संजय राऊत : स्वप्ना पाटकर व्हायरल ऑडिओ क्लीप प्रकरण काय आहे?

संजय राऊत

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मानसी देशपांडे
    • Role, बीबीसी मराठीसाठी, पुण्याहून

रविवारी (31 जुलै) रात्री उशिरा अंमलबजावणी संचलनालयानं (ईडी) शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांना अटक केली आणि आज (1 ऑगस्ट) कोर्टानं राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे.

एकीकडे पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांवर कारवाई झाली असताना, दुसरीकडे संजय राऊत यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंही ते अडचणीत आलेत. या ऑडिओ क्लिपप्रकरणी राऊतांविरोधात वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

स्वप्ना पाटकर यांच्या तक्रारीनंतर 31 जुलै रोजी वाकोला पोलिसांनी कलम 504, 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार स्वप्ना पाटकर यांनी जबाबात म्हटलंय की, 'संजय राऊत यांनी मला अश्लिल शिवीगाळ केली.'

व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप 70 सेकंदांची असून, ही ऑडिओ क्लिप 22 नोव्हेंबर 2016 रोजीची आहे आणि या प्रकरणात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

2016 च्या ऑडिओ क्लिपची तक्रार आता का नोंदवली?

2016 च्या ऑडिओ क्लिपची तक्रार इतक्या उशिरा का देण्यात आली हे विचारल्यावर स्वप्ना पाटकर यांच्या वकील अॅड. आभा सिंग यांनी सांगितलं की, "या प्रकरणी आधीही तक्रार देण्यात आली होती पण पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही."

अॅड. आभा सिंग यांनी पुढे सांगितलं की, "रविवारी (31 जुलै रोजी) वाकोला पोलिसांनी ज्या प्रकरणात एफआयआर केली, ती तक्रार आम्ही खरंतर दीड दोन वर्ष आधीच केली होती. पण तेव्हा संजय राऊत सत्तेत होते. पोलिस त्यांना घाबरुन होते. त्यामुळे त्यांनी तक्रार दाखलच करुन घेतली नाही. ही जुनी तक्रार आहे. पण आता पोलिसांनी ती दाखल करुन घेतली. आम्ही राष्ट्रीय महिला आयोगातही तक्रार दिली होती. तक्रार देण्यात उशीर झाला असं काही नाही."

संजय राऊत

फोटो स्रोत, Getty Images

"इतके दिवस पोलिसांकडे तक्रार होती. पण ते एफआयआर करुन घेत नव्हते. यावरुन हेच दिसतं की पोलीस हे राजकीय प्रभावाखाली होते. आता सरकार बदललंय तर एफआयर करुन घेतली. यावरुन दिसतं की पोलीस हे राजकीय प्रभावाखालीच काम करतात. असं व्हायला नको. पोलिसांनी स्वतंत्रपणे काम करायला हवं. आता एफआयआर झाला. पण ज्या व्यक्तीच्याविरोधात झालाय तो आता जेलमध्ये आहे. जेव्हा ते बाहेर येतील तेव्हा या केसमध्ये सुद्धा कारवाई झाली पाहिजे," असंही आभा सिंग यांनी सांगतिलं.

अॅड. आभा सिंग यांनी दिलेल्या माहीतीनुसार, "स्वप्ना पाटकर यांना आधी पोलिस संरक्षण होतं. जे अटक झाल्यावर काढलं गेलं. त्यानंतर मागच्या 8 दिवसांपासून त्यांना परत पोलिस संरक्षण दिलं गेलंय."

या प्रकरणी शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "त्याचा तसा संदर्भ घेण्यात काही अर्थ नाही. त्यांची ती घरगुती भांडणं आहेत. त्या भांडणामध्ये समोरची व्यक्ती हसतेय. एवढं बोललं तर रागवत नाही. याचा अर्थ चिडवण्याचा प्रकार होताना दिसतोय आणि ते चिडलेत. इथपर्यंत बरोबर आहे. या ईडीचा आणि त्याचा तसा काही संबंध असेल असं मला वाटत नाही. शासकीय यंत्रणांचा जो सुळसुळाट झालाय तो मात्र यांच्या राजकीय दबावाला बळी न पडणाऱ्या लोकांवर होतोय हे स्पष्ट आहे."

स्वप्ना पाटकर कोण आहेत?

वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणाऱ्या स्वप्ना पाटकर यांचं पूर्ण नाव स्वप्ना सुजित पाटकर असं आहे. त्यांचं वय 40 वर्षे आहे.

