नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा खटला कुठपर्यंत पोहोचलाय?

फोटो स्रोत, Facebook
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
महाराष्ट्रातल्या सामाजिक, विवेकवादी आणि अंधश्रद्धाविरोधी चळवळीत मोलाचं योगदान असणारे महत्त्वाचे कार्यकर्ते म्हणून नरेंद्र दाभोलकरांची ओळख होती. 1 नोव्हेंबर, नरेंद्र दाभोलकर यांची आज जयंती.
नऊ वर्षांपूर्वी, 20 ऑगस्ट 2013 रोजी, दाभोलकरांची पुण्यात भरदिवसा गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली.
दाभोलकर हत्येप्रकरणी तब्बल 8 वर्षांनी खटला सुरू झाला. कोर्टाने डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद काळस्कर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या 5 आरोपींवर दोषारोप निश्चित केले आहेत.
नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी महत्त्वाचे टप्पे कोणते? हत्येनंतरचा तपास आणि त्यात आतापर्यंत काय झालं? यावर एक नजर टाकूया...
20 ऑगस्ट 2013
20 ऑगस्ट 2013 ला पहाटे पुण्यात राज्याला हादरवून टाकणारी घटना घडली.
बालगंधर्व रंगमंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली. ते मॉर्निंग वॉकला गेले असताना जवळच दबा धरून बसलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. दाभोलकरांचा जगीच मृत्यू झाला.
दाभोलकरांवर फायरिंग केल्यानंतर दोन्ही संशयित आरोपी बाईकवरून पळून जाण्यात यशस्वी ठरले.
पुणे पोलिसांकडून तपास CBI
नरेंद्र दाभोलकरांच्या मृत्यूनंतर राज्यभरात आंदोलनं झाली. सामाजिक चळवळीतील हजारो कार्यकर्ते आणि सामान्य लोक रस्त्यावर उतरले.

फोटो स्रोत, Getty Images
दाभोलकरांची हत्या झाली त्यावेळी राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचं आघाडी सरकार होतं. पुणे पोलिसांनी चौकशी सुरू केली पण सरकारवर आरोपींचा छडा लावण्याचा दवाब वाढत होता.
पुणे पोलिसांचा तपास भरकटतानाच दिसून आला. पोलिसांनी मनिष नगौरी आणि विकास खंडेलवालला अटक केली होती. हत्येचा छडा लागल्याचा दावा करण्यात आला. पण त्यानंतर आरोपींचा प्रकरणाशी संबंध नसल्याचं आढळून आलं. पुणे पोलिसांनी या आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केलं नाही.
त्यानंतर पत्रकार केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. न्यायमूर्ती पी.व्ही.हरदास यांनी नरेंद्र दाभोलकर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला. मे 2014 मध्ये सीबीआयने नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी तपास हाती घेतला.
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी पहिली अटक
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर दोन वर्षांनी CBI ने पहिल्या आरोपीला अटक केली. तारीख होती 10 जून 2016. सीबीआयने हिंदू जनजागृती समिती या संघटनेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडेला पनवेलमधून अटक केली.

CBI ने तपास करून नाक-कान-घसा तज्ज्ञ (ENT Surgeon) असलेल्या डॉ. तावडेविरोधात 6 सप्टेंबर 2016 रोजी हत्या आणि हत्येचं षडयंत्र रचल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केलं. तपास यंत्रणेने दावा केला होता की, "डॉ. दाभोलकर आणि सनातन संस्थेमध्ये असलेल्या वैमनस्यातून ही हत्या करण्यात आली होती."
डॉ. दाभोलकरांवर फायरिंग करणारे संशयित आरोपी म्हणून CBI ने सनातन संस्थेशी संबंधित सारंग आकोलकर आणि विनय पवार यांना या आरोपी केलं होतं.
पण, तपासातील घोळ अजूनही कायम होता. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी हायकोर्टात दाखल याचिकेतील माहितीनुसार, "CBI ने सनातन संस्थेशी संबंधित सारंग आकोलकर आणि विनय पवार यांना दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपी म्हणून दाखवलं. पण 13 सप्टेंबर 2019 रोजी दाखल दोषारोपपत्रात त्यांची नावं वगळण्यात आली."
या याचिकेत हामीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, स्मिता पानसरे आणि मेघा पानसरे याचिकाकर्ते आहेत.
दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य शूटर्स कसे सापडले?
डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या कोणी झाडल्या? याचा छडा हत्येनंतर तब्बल 5 वर्षांनी लागला. तारीख होती 10 ऑगस्ट 2018.
महाराष्ट्र एटीएसने (दहशतवाद विरोधी पथक) मुंबई जवळच्या नालासोपारा परिसरातून वैभव राऊत आणि शरद कळसकर नावाच्या दोन व्यक्तींना अटक केली. त्यांच्याकडून 20 गावठी बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्याची साधनं ATS ने जप्त केली होती. शरद कळसकरची अटक दाभोलकर प्रकरणाच्या तपासात अत्यंत महत्त्वाचा सुगावा ठरला.
नाव न घेण्याच्या अटीवर एटीएसचे अधिकारी सांगतात, "चौकशी दरम्यान शरद कळसकरने डॉ. दाभोलकरांची हत्या केल्याचं कबूल केलं. यात त्याच्यासोबत सचिन अंदुरे होता अशी माहिती त्याने दिली."
शरद आणि सचिनने डॉ. दाभोलकरांचा बाईकवरून पाठलाग केला आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या."

