बीबीसी विशेष : हाफिज सईदला पाकिस्तानच्या राजकारणात यायचंय तरी का?
- Author, शुमाईला जाफरी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
लष्कर-ए-तोयबा या कट्टरतावादी संघटनेचा संस्थापक आणि जमात-उद-दावा या बंदी घातलेल्या संघटनेचा प्रमुख हाफिज सईद पाकिस्तानच्या राजकारणात सक्रीय होऊ लागला आहे.
मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्यांचा मास्टरमाइंड हाफिज सईद होता, असा भारताचा दावा आहे.
बीबीसी प्रतिनिधी शुमाईला जाफरी यांना दिलेल्या मुलाखतीत हाफिज सईदनं पाकिस्तानातली त्याची प्रतिमा, त्याच्यावर होणारे आरोप आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी त्याचं मत व्यक्त केलं.
'लोकांना जागरूक करायला राजकारणात'
हाफिज सईदनं नुकतीच राजकारण प्रवेशाची घोषणा केली होती. त्यानं मिली मुस्लीम लीग नावाच्या पक्षाची स्थापनाही केली, पण पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानं त्याच्या निवडणूक लढण्यावर बंदी घातली.
राजकारणात का यावंसं वाटलं, या प्रश्नाचं उत्तर देताना त्यानं सांगितलं, "मला वाटतं की, पाकिस्तानला एक करायची आणि पाकिस्तानी लोकांना जागरूक करण्याची ही योग्य वेळ आहे. त्याच पायावर काम करण्यासाठी मी राजकारणात येत आहे."
त्याच्यासारखी वादग्रस्त व्यक्ती पाकिस्तानमध्ये ऐक्य निर्माण करू शकते का? तो सांगतो, "लोक मला ओळखतात आणि त्यांना मी कोण आहे, हे देखील माहीत आहे."
राजकारणात येण्यासाठी मुस्लीम लीगचं व्यासपीठ वापरणार का, याचं उत्तर देताना तो म्हणाला, "इन्शाअल्ला, नक्कीच वापरणार."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल
पाकिस्ताननं हाफिज सईदवर कारवाई करावी, यासाठी भारताकडून पाकिस्तानवर खूप काळापासून दबाव टाकण्यात येत आहे. हाफिज सईदवरही पाकिस्तानमध्ये भारतविरोधी भाषणं केल्याचे आरोप ठेवले गेले आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल विचारल्यावर हाफिजनं कठोर भाषेत आरोप करायला सुरुवात केली. "मी कधीच कपोलकल्पित गोष्टी करत नाही. माझी विधानं तथ्यांवर आधारित आहेत. मोदींबद्दल माझं मत आहे की, ते ढाक्याला गेले होते. तिथं त्यांनी सगळ्यांसमोर विधान केलं, पाकिस्तानचे दोन तुकडे करण्यात माझा हात आहे. मी रक्त सांडलं."
हाफिज सईद म्हणाला, "माझी इच्छा आहे की, मला आणि मोदींना जगानं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करावं, आणि त्यांनीच ठरवावं की सर्वांत मोठा दहशतवादी कोण आहे!"
हाफिज सईदच्या आरोपांवर भारताची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाशी आम्ही संपर्क साधला. पण या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
संघटनेवरील बंदीबद्दल
लष्कर-ए-तोयबावर बंदी घातल्यानंतर पाकिस्ताननं नुकतंच सईदच्या जमात-उद-दावावरही बंदी घातली आहे.
पण म्हणजे 'एक कोटी डॉलर्सचा इनाम डोक्यावर असलेला दहशतवादी' ही हाफिज सईदची आंतरराष्ट्रीय पातळीवरची ओळख पाकिस्तानला मान्य आहे का?
हाफिज सईद म्हणतो, "अमेरिकेनं भारताला पाठिंबा द्यायला सुरुवात केली आणि त्या दोन देशांनी मिळून आमच्यावर (जमात-उद-दावा) बंदी घालायला सुरुवात केली. त्यांनी पाकिस्तान सरकारवरही दबाव टाकायला सुरुवात केली आहे."
"त्या दोन देशांसमोर पाकिस्तान कमकुवत देश आहे, हे सत्य आहे. देशासमोर आर्थिक संकटं आहेत. त्या आर्थिक संकटांमुळे पाकिस्तान अडचणीत सापडला आहे आणि आमच्यावर बंदी घातली आहे."
आरोप आणि कोर्ट
हाफिजचं म्हणणं आहे की, तो जेव्हा जेव्हा न्यायालयात गेला, कोर्टानं त्याचा युक्तिवाद मान्य केला आहे. एवढंच नाही, तर त्याच्या विरोधातले कोणतेही आरोप सिद्ध होत नसल्याचं कोर्टानं सांगितलं आहे.
पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांताच्या कायदामंत्र्यांनी असं विधान केलं होतं की, ज्या लोकांचा वापर देशातले सत्ताधारी 'अॅसेट' म्हणून करतात, त्यांच्यावरचे आरोप कोर्टात सिद्ध होतील, अशी अपेक्षा कशी ठेवणार! बीबीसीच्या प्रतिनिधींनी हाफिजला या विधानाची आठवण करून दिली.
यावर हाफिजचं म्हणणं असं की, निर्णय घेण्याचं काम कोर्टाचं असतं. राजकारणी किंवा राजकीय नेता हे निर्णय घेऊ शकत नाही.
तो म्हणाला, "निर्णय वारंवार आमच्याच बाजूनं होत आहेत. देशाचा कायदामंत्री किंवा संरक्षणंत्री काही विधान करत असतील, तर ते विधान किती खरं आहे? हे राजकीय नेते राजकारणात पण एकमेकांच्या उरावर बसण्यात धन्यता मानतात."

