तरला दलाल : देशीविदेशी पदार्थ घरच्या घरी करण्याचा आत्मविश्वास देणाऱ्या शेफ

फोटो स्रोत, tarladalal.com
- Author, भक्ती चपळगावकर
- Role, मुक्त पत्रकार
माझा खाद्यप्रवास मुंबईच्या तुलनेत अगदीच लहान असलेल्या गावात आणि मध्यमवर्गीय घरात सुरू झाला. घरातले मराठमोळे पदार्थ हाच त्या प्रवासाच्या सुरूवातीचा महत्वाचा टप्पा होता.
90 च्या दशकाच्या सुरूवातीला मी आणि माझ्यासारखे अनेकजण शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडले, आणि आम्ही मराठी मध्यमवर्गीय चवींच्या पलिकडे आम्ही काही शोधू लागलो. उपाहारगृहांमध्ये घेतलेल्या चवी घरी बनवू शकतो का याची चाचपणी करु लागलो.
या प्रवासात तरला दलाल यांनी जगातल्या वेगवेगळ्या भागात बनणारे चविष्ट पदार्थ आपण घरी बनवू शकतो हा आत्मविश्वास भारतच नाही तर भारतीय उपखंडातल्या तमाम हौशी शेफ्सना, विशेषतः गृहिणींना दिला. पुस्तकं, टीव्ही शोज, प्रात्यक्षिके, युट्यूब चॅनल्स यांच्या माध्यमांतून त्या घरोघरी पोचल्या.
पुण्यात एका मध्यमवर्गीय घरात तरला यांच्या जन्म झाला. 1960 साली वयाच्या चोविसाव्या वर्षी नलिन दलाल यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या मुंबईत राहायला आल्या. नेपियन्सी रोड या उच्चभ्रू भागातल्या एका अपार्टमेंटमध्ये नलिन दलाल यांच्याबरोबर त्यांचा संसार सुरू झाला. वयाच्या सात-आठ वर्षापासून स्वयंपाकघरात मदत केल्यामुळे त्यांना गुजराती पद्धतीचा स्वयंपाक माहित होता. आपल्या नव्या आयुष्यात स्थिरस्थावर होताना त्यांना खाद्यपदार्थ बनवण्याच्या त्यांच्या छंदाने मदत केली.
खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक मोहसिना मुकादम यांच्या मते 'तरला दलाल यांच्या आयुष्यातला हा काळ फार महत्वाचा होता. याच काळात त्यांनी स्वतःचा शोध घेतला. दलाल यांच्या तुलनेत साध्या घरातून मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीत राहताना आलेले दडपण याच काळात त्यांच्या मूळातल्या उद्योगशील स्वभावामुळे दूर झाले'.
नलीन दलाल यांनी जगभरात प्रवास केला होता. ते मुळात खवैय्ये होते. देशोदेशीचे पदार्थ चाखलेले नलीन सगळ्याप्रकारच्या पदार्थांचा मनापासून आस्वाद घेत. तरला कडक शाकाहारी. नवऱ्याची हौस पूर्ण करण्याची इच्छा आणि मांसाहारी पदार्थ बनवण्याची अनिच्छा या दोन कारणांनी त्यांनी वेगवेगळे शाकाहारी पदार्थ शिकायला सुरूवात केली. रोटी, सब्जी, कढी खिचडी ते देशीविदेशी चविष्ट पदार्थ हा प्रवास त्यांनी झपाट्याने पूर्ण केला.

फोटो स्रोत, tarladalal.com
मुंबईत पारसी समाजाच्या एक महिला कुकिंग क्लासेस घेत. त्यात शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थांचा समावेश असे. तरला यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, 'ज्या दिवशी शाकाहारी पदार्थांचा दिवस असे त्या दिवशी मी क्लासला जाई'. पण लवकरच त्यांनी शाकाहारी पदार्थांवर मास्टरी मिळवली. मग नलीन यांनी त्यांना परदेशी पाककृतींची अक्षरशः शेकडो पुस्तकं आणून दिली.
