डोनाल्ड ट्रंप यांनी दिवाळी का साजरी केली?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, विनायक गायकवाड
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी यंदा व्हाईट हाऊसमध्ये ईद साजरी केली नव्हती, पण दिवाळी मात्र साजरी केली.
ते निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हिंदू समाजाच्या एका रॅलीदरम्यानही दिसले होते. हिंदू धर्माचे आपण मोठे चाहते आहोत, असं तेव्हा ते म्हणाले होते.
हिंदूंचे सण साजरे करून भारताशी जवळीक साधण्याचा राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचा प्रयत्न आहे, असं आंतरराष्ट्रीय राजकारणातील अभ्यासकांचं मत आहे.
यामागे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अमेरिकेतील अंतर्गत राजकीय परिस्थिती ही प्रमुख कारणं असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

फोटो स्रोत, Twitter
डोनाल्ड ट्रंप यांची मुस्लीमविरोधी धोरणं आणि वक्तव्य ही जगजाहीर आहेत.
2016 मध्ये निवडणुकीच्या आधीपासूनच ट्रंप यांनी आपला अजेंडा स्पष्ट केला होता. तर राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरही ट्रंप यांची मुस्लिमांसंदर्भातील धोरणं बदललेली नाहीत.
अमेरिकेच्या राजकारणाचा अभ्यास करणाऱ्या निखिल श्रावगे यांच्या मते, ट्रंप यांच्या याच भूमिकेमुळे अमेरिकेतील हिंदूंना ते जवळचे वाटतात.
निखिल सांगतात, "सध्या अमेरिकेत 20 लाखांपेक्षा जास्त हिंदू स्थायिक आहेत, पण अमेरिकेतील हिंदू हे रिपब्लिकन पक्षापेक्षा डेमोक्रॅटिक पक्षाशी जास्त जोडले गेले आहेत."
"2016 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत तब्बल 87 टक्के हिंदूंनी हिलरी क्लिंटन यांना मतदान केलं होतं. तर फक्त 7 टक्के हिंदूंनी ट्रंप यांना मतदान केलं," श्रावगे सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
हा टक्का जरी कमी असला, तरी ट्रंप यांच्या सरकारमध्ये अनेक हिंदू मुख्य पदांवर आहेत.
यामध्ये अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रांमधील प्रतिनिधी निक्की हॅले, सेंटर फॉर मेडिकेअर सर्व्हिसच्या संचालक सीमा वर्मा, अमेरिकेच्या फेडरल कम्युनिकेशन कमिशनचे अध्यक्ष अजित पै आणि ट्रंप यांचे डेप्युटी प्रेस सेक्रेटरी राज शाह यांचा समावेश आहे.
उद्योजक शलभ कुमार हे अमेरिकेतील हिंदूंचा एक मुख्य आवाज असल्याचं मानलं जात. ते सरकारमध्ये कुठेही नाहीत. पण ते राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.
निखिल सांगतात, "शलभ कुमार यांनी ट्रंप कॅम्पेनला निवडणुकीदरम्यान 10 लाख डॉलर्सची देणगी दिली होती. इतकंच नाही तर हिंदू कोएलिशनच्या माध्यमातून शलभ कुमार यांनी ट्रंप यांची एक रॅलीही आयोजित केली होती. त्यामुळे शलभ कुमार यांचं ट्रंप यांना विशेष महत्व आहे."

फोटो स्रोत, Getty Images
आंतरराष्ट्रीय विषयांच्या अभ्यासक प्राध्यापक उत्तरा सहस्रबुद्धे यांच्या मते आशियातील चीनची ताकद कमी करायला अमेरिकेला भारताची मदत लागणार आहे.
त्या म्हणतात, "ओबामांच्या कार्यकाळात अमेरिकेची चीनशी स्पर्धा तर होती पण जुळवून घेण्याचं धोरणंही होतं. पण ट्रंप यांच्या कार्यकाळात आता अमेरिका चीनशी फार जुळवून घेण्यास उत्सुक नाही."
"इतकंच नाही तर आशिया-पॅसिफिक भागात अमेरिकेचा नेहमीच प्रभाव राहिला आहे. पण ट्रंपच्या नेतृत्वाखालील अमेरिकन सरकारला आता आशिया-पॅसिफिकमध्ये घडणाऱ्या गोष्टींची जबाबदारी झटकायची आहे."
"त्यासाठी चीनला टक्कर देणारी एक ताकद निर्माण होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच भारत हा अमेरिकेसाठी महत्वाचा मित्र बनतोय," असं सहस्रबुद्धे म्हणतात.
इतकंच नाही तर अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट रेक्स टिलरसन दिवाळीनंतरच्या आठवड्यात भारतात येत आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भारत अमेरिकेसाठी किती महत्त्वाचा भागीदार आहे हे वक्तव्य आता टिलरसन करत आहेत.
टिलरसन यांचा हा दौरा लक्षात घेता दिवाळीचं औचित्य साधून भारताशी मैत्री घट्ट करण्याचा ट्रंप सरकारचा विचार आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








