फॉक्सकॉन-वेदांता : राज ठाकरेंचा एकनाथ शिंदे सरकारला सवाल, प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?' #5मोठ्याबातम्या

एकनाथ शिंदे राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images/facebook

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. 'फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?'

फॉक्सकॉन-वेदांता कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातला हलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर विरोधकांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.

या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्या ट्विटर खात्यावरून ट्वीट करून राज ठाकरे म्हणाले, "फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक 1 लाख 58 हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?"

"हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं," असंही राज ठाकरे म्हणाले. ही बातमी एबीपी माझाने दिली.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

संबंधित प्रकल्प महाराष्ट्रात होण्यासाठी नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती देऊ केल्या होत्या. परंतु गेल्या दोन वर्षांत त्याला जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, तो कमी पडला असावा, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

2. 'मूर्तीपूजा मान्य असेल तरच दांडिया प्रवेश,' मध्य प्रदेशमधील नियमाने नवा वाद

"ज्या मुस्लीम युवक युवतींना दांडिया खेळायचा आहे, त्यांनी मूर्तीपूजा मान्य करावी," असा नियम मध्य प्रदेश सरकारने आणल्यानंतर या प्रकरणावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधीक छायाचित्र

मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवलं आहे.

"ज्या मुस्लीम युवक युवतींना दांडिया खेळायचा आहे, त्यांनी मूर्तीपूजा मान्य करावी. शिवाय, येताना त्यांनी आपल्या कुटुंबातील महिलांनाही सोबत आणावं, तुमचं स्वागतच होईल," असंही उषा ठाकूर यांनी पत्रात म्हटलं.

हिंदू संघटनांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. तर अनेकांनी सरकारची भूमिका म्हणजे धार्मिक द्वेष पसरवण्याचं कारस्थान असल्याचं म्हटलं आहे. ही बातमी झी 24 तासने दिली.

3. शिवसेनेत 'महाराष्ट्र न्यायिक विधी सेना' शाखेची स्थापना

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (13 सप्टेंबर) महाराष्ट्र न्यायिक विधी सेना शाखेची स्थापना करण्यात आली.

ही संघटना म्हणजे शिवसेनेची वकील संघटना असेल. या माध्यमातून पक्षाचं न्यायालयीन कामकाजही पाहिलं जाणार आहे, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, facebook

मंगळवारी राज्यातील 100 ते 150 वकिलांनी मुंबईतील शिवसेना भवन मध्यवर्ती कार्यालयात उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

शिवसेना पक्षासोबत आम्हाला काम करण्याची इच्छा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

याच पार्श्वभूमीवर 'महाराष्ट्र न्यायिक विधी सेना' स्थापन करण्यात आली आहे. पक्षाच्या न्यायालयीन कामकाजासोबतच संघटनेमार्फत गरजू नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना कायदेशीर मदत दिली जाईल, असं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली.

4. संसदेच्या नव्या इमारतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची मागणी

केंद्रातील महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत बनवण्यात येत असलेल्या नव्या संसदेच्या इमारतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याची मागणी AIMIM पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.

असदुद्दीन ओवैसी

फोटो स्रोत, Twitter

संसद सभागृह हे संविधानानुसार चालते. त्यामुळे नव्या संसद भवनाचं नाव हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरूनच असावे, असं ओवैसी म्हणाले. ही बातमी प्रभात खबरने दिली.

5. स्वप्नं विकणारे गुजरातमध्ये सत्ता स्थापन करू शकणार नाहीत - अमित शाह

"गुजरातमध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करेल. स्वप्ने विकणाऱ्यांना गुजरात निवडणुकीत कधीच यश मिळणार नाही," असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी केलं आहे.

गुजरातमध्ये आयोजित एका कार्यक्रमाप्रसंगी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अमित शाह बोलत होते. यावेळी शाह यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं.

ते म्हणाले, "गुजराती जनता काम करणाऱ्यांवर विश्वास ठेवते. त्यामुळे गुजरातमध्ये भाजपचाच दणदणीत विजय होईल." ही बातमी लोकमतने दिली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)