ठाकरे कुटुंबातील वाद काय आहेत? स्मिता ठाकरे आणि जयदेव ठाकरे 'मातोश्री'पासून कसे दुरावले?

फोटो स्रोत, ANI, GETTY
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर दावा केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातला संघर्ष आता आणखी तीव्र झालाय हे दसरा मेळाव्यांच्या निमित्ताने स्पष्ट झालं.
पण हा संघर्ष चिघळण्याचं आणखी एक कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांनी थेट ठाकरे कुटुंबातील वादात हात घातल्याचं जाणकार सांगतात.
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि उद्धव ठाकरे यांचे थोरले बंधू जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे आणि थोरले बंधू बिंदूमाधव ठाकरे यांचे पुत्र निहार ठाकरे यांनी हजेरी लावली. ठाकरे कुटुंबातील या सदस्यांना आपल्या बाजूने करण्यात एकनाथ शिंदे यांना यश आल्याचं यावेळी दिसलं. तर उद्धव ठाकरे यांना एकटं पाडण्यासाठी खेळली गेलेली ही खेळी होती असंही विश्लेषकांना वाटतं.
पण हे प्रकरण नेमकं काय आहे? ठाकरे कुटुंबातील हे वाद काय आहेत? जयदेव ठाकरे, बिंदू माधव ठाकरे आणि स्मिता ठाकरे हे उद्धव ठाकरे कुटुंबापासून कधी आणि कसे दुरावले? ठाकरे असूनही त्यांनी शिंदेंना पाठिंबा का दिला? असे काही प्रश्न आपल्या नक्कीच मनात येतील. त्यामुळे या बातमीत आपण ठाकरेंच्या घरातलं हे गुंतागुंतीचं राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
दसरा मेळाव्यात नेमकं काय घडलं?
दसरा मेळाव्याच्या सभेत ठाकरे कुटुंबातील तीन महत्त्वाचे सदस्य एकनाथ शिंदे यांना समर्थन देताना दिसले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दसरा मेळाव्यात या तीनही सदस्यांना व्यासपीठावरसुद्धा बोलवलं.

फोटो स्रोत, Getty Images
सुरुवातीला जयदेव ठाकरे यांना व्यासपीठावर बोलवण्यात आलं. यावेळी जयदेव ठाकरे म्हणाले, "एकनाथ हा माझ्या आवडीचा आहे. आता तर मुख्यमंत्री आहे त्यामुळे आता एकनाथराव बोलावं लागेल. पाच-सहा दिवस झाले मला फोन येतायत की तुम्ही शिंदे गटात गेलाय का? हा ठाकरे कोणाच्या गोठ्यात बांधला जात नाही. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिका चांगल्या आहेत. असा धडाडीचा माणूस महाराष्ट्राला हवा आहे. मी त्याच्या प्रेमासाठी आलो."
ते पुढे म्हणाले, "हा एकटा नाथ होऊ देऊ नका. ते जी काही कामं करत आहेत ती भल्यासाठी आहेत. माझं म्हणणं आहे की, हे सगळं बरखास्त करा, परत निवडणुका घ्या आणि शिंदे राज्य येऊ द्या."
शिवसेना कोणाची आणि बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा नेमकं कोण पुढे नेत आहे? यावर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात टोकाचा संघर्ष सुरू असताना ठाकरे कुटुंबातील या सदस्यांनी एकनाथ शिंदे यांना थेट पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

फोटो स्रोत, ANI
एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या उत्तराधिकारी म्हणून पाहिल्या गेलेल्या स्मिता ठाकरे यांचंही एकनाथ शिंदे यांनी व्यासपीठावर बोलावून स्वागत केलं.
यावेळी माध्यमांनी स्मिता ठाकरे यांना शिवसेनेतल्या फुटीमध्ये तुम्ही शिंदे गटाकडून आहात की ठाकरे गटाकडून? असं विचारलं असता त्या म्हणाल्या, 'मी राजकारणात नाहीये. मी समाजसेवा करते.' इतकंच म्हणून त्या निघून गेल्या.
बिंदूमाधव ठाकरे यांचा मुलगा निहार ठाकरे यांनीही शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यातही त्यांनी हजेरी लावली. इतकंच नाही तर शिवसेना कुणाची यावरून कोर्टामध्ये सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेतही ते शिंदे गटाच्या बाजूने काम करत आहेत.
'कुटुंबात किती कटुता आहे हे स्पष्ट दिसलं`
पण एक प्रश्न येतोच. तो म्हणजे, ठाकरे कुटुंबातील सदस्य आपल्याला समर्थन देत आहेत हे जाहीरपणे दाखवून एकनाथ शिंदे यांनी काय साध्य केलं? या प्रश्नाचं उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात, "ठाकरे आडनाव शिवसेनेशी जोडलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी ठाकरे आपल्यासोबत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न शिंदेंनी केला. दुसऱ्या बाजूला ठाकरे कुटुंबातील एवढे सदस्य उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाहीत. यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे कसे एकटे आहेत हे दाखवण्याचाही शिंदे यांचा हा प्रयत्न होता असे दिसते."

