नीरज चोप्रासाठी 'हे' ठरलं सर्वांत मोठं आव्हान...

नीरज चोप्रा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नीरज चोप्रा
    • Author, मनोज चतुर्वेदी,
    • Role, बीबीसी हिंदीसाठी.

टोकियो ऑलिम्पिक गाजवणाऱ्या नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक पटकावलं आहे. आणि हे रौप्य पदक पटकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलाय.

त्याने ओरगॉनमध्ये (अमेरिका) सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरुष भालाफेकीत 88.13 मीटर लांब भाला फेकून रौप्यपदकावर आपलं नाव कोरलंय.

यापूर्वी या स्पर्धेत भारताच्या लॉन्ग जंपर अंजू बॉबी जॉर्ज यांनी कांस्यपदक जिंकलं होतं. 2003 पॅरिस चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी हे कांस्यपदक जिंकलं होतं.

वर्षभरापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये अनपेक्षित कामगिरी करून सुवर्णपदक पटकवणाऱ्या नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकून देशाचं नाव भलेही उंचावलं असेल. पण जो आनंद त्याच्या चेहऱ्यावर टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यावर होता तो यावेळी दिसला नाही.

नीरज चोप्रा

फोटो स्रोत, Getty Images

या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स जेव्हा त्याचं अभिनंदन करायला गेला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला नाही. कदाचित सुवर्णपदक हुकल्यामुळे तो नाराज असावा.

टोकियोपेक्षा चांगली कामगिरी

नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.53 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकलं होतं. या स्पर्धेत त्याने पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी केली. पण तरीही तो अँडरसन पीटर्सला आव्हान देताना दिसला नाही. पीटर्सने 90 मीटरच्या पुढे जातं सुवर्णपदक आपल्या नावावर केलं.

अँडरसन पीटर्सने 2019 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावलं होतं. दुखापतीमुळे नीरज या स्पर्धेत सहभागी होऊ शकला नव्हता. झेक प्रजासत्ताकच्या वेल्डाचने या स्पर्धेत कांस्यपदक मिळवलं.

नीरजने भालाफेक स्पर्धेच्या पात्रता फेरीत 88.29 मीटर भालाफेक करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. मात्र पात्रता फेरीत त्याने जी कामगिरी केली ती त्याला अंतिम फेरीत करता आली नाही. नीरज चोप्राच्या बाबतीत असं म्हटलं जातं की, तो पहिल्या आणि दुसऱ्या प्रयत्नातच सर्वोत्तम कामगिरी करतो.

नीरज चोप्रा

फोटो स्रोत, Getty Images

मात्र या स्पर्धेत अंतिम फेरीत त्याला यश मिळवता आलं नाही. पहिल्या थ्रोवर तर तो फाऊल झाला आणि दुसऱ्या थ्रोमध्ये तो फक्त 82.39 मीटर भालाफेक करू शकला. नीरजने तिसऱ्या प्रयत्नात 86.37 मीटर भालाफेक करून टॉप ब्रॅकेटमध्ये प्रवेश मिळवला.

पुढे चौथ्या प्रयत्नात त्याने 88.13 मीटर भालाफेक करत रौप्यपदकाची निश्चिती केली. पण अँडरसन पीटर्सला धोबीपछाड देण्यासाठी त्याने जे दोन प्रयत्न केले त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. त्याचे दोन्ही प्रयत्न फसले. यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.

90 मीटरचा अडथळा

90 मीटरचा अडथळा पार करण्याचं नीरज चोप्राचं स्वप्न आहे. त्याने ज्या पद्धतीने या सीजनची सुरुवात केली होती त्यावरून तरी तो 90 मीटर पार करू शकेल असं वाटत होतं. त्याने स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये 89.94 मीटर भालाफेक केली होती. आणि त्याला फक्त सहा सेंटीमीटर पर्यंतच अंतर कापायचं होतं. पण या चॅम्पियनशिपमध्ये त्याला हे अंतर गाठणंही कठीण झालं.

असं म्हटलं जातं की भालाफेक करताना शक्ती आणि वेग यांचं संतुलन राखावं लागतं. आणि यातूनच परिणाम साध्य होतो. काहीवेळा ते संतुलन ठेवणं कठीण होतं. या खेळात खेळाडूवर असलेल्या मानसिक ताणाची भूमिका महत्त्वाची ठरते.

नीरज चोप्रा

फोटो स्रोत, Getty Images

नीरज जेव्हा टोकियोला गेला होता तेव्हा त्याच्याकडे काहीच नव्हतं. पण आज जेव्हा तो जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये गेला तेव्हा त्याच्या मागे ऑलिम्पिक सुवर्णविजेता ही बिरुदावली होती. त्यामुळे त्याच्यावर सव्वाशे अब्ज देशवासीयांच्या भावनांचं दडपण येणं स्वाभाविक आहे.

नीरजबद्दल असं म्हटलं जातं की, तो भावनांवर नियंत्रण मिळवून आंतरिक भीतीवर मात करतो. पण तरीही नीरजने आपल्या नावावर जो विक्रम नोंदवलाय तसा इतर कोणी नोंदवलेला नाही.

नीरज चोप्रा सलामीच्या थ्रोमध्ये आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो हे सत्य नसेलही कदाचित. पण त्याने टोकियोमध्ये अशाच पद्धतीने सुवर्णपदक जिंकलं. इथं मात्र त्याला सुरुवातीच्या थ्रोमध्ये सर्वोत्तम कामगिरी करता आली नाही.

कदाचित याच दबावामुळे तो 90 मीटरचा अडथळा पार करण्यात अपयशी ठरला असेल. पण तो आपल्या म्हणण्याला 2017 सालचा संदर्भ देतो. 2017 च्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये त्याने शेवटच्या प्रयत्नात 85.23 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकलं होतं. तर मागच्या वर्षी त्याने इंडियन ग्रांप्रीमध्ये शेवटच्या थ्रोवर 88.07 मीटर भालाफेक करून राष्ट्रीय विक्रम केला होता.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)