मुळात झपाटलेल्या वृत्तीने काम करण्याची सवय असल्याने तरला दलाल यांनी त्या पुस्तकांना शालेय पुस्तकं मानून त्यांचा अभ्यास केला. त्यांचे स्वयंपाकघर त्यांची प्रयोगशाळा बनले. चुकत-माकत, अनेक प्रयोग करत त्यांनी परदेशी पदार्थांना भारतीय शाकाहारी साज चढवला. पदार्थ बनल्यानंतर तो पेश करतानाही आकर्षक दिसला पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. भारतीय मध्यमवर्गीय समाजासाठी हे नवे होते. गार्निशिंग आणि प्लेसिंग या गोष्टींचा विचार करताना त्यांचा मूळचा परफेक्शनिस्ट स्वभाव दिसतो.
कुकिंग क्लासेस
आपल्या स्कील्सचा काहीतरी उपयोग करायचा या उद्देशाने त्यांनी घरातच क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण गुजराती समाजातल्या एका गृहिणीने असे काही तरी सुरू करणे त्यांच्या परंपरावादी घराला लगेच मान्य झाले नाही. इथे नलीन यांनी पुन्हा त्यांना मदत केली. 'महाराजचे (घरी स्वयंपाक करायला येणाऱ्या आचाऱ्याला गुजराती समाजात महाराज म्हणतात) काम माझ्या सुनेने करु नये' असे नलीनच्या आईचे म्हणणे होते.
नलीनने समजावले, 'अगं आई, करु दे तिला, दोन तीन महिने शिकवेल, हौस फिटली की स्वतःच बंद करेल'.
पण तरला दलाल यांचा उदय योग्य वेळी झाला होता. पदार्थ बनवण्याची हातोटी, ते बनवण्याची पद्धत सोपी करुन ते शिकवण्याचे कसब त्यांच्यात होते.
देशीविदेशी पदार्थ रांधून तुम्ही ते पेश करु शकता हा आत्मविश्वास त्यांनी सामान्य गृहिणींना दिला. त्या काळच्या भाषेत सांगायचे झाले तर तरला दलाल क्लासेस लवकरच ब्लॉकबस्टर ठरले. त्यांना तीन मुलं, संजय, दीपक आणि रेणू. त्यांचे क्लासेस सुरू झाले तसे घरात वर्दळ वाढली. संजय त्यावेळेस आठ नऊ वर्षाचे होते.

फोटो स्रोत, tarladalal.com
ते सांगतात, 'आईच्या क्लासेससाठी गॅलरीतून खुर्च्या काढून घरात मांडायच्या आणि क्लास संपला की परत नेऊन ठेवायच्या हे माझे काम. लवकरच विद्यार्थिनींची संख्या पन्नासच्यावर गेली आणि क्लासेससाठी घरात जागा पुरेनाशी झाली. आईची लोकप्रियता क्लासेसमुळे खूप वाढली.
प्लेजर्स ऑफ व्हेजिटेरियन कुकिंग
सत्तरच्या दशकाच्या सुरूवातीला आईने पुस्तक लिहायला सुरूवात केली. माझ्या वडलांनी तिला नेहमीच प्रोत्साहित केले. तिचे 'प्लेजर्स ऑफ व्हेजिटेरियन कुकिंग' हे पुस्तक 1974 साली प्रसिध्द झाले आणि या पुस्तकाने इतिहास घडवला'.
सगळ्या घरासाठी स्वयंपाक करण्याची जबाबदारी बहुतेकवेळा सूनेकडे येते. परंपरागत घर असो वा आधुनिक, त्याकाळी स्वयंपाक करण्याच्या कामाचे विभाजन अपवाद सोडले तर बहुतेकवेळा महिलांकडे होते.
या कामात त्यांना मदत व्हावी, इतकेच नाही तर पार्टी आयोजित करताना, मुलांना डबे देताना, रोज कोणता पदार्थ बनवू शकतो हा निर्णय घेताना तरला दलाल देशातल्या या लाखो महिलांच्या मदतीला धावल्या. या महिला आधुनिक होत्या. त्यांना परदेशी पदार्थ बनवण्याची हौस होती. त्यांनी उपाहारगृहांमध्ये आपापल्या प्रांतांशिवाय भारतातल्या इतर प्रांतातले पदार्थ चाखले होते. ते घरी बनवू शकतो ही शक्यताच त्यांना अचंबित करणारी होती.

