एकनाथ शिंदेंना आर. आर. पाटलांनी काय सल्ला दिला होता?

आर.आर. पाटील

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, आर.आर. पाटील

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांचं विधानसभेतील एक भाषण भरपूर गाजलं होतं.

2014 साली भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेरुन मिळालेल्या आधारामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. शिवसेनेने सुरुवातीच्या काळामध्ये विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला होता. एकनाथ शिंदे यांना विरोधी पक्षनेते पदी काम करण्यास शिवसेनेने सांगितले होते.

त्यांची या पदावर निवड झाल्यावर अभिनंदनपर भाषणात आर. आऱ पाटील यांनी युतीवर खरपूस टीका केली होती. एकनाथ शिंदे आणि एकनाथ खडसे यांच्यासह शिवसनेच्या भूमिकेवर त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत चिमटे काढले होते.

आर. आर. पाटील यांनी या भाषणात शिवसेनेला टोले लगावताना काही गोष्टी एकनाथ शिंदेंना कानमंत्रासारख्या सांगितल्या होत्या.

त्यापूर्वीच्या विधानसभेत भाजपाचे एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते होते त्यानंतर पुढच्या विधानसभेत 2014 साली एकनाथ शिंदे विरोधीपक्षनेते झाले होते. एका एकनाथानंतर दुसरा एकनाथ विरोधी पक्षनेतेपदी बसतोय. विरोधी पक्षनेता हा भावी मुख्यमंत्री मानला जातो, त्याची पत मुख्यमंत्र्याइतकी असते, असं सांगताना त्यांनी एकनाथ खडसेंना मुख्यमंत्रिपद मिळालं नव्हतं यावरही टिप्पणी केली होती.

आर. आर. पाटील यांनी या भाषणात चौफेर टोलेबाजी केली होती. देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी वानखेडे स्टेडियमवर एका भव्य सोहळ्यात झाला होता. तसा आम्ही केला असता तर मीडियानं आमचं सरकार अरबी समुद्रात बुडवलं असतं असं सांगत पाटील यांनी अध्यक्ष महोदय तुमचा शपथविधी किमान आझाद मैदानावर व्हायला पाहिजे होता असा टोला लगावला. त्याबरोबर अख्खं सभागृह हास्यकल्लोळात बुडालं होतं. शेवटी अभिनंदनाचा ठराव विरोधी पक्षनेत्यासाठी आहे, अधूनमधून त्यांच्यावर बोला असं अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना सांगावं लागलं. त्यावरही सभागृहात मोठा हास्यस्फोट झाला.

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर आर. आर. पाटील यांनी एकनाथ शिंदेना उद्देशून "त्यांचा आझाद मैदानावर तर तुमचा शिवाजी पार्कवर शपथविधी व्हायला पाहिजे होता असं मी म्हणणार नाही", असं म्हणत शिंदे यांना पुन्हा एक चिमटा काढला.

एकनाथ शिंदे विरोधीपक्षनेते झाले तरी शिवसेना आणि भाजपाच्या चर्चा सुरू होत्या असं त्यावेळेस बोललं जाईल. याचाच आधार आर. आर. पाटील यांनी घेतला. ते म्हणाले,

एकनाथ शिंदे साहेब तुमच्या पक्षाची भूमिका पाहाता, विरोधी पक्षनेतेपदही हातातून जायला नको आणि आमच्या वाटाघाटीही चालू राहातील अशी आहे, आज महाराष्ट्रातल्या जनतेची राज्य कुणी कसं करावं यापेक्षा सगळ्या पक्षांचं एकदा स्पष्टीकरण येऊन जावं हीच प्रामुख्याने इच्छा आहे.

विरोधी पक्षनेता प्रभावीपणे काम करू शकेल का?

