मानाचे गणपती : कोणत्या गणपती मंडळाचा मान कितवा हे कसं ठरलं?

- Author, मानसी देशपांडे
- Role, बीबीसी मराठीसाठी, पुण्याहून
संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहात साजरा केलाच जातो. पण पुण्यातला गणेशोत्सवामध्ये काही वेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. त्यातलीच एक म्हणजे मानाच्या पाच गणपतींची परंपरा.
1893 सालापासून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा त्यामागे होती. पण स्वातंत्र्य मिळेपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा समाजात रुजली होती आणि स्वातंत्र्यानंतरही या सणाचा उत्साह आणि चैतन्य कायम राहिला.
यामध्ये काळानुरुप काही बदल निश्चितच झाले. पण 125 पेक्षा जास्त वर्षं उलटल्यावरही मानाच्या पाच गणपतींची परंपरा पुण्यात तितक्याच बारकाईने पाळली जाते.
ही पद्धत सुरु कशी झाली, मानाच्या गणपतींच्या पाच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा इतिहास काय आहे, हे आपण जाणून घेऊया.
1893 साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाल्यानंतर गणपती मंडळांची संख्या वाढत गेली. असं सांगितलं जातं की दुसऱ्याच वर्षी गणपती मंडळांची संख्या 100 वर गेली होती.
त्यामुळे विसर्जन मिरवणुकीचं नियोजन आणि त्याची रुपरेषा कशी असावी यावर चर्चा सुरु झाली. कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत मानलं जातं. कसबा गणपतीचं मंदिर हे शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे.
ग्रामदैवत म्हणून कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीला मानाचा पहिला गणपती हा मान देण्यात आला. या मंडळाच्या सार्वजनिक गणपतीला विसर्जनाचा पहिला मान देण्याचं लोकमान्य टिळक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरवलं. म्हणून मग आजही कसबा गणपती हा विसर्जन मिरवणुकीत पहिला असतो.
त्यानंतर मानाच्या दुसऱ्या गणपतीचं स्थान हे पुण्याची ग्रामदेवी मानल्या जाणाऱ्या तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या सार्वजनिक गणेशोत्सवातील गणपतीला मिळाला.
हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानल्या जाणार गुरुजी तालिम गणपतीला मानाचा तिसरा म्हणून तर तुळशीबाग मंडळाच्या गणपतीला मानाचं चौथं स्थान मिळालं. यानंतर स्वतः लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या केसरीवाडा गणपती हा मानाचा पाचवा गणपती मानला जातो.
पुण्यात मुख्य विसर्जन मिरवणुकीची सुरुवात महात्मा फुले मंडईमधून होते. नंतर ती लक्ष्मी रस्त्यावरून पुढे जाते. मुठा नदीच्या पात्रात गणपती विसर्जन होतं.
दरवर्षी मिरवणुक सुमारे 25 ते 30 तास चालते. मिरवणुकीतल्या गणपती रथांसमोर, ढोल ताशा पथकांचं वादन, विविध कला सादर करणारे पथकं असतात.
विसर्जन मिरवणुकीतल्या या पहिल्या पाच गणपती मंडळांविषयी अधिक जाणून घेऊया
कसबा गणपती मंडळ
पुण्यातल्या कसबा पेठेत मध्ययुगीन गणपतीचं मंदिर आहे. या गणपतीला पुण्याचं ग्रामदैवतही मानलं जातं. कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात 1893 साली झाली.

फोटो स्रोत, Kasaba Ganapati Facebook Page
या सार्वजनिक गणपती मुर्तीची स्थापना सुरुवातीचे काही वर्षं कसबा गणपतीच्या मंदिरातच व्हायची.
1925 पर्यंत ही व्यवस्था होती. यानंतर मंदिरासमोरच्या वाड्यात हा गणपती बसवला जाऊ लागला. या गणपतीसमोर मेळे, मोठ्या गायकांचे जलसे होत असत.
आताही कसबा सार्वजनिक गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. पुरातन मंदिरं, ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती बनवून सजावट केली जाते.
तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ
तांबडी जोगेश्वरी देवी ही पुण्याची ग्रामदैवता मानली जाते. बुधवार पेठेत, आप्पा बळवंत चौकाजवळ हे मंदिर आहे. तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात 1893 साली झाली. हा मानाचा दुसरा गणपती आहे.

देवाच्या मंदिराच्या बाजूलाच मांडव घालून गणपतीची स्थापना केली जाते. गणेशोत्सवादरम्यान मंडळाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.
गुरुजी तालीम गणपती मंडळ
गुरुजी तालीम मगणपती मंडळ हे पुण्यातलं सगळ्यांत जुनं मंडळ असल्याचं सांगितलं जातं. या मंडळाची स्थापना 1887 साली झाली. हा गणपती हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून ओळखला जातो.
भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवाले, शेख कासम वल्लाद यांच्या प्रेरणेतून या मंडळाची स्थापना झाली.

पुण्यात असलेल्या एका तालमीमध्ये हा गणपती बसवण्याची सुरुवात झाली होती. आता ही तालिम अस्तित्त्वात नाही. आता लक्ष्मी रोड जवळच्या गणपती चौकात हा गणपती बसवला जातो. या गणपती मंडळाची सजावट हा दरवर्षी औत्सुक्याचा विषय असतो.
तुळशीबाग गणपती मंडळ
पुण्यातली तुळशीबाग शॉपिंग साठी प्रसिद्ध आहे. तुळशीबागेत ऐतिहासिक असं रामाचंही मंदिर आहे. मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती.
या गणपतीची स्थापना 1901 साली करण्यात आली. तुळशीबाग ही पुण्यातली एक महत्त्वाची बाजारपेठ राहीली आहे. तुळशीबागेतल्या मोक्याच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी हा गणपती बसवला जातो.
केसरीवाडा गणपती मंडळ
या गणपती उत्सवाची सुरुवात स्वतः लोकमान्य टिळकांनी केली. केसरीवाड्यात हा उत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवादरम्यान केसरीवाड्याच्या आवारात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.
त्यात व्याख्यानं, सांस्कृतिक कार्यक्रम अशा कार्यक्रमांची रेलचेल असते. भव्य सजावट किंवा मोठे देखावे यापेक्षा या मंडळाकडून अशा कार्यक्रमांवर भर दिला जातो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