फोटो स्रोत, tarladalal.com
विदेशी पदार्थांना पूर्णपणे भारतीय साज देण्यात तरला यशस्वी झाल्या. एका मुलाखतीत त्या सांगतात, विदेशी पदार्थाला भारतीय बनवणे सोपे नाही. प्रत्येक प्रांताचा स्वतःचा स्वाद असतो, पद्धत असते, त्या पद्धती, त्या चवी त्याचे रुपांतर शाकाहारी पदार्थात, भारतीय रुपात झाले तरी त्याचे मूळ रूप कुठेतरी टिकवावे लागते. चायनीज पदार्थात साखर घातली म्हणून मेक्सिकन पदार्थात ती घालायला नको. तसेच पंजाबी आणि गुजराती पदार्थांचे. गुजराती स्वयंपाकात साखरेचा वापर सढळपणे केला जातो, पण पंजाबी जेवण मसालेदार हवे'.
खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक मोहसिना मुकादम यांच्या मते 'तरला दलाल यांची पुस्तके इंग्रजी भाषेत प्रकाशित होणे अतिशय महत्वाचे ठरले. त्यामुळे त्या एका समाजापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. त्यांच्या नावाला एक भारतीयत्व प्राप्त झाले.
चमकदार आणि आकर्षक पाककृतींचे फोटो असलेली, उत्तम निर्मितीमूल्य असलेली पुस्तकं हे तरला दलाल यांच्या पुस्तकांचे वैशिष्टय होते. इतकेच नाही तर सत्तर ऐंशीच्या दशकात इंग्रजी मासिकांतून त्यांच्या पाककृती नियमित प्रकाशित होत असत, त्याही आकर्षणाचा मुद्दा ठरे.
पदार्थांचे उत्तम प्लेसिंग आणि गार्निशिंग हे त्यांच्या पदार्थांचे अजून एक वैशिष्ट्य.
आता पाककृतींची पुस्तके सर्रास मिळतात, विशिष्ट प्रसंगांसाठी (पार्टी, समारंभ), उद्देशाने (मुलांचे डबे, पेशंटसाठी स्वयंपाक) पुस्तके उपलब्ध आहेत पण त्याची सुरूवात तरला दलाल यांनी केली. त्यांनी शाकाहारी पाकसिध्दीला ग्लॅमर दिले. ते देताना त्या पाककृती पध्दतशीरपणे तयार केल्या. थाय असो वा इटालियन वा मेक्सिकन, सगळ्या पाककृतींना सादर करताना त्यांना त्याला स्टॅंडर्डाईज केले. हे करत असताना त्यांना त्यांच्या पाककृती कोणत्या वर्गासाठी उपयोगी पडू शकतात याची उत्तम जाण होती, म्हणजेच त्यांचा मार्केट रिसर्च पण होता, त्यांच्या क्लासेसमध्ये त्यांना हे ज्ञान मिळत गेले.
कला आणि व्यापारीवृत्ती याचा सुरेख संगम गुजराती समाजात दिसतो, त्या समाजात असल्याचा फायदाही त्यांना झाला. सत्तरच्या दशकात जरी त्यांचे पहिले पुस्तक आले तरी त्यांची खरी लोकप्रियता नव्वदच्या दशकात वाढली'. याचे महत्वाचे कारण म्हणजे मुक्त अर्थव्यवस्थेच्या आगमनानंतर भारतीय मध्यमवर्ग नवी स्वप्ने बघू लागला होता. आपली जीवनशैली चांगली असावी असा त्याचा आग्रह होता कारण त्यासाठी लागणारा पैसा थोड्याफार प्रमाणात आता त्याच्याकडे आला होता.
