क्युबा : दूतावासातील कर्मचाऱ्यांना अमेरिकनं परत बोलावलं, सॉनिक हल्ल्याची भीती

अमेरिकन दूतावास

फोटो स्रोत, Reuters

रहस्यमय सॉनिक हल्ल्यांनंतर अमेरिकेनं क्युबातील त्यांच्या दूतावासातील निम्म्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना माघारी बोलावलं आहे. याशिवाय अमेरिकेनं नागरिकांना क्युबामध्ये न जाण्याबद्दल इशाराही दिला आहे.

दूतावासाखेरीज हॉटेलमध्येही हल्ले झाल्यानं अमेरिकन नागरिकांना क्युबात न जाण्याबद्दल इशारा देण्यात आला आहे.

क्युबातील अमेरिकेच्या दूतावासातील 21 कर्मचाऱ्यांनी अचानक चक्कर येणं, मळमळ, ऐकू न येणं आणि शुद्ध हरपणं अशा स्वरूपाच्या तक्रारी केल्या आहेत. यामागे 'सॉनिक हल्ले' म्हणजेच ध्वनिलहरींद्वारे केलेले हल्ले हे कारण असल्याची प्राथमिक माहिती आहे.

क्युबाने या हल्ल्यात कसलाही सहभाग नसल्याचं म्हटलं आहे.

अशआ प्रकारच्या आरोग्याच्या तक्रारी नोंदवल्यांपैकी दोघे कॅनाडाचे नागरिकही आहेत.

अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट रेक्स टिलर्सन यासंदर्भात म्हणाले की, अमेरिका क्युबाशी राजनैतिक संबंध कायम ठेवणार असून, दोन्ही देश या हल्ल्यांचा तपास करण्यासाठी परस्पर सहकार्य करतील.

अमेरिकेनं हवाना येथील अत्यावश्यक सेवा वगळून इतर कर्मचाऱ्यांना कुटुंबीयांसह तातडीने दूतावास सोडण्याचे आदेश दिले आहेत.

तसंच क्युबासाठीच्या व्हिसा प्रक्रियाही स्थगित केल्या आहेत.

डोनाल्ड ट्रंप

फोटो स्रोत, EPA

अमेरिकेच्या स्टेट विभागातील अधिकारी म्हणाले, "जोपर्यंत क्युबा आमच्या नागरिकांच्या सुरक्षेची हमी देत नाही, तोपर्यंत आम्ही तेथील दूतावासात फक्त अत्यावश्यक कर्मचारीच ठेवू."

"किमान 21 कर्मचाऱ्यांना या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलं आहे," असं या अधिकाऱ्यानं सांगितलं.

एफबीआय, रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलीस आणि क्युबा प्रशासानानं तपास करूनही, 2016 पासून होत असलेल्या या घटनांची पूर्ण मीमांसा झालेली नाही.

"हे हल्ले कसे, कशा प्रकारे आणि कोणत्या माध्यमातून होत आहेत, याची आम्हाला माहिती नाही," असं या अधिकाऱ्यानं सांगितलं.

परंतु यापूर्वीच्या अहवालांनुसार हे 'सॉनिक हल्ले' होते. यामध्ये हवानातील कर्मचाऱ्यांना ध्वनिलहरींनी लक्ष्य करण्यात आलं. त्यामुळं या कर्मचाऱ्यांच्यात श्रवणदोष निर्माण झाले.

सॉनिक हल्ले म्हणजे काय?

विनाआवाजाच्या यंत्रातून अशा प्रकारे ठराविक उद्देशाने हल्ला करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्याचं मत डेनिस बेडाट यांनी एएफपी वृत्तसंस्थेला गेल्या आठवड्यात दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. बेडाट हे बायोइलेक्ट्रोमॅग्नेटिक तज्ज्ञ आहेत.

ते म्हणाले, "अल्ट्रॉसॉनिक लहरी माणसाच्या ऐकण्याच्या क्षमतेच्या बाहेर असतात. त्यांच प्रसारण अॅम्प्लिफायरच्या सहायानं करता येतं. यासाठीचं उपकरण मोठं असावं लागत नाही. ते घराबाहेर आणि घराच्या आतही वापरता येतं."

त्यांनी अमेरिका पोलीस वापरत असलेल्या 'अॅक्टिव्ह डिनायल सिस्टीम' या दंगलविरोधी बंदुकीचं उदाहरण दिलं. या बंदुकीतून इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी उत्सर्जित होतात. त्यामुळं असह्य जळजळ होते.

या हल्ल्यांमागे कोण?

अमेरिकेनं या हल्ल्यासाठी क्युबाला जबाबदार धरलेलं नाही.

या हल्ल्यामागे कोण आहे, ते अमेरिका आणि क्युबाच्या सरकारांना शोधता आलं नसल्याचं अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटनं म्हटलं आहे.

दूतावास

फोटो स्रोत, Getty Images

तपासाचा भाग म्हणून आम्ही तिसऱ्या देशाच्या सहभागाची शक्यता नाकारत नाही. पण तपास सुरू आहे, असं या अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.

अमेरिका - क्युबा संबंध

क्युबाचे राष्ट्राध्यक्ष राउल कॅस्ट्रो यांनी या हल्ल्यामागे क्युबा नसल्याचं हवानातील तत्कालीन अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना विश्वासानं सांगितलं होतं, असं म्हणतात.

अमेरिका आणि क्युबा यांच्यातील अनेक वर्षांच्या ताणलेल्या संबंधांनंतर अमेरिकेने 2015 मध्ये क्युबामध्ये दूतावास पुनर्स्थापित केला होता.

2016 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी क्युबाला भेट दिली. 1928 मध्ये केल्विन कूलीज यांच्यानंतर क्युबाला भेट देणारे ते पहिलेच अध्यक्ष ठरले.

जूनमध्ये डोनाल्ड ट्रंप यांनी ओबामांचं क्युबाविषयक धोरण अंशतः मागे घेण्याविषयी सूतोवाच केलं होतं. मात्र हवानामधला दूतावास बंद करणार नाही, असंही त्यांनी सांगितलं होतं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)