गोवा विधानसभा निवडणूक: प्रतापसिंह राणेंची माघार हा देवेंद्र फडणवीसांचा विजय?

प्रतापसिंह राणे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतापसिंह राणे
    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी

गोव्याच्या निवडणुकीसाठी भाजपाचे प्रभारी असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची एक खेळी तूर्तास तरी यशस्वी ठरलेली दिसते आहे. 50 वर्षं आमदार असणारे काँग्रेसचे माजी मुख्यंमंत्री प्रतापसिंह राणे यंदा निवडणूक लढवणार नाही.

'त्यांची लढायची इच्छा नाही आणि त्यांच्या सुनेला त्याच मतदारसंघातून भाजपा तिकीट देईल असं त्यांच्याशी बोलणं झालं होतं' असं सांगणाऱ्या फडणवीसांना 'हे खोटं आहे, असं काहीच ठरलं नव्हतं' हे सांगून अडचणीत आणणारे राणे भाजपसाठी अडथळा बनले होते. पण हो नाही करत राणेंनी अखेरीस माघार घेतली.

1972 मध्ये पहिल्यांदा आमदार झालेले राणे आता 50 वर्षांनंतर निवडणुकीच्या राजकारणाला रामराम ठोकताहेत. पण राणेंच्या यंदा निवडणूक लढवण्यावरुन त्यांचा पक्ष कॉंग्रेस आणि सत्ताधारी भाजपा यांना चांगलेच हिंदोळे खावे लागले.

राणे निवडून येत असणाऱ्या 'पर्ये' मतदारसंघातून भाजपानं त्यांची सून दिव्या राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रभारी असणाऱ्या भाजपानं गेल्या काही काळात राणेंना आपल्या बाजूला ओढण्याचाही प्रयत्न केला होता. पण राणेंकडून कोणतही स्पष्ट विधान आलं नाही.

कॉंग्रेसच्या गोव्याच्या पहिल्याच यादीत प्रतापसिंहांचं नाव होतं आणि तीन दिवसांपूर्वी नेहमी ते प्रचार सुरू करण्याअगोदर देवळात नारळ ठेवतात, तसा त्यांनी यंदाही ठेवला. त्यामुळे पोर्येमध्ये गोव्यातला कौटुंबिक राजकीय मुकाबला राणे विरुद्ध राणे, म्हणजे सासरे विरुद्ध सून होणार असं चित्र तयार झालं.

राणे स्वत: नाही तर त्यांच्या पत्नी विजयादेवी लढतील अशीही चर्चा गोव्यात होती. पण अखेरीस प्रतापसिंहांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. आता कॉंग्रेसनंही तिथला उमेदवार बदलला आहे आणि राणेंच्या नात्यातल्याच रणजित राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. म्हणजे प्रतापसिंह राणे 50 वर्षांनी पहिल्यांदाच गोव्याच्या निवडणुकीत नसतील.

राणेंच्या या निर्णयामुळे एका प्रकारे भाजपाचा जीव भांड्यात पडला आहे. राणेंशी सलोख्याचे राजकीय संबंध तयार करु पाहणाऱ्या भाजपानं राणेंच्या होकारानंतरच त्यांच्या सून दिव्या राणे यांना तिकीट दिलं होतं. तसं फडणवीसांनी जाहीर सांगितलंही होतं. पण राणेंनी असं काहीही घडलं नसल्याचं म्हणत फडणवीसांना तोंडावर पाडलं होतं. मात्र आता प्रतापसिंहांच्या माघारीनंतर या जागेवर कोणते राणे जिंकणार याकडे आता गोव्याचं लक्ष आहे.

'राणेंना' ओढण्याचे भाजपाचे प्रयत्न

गोव्यात गेल्या निवडणुकीत सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या कॉंग्रेसमध्ये आता राणेंसह चारच आमदार उरले आहेत. राणेंचे पुत्र विश्वजीत हे तर 2017 मध्येच त्यांचा गट घेऊन भाजपात गेले आणि नंतर पुन्हा भाजपाच्या तिकीटावर निवडून आले.

विश्वजीत भाजपाच्या गोव्याच्या सरकारमध्ये मंत्रीही आहेत. आता ते भाजपाच्या तिकिटावरच शेजारच्या वळपोई मतदारसंघातून लढताहेत.

पण प्रश्न होता की दक्षिण गोव्यातल्या पोर्येतून सातत्यानं निवडून येणार कॉंग्रेसचे प्रतापसिंह राणे यंदा काय करणार? कॉंग्रेसचा सर्वात मोठा नेता असणाऱ्या राणेंबद्दल चर्चा सुरु झाली जेव्हा सप्टेंबर महिन्यात गोव्याचे भाजपाचे प्रभारी असणारे देवेंद्र फडणवीस 82 वर्षांच्या राणेंना भेटायला त्यांच्या निवासस्थानी गेले तेव्हा. त्यानंतर पुत्रापाठोपाठ आता वडीलही भाजपात जाणार का हा प्रश्न गोव्यात विचारला जाऊ लागला. विश्वजीत यांनीही 'राणेंनी सन्मानानं निवृत्त व्हावं' असं म्हटलं होतं.

