के. चंद्रशेखर राव यांचा पक्ष राष्ट्रीय राजकारणात जागा निर्माण करेल का?

- Author, जिंका नागाराजू
- Role, बीबीसी तेलुगूसाठी
तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा केली आहे. तेलंगण राष्ट्र समितीच्याऐवजी आता त्यांचा पक्ष 'भारत राष्ट्र समिती' नावाने ओळखला जाईल.
परंतु सध्याच्या स्थितीत ते राष्ट्रीय राजकारणात स्वतःची जागा तयार करू शकतात का? हाच मोठा प्रश्न आहे.
तेलंगणच्या प्रादेशिक ओळखी पलिकडे जाऊन ते दुसऱ्या राज्यांमधील लोकांचा पाठिंबा मिळवू शकतात का आणि देशाच्या सध्या राजकीय स्थितीत त्यांच्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून संधी तरी आहे का?
गेल्या बऱ्याच काळात भारतात नव्या राष्ट्रीय राजकीय पक्षाची स्थापना झाली आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर फक्त एकाच राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाली, तो म्हणजे भारतीय जनता पार्टी.
अर्थात अनेक प्रादेशिक पक्ष नावापुढे ऑल इंडिया असं लिहितात हा भाग वेगळा. उदाहरण द्यायचं झालं तर ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, ऑल इंडिया एडीएमके, एआयएमआयएम, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक वगैरे वगैरे... पण यातला कुठलाही पक्ष हा राष्ट्रीय पक्ष नाही.
कम्युनिस्ट पक्षांचा जनाधार वेगाने कमी होतोय त्यामुळे त्यांच्यासमोर आपला राष्ट्रीय दर्जा गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय पक्षाचे मापदंड काय आहेत?
सध्याच्या काळात आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात सरकार स्थापन करणारा आम आदमी पक्ष हा पहिलाच प्रादेशिक पक्ष आहे.
सध्याच्या स्थितीत काँग्रेस आणि भाजपा या दोनच पक्षांची अखिल भारतात उपस्थिती आहे. काँग्रेसची स्थापना 1885 साली तर भाजपाची स्थापना 1980 साली झाली.

फोटो स्रोत, FACEBOOK/ARVIND KEJRIWAL
गेल्या काही दशकांमध्ये अनेक राजकीय पक्षांचा उदय झाला, परंतु काही काळानंतर त्यांचा प्रभाव कमी होत गेला.
यामध्ये समाजवादी पार्टी, मुस्लीम लीग, वेगवेगळे डावे पक्ष, वेगवेगळे शेतकरी पक्ष यांचा समावेश आहे. जनसंघाचाही यात उल्लेख करता येईल.
जर निवडणुकांचा विचार केला तर पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांत म्हणजे 1952 साली राष्ट्रीय राजकीय पक्षांची संख्या 14 होती, 2019 च्या निवडणुकांपर्यंत ती 7 वर आली.
2019 नंतर ईशान्य भारतातील नॅशनल पिपल्स पार्टीला राष्ट्रीय दर्जा मिळाला. हा दर्जा निवडणूक आयोगाद्वारे ठरवलेल्या मापदंडांना पूर्ण केल्यावर मिळतो. परंतु याचा अर्थ त्यांचा राष्ट्रीय स्तरावर प्रभाव असेलच असं नाही.

फोटो स्रोत, FACEBOOK/NARENDRA MODI
आपल्या मूळ राज्याशिवाय किमान 4 राज्यांत काही जागा जिंकल्यावरच निवडणूक आयोग हा दर्जा देतो. स्वतःला राष्ट्रीय घोषित केलं म्हणून कोणताही पक्ष राष्ट्रीय होत नाही, त्यासाठी निवडणूक आयोगाच्या अटी पूर्ण कराव्याच लागतात.
प्रादेशिक पक्षांचं युग
आपल्या देशात 1952 पासून प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहेत. 1952 च्या सार्वत्रिक निवडणुकीत देशात 19 प्रादेशिक पक्ष होते. अर्थात देशात प्रादेशिक पक्षांची भरभराट 1984 नंतरच पाहायला मिळाली.
1984 साली काँग्रेसने आपलं शेवटचं स्वबळावरचं सरकार स्थापन केलं होतं.
1989 पासून 2014 पर्यंत आघाड्यांच्या सरकारांचा काळ होता. 2014 साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने स्वबळावर बहुमत मिळवलं. अर्थात तरीही भाजपानं अनेक प्रादेशिक पक्षांशी आपली आघाडी कायम ठेवली आणि स्वतःचा जनाधारही वाढवत नेला.
2019 मध्ये त्यांना पूर्वीपेक्षाही जास्त समर्थन मिळालं. काँग्रेस पार्टीच्या कामगिरीमध्ये मात्र वेगाने घट पाहायला मिळाली.

