाचेव्ह आणि रीगन
नोव्हेंबर 1985 - सोव्हिएटचे नेते मिखाईल गोर्बाचेव्ह आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी जिनिव्हा इथं झालेल्या परिषदेत एकमेकांची भेट घेतली.

फोटो स्रोत, Getty Images
यामुळे अनेक वर्षं सुरू असलेल शीतयुद्ध संपलं.
6. थॅचर आणि मंडेला
4 जुलै 1990 - ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर आणि आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते नेल्सन मंडेला यांनी हस्तांदोलन केलं. 10 डाऊनिंग स्ट्रीटच्या पायऱ्यांवरच हे हस्तांदोलन ऐतिहासिक ठरलं.

फोटो स्रोत, Getty Images
थॅचर यांनी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचा उल्लेख एकेकाळी दहशतवादी संघटना असा केला होता. पुढं 1994साली मंडेला दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले.
7. राबिन आणि अराफत
13 सप्टेंबर 1993 - पॅलेस्टाईनचे नेते यासर अराफत आणि इस्रायलचे पंतप्रधान आयझॅक राबिन यांची वॉशिंग्टनमध्ये भेट झाली.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पुढाकाराने मध्यपूर्व आशियासाठी झालेल्या ओस्लो समझोत्यावर सही करण्यासाठी हे नेते एकत्र आले होते. त्यावेळी त्यांनी हँडशेक केलं.
8. मॅकगिनीज आणि राणी एलिझाबेथ
27 जून 2012 - उत्तर आयर्लंडच्या भेटीवेळी ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांनी तिथले त्यावेळेचे डेप्युटी फर्स्ट मिनिस्टर मार्टिन मॅकगिनीज यांची भेट घेतली. बेलफास्टमध्ये झालेल्या या भेटीत हे हस्तांदोलन काही सेकंदांचंच होतं.

फोटो स्रोत, Getty Images
मॅकगिनीज आयरिश रिपब्लिकन आर्मीचे कमांडर होते. काही सेकंदांच्या या हस्तांदोलनाला मोठं ऐतिहासिक महत्त्व आहे. या भेटीनंतर ब्रिटन आणि आयर्लंड आणि आयर्लंडच्या नागरिकांसाठी नव्या नात्याची सुरुवात आहे, असं मॅकगिनीज म्हणाले होते.
9. ओबामा आणि कॅस्ट्रो
21 मार्च 2016 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि क्युबाचे राष्ट्राध्यक्ष रौल कॅस्ट्रो यांच्यातील हस्तांदोलन महत्त्वाचं ठरलं. ही भेट क्युबातील रिव्होल्युशन पॅलसमध्ये झाली.

फोटो स्रोत, Getty Images
या शतकात क्युबा या कम्युनिस्ट राष्ट्राला भेट देणारे ओबामा हे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होते. अमेरिकेने लादलेल्या आर्थिक निर्बंधांवर कॅस्ट्रोंनी या भेटीत भर दिला. दोन्ही देशांतील संबंध सामान्य होण्यासाठी निर्बंध हटवण्यात यावेत, असं ते म्हणाले.
10. सॅंटोस आणि टिमोलिऑन
23 जून 2016 - कोलंबियाचे पंतप्रधान औन मेन्युएल सॅंटोस आणि Revolutionary Armed Forcesचे नेते हिमेनज टिमोलिएन यांच्यात हावानामध्ये शांती करार झाला होता. क्युबाचे राष्ट्राध्यक्ष रौल कॅस्ट्रो यांच्या पुढाकाराने ही भेट झाली होती.

फोटो स्रोत, Getty Images
लॅटिन अमेरिकेत सुरू असलेला हा 52 वर्षांचा जुना नागरी संघर्षात ही शस्त्रसंधी महत्त्वाचं पाऊल मानली जाते.
हे पाहिलंत का?
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









