बैलांच्या शर्यतीत महिलेवर सामूहिक बलात्कार, स्पेनमध्ये हजारो महिला रस्त्यावर

फोटो स्रोत, AFP
सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातून पाच आरोपींना वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ स्पेनच्या पँपलोना शहरामध्ये सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी हजारो महिला रस्त्यावर उतरल्या.
स्पेनच्या प्रसिद्ध बैलांच्या शर्यतीदरम्यान एका 18 वर्षींय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील पाच आरोपींवर फक्त लैंगिक छळाचा ठपका ठेवण्यात आला.
'वोल्फ पॅक गँग' या नावानं स्वतःची ओळख करून देणाऱ्या आरोपींवर फक्त लैंगिक छळाचा आरोप लावण्यात आल्यानं अनेकांचा संताप अनावर झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, या पाच जणांनी पीडित तरुणीला एका कोपऱ्यात घेरलं त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले.
यावेळी आरोपींपैकी काहींनी अत्याचार होत असतानाचे मोबाईलवर चित्रण केलं.
या घटनेनंतर 'ला मनाडा' (म्हणजेच वोल्फ पॅक) या त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जल्लोष साजरा करत ही क्लिप शेअर करण्याचं वचनही दिलं.
या संपूर्ण घटनाक्रमादरम्यान पीडित तरुणीनं आपले डोळे बंद ठेवत "निष्क्रीय किंवा तटस्थ" वृत्ती ठेवल्याचं पोलिसांच्या अहवालात म्हटलं आहे. त्यानंतर या तरुणीचा मोबाईलही चोरीला गेला.
तरुणीनं विरोध न करणं हे तिची संमती असल्याचं दर्शवत होतं असा बचाव आरोपींच्या वकिलांनी केला. तर प्रचंड मोठा आघात झाल्यामुळे ती हालचाल करू शकत नव्हती, असं विशेष सरकारी वकिलांनी सांगितलं.

फोटो स्रोत, AFP
पीडित तरुणीची ओळख लपवण्यासाठी बंद दाराआड जवळपास पाच महिने या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.
या प्रकरणात होसे एंजल प्रेंडा, अल्फोंसो कॅबझुलो, अँटोनिओ मॅन्यूएल गुरेरो, हेसुस एस्कुडेरो आणि एंजल बोझा या पाच आरोपींना प्रत्येकी नऊ वर्षं कैदेची शिक्षा सुनावण्यात आली.
विशेष सरकारी वकिलांना मात्र वीस वर्षं कैदेची मागणी केली होती.
2016 पासून कैदेत असलेल्या आरोपींना पीडित तरुणीला 61 हजार डॉलर्स नुकसानभरपाई देण्याचेही न्यायालयाने आदेश दिले. तसेच गुरेरो या एका नागरी सुरक्षा अधिकाऱ्यास पीडिताचा फोन चोरल्याबद्दल 900 युरोचा दंड केला.
या निकालाविरोधात न्यायालयात अपील करणार असल्याचं पीडित तरुणीसह आरोपींनीही म्हटलं आहे.
स्पॅनिश कायद्यानुसार हिंसाचार किंवा धमक्यांचा वापर करून लैंगिक छळ किंवा बलात्कार झाला असेल तर त्यावर शिक्षा देण्यासाठी कायद्यात वेगवेगळ्या तरतुदी आहेत.
या घटनेनंतर लैंगिक गुन्ह्यांविषयींच्या कायद्यांचा पुनर्आढावा घेतला जाणार असल्याचं स्पॅनिश सरकारनं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, EPA
न्यायालयाच्या निकालानंतर स्पॅनिश जनतेचा रोष वाढला. शनिवारी तीस हजारांहून अधिक नागरिक आंदोलनात सहभागी झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
आंदोलनकर्ते, बैलांच्या शर्यती आयोजित केल्या जाणाऱ्या रस्त्यांवरच उतरले होते.
अनेकांनी फक्त या याचिकेच्या निकालामुळेच ते इथं जमलेले नसल्याचं सांगत संपूर्ण न्यायिक व्यवस्थेच्याविरोधात भूमिका घेण्यासाठी इथं आले असल्याचं सांगितलं. हे कायदे महिलांविरोधी असल्याचं त्यांच म्हणणं आहे.
'आमच्या मतांना कोणीच न्याय देत नाही,' असं वाक्य असलेल्या एका मोठ्या बॅनरसह हे सगळे आंदोलनकर्ते एकत्र जमा झाले.
नन्सचा एक ग्रुपही या आंदोलनात सहभागी झालेला होता. या शिक्षेविरोधात टीका करणारा आवाज आम्हाला चर्चमधून ऐकू यायला हवा, असं सिस्टर्सच्या प्रवक्त्या सिस्टर मारीलूझ यांनी AFP वृत्तसंस्थेला सांगितलं.
या प्रकरणाविरोधात राष्ट्रीयस्तरावर रोष व्यक्त केला जात आहे. माद्रीद, बार्सिलोना, व्हलेंसीया इथंही निदर्शने केली जात आहेत.
#cuéntalo या स्पॅनिश हॅशटॅगखाली नागरिक त्यांची आपबिती सांगत आहे. या हॅशटॅगचा अर्थ बोलतो व्हा असा होतो.
या निकालानंतर राष्ट्रीय पोलिसांनी "No is No" असं ट्वीट करत त्याखाली आपत्कालीन संपर्क क्रमांकही दिला आहे. आम्ही सदैव तुमच्यासोबत असल्याचं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