फोटो स्रोत, FACEBOOK/KCR
म्हणजेच एका राष्ट्रीय पक्षाचा प्रभाव कमी होत असताना आणखी एका राष्ट्रीय पक्षाची जागा आहे, हे स्पष्ट आहे. त्यामुळे केसीआर यांचे प्रयत्न हे फक्त स्वप्नवत म्हणता येणार नाही. परंतु ते ती जागा भरू शकतात की नाही ही गोष्ट वेगळी.
केसीआर स्वतःची जागा तयार करतील का?
जिथं जिथं काँग्रेस क्षीण झाली तिथं भाजपा किंवा एखाद्या प्रादेशिक पक्षानं जागा पटकावलीय.
आंध्र प्रदेशात काँग्रेस कमकुवत झाल्यावर ती जागा भाजपा भरू शकलेली नाही.
तिथं प्रादेशिक पक्ष वायएसआर काँग्रेसनं जागा मिळवली आणि वाय एस जगनमोहन रेड्डी तिथले मुख्यमंत्री झाले.
त्या राज्यातून काँग्रेस साफ बाहेर पडली आहे आणि भाजपाही तिथं प्रवेश करू शकली नाही. अशा स्थितीत केसीआर तिथं यश मिळवू शकतात का?

फोटो स्रोत, FACEBOOK/YS JAGAN MOHAN REDDY
तेलंगण, तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल अशा राज्यात काँग्रेस किंवा भाजपा दोघेही मजबूत नाहीत.
या राज्यांत प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षांना प्रवेश करू दिलेला नाही.
त्यामुळे नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी राव यांना इतर प्रादेशिक पक्षांशी दोन हात करावे लागतील हे स्पष्टच आहे.
आता राष्ट्रीय पक्ष बनण्याची घोषणा केल्यावर ते तेलंगणबाहेर काही प्रभाव पाडू शकतात का हे तपासून पाहावं लागण्याचं हेच कारण आहे.
आंध्र प्रदेशात काय स्थिती आहे?
आंध्र प्रदेशातील सध्याचं राजकीय अवकाश पाहिलं तर तिथं फक्त वायएसआर काँग्रेस आणि तेलगू देसम पार्टी असताना तिसऱ्या पक्षाला जागा नाही.
भाजपासुद्धा तिथं स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या स्थितीत नाही. तिथं भाजपाला दोघांपैकी एका राजकीय पक्षाशी जुळवून घ्यावं लागेल.
हिच स्थिती अभिनेता पवन कल्याणच्या जनसेना पक्षाची आहे. एक दशक जुना असलेल्या या पक्षाची स्थिती अजूनही चांगली नाही.

फोटो स्रोत, FACEBOOK/TRSPARTYONLINE
या परिस्थितीत केसीआर यांच्या पक्षाचं या राज्यात काय भवितव्य असेल यावर राज्यशास्त्राचे निवृत्त व्याख्याते ए. चंद्रशेखर सांगतात, "हे अत्यंत कठीण असेल. आजच्या स्थितीत आंध्र प्रदेशात कोणत्याही राष्ट्रीय पक्षाचा प्रभाव नाही. काँग्रेसही नाही आणि भाजपाही नाही. त्यामुळे नवा राजकीय पक्ष इथं कसा जागा मिळवू शकेल?"
रायलसीमा विद्यावनतुला वेदिकाचे संयोजक एम. पुरुषोत्तम रेड्डी सांगतात, केसीआऱ यांचा राष्ट्रीय पक्ष म्हणजे केवळ घोषणेपुरतीच गोष्ट आहे. त्याचं लक्ष्य आजही फक्त तेलंगणच आहे. ते राष्ट्रीय पक्षाचं बिरुद लावून तेलंगणमध्ये राजकीय फायदा घेऊ पाहात आहेत. सध्या त्यांना तिथं भाजपाद्वारे आव्हान दिलं जातंय. ही त्यांची रणनीती आहे, आंध्रप्रदेशात त्यांना काहीही साध्य होणार नाही.
रेड्डी यांच्यामते, केसीआर आंध्र प्रदेशात अप्रियही आहेत. लोक त्यांना तेलंगणवाले केसीआर म्हणून ओळखतात.
तेलंगणमध्ये काय प्रभाव पडणार?
केसीआर यांच्या राष्ट्रीय पक्ष घोषणेवर तेलंगणमधील लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिलीय.
त्यांचे समर्थक केसीआर यांना मोदींना पर्याय असल्यासारखं दाखवत आहेत तर काही लोक याला नाटक म्हणत आहेत.

