प्रमोद महाजनांना आलेला 'तो' शेवटचा मेसेज हत्येचा संकेत होता का?

प्रमोद महाजन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रमोद महाजन
    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

22 एप्रिल 2006 चा दिवस उजाडला एका गोळीबाराच्या सुन्न करणाऱ्या घटनेनं. संपूर्ण भारताला हादरवणारा हा गोळीबार झाला दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू इमारतीत. कारण या गोळीबारात जखमी झाले होते भाजपचे नेते प्रमोद महाजन.

गोळीबाराच्या घटनेनंतर रक्तानं माखलेल्या अवस्थेतील प्रमोद महाजनांना हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं 13 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यावर त्यांनी 3 मे 2006 रोजी अखेरचा श्वास घेतला.

प्रमोद महाजनांच्या हत्येनं हादरा बसण्याचं आणखी एक कारण म्हणजे मारेकरी. कारण ही हत्या कुणी दुसऱ्यानं नाही, तर त्यांच्याच सख्ख्या भावानं म्हणजे प्रवीण महाजन यांनीच केली होती.

या हत्येमागचं कारण काय होतं, कोर्टात काय घडलं, प्रवीण महाजनांनी प्रमोद महाजनांना मोबाईलवर शेवटचा केलेला 'तो' मेसेज काय होता, अशा साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण या हत्येच्या गोष्टीतून जाणून घेणार आहोत.

हत्येच्या दिवशी नेमकं काय झालं होतं?

दिवस होता 22 एप्रिल 2006.

वार - शनिवार

वेळ - सकाळचे 7.30 वाजले होते.

भाजप नेते प्रमोद महाजन मंबईतील वरळी परिसरातल्या 'पूर्णा' निवासस्थानी होते. हातात वर्तमानपत्र आणि समोर चहाचा कप. समोरच्या टीव्हीवर बातम्या सुरू होत्या. महाजन कुटुंबीयांसाठी ही सकाळ सामान्य दिवसाप्रमाणेच होती.

प्रमोद महाजनांचा दिवस नेहमीसारखाच होता. कुठल्याही राजकीय भेटीगाठी ठरल्या नव्हत्या. त्यामुळे प्रमोद महाजन दिवसाची नेहमीप्रमाणे सुरुवात करण्याच्या तयारीत होते आणि तेवढ्यात दरवाज्यावरची बेल वाजली. त्यांचे छोटे बंधू प्रवीण महाजन समोर उभे होते.

प्रमोद महाजन, भाजप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रमोद महाजन

जीन्स आणि टी-शर्ट घातलेले प्रवीण महाजन आत आले. बहुधा प्रमोद महाजन यांना याची कल्पना नसावी. कारण प्रवीण महाजन फारसे प्रमोद महाजन यांच्या घरी येत नसत. प्रमोद महाजनांनी विचारलं, "तू इथे कसा?"

प्रवीण महाजन सोफ्यावर बसले. आणि त्यांनी तक्रारीचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. प्रमोद महाजन त्यांना वेळ देत नाहीत. व्यापारात मदत करत नाहीत, अशी त्यांची प्रामुख्याने तक्रार होती.

त्यानंतर दोन्ही भावात काही काळ चर्चा झाली आणि अचानक 7.40 च्या सुमारास 10 मिनिटांपूर्वी मोठ्या भावाला भेटण्यासाठी आलेल्या प्रवीण महाजनांनी आपल्याकडचं 32 बोअरचं पिस्तूल बाहेर काढली आणि प्रमोद महाजनांवर पॉईंट ब्लँक रेंजवरून गोळ्या झाडल्या. प्रमोद महाजनांच्या छातीच्या खाली तीन गोळ्या लागल्या.

मुंबई पोलिसांनी त्यावेळी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, "प्रवीण महाजन चौथी गोळी फायर करण्यासाठी सरसावले. पण पिस्तूल जॅम झालं. त्यामुळे त्यांना पुढे फायरिंग करता आलं नाही. त्यांच्या पिस्तुलात नऊ गोळ्या होत्या."

'पूर्णा' इमारतीत एकच हाहाःकार उडाला आणि धावपळ सुरू झाली. प्रमोद महाजनांच्या पत्नी रेखा महाजन यांनी मदतीसाठी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडेंच्या घरी धाव घेतली. मुंडे याच इमारतीत 12 व्या मजल्यावर राहात होते. मुंडे धावत महाजन यांच्या घरी पोहोचले.

गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते. दोघांची राजकारणातील सुरुवात एकत्र झाली. शिवाय, गोपीनाथ मुंडेंच्या पत्नी प्रज्ञा मुंडे या प्रमोद महाजनांच्या भगिनी.

प्रमोद महाजन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गोपीनाथ मुंडे, प्रज्ञा मुंडे आणि प्रकाश महाजन

त्या दिवशी काय झालं होतं, याबाबत प्रमोद महाजन यांच्या पत्नी रेखा महाजन यांनी कोर्टात साक्ष दिली होती. त्यात त्या म्हणाल्या होत्या, "मी बेडरुममध्ये असताना गोळ्यांचा आवाज ऐकला. मी बाहेर आले. प्रवीण महाजनांना पिस्तुलातून प्रमोद महाजन यांच्यावर गोळ्या झाडताना पाहिलं."

"मी ओरडले. प्रवीण तू हे काय केलंस. मी त्यांना ढकलण्याचा प्रयत्न केला. पण प्रवीणने मला ढकलून दिलं आणि म्हटलं की, तुम्ही माझं ऐकलं नाही, आता भोगा," असं रेखा महाजन यांनी कोर्टाला सांगितलं होतं.

भावावर गोळ्या झाडून प्रवीण महाजन थेट पोलीस ठाण्यात गेले...

प्रमोद महाजनांवर गोळ्या झाडल्यानंतर प्रवीण महाजन घराबाहेर पडले. कोणाशी काहीच न बोलता, 15 मजले जिन्याने उतरत खाली आले. गाडी पार्किंगमध्येच सोडली आणि टॅक्सीने पोलीस स्टेशनकडे निघाले.

सकाळचे 8.30 वाजले असतील. नाईट शिफ्टवर असलेले वरळी पोलीस स्टेशनचे कर्मचारी ड्युटी संपवून घरी जाण्याच्या तयारीत होते. तेवढ्यातच हातात पिस्तूल घेऊन प्रवीण महाजन शांतपणे चालत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यांनी पिस्तुलासह आत्मसमर्पण केलं.

"मी प्रमोद महाजनांवर गोळ्या झाडल्यात," असं त्यांनी थेट पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं.

ड्युटीवरील पोलिसांचा विश्वासच बसला नाही. कारण प्रवीण महाजन कोणालाच फारसे माहित नव्हते. प्रवीण महाजन यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी प्रमोद महाजनांच्या घरी धाव घेतली.

प्रवीण महाजन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रवीण महाजन

प्रमोद महाजन गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ सुरू झाली. गोपीनाथ मुंडेंनी त्याच इमारतीत रहाणारे डॉ. विजय बंग यांना फोन केला.

इंडिया टुडेशी बोलताना डॉ. बंग म्हणाले होते, "मी पोहोचलो तेव्हा महाजनांनाा खुर्चीवर बसवलं होतं. त्यांचा रक्तदाब खूप कमी झाला होता. शरीरात अंतर्गत रक्तस्राव सुरू झाला असावा."

गोपीनाथ मुंडे आणि रेखा महाजन यांनी प्रमोद महाजनांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर प्रमोद महाजनांवर तातडीनं उपचार सुरू झाले.

कोर्टात साक्ष देताना रेखा महाजन पुढे म्हणाल्या होत्या, "रुग्णालयात नेताना प्रमोद महाजन शुद्धीवर होते. ते गोपीनाथ मुंडे यांना म्हणाले, मी असं काय केलं होतं, की प्रवीणने माझ्यावर गोळ्या झाडल्या."

इथे वरळी पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ IPS अधिकारी पोहोचण्यास सुरूवात झाली. पोलिसांनी प्रवीण महाजन यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा केला होता. तर वरळी पोलीस स्टेशनला छावणीचं स्वरूप आलं होतं. पोलीस स्टेशनबाहेर मोठ्या संख्येने रिपोर्टर आणि चॅनलच्या ओबी व्हॅन पोहोचल्या होत्या.

प्रवीण महाजन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रवीण महाजन

हे सगळं एकीकडे सुरू असताना, तिकडे मुंबईतील प्रसिद्ध हिंदुजा रुग्णालयात प्रमोद महाजन मृत्यूशी झुंज देत होते. 13 दिवस मृत्यूला चकवा दिला, मात्र अखेर ते हरले. 3 मे 2006 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

तिकडे प्रवीण महाजनांना अटक करून कोर्टात प्रकरण पोहोचलं होतं.

