नेपाळ : कठीण परीक्षेनंतरच होते 'जिवंत देवी'ची निवड

फोटो स्रोत, Getty Images
नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये नुकतंच तीन वर्षांच्या मुलीला 'जिवंत देवी'चा दर्जा देण्यात आला आहे. गुरुवारी पुजाऱ्यांनी तिला ऐतिहासिक मंदिरात पाठवलं.
मासिक पाळी सुरू होईपर्यंत या मुलीची जिवंत देवीच्या रूपात पूजा केली जाईल. नेपाळमध्ये अशा मुलींना कुमारिका म्हणून ओळखलं जातं.
मासिक पाळी जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत तिला कुमारीकेच्या वेशभूषेतच रहावं लागेल.
जिवंत देवी म्हणून निवड झालेल्या या मुलीचं नाव तृष्णा शाक्य आहे.
तृष्णाला लाल साडी नेसवण्यात आली होती. 2015 मध्ये आलेल्या भूकंपाचे साक्षीदार असलेल्या रस्त्यांवरून तिच्या वडिलांनी तिला घरापासून ऐतिहासिक दरबारात नेलं.
या दरबारात तिची यथोचित पूजा करण्यात आली. आता तिथं तिची विशेष काळजी घेतली जाईल.
मिरवणुकीदरम्यान या छोट्या मुलीला तिच्या कुटुंबातील सदस्यांचा वेढा पडलेला होता.
गुडघ्यापर्यंत लाल रंगाचे ढगळ कपडे घातलेले काही पुरुष तिच्यासोबत रस्त्यांवरून अनवाणी चालत होते.

फोटो स्रोत, Getty Images
"मला आनंदही झाला आहे आणि त्याच वेळी मी दु:खीसुध्दा आहे. कुमारिका म्हणून माझ्या मुलीची निवड झाली आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण दुःख याच गोष्टीचं आहे की, ती आता आमच्यापासून दूर जात आहे." असं तिचे वडील बिजया रत्न शाक्य यांनी न्यूज एजेंसी 'एएफपी'ला सांगितलं.
तृष्णाला घेऊन जात असताना तिचा जुळा भाऊ कृष्णा रडत होता.
तिला आता हिंदू देवी तलेजूचा अवतार समजण्यात येईल.
विशेष सणांच्या दिवशीच तिला मंदिरातून बाहेर पडण्याची परवानगी असेल. वर्षातून फक्त 13 वेळाच ती आता मंदिराबाहेर पडू शकेल.
अनेक प्रकारच्या शारीरिक चाचण्या
कुमारिकेला जिवंत देवीचा दर्जा देण्याआधी पुजारी संबधित मुलीसमोरच एका जनावराचा बळी देतात. या प्रथेनुसार आतापर्यंत 108 म्हशी, बकऱ्या, कोंबडे, बदक आणि अंडी कापण्यात आली आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
या कुमारीकेला हिंदू आणि बौद्ध धर्माकडून सारखाच सन्मान दिला जातो. विशेष म्हणजे अशा कुमारिका या पूर्वी काठमांडू, पाटन आणि भक्तपूर अशा तिन्ही राजेशाही साम्राज्यांचं प्रतिनिधित्व करत असत.
कुमारिका निवडीची प्रथा ही राजघराण्यांशी संबंध होती. 2008 मध्ये हिंदू साम्राज्य संपुष्टात आलं आणि नेपाळमध्ये लोकशाहीची घोषणा करण्यात आली. पण, तरीही कुमारिका प्रथा अजूनही सुरूच आहे.
विविध प्रकारच्या शारीरिक चाचण्यांनंतर कुमारीकेची निवड होते. मान्यतेनुसार, कुमारीका होण्यासाठी हरणीसारखी जांघ आणि सिंहणसारखी छाती असणं गरजेचं आहे.
या शारीरिक चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरही मुलीला पुन्हा सिध्द करावं लागतं की, म्हैस कापल्यावर ती रडणार नाही.
मंदिरातच दिलं जातं शालेय शिक्षण
लहान मुलांसाठी काम करणाऱ्या समाजसेवी संस्थांनी प्रथेला नेहमीच विरोध केला आहे. या मुलांचं लहानपण आपण त्यांच्यापासून हिसकावून घेत आहोत, असं त्यांचं म्हणणं आहे.
यामुळं मुली समाजाच्या मुख्य धारेपासून दूर फेकल्या जातात आणि त्यांच्या शिक्षणावरही त्याचा परिणाम होतो.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, कुमारिकेला शालेय शिक्षण दिलं जावं असा आदेश नेपाळच्या सुप्रीम कोर्टानं 2008 मध्ये दिला होता. त्यानंतर मंदिरातच या मुलींच्या शालेय शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. तिथंच त्या शालेय परीक्षाही देतात.
"मंदिरातून बाहेर पडल्यानंतर समाजात मिसळण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला." असं अनेक माजी कुमारिकांनी सांगीतलं आहे.
नवीन कुमारिका मंदिरात पोहोचण्या आधी बारा वर्षांची विद्यमान कुमारी मटिन शाक्य ही मागच्या दरवाजातून मंदिर सोडून बाहेर पडली होती.
मटिन लाल वस्त्रांमध्ये, लाल रंगाचा मळवट भरून तिच्या घरी परत आली आहे. 2008 मध्ये तिला जिवंत देवी म्हणून मान्यता मिळाली होती.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








