फ्रान्समध्ये लांडगे परत आले, पण शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली!

फोटो स्रोत, Getty Images
फ्रान्समधले शेतकरी सध्या एका भलत्याच प्रश्नाने व्यथित आहेत - त्यांना लांडग्यांच्या वाढत्या त्रासामुळे आपल्या पशुधनाची काळजी आहे. असं असलं तरीही फ्रान्स सरकारने 2023 पर्यंत देशात लांडग्यांची संख्या 360 वरून 500 पर्यंत वाढवण्यास परवानगी दिली आहे.
आगामी काळात लांडग्यांची संख्या 40 टक्क्यांनी वाढेल अशी योजना सरकारने जाहीर केली आहे. तर तिथल्या बळीराजाने या योजनेला आपला विरोध दर्शविला आहे.
1930 दरम्यान शिकाऱ्यांमुळे फ्रान्समधून लांडगे नामशेष झाले होते. पण 1990च्या काळात इटलीमार्गे फ्रान्समध्ये लांडग्यांचं पुनरागमन झालं.
लांडगे संरक्षित प्रजातीत मोडतात आणि त्यांचं संरक्षण करण्याच्या दिशेने फ्रान्सने 'बर्न कन्व्हेंशन'अंतर्गत ठराव मंजूर केला आहे. आणि आता त्यांची संख्या वाढावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
पण सरकारचे हे प्रयत्न कमी पडत असून, मंत्र्यांमध्ये राजकीय इच्छाशक्ती नसल्याचा आरोप प्राणी हक्क गटांचे कार्यकर्त्यांनी केला आहे.
पण लांडग्यांच्या भल्यासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयांमुळे शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या आहेत. म्हणून सरकारने फ्रान्समध्ये 2017 प्रमाणेच यावर्षीही शिकाऱ्यांना 40 लांडग्यांची कत्तल करण्याची परवानगी दिली आहे.

फोटो स्रोत, AFP/GETTY IMAGES
2019 पासून दरवर्षी 10 टक्के लांडगे मारले जाऊ शकतात. पण लांडग्यांकडून जनावरांवर होणारे हल्ले वाढल्याचं निदर्शनास आल्यास ते प्रमाण 12 टक्के होईल.
2017 मध्ये लांडग्यांकडून जवळपास 12,000 मेंढ्यांचा फडशा पाडण्यात आला होता. या घटनांनंतर फ्रान्स सरकारवर शेतकऱ्यांनी चांगलाच दबाव आणला होता, विशेषतः आल्प्स आणि पायरनीझ प्रदेशातून.
"हा वाद मिटवण्यासाठी आणि दीर्घ काळासाठी शांततेत एकत्र राहण्यासाठी काय मार्ग काढावेत, याची जबाबदारी आम्ही सर्व हितधारक आणि स्थानिक कायदे प्रतिनिधींवर टाकतो," असं कृषीमंत्री स्टीफन ट्रावर्ट आणि पर्यावरणमंत्री निकोलस ह्युलोट यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
पश्चिम युरोपीयन देशांमध्ये एकटा फ्रान्सच असा देश नाही जिथं लांडग्यांचं पुनरागमन झालं आहे. गेल्या शतकाचा विचार केल्यास पहिल्यांदाच उत्तरी बेल्जियम प्रदेशात एक लांडगा दिसला होता.
2017 मध्ये जर्मनीत लांडग्यांचे 60 कळप वावरत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत 15 टक्के जास्त.
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