फोटो स्रोत, CMO
ठाकरे कुटुंबातील सदस्य एकनाथ शिंदेंनी बोलवलेल्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहतात आणि जाहीरपणे आपलं समर्थन शिंदेंना दाखवतात याचा अर्थ कुटुंबात किती तीव्र मतभेद झालेले आहेत हे स्पष्ट दिसतं असं ज्येष्ठ पत्रकार आणि ठाकरे कुटुंबाचं राजकारण जवळून कव्हर केलेले पत्रकार वैभव पुरंदरे सांगतात.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "या संपूर्ण घटनाक्रमावरून लक्षात येतं की ठाकरे कुटुंबात किती मतभेद आहेत. ठाकरे कुटुंबातील सदस्य जाहीरपणे शिंदेंना समर्थन देतात. ते सभेला हजेरी लावतात, तेही अशा परिस्थितीत जेव्हा उद्धव ठाकरेंसमोर आतापर्यंतचं सर्वात मोठं संकट आहे. त्यांची अस्तित्त्वाची लढाई आहे. यावरून हे स्पष्ट दिसतं की किती तीव्र मतभेद उद्धव ठाकरे आणि इतर ठाकरे कुटुंबियांमध्ये होते. ठाकरे कुटुंबातील सदस्यांमध्ये असलेली कटूता यानिमित्ताने समोर आली असंही म्हणावं लागेल."
यापूर्वीही हे चित्र एकदा दिसलं होतं असंही ते म्हणाले.
"दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर अंत्ययात्रा निघाली तेव्हा त्या ट्रकवर सुद्धा राज ठाकरे, जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे, निहार ठाकरे यांच्यापैकी कोणीही नव्हतं. आता तर जाहीरपणे सगळे शिंदेंची बाजू घेत आहेत. त्यामुळे कुटुंबातील वाद जगजाहीर झाला आहे," असं वैभव पुरंदरे सांगतात.
जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातले वाद
जयदेव ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे थोरले बंधू आहेत. त्यांनी खूप पूर्वीच 'मातोश्री' हे निवासस्थान सोडलं. ते वेगळे राहतात.
ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात, "बाळासाहेब ठाकरे यांचा थोरला मुलगा असल्याने अर्थात राजकीय वारसा आपल्याकडे येईल अशी त्यांची अपेक्षा असावी. पण तरीही बाळासाहेबांनी राजकीय वारसा उद्धव ठाकरेंकडे सोपवला. त्यामुळे जयदेव ठाकरेंना आपण राजकीय वारसदार असावं हे वाटणं स्वाभाविक होतं. मला वाटतं ही सल त्यांच्या मनात निश्चित असणार."

फोटो स्रोत, Getty Images
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन 17 नोव्हेंबर 2012 रोजी झालं. निधनानंतर संपत्तीवरून जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातला वाद उफाळून आला होता.
ज्येष्ठ पत्रकार वैभव पुरंदरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं आधीपासूनच पटत नव्हतं. त्यानंतर मालमत्तेवरून वाद झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मृत्यूपत्रावरून वाद झाले. जयदेव ठाकरे यांनी याबाबत न्यायालयात आव्हान दिलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती बरी नसताना उद्धव ठाकरेंकडून त्यांची दिशाभूल केली असा आरोप जयदेव ठाकरे यांनी केला होता. म्हणजे बाळासाहेबांना मॅनीप्यूलेट केल्याचा हा गंभीर आरोप होता. नंतर उद्धव ठाकरे यांनी आपलं नाव रेशनकार्डवरून काढून टाकण्यासाठी प्रयत्न केला असाही आरोप जयदेव ठाकरे यांनी केला. पण नंतर त्यांनी साधारण 2018 मध्ये ही याचिका मागे घेतली."
8 वर्षांपूर्वी झी 24 तास या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जयदेव ठाकरे म्हणाले होते, 'बाळासाहेब ठाकरे व्यथित होऊन गेले. त्यांनी सुख वाटलं पण दु:ख सोबत घेऊन गेले. मी यावर फार बोलू शकत नाही. माझ्याजवळ त्यांनी मन मोकळं केलं होतं पण मी आत्ता बोलू शकत नाही कारण बोललो तर त्यावरून प्रचंड मोठा गदारोळ होईल.'