तरला दलाल सुद्धा बदलणा-या समाजाबरोबर बदलल्या. त्यांनी स्वयंपाकाचे बदलणारे वारे ओळखले. बदलत्या जीवनशैलीमुळे अधिक आरोग्यदायी आहाराची सुध्दा गरज निर्माण झाली. त्यासाठी एक स्वतंत्र विभाग त्यांनी तरलादलालडॉटकॉमवर सुरू केला.
कुक इट अप विथ तरला दलाल
एका खाजगी वाहिनीवर त्यांनी 'कुक इट अप विथ तरला दलाल' हा कार्यक्रम सादर करायला सुरूवात केली. त्यांची वेबसाईट एकोणीसशे नव्वदच्या आधीच सुरू झाली असली तरी या कार्यक्रमाने त्यांचा चेहरा लोकांच्या अधिक ओळखीचा झाला. सुधांशु पांडे या त्याकाळच्या नवोदित अभिनेत्याबरोबर त्या हा कार्यक्रम सादर करत असत.
पाककृती अगदी सहजपणे सादर करत असतानाच निवेदक फक्त उभा राहणार नाही तर त्यालाही स्वयंपाकात सामील करुन घेण्याची त्यांची पद्धत होती. याच पद्धतीने त्यांनी देशातच नाही तर जगभरात पाककृती बनवण्याची प्रात्यक्षिके घेतली. हे सगळेकाही वाऱ्याच्या वेगाने सुरू असताना तरला यांना अचानकपणे एका मोठा संकटाचा सामना करावा लागला.

फोटो स्रोत, tarladalal.com
संजय दलाल सांगतात, 'माझ्या आईला डोळ्याचा आजार झाला. त्यावर एक शस्त्रक्रिया मुंबईत झाली पण डॉक्टरांच्या चुकीमुळे तिला एक डोळा गमवावा लागला. तिचा डोळा वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची शर्थ केली, तिला उपचारांसाठी परदेशी घेऊन गेलो पण तिचा डोळा वाचला नाही. फार कमी लोकांना माहित होते पण पुढची अनेक वर्ष तिला फक्त एकाच डोळ्याने दिसत होते. त्यामुळे तिला दैनंदिन कामांत अनेक अडचणींचा सामना करावा लागे पण त्याचा परिणाम तिच्या कामावर झाला नाही'.
शेफ गृहिणी
शेफ हा पुरूष असतो आणि घरी स्वयंपाक करणारी बाई, असे एक चुकीचे पण समाजमान्य गृहितक तरलानी मोडून काढले.
हे करत असताना गृहिणी म्हणून आलेल्या अनुभवाचा त्यांना फायदा झाला. स्वयंपाकाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेतल्यानंतर पाककृतींचे सादरीकरण करणे आणि स्वयंपाकघरात प्रयोग करुन घरच्यांना खायला घालून त्यातून आलेल्या अनुभवांनंतर शिकवणे यातला हा फरक होता. म्हणून त्यांच्या पुस्तकांमध्ये जशी मेट्रिक मापं आहेत, तसेच वाटी-चमच्यांतही प्रमाण दिले आहे.
त्यांच्या पाककृतींच्या व्हिडिओंमध्येही त्या वारंवार हा पदार्थ करणे किती सोपे आहे आणि किती कमी वेळात तयार होऊ शकतो याचा आवर्जून उल्लेख करतात. स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला इतर अनेक कामे असतात, स्वयंपाक चांगला झाला पाहिजेच पण त्याच बरोबर तो लवकर आटोपला पाहिजे याची जाणीव त्यांना होती.
स्वयंपाक हा गृहिणींचा मुक्तमार्ग असू शकतो याची जाणीव त्यांना असावी. पारंपरिक घरात वावरताना, अनेक दडपणांखाली काम करताना स्वयंपाकातून मिळणारा निर्मितीचा आनंद त्यांनी अनेकींना मिळवून दिला. 2007 साली भारत सरकारतर्फे दिला गेलेला 'पद्मश्री' पुरस्कार त्यांच्या कामाचा उचित गौरव होता.