आर. आर पाटील म्हणाले, विरोधीपक्षनेतेपदावर बसल्यावर पुन्हा वाटाघाटी सुरू राहणार असतील तर विरोधीपक्षनेता प्रभावीपणे काम करू शकेल का? विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीला न्याय देता येऊ शकेल का? आज या अभिनंदनाच्या भाषणाला उत्तर देताना आता वाटाघाटीचे दरवाजे बंद, परतीचे दोर कापलेले आहेत असं शिवसेनेच्या भूमिकेला, इतिहासाला साजेसं उत्तर तुम्ही दिलं तर राज्याला विरोधीपक्षनेता मिळाला असा अर्थ होईल.

देवेंद्र फडणवीसांचे बहुमत सिद्ध करताना पोलची मागणी करण्यात शिवसेना फारशी उत्सुक नव्हती याचा उल्लेख करुन आर. आऱ. पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना आता उत्तराच्या भाषणात तुम्ही किती ठाम आहात ते कळूदे असं आवाहन केलं होतं.

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Getty Images

"आता आमचा दिल्ली किंवा महाराष्ट्राचा नेता कोणत्याही चर्चा वाटाघाटी करणार नाही, विषय संपला. आता फक्त विरोधीपक्षनेतापदाला न्याय देणार, विरोधी पक्षातील आमदार म्हणूनच काम करणार असं त्यांनी उत्तरात सांगितलं तरच मी विरोधी पक्षनेत्याचं अभिनंदन करेन, जर दोन्ही राहाणार असेल तर अभिनंदनासाठी वापरलेले शब्द परत घेण्याचा अधिकार आम्हाला राखीव ठेवला पाहिजे."

"विरोधीपक्षनेते पदाची याची पाहिली तर या जागेवर दिग्गज नेते बसल्याचं दिसून येईल. संघटीतपणे संसदीय आयुधांचा वापर करुन प्रभावीपणे काम केलं तर सरकारला एख पाऊलही पुढे टाकणं मुश्कील करता येतं इतकी विरोधी पक्षात ताकद असते", असं त्यांनी एकनाथ शिंदेंना यामध्ये सांगितलं होतं.

एकनाथ शिंदे चांगले संघटक आहेत. सत्तेच्या बाजूला आमदारांना संघटीत ठेवणं सोपं असतं पण विरोधी पक्षात संघटीत ठेवणं सोपं नसतं. आमचा अनुभव आहे. पाच वर्षं एकसंघपणाने अशंच संघटित राहिलं पाहिजे असा सल्ला त्यांनी शिवसेनेला दिला. लोकशाहीत सरकारवर अंकुश ठेवणं विरोधी पक्षाचं काम आहे", असंही त्यांनी शिंदे यांना सांगितलं.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

जनतेच्या हिताचे निर्णय घेताना सरकारचा जेवढा सहभाग असतो तितकाच नियंत्रण ठेवण्यासाठी विरोधक महत्त्वाचा असतो याची आठवण करुन त्यांनी दिली होती.

पुढे काय झालं?

विरोधी पक्षात लोकांना संघटीत ठेवणं कठीण असतं या आर. आर. पाटील यांच्या म्हणण्यामागे त्यावेळेस सुरू असणारी एक चर्चा होती. जर सेना सत्तेत सहभागी झाली नाही तर सेनेत फूट पडेल अशी तेव्हा चर्चा होती. त्या आधारावर आर. आर. यांनी हे वक्तव्य केले होते.

आर. आर. पाटील यांनी हा सल्ला दिला सेनेला आणि एकनाथ शिंदे यांना दिला असला तरी नंतर शिवसेनेने भाजपाबरोबर सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. पुढे एकनाथ शिंदे मंत्रीही झाले. एकनाथ शिंदे यांनी आज गुवाहाटीत आपल्याबरोबर 40 आमदार असल्याचा दावा केला. याचबरोबर आर. आर. पाटील यांनी केलेला त्यांचा संघटक म्हणून केलेला उल्लेख किती योग्य होता याचा अंदाज येऊ शकतो.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)