कोर्टात काय झालं?

प्रवीण महाजनांना अटक करून मध्य मुंबईतील भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी प्रवीण महाजन यांच्याविरोधात सेशन्स कोर्टात आरोपपत्र दाखल केलं.

मुंबई सेशन्स कोर्टाने 2007 मध्ये प्रवीण महाजन यांना प्रमोद महाजन हत्याप्रकरणी दोषी ठरवलं. त्यांना जन्मठेप सुनावण्यात आली. वरिष्ठ वकील उज्वल निकम प्रमोद महाजन खटल्यात विशेष सरकारी वकील होते. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "प्रवीण महाजन यांच्या मनात नेमकं काय होतं. हे कधीच कळू शकलं नाही."

प्रमोद महाजन खटल्याच्या सुनावणीचा काही भाग इन-कॅमेरा करण्यात आला होता. प्रमोद महाजन यांच्या चारित्र्यावर आरोप केल्यामुळे हा खटला इन-कॅमेरा करण्यात आला होता.

14 दिवसांच्या फर्लोवर बाहेर आल्यानंतर प्रवीण महाजन यांनी काही प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली होती. डीएनएच्या मुलाखतीत त्यांना तुम्ही प्रमोद महाजन यांची हत्या का केली? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

प्रवीण महाजन

फोटो स्रोत, Huw Evans picture agency

फोटो कॅप्शन, प्रवीण महाजन

या मुलाखतीत प्रवीण महाजन म्हणाले होते, "मी प्रमोदला मारलं नाही. हे घडलं. तुम्ही यावर विश्वास ठेऊ शकाल? मी याचा विचार करत नाही. तुम्हाला वाटेल की, ही घटना पुन्हा माझ्यासमोर येत राहील. पण मी याचा विचार करत नाही."

"काही गोष्टी न समजण्यापलीकडे असतात. हे सर्व फक्त 15 मिनिटात घडलं. माझ्या अनेक गोष्टी लक्षात आहेत. फक्त 22 एप्रिल 2006 चा दिवसच का? मला सर्व आठवतंय."

प्रवीण महाजन आणि प्रमोद महाजन यांच्यात नेमकं काय झालं? हे कधीच पुढे आलं नाही.

मात्र, प्रमोद महाजनांवर गोळ्या झाडण्याच्या सहा दिवस आधी, 15 एप्रिलला प्रवीण महाजनांनी प्रमोद महाजनांना एक मेसेज पाठवला होता - "अब याचना नहीं, रण होगा. जीवन विजय के साथ या फिर मरण होगा."

भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी सेशन्स कोर्टात दिलेल्या साक्षीत या मेसेजबाबत माहिती दिली होती.

प्रवीण महाजनांचा मृत्यू

प्रवीण महाजन यांना 18 डिसेंबर 2007 रोजी मुंबई सेशन्स कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांना नाशिक सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आलं.

प्रवीण महाजन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रवीण महाजन

27 नोव्हेंबर 2009 रोजी त्यांना 14 दिवसांची फर्लोची रजा देण्यात आली. ही रजा संपण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 11 डिसेंबर 2009 रोजी त्यांना डोकेदुखी आणि रक्तदाबाच्या त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना त्याच रात्री ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी नेण्यात आले. तिथे त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला आणि ते कोमात गेले.

दोन-अडीच महिने प्रवीण महाजन कोमातच होते. अखेर उपचारादरम्यानच त्यांचा 3 मार्च 2010 रोजी मृत्यू झाला.

हत्येचं कारण कधीच समोर आलं नाही...

भावाच्या म्हणजे प्रमोद महाजनांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर नाशिक जेलमध्ये प्रवीण महाजन यांनी 'माझा अल्बम' नावाचं एक पुस्तक लिहिलं. हे पुस्तक वादाचा विषय बनलं होतं.

प्रमोद महाजन, भाजप

फोटो स्रोत, Getty Images

प्रवीण महाजन यांच्या पुस्तकातील काही भाग वर्तमानपत्रातही छापण्यात आला होता. त्यात ते असं म्हणाले होते, 'हे सर्व कसं घडलं. आणि कोणी केलं. हे लोकांना कधीच कळणार नाही.'

झालंही तसंच. प्रमोद महाजनांच्या हत्येचं कारण कधीच समोर आलं नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)