फोटो स्रोत, Getty Images
संरक्षणंत्री हाफिजला घाबरतात का?
पाकिस्तानमधले जबाबदार नागरिकही तुमच्या बाजूनं दिलेल्या निकालांबाबत सहमत नाहीत, मग तुमच्या या तर्कांवर जगाचा विश्वास कसा बसणार, असा प्रश्न हाफिजला विचारला.
यावर बोलताना हाफिज म्हणाला की, दोन दिवसांपूर्वी संरक्षण मंत्र्यांनी त्याच्याविरोधात कठोर वक्तव्य केलं होतं. आता त्यांना दोनच दिवसांमध्ये त्याबद्दल स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.
संरक्षणमंत्री तुला घाबरून हे स्पष्टीकरण देत आहेत का, यावर त्यानं हसत हसत उत्तर दिलं, "मला नाही माहीत. ते घाबरत नाहीत. अलहमदुलिल्लाह! आम्हाला कोणी घाबरावं, असं कोणतंही काम मी किंवा माझ्या पक्षानं केलेलं नाही. पाकिस्तान एक कमकुवत देश आहे, हे काळजीचं कारण आहे. पाकिस्तानपुढे नेहमीच आर्थिक समस्या उभ्या असतात. सरकारला नेहमीच (दुसऱ्या देशांकडून) आर्थिक मदत घ्यावी लागते."

फोटो स्रोत, Getty Images
हाफिज सईद पाकिस्तानवरचं ओझं आहे का?
गेल्या काही वर्षांमध्ये हाफिज सईदमुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय दबावाचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे पाकिस्तान प्रशासनाला हाफिज सईद डोईजड होऊ लागला आहे का, यावर सईदचं स्पष्टीकरण असं, "ख्वाजा आसिफनं अमेरिकेत केलेल्या वक्तव्यात मला 'ओझं' म्हटलं होतं. त्याविरोधात मी त्याला कायदेशीर नोटीस पाठवली. त्या नोटिशीला त्यानं उत्तर दिलं आणि त्याचं विधान चुकीचं असल्याचं सांगत माफी मागितली."
या प्रकरणाला सईद पाक सरकारचं 'दुटप्पी धोरण' मानण्यास तयार नाही. तो म्हणतो, "खरं तर पाकिस्तान दबावाला बळी पडतो. त्यांच्याकडे स्वत:ची अशी काहीच नीती नाही. मी 'लष्कराच्या हातातलं बाहुलं' आहे, या गोष्टीचा पुरावा काय?"

आंतरराष्ट्रीय स्तरावर हाफीजमुळे पाकिस्तानची कोंडी होते, या विषयावर हाफिजचं म्हणणं असं, "मला विचाराल, तर आता परिस्थिती बदलत आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या पायांवर उभा राहायला लागला आहे. पाकिस्ताननं अमेरिकेला स्पष्टपणे सांगितलं आहे की, आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाही."
हाफिज सईद म्हणतो, "क्रॅकडाऊन असो किंवा इतर काहीही, माझ्याविरोधात होणाऱ्या कोणत्याही कारवाईविरोधात मी कोर्टात जाणार!"
तुम्ही हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









