गोवा : काँग्रेस नाट्यामध्ये सोनिया गांधींची मध्यस्थी; मुकुल वासनिकांना पाठवलं

फोटो स्रोत, facebook
गोवा काँग्रेसमध्ये नाट्यमय घडामोडी घडत असून, विरोधी पक्षाचे नेते मायकेल लोबो यांना पदावरून दूर करण्यात आलं आहे. काँग्रेसचे गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी यासंदर्भात माहिती दिली.
"काही नेत्यांनी भाजपच्या साथीने गोवा काँग्रेस कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. या कटाचं नेतृत्व आमच्याच दिगंबर कामत आणि मायकेल लोबो या नेत्यांनी केलं होतं. हे दोघेही भाजपच्या साथीने काम करत होते. भाजपचा विरोधी पक्षांना संपवण्याचा डाव आहे", असं गुंडू राव म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "दिगंबर कामत यांच्याविरोधात अनेक खटले आहेत. लोबो यांना सत्ता हवी आहे. या सगळ्या प्रकाराने काँग्रेस पक्ष कमकुवत होणार नाही. आम्ही हा मुद्दा आक्रमकपणे मांडू.
"सत्ता आणि वैयक्तिक फायद्यासाठी या दोघांनी विश्वासघात केला आहे. विरोधी पक्षनेतेपदी नव्या नेत्याची निवड होईल. किती लोक सोडतात आणि किती थांबतात ते बघतो. आमच्याकडे 5 आमदार आहेत. आम्ही आणखी काही नेत्यांच्या संपर्कात आहोत."
गोव्यातील या राजकीय हालचालींनतर काँग्रेस पक्षाचं केंद्रीय नेतृत्व अॅक्शन मोडमध्ये आलं आहे.
"गोव्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी लक्षात घेऊन काँग्रेस अध्यक्षांनी पक्षाचे नेते मुकुल वासनिक यांना राज्यात पाठवलं आहे," असं ट्विट काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
गोव्यात काँग्रेसचे 11 पैकी 10 आमदार भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याच्या अनेक बातम्या प्रसिद्ध होत आहे. सोमवारपासून (11 जुलै) गोव्यात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसचे आमदार भाजप विधिमंडळ गटात सामील होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यासह 10 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मायकल लोबो यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

फोटो स्रोत, TWITTER/ CMichael Lobo
ते म्हणाले, "या सगळ्या अफवा आहेत. असं काहीही नाही. अधिवेशन सुरू होणार असल्यामुळे कोणीतरी अफवा पसरवली आहे. मला कोणीही असं सांगितलेलं नाही. मला जर असं काही कळालं तर मी तुम्हाला नक्की कळवणार."
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी या चर्चा म्हणजे अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
काँग्रेसच्या या आमदारांच्या यादीत माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचंही नाव असल्याचं बोललं जात आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना दिगंबर कामत म्हणाले होते, "गेल्या महिन्यभरापासून मी ही चर्चा ऐकतोय. याला काही अर्थ नाही. अशा चर्चा कोणीतही प्लांट करत आहे. मला वाटत नाही यात काही तथ्य आहे. माझं नाव सुरुवातीपासूनच घेत आहेत. मी दिल्लीला गेलो, अहमदाबाद-गुजरातला गेलो की असंच म्हणतात. काय करणार आता."
तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करत आहात का? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, "नाही. मी प्रवेश करत नाहीये."
दरम्यान, भाजपकडून मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
पक्षांतर बंदीची कारवाई टाळण्यासाठी पक्षातून बाहेर पडणाऱ्या आमदारांची संख्या 2/3 असणं आवश्यक आहे. त्यामुळे गोवा काँग्रेसचे 11 पैकी 10 आमदार फुटणार असतील तर ही संख्या 2/3 पेक्षाही जास्त आहे.

फोटो स्रोत, ANI ON TWITTER
यापूर्वी 2019 मध्ये गोवा काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी 9 आमदारांना सोबत घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी गोव्यात काँग्रेसचे 15 आमदार होते.
माजी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्यासह निळकंठ हळर्णकर, इजिदोर फर्नांडिस, टोनी फर्नांडिस, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, फ्रान्सिस सिल्वेरा, बाबूश मोन्सेरात, विल्फ्रेड डिसा उर्फ बाबाशान, जेनिफर मोन्सेरात, क्लाफास डायस यांचा यात समावेश होता.
त्यावेळी सुद्धा ऐन पावसाळी अधिवेशनाच्या आधी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
मायकल लोबो आणि दिगंबर कामत या आमदारांनी तर ही चर्चा फेटाळून लावली आहे, असं असलं तरी राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं हा अनुभव महाराष्ट्राने नुकताच घेतला आहे. त्यामुळे यात किती तथ्य आहे हे आगामी काळातच स्पष्ट होऊ शकेल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








