व्हर्जिन हायपरलूप : मुंबई ते पुणे 25 मिनिटांत शक्य आहे का?

फोटो स्रोत, Virgin Hyperloop One
महाराष्ट्र सरकारने व्हर्जिन हायपरलूप या कंपनीसमवेत मुंबई आणि पुणे शहरांना जोडण्यासाठी हायपरलूपच्या उभारण्यासाठी करार केला आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हर्जिन हायपरलूपचे चेअरमन रिचर्ड ब्रॅन्सन यांच्याशी हा करार केला.
पुणे-नवी मुंबई विमानतळ-मुंबई हे साधारण 150 किमीचं अंतर 25 मिनिटांत पूर्ण करणारी ही आधुनिक वाहतूक व्यवस्था आहे.
मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पुणे हायपरलूप प्रकल्पाला पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
बीबीसीचे तंत्रज्ञान प्रतिनिधी रॉरी सेलान-जोन्स यांनी अमेरिकेतील नेवाडामध्ये असलेल्या व्हर्जिन हायपरलूपच्या चाचणीस्थळाला भेट दिली होती. हा प्रकल्प नेमका काय आहे, त्याचं तंत्रज्ञान आणि हा प्रकल्प प्रत्यक्षात येणं शक्य आहे का, याबद्दल त्यांचं हे विवेचन.
तर या तंत्रज्ञानामागचा प्लॅन असा आहे की, तुम्हाला एका पॉडमध्ये बसवून आणि एक निर्वात पोकळीमध्ये हे पॉड 1,123 किमी प्रतितास वेगाने धावेल. म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तास लागतो तिथं तुम्ही मिनिटांत किंवा अगदी काही सेकांदात पोहोचाल.
'हायपरलूप वन' मागं असणारी कल्पना
नेवाडामध्ये या प्रकल्पाच्या चाचणी स्थळाला जेव्हा मी भेट दिली, तेव्हा माझ्या मनात एकच विचार आला तो म्हणजे या हायपरलूपची कल्पना जेव्हा प्रथम इलॉन मस्कने समोर ठेवली होती तेव्हा कुणालाही ती शक्य वाटत नव्हती.

फोटो स्रोत, David Becker/Getty Images
एका निर्वात (vacuum) पाइपमध्ये चुंबकीय शक्तीने तरंगणारी मॅगलेव्ह (Maglev) ट्रेन कशी अशक्य वाटणाऱ्या वेगात धावू शकेल आणि कशा प्रकारे यातून भविष्यातली क्रांतिकारक वाहतूक व्यवस्था निर्माण करता येईल, यावर आता जगभरात ठिकठिकाणी काम सुरू आहे.
मॅगलेव्ह (Maglev)
मॅगलेव्ह म्हणजे मॅग्नेटिक लेव्हिटेशन रेल्वे होय. यात चुंबकाच्या सहाय्याने ट्रेन रेल्वेच्या रुळापासून वर उचलली जाते. त्यामुळे घर्षण नाहीसं होऊन रेल्वे अतिवेगात धावू शकते. अशा रेल्वे चीन आणि जपानमध्ये कार्यरत आहेत. शांघाय शहरापासून विमानतळापर्यंत धावणारी मॅगलेव्ह ताशी 430 किमी वेगाने धावते.
हीच रेल्वे जर निर्वात पाईपमध्ये बसवली तर ती आणखी वेगाने धावू शकेल. हेच आहे हायपरलूप वनचं कॉन्सेप्ट. अर्थात यात आता सर रिचर्ड ब्रॅन्सन यांनी गुंतवणूक केली असल्याने याला आता व्हर्जिन हायपरलूप वन म्हणावं लागेल. अर्थात हे आधिक प्रगत तंत्रज्ञान आहे.
लास व्हेगासपासून उत्तरेला 40 मैल अंतरावर असलेल्या वाळवंटात जेव्हा तुम्ही चाचणीस्थळावर पोहोचता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की हा प्रकल्प फारच खर्चिक आहे.
चाचणीसाठी 500 मीटर लांबीचा टेस्ट ट्रॅक बनवण्यात आला आहे. याला डेव्हलूप म्हणतात. याची निर्मिती 300 लोकांनी केली असून त्यातील 200 कुशल इंजिनीअर आहेत. त्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या आहेत, ज्यानुसार ते पॉड या ट्यूबमधून 387 किमी प्रतितास इतक्या वेगाने धावू शकतं, हे सिद्ध झालं आहे.
अर्थातच अजून यात माणसांना बसवण्यात आलेलं नाही.

