पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणाचा खटला कुठवर आला आहे?.

पवनराजे निंबाळकर हत्या
    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप आहे. पवनराजे निंबाळकरांची हत्या राजकीय वादातून झाल्याचा CBI चा दावा आहे.

पवनराजे निंबाळकर यांच्यामुळे पद्मसिंह पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला धोका असल्याने ही हत्या झाल्याचं CBI ने आरोपपत्रात म्हटलंय. या प्रकरणी CBI ने पद्मसिंह पाटील यांना 2009 मध्ये अटक केली होती. पद्मसिंह पाटील सध्या जामिनावर बाहेर आहेत.

पद्मसिंह पाटील यांचे वकील भूषण महाडिक म्हणतात, "पद्मसिंह पाटील यांना या प्रकरणी खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलंय." खटला सुरू असल्याने यावर अधिक काही बोलता येणार नाही.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून 2013 मध्ये निंबाळकर खून खटला अलिबागहून मुंबईला वर्ग करण्यात आला. मुंबईच्या सत्र न्यायलयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. पद्मसिंह पाटील यांना खटल्याच्या सुनावणीवेळी कोर्टात उपस्थित रहावं लागतं.

पवनराजे निंबाळकरांची हत्या

तारीख- 3 जून 2006

स्थळ- कळंबोली, नवी मुंबई .दुपारी 12 वाजताची वेळ होती.

कॉंग्रेसचे दिवंगत नेते पवनराजे निंबाळकर मुंबईला काही कामानिमित्त आले होते. काम संपवून ते पुण्याच्या दिशेने निघाले होते. वाटेत कळंबोली परिसरात त्यांना एका व्यक्तीला भेटायचं होतं. बार्शीतील जमिनीच्या व्यवहाराबद्दल चर्चा करण्यासाठी त्यांना बोलावण्यात आलं होतं.

पांढऱ्या रंगाच्या स्कोडा गाडीतून पवनराजे निंबाळकर कळंबोलीतील चाररस्ता, शिळफाटा परिसरात पोहोचले. या ठिकाणी भेटीचं ठिकाण ठरलेलं होतं. सीबीआयने कोर्टात दाखल आरोपपत्रानुसार, पवनराजेंचे मारेकरी आधीपासूनच पाळत ठेऊन होते.

पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील

निंबाळकर यांची गाडी पुढे गेल्यानंतर कथित मारेकऱ्यांनी गाडीला ओव्हरटेक केलं. ड्रायव्हरला थांबण्याचा इशारा करण्यात आला. मारेकऱ्यांनी गाडीजवळ जाऊन निंबाळकर यांची चौकशी केली. पवनराजे झोपले होते. ड्रायव्हरने उठवताच त्यांनी खिडकीच्या काचा खाली केल्या.

आणि या अज्ञात शूटर्सनी काही क्षणातच पवनराजे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पवनराजे यांच्या डोळ्याखाली जखमा झाल्या. ते तिथेच खाली पडले. ड्रायव्हर समद काझीदेखील जबर जखमी झाला होता.

CBI च्या आरोपपत्रानुसार मारेकरी गाडीतून पळून गेले. काही अंतरावर जाऊन त्यांनी बंदूक आणि इतर गोष्टी फेकून दिल्या. त्यानंतर पनवेलच्या बेलवली गावात त्यांनी वापरलेली इंडिका गाडी सोडून दिली.

कसा लागला पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा सुगावा?

पवनराजे हत्याकांडाचा तपास कळंबोली पोलिसांनी सुरू केला. पण या तपासावर निंबाळकर कुटुंबियांनी आक्षेप घेतला. पवनराजेंच्या कुटुंबियांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. कोर्टाने ऑक्टोबर 2008 मध्ये पवनराजे निंबाळकर हत्येचा तपास केंद्रीय तपास यंत्रणा CBI कडे सूपुर्द केला.

CBI ने तपास हाती घेतला. पण पवनराजे हत्या प्रकरणी काहीच सुगावा सापडत नव्हता. अचानक 2009 मध्ये मुंबई क्राइम ब्रांचच्या हाती एक मोठा पुरावा हाती लागला. खबऱ्याने एक व्यक्ती खूप 'मोठं काम' केल्याचं बोलतोय अशी खबर आणली.

क्राइम ब्रांचने पारसमल जैनला ताब्यात घेतलं. डोंबिवलीत रहाणारा जैन सोने व्यापारी होता. पण प्रचंड नुकसान झाल्यानंतर तो गुन्हेगारीकडे वळला. जैन आणि दिनेश तिवारीकडून पोलिसांनी बंदूक आणि गोळ्या जप्त केल्या. 25 फेब्रुवारी 2009 ला जैनला अटक करण्यात आली.

पवनराजे यांचे चिरंजीव ओमराजे निंबाळकर

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, पवनराजे यांचे चिरंजीव ओमराजे निंबाळकर

क्राइम ब्रांचचे अधिकारी नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, जैन चोरी केल्याची माहिती देत होता. पण, खबरी पोलिसांना सातत्याने 'मोठं काम' काय केलं हे विचारा असं सांगत होता. जैनला दरोड्याच्या दोन विविध गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.

त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत क्राइम ब्रांचचे तत्कालीन पोलीस सहआयुक्त राकेश मारिया म्हणाले होते, "चौकशी दरम्यान पारसमल जैनने पवनराजे हत्या प्रकरणाची माहिती दिली."

