डिसले गुरूजींचा राजीनामा, '34 महिन्यांचा पगार होणार वसूल' #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Twitter@RanjitDisle
आज सकाळी विविध वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा-
1. डिसले गुरूजींचा राजीनामा, '34 महिन्यांचा पगार होणार वसूल'
डिसले गुरुजी त्यांच्या राजीनाम्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ग्लोबल टिचर पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी नुकतीच राजीनामा पूर्व नोटीस दिली आहे.
शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी डिसले गुरुजींबाबत चौकशी करून अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार कारवाई होण्याअगोदर रणजितसिंह डिसले यांनी 7 जुलै रोजी राजीनामा नोटीस दिली आहे.
8 ऑगस्ट रोजी त्यांचा राजीनामा मंजूर होऊन त्यांना कार्यमुक्त केले जाणार आहे. तरीही जिल्हा प्रशासन डिसले गुरुजींवर कारवाई करणार आहे.
जवळपास 34 महिने कामावर हजर न राहता त्यांनी पगार घेतला आहे. हा सर्व पगार सोलापूर जिल्हा प्रशासन वसूल करणार आहे. याबाबत जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी महाराष्ट्र टाइम्सला माहिती दिली आहे.
2. दीपक केसरकर लिमिटमध्ये राहा - निलेश राणे
शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना भाजप नेते निलेश राणे यांनी लिमिटमध्ये राहण्याचा इशारा दिला आहे.
निलेश राणेंनी म्हटलं आहे, ''युती टिकवण्याची जितकी जबाबदारी आमची आहे, तितकीच तुमचीही आहे. तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते आहात. आमचे नाही.''
ट्विटरवर एक व्हीडिओ शेअर करत ते असे म्हणाले आहेत. या व्हिडीओला त्यांनी 'दीपक केसरकर लिमिटमध्ये राहा', असं कॅप्शन देऊन शेअर केलं आहे.
एबीपी माझानं त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, @meNeeleshNRane
निलेश राणे म्हणाले आहेत की, ''दीपक केसरकर कुठे तरी बोलले, राणेंची दोन्ही मुले लहान आहेत. त्यांना समज देण्याची गरज आहे. दीपक केसरकर आपण युतीत आहोत. विसरू नका. युती टिकवण्याची जितकी जबाबदारी आमची आहे, तितकीच तुमचीही आहे. तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते आहात. आमचे नाही. तुमची अवस्था आम्ही मतदारसंघात काय केली आहे, हे आम्हाला माहीत आहे.
राणेंच्या याच दोन मुलांनी तुमची नगरपालिका तुमच्याकडून घेतली. आज भारतीय जनता पक्ष आहे तिकडे. जिल्हा परिषद देखील आमच्याकडे. पंचायत समिती सदस्य तुमच्या मतदारसंघातील आमच्याकडे आहे.''
3. ...तर सीएए लागू होऊ देणार नाही - यशवंत सिन्हा
राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेससह विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी "मी राष्ट्रपती झालो, तर सीएए कायदा लागू होऊ देणार नाही," असं म्हटलंय. आसामच्या दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
आसाममध्ये विरोधी पक्षातील खासदारांशी संवाद साधताना सिन्हा म्हणाले, "भाजपाप्रणित केंद्र सरकार अजूनही नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करु शकलेले नाही. नागरिकत्व हा आसामध्ये एक प्रमुख मुद्दा आहे. केंद्र सरकारला हा कायदा देशभरात लागू करायचा आहे. मात्र मसुदाच कमकुवत असल्यामुळे सरकारला आजतागायत सीएए कायदा लागू करता आलेला नाही."
राष्ट्रपतीपदाची निवडणूक येत्या १८ जुलै रोजी होणार आहे. तर २१ जुलैला मतमोजणी होणार आहे. लोकसत्तानं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
4. इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त होणार, GST मध्ये घट
केंद्र सरकारनं इलेक्ट्रिक वाहनासाठी वापरल्या जाणाऱ्या बॅटरी पॅकवरचा जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणला आहे. या वाहनांची वाढती मागणी आणि तसंच त्यातून रोजगार निर्मितीसाठी केंद्रानं हा निर्णय घेतला आहे.

फोटो स्रोत, ANI
एका इलेक्ट्रिक वाहनात बॅटरी पॅकचा 50 टक्के हिस्सा असतो. त्यामुळे याचा परिणाम या गाड्यांच्या किंमती स्वस्त होण्यावर होणार आहे.
याआधी सरकारनं बॅटरी पॅकवरचा जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर आणला होता. गेल्या 4 वर्षांत सरकारनं यावरील जीएसटी 2 वेळा कमी केला आहे.
एनडीटीव्हीच्या हिंदी गॅझेटनं हे वृत्त दिलं आहे.
5. पालघरमध्ये 7 वर्षांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण
पालघरमध्ये 7 वर्षांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाली आहे. लागण झालेली मुलगी पालघर जिल्ह्यातल्या झाई गावातल्या आश्रमशाळेत राहाते, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
याआधी 2021 मध्ये पुण्यात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला होता. या मुलीवर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू करण्यात आले आहेत.
सकाळनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