फोटो स्रोत, Getty Images
कुटुंबाने एकत्र राहण्याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'आताच्या काळ हा कुटुंबांनी एकत्र राहण्याचा राहिला नाही. पूर्वी 100 लोक एकत्र रहायचे. आता तसं राहिलेलं नाही. पूर्वी भांड्याला भांडं लागत होतं असं म्हणायचे आता बांगडीला बांगडी लागते.' अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी झी 24 तास या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली होती.
बीबीसी मराठीने जयदेव ठाकरे यांना मुलाखतीसाठी विचारलं आहे. परंतु त्यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
स्मिता ठाकरे 'मातोश्री'पासून कशा दूरावल्या?
स्मिता ठाकरे यांची राजकीय महत्त्वाकांक्षा होती यावर यापूर्वी अनेकदा बोललं गेलं आहे. 'शिवसेनेची तोड-फोड संस्कृती' आपल्याला पटत नाही असंही त्यांनी यापूर्वी एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात, "1995 मध्ये युतीचं सरकार आल्यानंतर स्मिता ठाकरे राजकीय, सामाजिक वर्तुळात प्रभावशाली दिसत होत्या. त्या शिवसेनेचा ताबा घेतील की काय अशी परिस्थिती होती. पण नंतर सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरे यांच्याकडे गेल्यानंतर त्या यापासून दूर झाल्या. त्यांच्या मनात ही सल असावी की आपल्याकडे शिवसेनेची सूत्र येता येता राहिली."
लेखक वैभव पुरंदरे यांनी 'बाळ ठाकरे अँड द राईज ऑफ द शिवसेना' या पुस्तकात याबाबत उल्लेख केला आहे.
ते म्हणतात, "1999 साली शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर पक्षात अंतर्गत दोन गट दिसू लागले. एक गट राज ठाकरेंना बाळासाहेबांचा उत्तराधिकारी मानत होता आणि दुसरा गट उद्धव ठाकरेंना. या दोघांव्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती शिवसेनेची धुरा हाती घेण्याच्या स्पर्धेत होती. ती व्यक्ती म्हणजे स्मिता ठाकरे."
वैभव पुरंदरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाआधी ते निवृत्तीच्या दिशेने जात होते. ते थकले होते. त्यावेळी 'मातोश्री'वर तीन सत्ताकेंद्र निर्माण झाली होती. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि स्मिता ठाकरे. राज ठाकरे त्यावेळी वेगळे राहत होते. पण स्मिता ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच घरात राहत होते. त्यामुळेही घरातच वाद सुरू झाले."