फोटो स्रोत, Getty Images
शरद कळसकरकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास यंत्रणांनी औरंगाबादच्या सचिन अंदुरेला अटक केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी करण्यात आलेली ही तिसरी अटक.
वकील अभय नेवगी पानसरे प्रकरणी कोर्टात याचिकाकर्त्यांचे वकील आहेत. त्यांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, "महाराष्ट्र एटीएसने केलेल्या तपासानंतर दाभोलकरांच्या शूटर्सना अटक करण्यात आली."
पुणे कोर्टात दाखल दोषारोपपत्रात CBI ने शरद कळसकर आणि सचिन अंधुरेचा शूटर्स म्हणून उल्लेख केलाय. डॉ. वीरेंद्र तावडे, शरद कळसकर आणि सचिन अंधुरे अजूनही जेलमध्येच आहेच.
संजीव पुन्हाळेकर आणि विक्रम भावेचा काय रोल?
मे 2019 मध्ये सीबीआयने पेशाने वकील असलेले संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी अटक केली. संजीव पुनाळेकर यांनी वकील म्हणून जेलमध्ये असलेल्या सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांची विविध प्रकरणी कोर्टात बाजू मांडली होती.
CBI ने चार्जशीटमध्ये आरोप केलाय की, दाभोलकर हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या शरद कळसकरला गुन्ह्यात वापरलेली बंदूक नष्ट करण्याबाबत पुनाळेकर यांनी सल्ला दिला. त्यांच्याच सल्ल्यानुसार कळसकरने चार बंदूका ठाणे खाडीत फेकून दिल्या. विक्रम भावेवर शूटर्ससाठी परिसराची रेकी केल्याचा आरोप आहे.
कोर्टाने संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेची जामीनावर मुक्तता केली आहे.
नऊ वर्षांनंतर 5 आरोपींविरोधात दोषारोप निश्चित
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी तब्बल नऊ वर्षांनंतर कोर्टाने आरोपींविरोधात आरोप निश्चित केले. तारीख होती 15 सप्टेंबर 2021.
पुणे कोर्टाने दाभोलकर हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेले डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद काळस्कर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याविरोधात दोषारोप निश्चित केले.
डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद काळस्कर आणि विक्रम भावे यांच्यावर भारतीय दंडसंहिता (IPC) कलम 302 (हत्या), 120 (बी) (गुन्ह्याचा कट रचणे), 34 नुसार आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत आणि यूएपीए अंतर्गत आरोप निश्चित केले.