स्वप्ना पाटकर यांनी सामनामध्ये लेखन केलेलं आहे. तसंच, चित्रपट निर्माती म्हणूनही त्यांना काम केलेलं आहे. मराठी अस्मिता हा विषय केंद्रस्थानी ठेवून बनवलेल्या आणि 2015 मध्ये रिलीज झालेल्या 'बाळकडू' या चित्रपटाच्या त्या निर्मात्या होत्या.

मराठी अस्मिता हा विषय केंद्रस्थानी ठेवून बनवलेल्या आणि 2015 मध्ये रिलीज झालेल्या 'बाळकडू' या चित्रपटाच्या स्वप्ना पाटकर निर्मात्या होत्या.

फोटो स्रोत, Royal Maratha Entertainment

पोलिसांना दिलेल्या जबाबात स्वप्ना पाटकर यांनी सांगतिलं आहे की, त्या सायकॉलॉजिस्ट असून त्यांचं मुंबईतील कलिना भागात काउंसिलींग सेंटर होतं. पण ते सध्या बंद असून त्या घरीच असतात. त्यांची आणि संजय राऊत यांची ओळख कशी झाली हे सुद्धा त्यांनी जबाबात सांगितलंय.

2007 पासून सामना वृत्तपत्रामध्ये त्यांचं सदर सुरु झालं आणि त्यादरम्यान संजय राऊत यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर संजय राऊत यांच्याशी त्यांच्या कुटुंबाचेही घनिष्ट संबंध झाले आणि ते दोघंही फोनद्वारे तसंच प्रत्यक्षरित्या एकमेकांसोबत संपर्कात होते असं पाटकर यांनी पोलिस जबाबात म्हटलंय.

20 नोव्हेंबर 2016 रोजी संजय राऊत यांच्या सोबत सामनाच्या ऑफिसमध्ये प्रत्यक्ष वाद झाल्याचं स्वप्ना पाटकर यांना नोंदवलंय.

नंतर 22 नोव्हेंबरला 2016 रोजी संजय राऊत यांनी फोनवरुन अश्लिल शिविगाळ केली आणि तो कॉल आयफोनमध्ये रेकॉर्ड केल्याचं स्वप्ना पाटकर यांनी जबाबात म्हटलंय.

स्वप्ना पाटकर खोट्या डिग्रीप्रकरणी होत्या तुरुंगात

2021 साली स्वप्ना पाटकर यांना खोट्या डिग्रीप्रकरणात बांद्रा पोलिसांकडून अटक झाली होती. या प्रकरणात त्यांना जवळपास 52 दिवस जेलमध्ये राहावं लागलं होतं.

क्लिनिकल सायकॉलॉजीच्या खोट्या पीएचडी डीग्रीचा वापर करुन एका रुग्णालयात 2 वर्षे काम केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

संजय राऊत

फोटो स्रोत, Getty Images

स्वप्ना पाटकर यांच्या वकील अॅड. आभा सिंग यांच्या माहितीनुसार, "52 दिवसांनी तिला हायकोर्टमधून जामीन मिळाला. बांद्रा सेशन्स कोर्टाने तिला जामीन नाकारल्यानंतर हायकोर्टाने जामीन दिला. तेव्हा कोविड पसरलेला होता. बांद्रा पोलिस हे पूर्णपणे संजय राऊतांच्या प्रभावाखाली होते. जामीन मिळण्यालायक ते प्रकरण होतं. नंतर हायकोर्टानेपण मान्य केलं की कलम 467 लावणं हे अयोग्य होतं. ते कलम कोर्टाने हटवलं. जामीन मिलण्यालायक गुन्ह्यांत तिला तुरुंगात डांबलं गेलं.

"त्या आधी आम्ही हायकोर्टात एक याचिकापण दाखल केली होती की, संजय राऊत तिच्यावर पाळत ठेवून आहेत आणि पाळतीसंदर्भातल्या केसेसचा स्थानिक पोलिस तपास करत नाहीयेत. पण हायकोर्टाने सांगतिलं की तुम्ही आमच्याकडे का आलात? खालच्या कोर्टात जा. मग आम्ही परत खालच्या कोर्टात आलो," असं स्वप्ना पाटकरच्या वकील आभा सिंग यांनी सांगितलं. स्वप्ना पाटकर यांनाही बीबीसी मराठीने संपर्क केला. पण त्यांनी रिप्लाय दिला नाही."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)