फोटो स्रोत, Getty Images
'मातोश्री'वरील स्थितीबाबत पत्रकार धवल कुलकर्णी त्यांच्या 'द कझीन्स ठाकरे' पुस्तकात शिवसेनेच्या एका नेत्याच्या हवाल्यानं विश्लेषण नोंदवतात. ते म्हणतात, "मीनाताईंच्या निधनानंतर ठाकरे कुटुंबात बऱ्याच गोष्टी गुंतागुंतीच्या झाल्या होत्या. मीनाताई गेल्यामुळे कुटंबात एकप्रकारचं रिकामेपण आलं होतं आणि ते भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि स्मिता ठाकरे प्रयत्न करत होते."
स्मिता ठाकरे यांना राज्यसभेची खासदारकी हवी होती. त्यांनी आज तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तसं स्पष्ट म्हटलंही होतं. मात्र, बाळासाहेबांना ते आश्वासन पूर्ण करता आलं नसल्यानं आपण काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं होतं. त्यामुळे स्मिता ठाकरे उद्धव ठाकरेंपासून दुरावल्या गेल्या याचं राजकीय महत्त्वाकांक्षा हेही कारण असू शकतं असं जाणकार सांगतात.
बीबीसी मराठीने स्मिता ठाकरे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांना मुलाखतीसाठीही विचारणा केली आहे. परंतु अद्याप त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
'कुटुंबाने एकत्र यायला हवं पण..."
बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे नातू आणि जयदेव ठाकरे यांचे थोरले पुत्र जयदीप ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना आपलं समर्थन जाहीर केलं आहे.
यंदा शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातही ते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांना आपला पाठिंबा आहे असं जयदीप ठाकरे यांनी म्हटलंय.
बीबीसी मराठीशी बोलताना जयदीप ठाकरे म्हणाले, "मी ठाकरे घराण्यातला सर्वात मोठा नातू आहे. मला बाळासाहेब ठाकरे, उद्धव काका आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आदर आहे. मला वाटतं यावेळी सर्व कुटुंबाने एकत्र असायलं हवं. पण तसं नाहीय. आता याचं कारण तुम्ही त्यांनाच विचारा. पण मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे आणि म्हणून मी दसरा मेळाव्याला गेलो होतो."
" बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष मोठा केला. खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे," असंही ते म्हणाले.
तुम्ही सक्रिय राजकारणात प्रवेश करत आहात का? या प्रश्नाचं उत्तर देताना जयदीप ठाकरे म्हणाले, "अजून तरी मी राजकारणात प्रवेश केलेला नाही. पण मला तशी संधी दिली तर मी नक्की पक्षासाठी काम करेन."
जयदीप यांचे वडील जयदेव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिलीय. पण तुमची भूमिका मात्र वेगळी आहे. याविषयी बोलताना ते सांगतात, "एका घरात दोन वेगळ्या भूमिका आणि मतं असू शकतात. मी ब-याच काळापासून माझ्या वडिलांच्या संपर्कात नाही. मला माझ्या आईनेच मोठं केलंय."
बिंदूमाधव ठाकरे यांचं अकाली निधन
बिंदूमाधव ठाकरे यांच्याशी उद्धव ठाकरेंचा काही मोठा वाद होता असं म्हणता येणार नाही कारण त्यांचं अकाली निधन झाल्यानंतर त्यांचं कुटुंब मातोश्रीपासून दुरावलं असं जाणकार सांगतात.

फोटो स्रोत, TWITTER/NIHAR THACKERAY
बिंदूमाधव ठाकरे यांच्याविषयी बोलताना वैभव पुरंदरे सांगतात, "ते फिल्म प्रोडक्शन करत होते. 1996 मध्ये त्यांचा अकाली मृत्यू झाला होता. मग त्यानंतर त्यांचं कुटुंब 'मातोश्री' हे ठाकरेंचं निवासस्थान सोडून बाहेर पडलं."
आणि आता बिंदूमाधव ठाकरे यांचे पुत्र निहार ठाकरे यांनी जाहीरपणे शिंदे गटाला पाठिंबा दिलाय.
बिंदूमाधव ठाकरे यांच्या कुटुंबाने त्यांच्या निधनानंतर राजकारणापासून दूर राहण्याचा किंवा एकंदरीतच ग्लॅमरपासून आणि त्यासंबंधी येणाऱ्या वादांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असं ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात.

फोटो स्रोत, FACEBOOK
ठाकरेंच्या घरातलं आणखी एक नाव म्हणजे राज ठाकरे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातला सत्तासंघर्षही महाराष्ट्रानं जवळून पाहिलाय. ठाकरे कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना उघड पाठिंबा दिलेला नाही. पण तरीही एकनाथ शिंदेंनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी घेतलेली भेटही ठाकरेंच्या कौटुंबिक समिकरणाविषयी अनेक गोष्टी सांगून जाते.
ठाकरे म्हणजे शिवसेना असं समीकरण देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात आत्तापर्यंत तरी पक्क होतं. पण आता याला आव्हान देण्यात आलं आहे. या राजकीय संघर्षात आता ठाकरे कुटुंबातील वादही चव्हाट्यावर आलेत. ठाकरे कुटुंबातील सदस्यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान देणाऱ्या एकनाथ शिंदेंना साथ दिल्याने सध्या राजकारणतही या अंतर्गत वादाची चर्चा होतेय. आणि त्यामुळेच खरी शिवसेना नेमकी कुणाची उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची यावर ठाकरे कुटुंबातील या राजकीय गणितांचा कसा परिणाम होतो हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








