थायलंडमध्ये पेनिस व्हाईटनिंगचा ट्रेंड का वाढतोय?

फोटो स्रोत, LELUXHOSPITAL
थायलंडमध्ये आजकाल जगावेगळाच ट्रेंड आला आहे. त्यामुळे ब्युटी इंडस्ट्री त्यांच्या सर्व मर्यादा तोडत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मागील काही दिवसांपासून थायलंडमध्ये पेनिस (पुरुषाचे शिश्न) व्हाईटनिंगचं प्रमाण वाढलेलं दिसून येत आहे.
त्वचा गोरी करून घेण्याचा प्रयत्न करणं आशियाई देशांमध्ये नवीन नाही. या देशांमध्ये अश्वेत त्वचेचा संबंध मजुरी आणि गरिबीशी जोडला जातो.
नुकतंच एका दवाखान्याची त्वचा गोरी करण्याची पद्धत ऑनलाईन पोस्ट करण्यात आली तेव्हा ती प्रचंड व्हायरल झाली. इतकी की थायलंडच्या आरोग्य मंत्रालयाला या प्रक्रियेसंबंधी धोक्याची सूचना जारी करावी लागली.
पेनिस व्हाईटनिंगचा उपचार घेणाऱ्या एका रुग्णाला बीबीसीच्या थाय सेवेनं विचारलं तेव्हा त्यानं सांगितलं, "पोहताना अधिक आत्मविश्वास वाटावा असं मला वाटतं होतं."
30 वर्षीय व्यक्तीनं सांगितलं की, त्याचं पेनिस व्हाईटनिंग पहिलं सत्र दोन महिन्यांपूर्वी होतं. तेव्हापासून त्यानं निश्चित असा बदल अनुभवला आहे.
या प्रकारचा उपचार करणाऱ्या दवाखान्याची फेसबुकवरची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. अवघ्या दोन दिवसांत 19 हजार वेळा ही पोस्ट शेअर करण्यात आली.
या पोस्टमध्ये उपचार कक्षातले फोटो सुद्धा टाकण्यात आले होते. त्यासोबत शस्त्रक्रिया स्पष्ट करून सांगण्यात आली होती.
या पोस्टवर चित्रविचित्र कमेंट्स आल्या आहेत.
काही जणांनी 'पेनिस व्हाईटनिंग कशासाठी करायचं?' असा प्रश्न विचारला आहे. तर काहींनी मात्र 'शस्त्रक्रियेनंतर पेनिसचा उपयोग टॉर्च लाईट म्हणून करता येईल, त्याला चमकू द्या,' अशी टिप्पणी केली आहे.
एका महिलेनं मात्र पेनिसच्या रंगाबद्दल वेगळी भूमिका घेतली आहे. तिचं म्हणणं होतं की, ती रंगाबद्दल गंभीर नाही, पण आकार आणि हालचालींबद्दल तिला चिंता वाटते.

फोटो स्रोत, LELUXHOSPITA
"चार महिन्यांपूर्वी आम्ही व्हजायना व्हाईटनिंगची सेवा सुरू केली," असं ली-लक्स हॉस्पिटलचे मार्केटिंग मॅनेजर पोपोल टँसकूल यांनी बीबीसीला सांगितलं.
"त्यानंतर रूग्ण पेनिस व्हाईटनिंगविषयी विचारायला लागले. म्हणून मग त्यानंतरच्या एका महिन्यानं आम्ही पेनिस व्हाईटनिंगची सेवा देणं सुरू केलं," पोपोल पुढे सांगतात.
या शस्त्रक्रियेसाठी एकूण पाच सत्र घेतली जातात आणि त्यासाठी एकूण 4 लाख रूपये मोजावे लागतात.
खरं तर हे शरीराचं गुप्तांग आहे. तरीसुद्धा थायलंडमधल्या बहुसंख्य लोकांना त्यांचं गुप्तांग गोऱ्या रंगाचं असावं असंच वाटतं.
व्हजायना आणि पेनिस व्हाईटनिंगसाठी महिन्यातून 20 ते 30 रुग्ण या दवाखान्यात उपचारासाठी येतात. यातले काही तर म्यानमार, कंबोडिया आणि हाँगकाँगमधून येतात.
"ही शस्त्रक्रिया गे आणि ट्रान्सव्हेस्टी लोकांमध्ये खूप प्रिय आहे. कारण ही माणसं गुप्तांगांची चागल्या प्रकारे काळजी घेतात," असं पोपोल सांगतात.
पेनिस व्हाईटनिंग अनिवार्य नाही
या दवाखान्याकडे मोठ्या प्रमाणात लोकांचं लक्ष वेधल्यामुळे थायलंडच्या आरोग्य मंत्रालयालाही यावर प्रतिक्रिया द्यावी लागली.
आरोग्य मंत्रालयानं या शस्त्रक्रियेमुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी माहिती दिली आहे. ज्यात शस्त्रक्रियेदरम्यानची वेदना, सूज, चट्टे तसंच प्रजनन क्षमतेवरील परिणामांता समावेश आहे.
"मध्येच हे उपचार घेणं थांबवलं तर त्वचा मुळच्या रंगावर परतू शकते. तसंच विचित्र दिसतील असे डागही त्वचेवर राहू शकतात," असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
"पेनिस व्हाईटनिंग केलंच पाहिजे असं काही नाही. हे म्हणजे पैशाचा अपव्यय आहे आणि वाईट परिणामांना आमंत्रण देणारं आहे," असं मंत्रालयातील अधिकारी डॉ. थोंगचाई किर्तीहुत्थयाकोर्न यांनी सांगितलं आहे.
गोरा रंग यशाचं गमक?
दक्षिण-पूर्व आशियात गेल्या दशकात स्किन व्हाईटनिंगचं प्रमाण वाढलं आहे.
50 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण स्किन व्हाईटनिंगसंबंधीच्या उपचारासाठी येतात, असं ली-लक्सचं म्हणणं आहे.

त्वचा गोरी करण्यासाठी बाजारात असंख्य उत्पादनं उपलब्ध आहेत. या उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी केल्या जाणाऱ्या जाहिराती बरेचदा वादात अडकतात.
बँकॉकच्या सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसमध्ये एका मलमाची जाहिरात लावण्यात आली होती. 'फक्त गोरे लोक इथं बसू शकतात,' असं त्या जाहिरातीत म्हटलं होतं.
तसंच थायलंडमधल्या एका सौंदर्य प्रसाधन कंपनीला तिनं ज्या पद्धतीनं उत्पादनाची जाहिरात केली त्यामुळे टीकेला सामोरं जावं लागलं होतं.
त्यानंतर या जाहिराती मागे घेण्यात आल्या होत्या.
दरम्यान '2014 मिस थायलंड वर्ल्ड' या सौंदर्य स्पर्धेत विजेतीच्या काळ्या त्वचेची तुलना इतर स्पर्धकांसोबत करण्यात आली होती.
"ज्या महिलांना काळ्या त्वचेमुळे असुरक्षित वाटतं, ज्यांचा काळ्या त्वचेमुळे आत्मविश्वास खालावला आहे, त्यांना ती प्रेरणा देण्याचं काम करणार आहे," असं त्यावेळी मॉडेल नॉनथवान मेयानं थाँगलेंगनं म्हटलं होतं.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