फोटो स्रोत, FACEBOOK/RAHUL GANDHI
तेलंगण सरकारचे सल्लागार आणि राजकीय विश्लेषक टंकासाला अशोक म्हणतात, "अनेक आघाड्यांवर काँग्रेसने देशाला निराश केलंय. भाजपा देश आणि समाजाला नष्ट करतोय. अशा स्थितीत देशाला वाचवण्यासाठी नव्या अजेंड्याची गरज आहे. केसीआर नव्या अजेंड्यासह आले आहेत. त्यांनी अजून घोषणापत्र जाहीर केलेलं नाही, पण देशाचा विकास हाच त्यांचा अजेंडा असल्याचं त्यांनी अनेकदा सांगितलं आहे."
इतकंच नाही तर अशोक यांनी, जसं राष्ट्र निर्माणाचं स्वप्न नेहरुंनी पाहिलं होतं, तसंच स्वप्न आज केसीआर पाहात असल्याचं सांगितलं.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव के. नारायणा यांनी केसीआऱ यांच्या घोषणेचं स्वागत केलं आणि एक इशाराही दिला.
ते म्हणतात, "केसीआर यांनी भाजपाशी लढण्यासाठी राष्ट्रीय पक्षाची घोषणा केलीय. त्याचं स्वागत आहे. भाजपा देशातील प्रत्येक संस्थेला संपवत आहे. दुसरे पक्षही भाजपाविरोधात लढत आहेत, त्यांच्या लढाईला धक्का बसणार नाही याचं भान केसीआर यांनी ठेवावं."
राजकीय विश्लेषक तेलकापल्ली रवी सांगतात, "केसीआर राज्याची पुढची निवडणूक राष्ट्रीय राजकारणाच्या नावाखाली लढवू पाहत आहेत. निवडणूक स्थानिक असेल, घोषणा मात्र राष्ट्रीय असतील. केसीआर यांचा कोणताही राष्ट्रीय अजेंडा नाही. भाजपापासून असलेल्या धोक्याची त्यांना जाणिव झालीय. त्यामुळेच त्यांनी आगामी निवडणुकांसाठी ही रणनिती तयार केली आहे."
तेलकापल्ली रवी यांच्यामते चरणसिंह, मोरारजी देसाई, व्ही. पी. सिंह, देवोगौडासुद्धा मुख्यमंत्री झाल्यावर नंतर पंतप्रधान झाले. पण त्या मांदियाळीत केसीआर येऊ शकतील का याबद्दल शंका आहे.

फोटो स्रोत, Getty Images
तेलंगण काँग्रेसचे नेते डॉ. मालू रवी सांगतात, केसीआर यांचे हे प्रयत्न भाजपाविरोधात लढत असलेल्या आघाडीला कमकुवत करणारे आहेत.
तेलंगणच्या ओळखीमधून बाहेर पडतील का?
के. चंद्रशेखर राव यांची सर्वोच्च ओळख तेलंगणचे नेते हीच आहे. त्यांना तेलंगणचे राजकीय पर्याय म्हणून पाहिलं गेलंय.
अशी ओळख असलेल्या व्यक्तीला दुसऱ्या राज्यातल्या लोकांचा पाठिंबा मिळेल का? तेलंगणवाली ओळख त्यांच्या मार्गात अडथळा बनेल का?
उस्मानिया विद्यापिठाचे राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक के. श्रीनिवासुलू सांगतात, "नरेंद्र मोदी यांची ओळख आधी गुजराती नेता अशी होती. मात्र भाजपासारख्या पक्षामुळे ते एका रात्रीत राष्ट्रीय नेते झाले. मोदी यांनी राष्ट्रीय राजकारणात आपला कोणताही पक्ष स्थापन केला नाही. मोदी एका भक्कम पक्षाच्या आधारावर आपल्या गुजराती ओळखीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. केसीआर जर राष्ट्रीय नेते होऊ पाहात आहेत तर त्यांना आपली प्रादेशिक ओळख मागे सोडून जावं लागेल."

फोटो स्रोत, Getty Images
हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक ई. वेंकटेसू सांगतात, "केसीआर यांना तेलंगणच्या ओळखीतून बाहेर पडणं सोपं नसेल. तेलंगणशी जोडलेली ओळख कायम ठेवत ते राष्ट्रीय नेते होऊ पाहात असतील त्यांनी भाजपाविरोधात पक्ष तयार करण्यापेक्षा भाजपाविरोधी आघाडीत सामिल होणं योग्य ठरलं असतं."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