पण प्रतापसिंह राणेंनी तेव्हा एक व्हिडिओ संदेशाद्वारे अशा प्रकारच्या चर्चांना नाकारलं होतं. तेव्हा ते म्हणाले होते, "या लोकांना केवळ अफवा उठवायच्या आहेत. मी गेली 45 वर्षं कॉंग्रेसमध्ये आहे. आता मी कधीही, विशेषत: आयुष्याच्या या टप्प्यावर, कॉंग्रेस सोडणार नाही. मी कॉंग्रेसचाच आहे."

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रतापसिंह राणे

फोटो स्रोत, Dr. Pramod Sawant/FACEBOOK

फोटो कॅप्शन, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रतापसिंह राणे

पण दिसतं आहे की त्यानंतरही भाजपानं त्यांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न थांबवले नाहीत. कारण भाजपानं त्यांची सून दिव्या राणे यांना 'पर्ये' मतदारसंघातून उमेदवारी दिली. शेजारच्या वळपोई मतदारसंघात विश्वजीत यांनाही दिली. एकाच कुटुंबात पती आणि पत्नी दोघांनाही तिकीट देणं हा अपवादच, पण भाजपानं तो राणेंसाठी केला. हे प्रतापसिंह यांच्या संमतीनच झालं आणि भाजपाशी त्यांचं बोलणं झालं होतं, असं 20 जानेवारीच्या पत्रकार परिषदेत स्वत: देवेंद्र फडणवीसांनीच जाहीरपणे सांगितलं.

"पर्ये ही प्रतापसिंह राणेंचीच जागा होती. ते गेली 50 वर्षं त्या जागेवरुन कॉंग्रेसच्या तिकीटावर सातत्याने निवडून आले. कॉंग्रेस तिथं कधीही हरली नाही. आम्ही यंदा प्रतापसिंह राणेंना अशी विनंती केली की कॉंग्रेस सातत्यानं खाली जाते आहे. तो पक्ष देशाचं भल करू शकत नाही. त्यामुळं तुम्ही ही जागा आम्हाला द्या. आपण स्वत: तिथून लढा किंवा आम्हाला मदत करा. त्यांनी आमचं म्हणणं मानलं. पण ते म्हणाले की ते यंदा वयामुळं निवडणूक लढवणार नाहीत आणि दिव्या राणे तिथून लढतील," फडणवीस म्हणाले होते.

पण प्रतापसिंह राणेंनी मात्र असं काहीही ठरलं नसल्याचं म्हटलं आणि फडणवीसांना चूक ठरवलं. माध्यमांशी गुरुवारी बोलतांना ते म्हणाले, "हे जे काही होतं आहे ते चुकीचं आहे. माझं नाव वापरलं जातं आहे. पर्ये ही काही माझी संपत्ती नाही. फडणवीस मला खूप दिवसांअगोदर येऊन भेटले होते. तेव्हा आम्ही राजकारणावर बोललो नव्हतो. मी निवडणूक लढवावी किंवा नाही हा प्रश्न वेगळा आहे, हे अगोदर स्पष्ट करायला हवं."

यासोबतच प्रतापसिंह यांचं कार्यकर्ते आणि पत्नीसोबत मंदिरामध्ये जाणं हेही त्यांचा प्रचाराची सुरुवात असं बोललं गेलं. पण त्यानंतर काही वेळातच आता प्रतापसिंह यांनी निवडणुकीतून माघर घेतली आहे. कोणतंही कौटुंबिक कारण नाही असं त्यांच्या गोटातून सांगण्यात येतं आहे.

कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते पी.चिदंबरम यांनीही पोर्येची जागा राणेंचीच असल्याचं म्हटलं होतं आणि ते लढतील किंवा ते सुचवतील ती व्यक्ती तिथून लढेल असंही सांगितलं होतं. पण आता त्यांच्या माघारीनं 50 वर्षांपासून ताब्यात असलेली जागा हातातून जाते की काय अशी नामुष्की कॉंग्रेसवर ओढवली आहे.

राणेंचा गोव्यातला दबदबा

प्रतापसिंह राणे हे 1972 पासून गोवा विधानसभेत आमदार आहेत आणि सलग 50 वर्षं आमदार असण्याचं त्यांचं रेकॉर्ड आहे. कॉंग्रेसचा ते कायम गोव्यातल्या राजकारणातला चेहरा राहिले आहेत. वास्तविक अगोदर ते महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीतून राजकारणात आले.