फोटो स्रोत, Getty Images
संजीव पुनाळेकरांविरोधात IPC कलम 201 (पुरावे नष्ट करणे किंवा खोट्या सूचना देणे) अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आला आहे.
हिंदुत्ववादी संघटना सनातन संस्थेशी संबंधित या पाचही आरोपींनी कोर्टात आपला गुन्हा कबूल करण्यास नकार दिला आहे. CBI ने दाभोलकर हत्या प्रकरणी 32 साक्षीदारांची लिस्ट खटल्यादरम्यान तपासणीसाठी कोर्टात सादर केली होती.
दाभोलकर खून खटला कुठपर्यंत पोहोचलाय?
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर आठ वर्षांनी 2021 मध्ये सीबीआयने अटक केलेल्या आरोपींविरोधात खटला सुरू करण्यात आला. सद्य स्थितीत पुण्याच्या विशेष कोर्टात हा खटला सुरू आहे. या खटल्यात सीबीआयकडून एकूण 32 साक्षीदार तपासले जाणार आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते मिलिंद देशमुख सांगतात, "महिन्यातून दोन दिवस हा खटला चालतोय. आतापर्यंत 12 साक्षीदार तपासून झालेत. प्रत्यक्षदर्शींची साक्षही नोंदवण्यात आलीये."
मार्च महिन्यात या खटल्यादरम्यान दाभोलकर प्रकरणातील एका प्रत्यक्षदर्शीने कोर्टात शरद कळसकर आणि सचिन अंधुरे यांना आरोपी म्हणून ओळखलं होतं. अंदुरे आणि कळसकर यांनी दाभोलकरांवर गोळीबार केला आणि ते तेथून फरार झाले अशी साक्ष प्रत्यक्षदर्शीने न्यायालयात दिली.
त्यावेळी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना CBI चे वकील प्रकाश सुर्यवंशी म्हणाले होते, "पुणे महापालिकेतील एक सफाई कर्मचारी दाभोलकरांचा खून झाला त्याठिकाणच्या जवळ उपस्थित होता. त्याने दोन लोकांना दाभोलकरांवर गोळ्या झाडून त्यानंतर शनिवार पेठ पोलीस चौकीच्या दिशेने चालत जाताना पााहिलं." पुणे पोलिसांची त्याचा जबाब नोंदवला होता.
नरेंद्र दाभोलकर खूनाप्रकरणी मुख्य षडयंत्र रचणारा अजूनही सापडलेला नाही. त्यामुळे हायकोर्टाच्या निगराणीखाली ही सुनावणी सुरू आहे. मिलिंद देशमुख पुढे म्हणाले, "5 आरोपींविरोधात खटला सुरू आहे."
जुलै महिन्यात दाभोलकर प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडे यांने हायकोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. पण, कोर्टाने साक्षीदारांचा तपास सुरू असल्याने जामीनावर सुनावणी करणार नाही. या खटल्याची सुनावणी लवकरात लवकर व्हावी याबाबत निर्देश दिले होते.
दाभोलकर प्रकरणातील प्रमुख आरोपी शरद कळसकरचे वकील प्रकार सालसिंगिकर बीबीसीशी बोलताना म्हणाले, "महिन्यातून दोन ते तीन तारखांना या खटल्याची सुनावणी होते. या प्रकरणी पहिल्यापासून प्रमुख आरोपी अनेकवेळा बदलले आहेत."
तपास यंत्रणांनी आधी नागोरी आणि खंडेलवाल यांना प्रमुख आरोपी म्हटलं. त्यानंतर सारंग आकोलकर आणि विनय पवार झाले. आणि आता आरोप शरद कळसकरवर ठेवण्यात आलाय. आम्ही याला कायदेशीर मार्गाने उत्तर देऊ."
दाभोलकर,पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्या प्रकरण साम्य आहे?
2013 मध्ये नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर फेब्रुवारी 2015 मध्ये गोविंद पानसरे आणि ऑगस्टमध्ये प्राध्यपक कलबुर्गी यांची हत्या झाली. 5 सप्टेंबर 2017 रोजी बंगळुरूमध्ये सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार गौरी लंकेश यांचा खून करण्यात आला.
काही दिवसांपूर्वी बॉम्बे मेघा पानसरेंच्या याचिकेवर सुनावणी करताना गोविंद पानसरे खून प्रकरणाचा तपास एटीएसकडे दिला आहे. हायकोर्टात याचिकाकर्त्यांचे वकील अभय नेवगी यांनी युक्तिवाद करताना म्हटलं होतं की, "या चारही हत्यांची उकल एटीएसने शरद कळसकर आणि सचिन अंधुरे या आरोपींना नालासोपारा बॉम्बस्फोट प्रकरणी अटक केल्यानंतर झाली." "पण हे फक्त मोहरे आहेत. यांच्यामागे असलेले मास्टरमाईंड आणि या आरोपींना विचारवंतांच्या हत्येचं षडयंत्र रचलं."
अभय नेवगी यांनी कोर्टात या चारही हत्यांमध्ये वापरण्यात आलेली बंदूक एकच असल्याचा दावा केला होता.
सप्टेंबर 2022 मध्ये नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे पुत्र हमीद दाभोलकर यांनी तपासयंत्रणांनी हा तपास गांभीर्याने घेतला नाही अशी टीका केली होती.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे गोविंद पानसरे प्रकरणातही प्रमुख आरोपी आहे. तर, पानसरे प्रकरणी अटकेत असलेल्या
अमोल काळेला कर्नाटक पोलिसांनी गौरी लंकेश प्रकरणात अटक केली होती. "डॉ. पानसरेंच्या हत्येच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन गावठी पिस्तूलांपैकी एकाचा वापर डॉ. दाभोलकर तर दुसऱ्याचा वापर प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी करण्यात आला," असा पोलिसांना संशय आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