तीन वर्षांनंतर अखेर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा पहिला सुगावा तपास यंत्रणांच्या हाती लागला होता. पारसमल जैनला अटक करणारे तपास अधिकारी सांगतात, कळंबोली परिसरात भेटण्यासाठी फोन करणारा पारसमल जैन हाच होता.

राजकीय वैमनस्यातून झाली हत्या?

पवनराजे हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे होता. त्यामुळे मुंबई पोलिसांनी आरोपी सीबीआयकडे सुपूर्द केले.

CBI ने दोषारोपपत्रात म्हटल्याप्रमाणे, 2005 मध्ये पद्मसिंह पाटील, सतीष मंदादे आणि मोहन शुक्ला यांनी पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचं षड्यंत्र रचलं. पवनराजे निंबाळकर हे पद्मसिंह पाटील यांची राजकीय कारकिर्दि आणि अस्तित्वासाठी धोका बनू लागले होते.

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी सीबीआयने जून 2009 मध्ये पद्मसिंह पाटील यांना अटक केली. पाटील त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उस्मानाबाद मतदार संघाचे खासदार होते.

राजकीय जाणकार सांगतात, तेरणा साखर कारखान्याच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपानंतर पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यातील वितुष्ट टोकाला पोहोचलं होतं.

पद्मसिंह पाटील मुख्य आरोपी?

सीबीआयने कोर्टात दाखल चार्जशीटमध्ये पवनराजे यांच्या हत्येबाबत सविस्तर उल्लेख केलाय.

आरोपपत्रानुसार, जानेवारी 2005 मध्ये पारसमल जैन या प्रकरणातील सह आरोपी मोहन शुक्लाला आर्थिक मदतीसाठी भेटला. शुक्लाने जैनला पवनराजे निंबाळकर, पद्मसिंह पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाला कसा धोका आहेत याची माहिती दिली.

शुक्लाने जैनला लातूरच्या सतीष मंदादे यांना भेटण्यासाठी सांगितलं. मंदादे जैनला घेऊन पद्मसिंह पाटील यांच्या घरी गेले. आणि सुपारी दिल्याचं त्यांनी सांगितलं. हे काम झाल्यानंतर समाजसेवक अण्णा हजारे यांनाही मारायचं आहे असं जैनला सांगण्यात आलं.

पद्मसिंह पाटील आणि शरद पवार

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, पद्मसिंह पाटील आणि शरद पवार

मंदादे यांनी जैनला पवनराजे निंबाळकर यांचं घर आणि कामाचं ठिकाण दाखवलं. त्यानंतर जैनने निंबाळकरांवर पाळत ठेवली. पण हे काम एकट्याचं नाही असं त्याला कळलं. निंबाळकरांच्या हत्येची 30 लाख रूपयांची सुपारी देण्यात आली होती.

पारसमल जैनच्या सोबत आता छोटे पांडे, दिनेश तिवारी आणि पिंटू सिंह नावाचे शूटर्स होते. मे 2006 मध्ये हे चौघे लातूर आणि उस्मानाबादमध्ये निंबाळकर यांचा शोध घेत होते. पण, ते सापडले नाहीत.

त्यानंतर 3 जून 2006 रोजी, जैनने पब्लिक फोनवरून पवनराजेंना फोन केला. बार्शीतील जागेवर मंदिर बांधण्याची इच्छा आहे असं दाखवून त्याने निंबाळकरांना बोलावून घेतलं.

पवनराजे हत्या खटल्याची सद्यस्थिती काय?

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी मुंबईच्या सेशन्स कोर्टात सुरू आहे. या प्रकरणी 160 च्या आसपास साक्षीदार आहेत. या सुनावणीला 2011 मध्ये सुरूवात झाली.

सीबीआयने पद्मसिंह पाटील यांच्यावर षडयंत्र (120-B), हत्या (302) आणि आर्म्स कायद्यांतर्गत दोषारोपपत्र दाखल केलं होतं. पवनराजे हत्या प्रकरणातील एक आरोपी पारसमल जैन माफीचा साक्षीदार बनला आहे.

पवनराजे निंबाळकर यांचा मुलगा जयराजे निंबाळकर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "या खटल्यात पद्मसिंह पाटील यांच्या वकिलांकडून वेळकाढूपणा केला जातोय. खटल्याच्या तारखेला वकील विविध कारणं देऊ उपस्थित राहत नाहीत."

न्यायदान

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या 9-10 महिन्यांपासून पारसमल जैनची उलटतपासणी सुरू आहे. "पद्मसिंह पाटील यांच्या वकीलांकडून मुद्दाम टाळाटाळ केली जात असल्याचा संशय आम्हाला आहे."

याबाबत आम्ही पद्मसिंह पाटील यांच्या वकिलांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. वकील भूषण महाडिक म्हणाले, "पद्मसिंह पाटील यांनी पवनराजे यांना राजकारणात आणलं. आपल्या सख्ख्या भावापेक्षाही जास्त त्यांनी चुलत भाऊ पवनराजेंना प्रेम दिलं. त्यामुळे ते त्यांच्या खूनाचा विचार करू शकत नाहीत."

हा खटला अत्यंत नाजूक स्थितीत असल्यामुळे त्यांनी याबाबत जास्त बोलण्यास नकार दिला.

या प्रकरणी पद्मसिंह पाटील, सतीष मंदादे, मोहन शुक्ला, पारसमल जैन, छोटे पांडे, दिनेश तिवारी, पिंटू सिंह, कैलाश यादव आणि शशिकांत कुलकर्णी यांच्यावर खटला सुरू आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)