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी त्यांना राजकारणात आणलं. पहिल्यांदा 'मगोपा'चे आमदार झालेले राणे लवकरच कॉंग्रेसमध्ये आले आणि 1980 मध्ये पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री बनले.

गोवा काँग्रेस

फोटो स्रोत, @INCGoa

त्यानंतर राणे 2007 पर्यंत पाच वेळा गोव्याचे मुख्यमंत्री बनले. त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा एकूण कार्यकाळ 15 वर्षांहूनही अधिक आहे यावरुन त्यांचा दबदबा लक्षात यावा. ते गोवा विधानसभेचे अध्यक्षही राहिले आहेत आणि 2002 मध्ये विरोधी पक्षनेतेही होते. 2002 मध्ये त्यांच्या मुलाने, विश्वजीत राणे यांनीही राजकारणात उडी घेतली आणि ते पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले.

पण नंतर विश्वजीत हेही गोवा कॉंग्रेसमधलं मोठं प्रस्थ बनलं. वळपोई विधानसभा मतदारसंघातून ते सलग निवडून येत आहेत. 2017 मध्ये ते गोव्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले जेव्हा कॉंग्रेस सगळ्यात मोठा पक्ष असूनही सत्ता स्थापन करू शकला नाही.

विश्वजीत यांनी बंड केलं आणि त्यांचा एक गट घेऊन ते भाजपाला येऊन मिळाले. मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून विश्वजीत हे भाजपा सरकारमध्ये मंत्री आहेत.

पोटनिवडणुकीत ते भाजपाच्या तिकीटावर पुन्हा निवडून आले. त्यांचं नावंही आता मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत घेतलं जातं. पर्रिकरांनंतर त्यांना या पदामध्ये रस होता असं म्हटलं जातं, पण भाजपानं काडरमधून वर आलेल्या डॉ. प्रमोद सावंतांची निवड केली.

विश्वजीत आणि सावंत यांचं सूत जुळत नाही. कोरोनाकाळात आरोग्यमंत्री म्हणूनही त्यांचे वाद झाले होते. पण आता विश्वजीत यांना आणि सोबतच त्यांच्या पत्नी दिव्या यांनाही उमेदवारी देऊन भाजपात राणेंची असलेला दबदबा आणि गरज दोन्हीही स्पष्ट झालं आहे. पण प्रश्न हाही आहे की प्रतापसिंह पक्षाला मदत करणार की सुनेला?

राणे विरुद्ध राणे विरुद्ध राणे

गोव्यातल्या मुक्त पत्रकार आणि निवडणूक सर्वेक्षण करणाऱ्या मनस्विनी प्रभुणे-नायक यांच्या मते प्रतापसिंहांच्या या निर्णयाचा कॉंग्रेसवर परिणाम होईल. "एक तर त्यांनी हा मतदारसंघ एवढी वर्षं बांधून ठेवला होता. प्रत्येक घरी त्यांचा संपर्क होता. त्यामुळे कॉंग्रेस हातातून जागा जाईल की काय या चिंतेत असणार," मनस्विनी म्हणतात.

विश्वजीत राणे

फोटो स्रोत, @visrane

फोटो कॅप्शन, विश्वजीत राणे

पण त्यांच्या मते प्रतापसिंह निवडणूक लढवतील की नाही याबाबत तिथल्या मतदारांमध्येही गेल्या दोन-एक वर्षांपासून शंका होती. "त्यांचं वयंही झालं आहे. शिवाय विश्वजीत यांनीही तो मतदारसंघ स्वत:च्या पद्धतीनं बांधायला घेतला होता. लोकांमध्ये त्यांनी एका प्रकारचा संदेश दिला होता की आता यावेळेस वडील निवडणुकीत असणार नाहीत. त्यामुळे तिथल्या मतदारांची मानसिकता अगोदरच तयार झाली होती," त्या सांगतात.

एकंदरीत प्रतापसिंह राणेंच्या माघारीनंतर पर्ये मतदारसंघात राणे विरुद्ध राणे विरुद्ध राणे अशी तीन राणेंची लढत आहे. दिव्या राणे आहेतच. कॉंग्रेसनं आता त्यांच्या नात्यातलेच रणजित राणे उभे केले आहेत. सोबतच 'आप'नं विश्वजीत कृष्णाजी राणे हे तिथून उमेदवार दिले आहेत. त्यामुळे एका मुख्यमंत्र्याच्या 50 वर्षांच्या कारकीर्दीचा अस्त होत असतांना कोण नवी 'राणे' त्यांची जागा घेणार हा गोव्याच्या निवडणुकीतला लक्षवेधी प्रश्न आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)