फोटो स्रोत, tarladalal.com
समाजातल्या सगळ्या स्तरातल्या, सगळ्या वयोगटातल्या लोकांबरोबर सहज संवाद करण्याची कला असल्याने त्यांची अनेकांशी मैत्री होत असे पण फार थोड्या लोकांना माहित आहे की, भारतातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये गणना होणाऱ्या कोकिलाबेन अंबानी आणि तरला दलाल यांची घनिष्ट मैत्री होती. तरला यांच्या भारत भ्रमंतीमध्ये अनेकवेळा कोकिलाबेन त्यांच्याबरोबर प्रवास करत. त्यांच्यातली मैत्री अनेक दशकं म्हणजे तरला यांच्या निधनापर्यंत कायम होती.
कोकिलाबेन यांनी तरलाना शिकवलेल्या फराळी इडली सांबर आणि फराळी दहीवडेसारख्या रेसिपी तरला दलालांच्या ब्लॅागवर आहेत.
तरला दलाल यांचा संचार इतका खोलवर झाला की तरला दलाल हा मोठा ब्रॅंड बनला. त्यांच्या निधनानंतरही तो सुरू आहे. त्यांचा मोठा मुलगा संजय दलाल युट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक सारख्या नव्या माधमांतून तो चालवतो. त्या 2013 साली गेल्या तरी त्यांच्या कंपनीचे शेफ नवनव्या पाककृती युट्यूबच्या माध्यमातून पोचवत आहेत.
माझ्या मते, तरला यांचे सगळ्यात महत्वाचे काम म्हणजे त्यांनी स्वयंपाक या आपल्या आयुष्यातल्या अतिशय महत्वाच्या पण त्याच बरोबर अतिशय अवडंबर केल्या गेलेल्या गोष्टीला इतके सुलभ केले की स्वयंपाक करणाऱ्याला स्वयंपाकाची भीती न वाटता तो करण्यात आनंद वाटू लागला. याचा अर्थ हा आनंद आधी मिळत नव्हता असे नाही, पण तो त्याची हातोटी असलेल्यांनाच मिळत होता, त्याचा आनंद आता इतरही घेऊ लागले.
नव्याने स्वयंपाकसिध्दीला सामोरे जाणाऱ्या व्यक्तीला जसे घरातली ज्येष्ठ आई आजी समजावून सांगते, नवनव्या क्लृप्त्या सांगते तशा तरला दलाल होत्या. त्यांच्या सर्वात लोकप्रिय पुस्तकाच्या, प्लेजर्स ऑफ व्हेजिटेरियन कुकिंगच्या प्रस्तावनेत त्यांनी गृहिणींच्या समस्यांचा विचार करुन पाककृतींची निवड करताना पुढील निकष लावले आहेत -
1) पाककृती साध्या हव्या. वर्षानुवर्षांच्या सरावानंतर ज्या गोष्टी जमतात त्यांचा विचार करण्यापेक्षा स्वयंपाकाचे किमान ज्ञान असलेल्या व्यक्तीला त्या करत्या याव्यात.
2) त्या लवकर, अगदी दहा मिनिटांत करता आल्या पाहिजेत.
3) त्या प्रत्येकवेळी त्याच चवीच्या झाल्या पाहिजेत.
4) त्यातले घटकपदार्थ फार महाग नकोत, ते सहज उपलब्ध झाले पाहिजेत'.
चार दशकांपूर्वी त्यांनी हे विचार गृहिणींसाठी मांडले होते. आज स्वयंपाक बऱ्याच प्रमाणात लिंगसापेक्ष राहिला नाही. ज्याला खायचे असेल त्याला रांधता आले पाहिजे हा विचार बऱ्यापैकी रुजतो आहे. तरला दलाल यांची स्वयंपाकाकडे बघण्याची दृष्टी इतकी प्रगल्भ असल्यामुळे ती आजच्या काळातही समर्पक ठरते हेच त्यांचे मोठेपण आहे.
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत आणि खाद्यसंस्कृती आणि सिनेमांवर नियमित स्तंभलेखन करतात.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