फोटो स्रोत, Virgin
इथल्या अभियंत्यांचं नेतृत्व अनीता सेनगुप्ता करत आहेत. अनीता अवकाश संशोधक आहेत आणि पूर्वी त्या नासामध्ये काम करत होत्या. नासाचं यान मार्स क्युरॉसिटी रोव्हर बनवण्यात त्यांचं योगदान मोठं आहे.
एखादं वाहन दुसऱ्या ग्रहावर उतरवण्यासारख्या आव्हानात्मक प्रकल्पावर काम केलेल्या सेनगुप्ता यांनी, पृथ्वीच्या पाठीवरील असा प्रकल्प सत्यात येईल का, याबद्दल माझी शंका दूर केली.
या वाळवंटात असलेल्या या भल्या मोठ्या पाईपकडे बोट दाखवत त्या म्हणाल्या, "हा प्रकल्प सत्यात उतरू शकतो, हे तुम्ही इथं पाहू शकता."
हे तंत्रज्ञान यापूर्वीच सिद्ध झालेलं आहे, असं त्या सांगतात. "हायपूरलूप म्हणजे दुसरं काही नसून एका निर्वात ट्यूबमधून धावणारी मॅगलेव्ह ट्रेन आहे."
"हे म्हणजे हवेत 2 लाख फुटांवर उडणारं विमान आहे, अशीही कल्पना तुम्ही करू शकता. कारण दोन्हीमध्ये हवेचा दाब तितकाच असणार आहे," असं त्या म्हणतात.
"लोकांना मॅगलेव्ह रेल्वे आणि विमानात प्रवास करताना काही तक्रार नसते. हायपरलूपमध्ये या दोन्ही तंत्रज्ञांचा समावेश आहे."
या प्रकल्पाला विविध सुरक्षा चाचण्यांमधून जावं लागेल आणि त्यानंतर 2021पर्यंत हा प्रकल्प पूर्ण व्यावसायिक पातळीवर सुरू होईल, अशी आशा त्या व्यक्त करतात.
'...मग त्या रनवेची गरज नाही!'
हा प्रकल्प व्यावसायिक आणि शासकीय भागीदारांना विकण्याची जबाबदारी आहे मुख्याधिकारी रॉब लॉईडची.
लास वेगासमधल्या CES टेकशोमध्ये आम्ही भेटलो, तेव्हा ते हायपरलूपला इतर वाहतूक व्यवस्थेशी जोडणाऱ्या एका अॅपची कल्पना करण्यात अधिक उत्सुक होते. मी त्यांना आठवण करवून दिली की, लंडन ते बर्मिंगहॅम पर्यंत असलेल्या HS2 हायस्पीड रेलसारखी पायाभूत सुविधा उभी करण्यासाठी किती दिवस लागले होते.
पण त्यांचं सरळ उत्तर आलं - "जर गॅटविक आणि हिथ्रो या दोन विमानतळांना जोडणारं हायपूरलूप उभारलं तर दोन्ही विमानतळांतील अंतर फक्त 4 मिनिटांवर येईल. मग अनेक वर्षांपासून रखडलेल्या हिथ्रोवरच्या तिसऱ्या रनवेची गरजही पडणार नाही."
लंडनच्या हिथ्रोवरील टर्मिनल 5 वरून टर्मिनल 2 वर पोहोचण्यासाठी जितका वेळ लागतो त्यापेक्षा हा वेळ कमी आहे, असं त्यांनी सांगितलं.
या प्रकल्पाचे चेअरमन रिचर्ड ब्रॅन्सन म्हणाले, "हिथ्रो आणि गॅटवीक यांना जोडणारी वेगवान व्यवस्था कधीही उत्तम. पण हे वाटतं तितकं सोपं नाही, कारण हिथ्रो ते गॅटविकपर्यंत पाईप टाकण्यासाठी येणारा खर्च, नियोजन यांचा विचार केला तर तिसरी रनवे बनवणं जास्त आकर्षक वाटतं."
दरम्यान, इलॉन मस्क लॉस एंजेलिसमध्ये भूमिगत हायपरलूप प्रकल्पासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी अमेरिका सरकारने त्यांना तोंडी परवानगी दिली होती, असं ते म्हणतात. "यामुळे न्यूयॉर्क ते वॉशिंग्टन डीसीपर्यंत पोहोचण्यास लागणारं अंतर फक्त अर्ध्या तासावर येऊ शकेल," असं ते सांगतात.

पण अनेकांना अजूनही हे मिशन होईल, असं वाटत नाही. कारण ज्या गुंतवणुकदारांनी टेस्ला मोटरमध्ये पैसे ओतले आहेत, तेच गुंतवणुदार पुन्हा या प्रकल्पात पैसे गुंतवतील का, असा प्रश्न आहे.
पण व्हिर्जिन हायपरलूपचे रॉब लॉइड यांनी विश्वास आहे की काही सरकारांकडे नक्कीच ही दृष्टी आहे. विमानाच्या नंतरची पहिली नवी वाहतुकीची व्यवस्था, असा ते हायपरलूपचा उल्लेख करतात.
अनेक वर्षांच्या संशोधनानंतर तंत्रज्ञानाची झेप क्षणाक्षणाला ट्विटरवरून 140-280 अक्षरांमध्ये व्यक्त होत आहे, अशा स्थितीत हायपरलूपची कल्पना उत्साहवर्धक आहे, असं गुंतवणुकदार पिटर थील यांचं मत आहे.
दोन शहरांना जोडणाऱ्या या व्यवस्थेचा आराखडा ड्रॉईंग टेबलवरून प्रत्यक्षात येणार नाही, अशी जर काही लोकांना अजूनही शंका वाटत असेल तरीही हे मान्य करावं लागेल की या प्रकल्पानं आपल्याला पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेवर विचार करण्यासाठी उद्युक्त करण्याचं मोठ काम केलं आहे.
म्हणून पुढे चालून 20 वर्षांनी जर मुंबई-पुण्याला जोडणाऱ्या एक्स्प्रेसवेवरची रहदारी आणि त्यातून होणारे अपघात कमी झाली झाले, तर नक्कीच हायपरलूपचे आभार मानावे लागतील.
हे वाचलं का?
हे आपण पाहिलं आहे का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









