इंडोनेशिया : चर्चवर बाँबहल्ला करणारं ते कुटुंब सीरियातून परतलं होतं

इंडोनेशिया

फोटो स्रोत, Getty Images

इंडोनेशियातल्या चर्चमध्ये झालेल्या आत्मघातकी बाँब स्फोटांमागे एकाच कुटुंबातील व्यक्ती असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

तसंच या कुटुंबातले 6 जण सीरियातून प्रशिक्षण घेऊन आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

या हल्ल्यांमध्ये किमान अकरा जणांचा मृत्यू झाला आहे तर 40हून जास्त जखमी झाले.

"एका चर्चवर आई आणि तिच्या दोन मुलींनी हल्ला केला. तर इतर दोन चर्चमध्ये वडील आणि तीन मुलांनी स्वत:कडच्या बाँबचा स्फोट घडवून आणला," अशी माहिती पोलीस दलाचे प्रमुख टिटो कार्नेवियन यांनी स्पष्ट केलं.

हे सर्वजण जेमाह अंशरुत दौला या संघटनेशी संबंधीत असल्याचं टिटो यांनी सांगितलं आहे.

इंडोनेशिया

फोटो स्रोत, Getty Images

2005 पासून इंडोनेशियात झालेला हा सगळ्यात भीषण हल्ला आहे.

इस्लामिक स्टेट्सने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

इंडोनेशियामधल्या सुरबाया शहरात आत्मघातकी हल्लेखोरांनी तीन चर्चवर हल्ला केला आणि त्यात 13 लोक मारले गेले आहेत. हल्ल्यात 40 लोक जखमी झाले आहेत.

सुरबाया हे देशातलं दुसरं मोठं शहर आहे. काही मिनिटांच्या अंतराने हे तीनही हल्ले झाले. अजून कुठल्याही संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

टीव्हीवरच्या दृश्यांमध्ये चर्चच्या प्रवेशद्वारापाशी दगड-विटांचा खच पडलेला दिसतो.

मुस्लीम लोकसंख्या अधिक असलेल्या इंडोनेशियामध्ये गेल्या काही महिन्यापांसून इस्लामिक कट्टरवाद पुन्हा डोकं वर काढताना दिसत आहे.

स्थानिक वेळेनुसार सकाळी साडे सातच्या सुमारास हे बाँब हल्ले झालेत.

इंडोनेशिया

फोटो स्रोत, Getty Images

हे हल्ले कथित इस्लामिक स्टेटनं प्रेरित जेमाह-अंशारुत दौलाह या संघटनेनं घडवून आणले असावेत असा अंदाज स्थानिक गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी राजधानी जकार्तापासून काही अंतरावर असलेल्या तुरुंगात इस्लामिक कैदी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये हणामारी झाली होती, त्यात 5 सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला होता.

इंडोनेशियातल्या अतिरेकी कारवायांचा इतिहास

इंडोनेशियात सर्वांता भयानक हल्ला 2002मध्ये प्रसिद्ध बालीच्या बेटावर झाला होता. या हल्ल्यात 202 जण मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी जहालवादी संघटनांवर कारवाया सुरू केल्या.

पण गेल्या काही वर्षांत कथित इस्लामिक स्टेटच्या हल्ल्यांत वाढ झालेली दिसून येत आहे.

जानेवारीच्या 2016मध्ये जकार्ता शहरात झालेल्या स्फोट आणि गोळीबारात 4 नागरिक आणि 4 हल्लेखार मृत्युमुखी पडले होते. इस्लामिक स्टेटनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात स्लेमन शहरातल्या चर्चमध्ये तलवारीनं करण्यात आलेल्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले होते.

यातल्या हल्लेखोरांनी इस्लामिक स्टेटमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला होत, असं पोलिसांनी सांगितलं होतं.

हेही वाचलंत का?

हे पाहिलं आहे का?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : गे आहे म्हणून बांबूचे फटके आणि जेल
व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : का होत आहे इंडोनेशियातल्या आदिवासींचं इस्लामीकरण?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)