चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, आशीष शेलार मुंबई भाजपाचे अध्यक्ष

फोटो स्रोत, Facebook/Chandrashekhar Bawankule
चंद्रशेखर बावनकुळे आता भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमले गेले आहेत. याआधी चंद्रकांत पाटील हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते.
याबरोबरच मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी आशीष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी या निवडीचं पत्रक प्रसिद्ध केलं आहे.
कामगार नेते ते ऊर्जामंत्री...
स्थानिक पत्रकार प्रवीण मुधोळकर यांचं विश्लेषण :
"राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रवासही खडतर आहे. सुरवातीला कोराडी ते नागपूर या मार्गावर बावनकुळे रिक्षा चालवायचे. त्यानंतर कोराडी मधील कोराडी महाऔष्णिक विद्युत केंद्रातील लहान मोठे कंत्राट घेऊन त्यांनी कंत्राटदार म्हणून काम सुरु केले.
"औष्णिक वीज केंद्रात कंत्राटदार म्हणून काम करतांना प्रकल्पातील कंत्राटी कामगारांचे प्रश्न ते उचलू लागले. पुढे त्यांनी स्वतःची ओळख कोराडी औष्णिक वीज केंद्रातील कामगार नेते म्हणून तयार केली.
"कामगार आंदोलनातूनच त्यांना नितीन गडकरी यांच्यासाखे मार्गदर्शक लाभले आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. बावनकुळे राजकारणात जेव्हा नवखे होते तेव्हा महाराष्ट्रात भाजपचं एवढं प्रस्थ नव्हतं. पण तरी ही त्यांनी गडकरींच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात केली.
"दरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणूका लागल्या. बावनकुळेंना भाजपने उमेदवारी दिली. त्यांनीही संधीच सोनं केलं आणि ते निवडून आले. त्यावेळी जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता होती. ही निवडणूक त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली. जिल्हा परिषदेतील सर्वाधिक सक्रिय सदस्य म्हणून अल्पावधीतच त्यांना प्रसिद्धी मिळाली.
"पुढे जेव्हा विधानसभेच्या निवडणूका लागल्या तेव्हा कामठी विधानसभा मतदारसंघासाठी इतर पक्षांकडून रिंगणात तगडे उमेदवार देण्यात आले होते. काँग्रेसने दिग्गज नेते मुकुल वासनिक यांना उमेदवारी दिली. तर तत्कालीन आमदार व राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत बहुजन रिपब्लिकन एकता मंच नावाचा पक्ष स्थापन करून निवडणुकीत उडी घेतली.
"भाजपकडे फारसे तगडे उमेदवार नव्हते. तेव्हा बड्या नेत्यांच्या लढाईत बावनकुळे यांना भाजपने उतरवले. त्यावेळी बावनकुळेंना डमी उमेदवार म्हणून हिणवलं गेलं मात्र त्यांनीच विजयाचं निशाण रोवलं. तेव्हापासून त्यांनी सलग तीन निवडणुका जिंकल्या.भाजपची सत्ता येताच मंत्रिपदाचा कुठलाही अनुभव नसताना त्यांना ऊर्जा खात्याचे कॅबिनेट मंत्री करण्यात आलं."
आशीष शेलार यांच्याबद्दल
आशीष शेलार सलग दोन टर्म आमदार असून त्यांनी याआधी 7 वर्षे मुंबई भाजपाचे अध्यक्षपद भूषवले आहे.

फोटो स्रोत, TWITTER/Ashish shelar
अभाविप, मुंबई सचिव,भाजपा, युवा मोर्चा, मुंबई अध्यक्ष, भाजपा महअधिवेशन कायर्कारिणी सदस्य (कोअर टीम), मुंबई महानगरपालिकेत दोन वेळा नगरसेवक, खार पश्चिम, भाजपा उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष, मुंबई महानगरपालिकेत भाजपा नगरसेवकांचे गटनेते, सुधार समितीचे अध्यक्षपद भूषवले, सदस्य एमएमआरडीए, मुंबई मेट्रो हेरीटेज सोसायटीचे गव्हर्नर, वांद्रे सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सल्लागार, क्षत्रिय गडकरी मराठा महासंघाचे महाराष्ट्र समाज संस्थेमध्ये सक्रिय अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








