यदुनाथ थत्ते : 'काळा स्वातंत्र्यदिन' आणि महाराष्ट्रातील दोन संपादकांचे राजीनामे

फोटो स्रोत, Weekly Sadhana
- Author, नामदेव काटकर
- Role, बीबीसी मराठी
15 ऑगस्ट 1972 रोजी 'साधना' साप्ताहिकात एक लेख प्रकाशित झाला आणि त्या लेखामुळे महाराष्ट्रात इतका गदारोळ झाला की, दोन संपादकांना राजीनामा देण्याची आणि साप्ताहिकाच्या विश्वस्तांना माफी मागण्याची वेळ आली होती.
त्या लेखाचं नाव होतं, 'काळा स्वातंत्र्यदिन' आणि तो लिहिला होता, दलित पँथरच्या संस्थापकांपैकी एक असलेले राजा ढाले यांनी.
तर हा लेख प्रकाशित केल्यानं यदुनाथ थत्ते आणि अनिल अवचट या दोन संपादकांना राजीनामा द्यावा लागला होता. तर विश्वस्त म्हणून समाजवादी नेते एस. एम. जोशींनी माफी मागितली होती.
यदुनाथ थत्ते यांचा10 मे रोजी स्मृतिदिन. 1998 साली थत्तेंचं निधन झालं. साक्षेपी संपादक, समाजाप्रती सहानुभूती नि कळवळा असलेला कार्यकर्ता, लोकशाहीवादी विचारवंत अशा विविध अंगानं यदुनाथ थत्तेंना महाराष्ट्र ओळखतो.
यदुनाथ थत्तेंच्या स्मृतिदिनाचं निमित्त साधत, 1972 साली महाराष्ट्रासह देशाला हादरवलेल्या 'त्या' लेखाची गोष्ट जाणून घेऊ.
'काळा स्वातंत्र्य दिन' हा राजा ढालेंचा लेख छापण्याआधीच्या घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या सर्व घडामोडी आधी पाहू. मग लेखावरून झालेल्या वादावर येऊ.
'काळा स्वातंत्र्य दिन'
दलितांवरील अत्याचारांविरोधात पेटून उठलेल्या तरुणांनी दलित पँथर या संघटनेची स्थापना करून अगदी काहीच दिवस उलटले होते. याआधी दलित युवक आघाडीच्या माध्यमातून अत्याचारग्रस्त कुटुंबांना भेटण्यापासून आक्रमक आंदोलनं करण्यापर्यंत, या तरुणांनी महाराष्ट्रभर आवाज उठवला होता.
स्वातंत्र्यानंतर 25 वर्षांच्या कालखंडात दलितांचं दु:ख, दारिद्र्य हटलेलं नव्हतं. उलट अमानुष अत्याचारांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली होती.
या परिस्थितीचा निषेध करण्यासाठी दलित पँथरनं 1972 सालचा भारतीय स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव 'काळा स्वातंत्र्य दिवस' म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आणि तशी तयारीही सुरू केली.

फोटो स्रोत, JV pawar
दलित वस्त्यांमध्ये काळे झेंडे आणि दलित तरुणांनी आपल्या शर्टांवर काळ्या फिती लावाव्यात, असं आवाहन करण्यात आलं.
एकीकडे भारतीय स्वातंत्र्याला 25 वर्ष पूर्ण होत होती आणि दुसरीकडे साधना साप्ताहिकही 25 व्या वर्षात पदार्पण करत होतं. असं दुहेरी औचित्य साधत 1972 साली साधनानं 'स्वतंत्र भारतातील दलितांची 25 वर्षे' असा विशेषांक काढण्याचं ठरवलं होतं.
त्याचवेळी मुंबईत दलित समाजातील तरूण मंडळी स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव 'काळा दिवस' म्हणून साजरा करणार असल्याची कुणकुण पुण्यात 'साधना' साप्ताहिकाच्या कार्यालयात लागली.
यदुनाथ थत्ते तेव्हा साधनाचे संपादक होते. आगामी अंकात दलित अत्याचारांवरच विशेषांक काढण्याची योजना 'साधना'मध्ये ठरली आणि त्याची जबाबदारी यदुनाथ थत्तेंनी अनिल अवचट या त्यावेळी तरुण असलेल्या पत्रकारावर दिली. अवचट तेव्हा अवघ्या 28 वर्षांचे होते.
विशेषांकाची कल्पना डोक्यात ठेवून जून 1972 मध्ये अनिल अवचट मुंबईतल्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये पोहोचले. तिथं दलित पँथरची ही तरूण मंडळी 'काळ्या स्वातंत्र्य दिना'ची मोर्चेबांधणी करत होते.
या बैठकीला प्रा. मे. पुं. रेगेंसह दलित पँथरमधील तरूण मंडळी उपस्थित होती. साधनामध्ये लेख द्यायचे, असं ठरलं. मात्र, अवचटांसमोर अट ठेण्यात आली की, लेख कुठलीही काटछाट न करता छापायचे. अवचटांनी अट मान्य केली आणि 15 ऑगस्ट 1972 च्या अंकाची तयारी सुरू झाली.
या विशेषांकात काय होतं?
'साधना'नं दलितांवरील अत्याचार आणि अनुभवांनी भरलेला हा विशेषांक काढला. एकूण 52 पानांचा हा अंक होता.
'साधना'च्या संपादकीयमधील माहितीनुसार, या विशेषांकात सुरुवातील पाच महाविद्यालयीन तरुणांच्या आयुष्यातील अस्पृश्यतेच्या एकेका प्रसंगाने आणि दोन छोट्या कवितांनी केला होता. त्यानंतर 'बलुतं'कार दया पवार यांचा अस्पृश्यतेचेच अनुभव सांगणारा तीन हजार शब्दांचा 'विटाळ' हा लेख होता.
मग जगदीश करंजगावकर यांचा 'वास्तवाला सामोरे जायला हवे' हा राजकीय लेख आणि त्र्यंबक सपकाळे यांच्या तीन कविता होत्या.
मग राजा ढाले यांचा 'काळा स्वातंत्र्यदिन' हा लेख होता.
त्यानंतर भीमराव चिकटे, ल. बा. रायमाने, वसंत नारायण जाधव, विद्यासागर कांबळे, विजया पगारे, दत्ता भगत, प्रल्हाद चेंदवणकर, धनंजय गुडदे यांचेही लेख त्यात होते. तसंच, एस. एम. जोशी आणि बाबा आढाव या तेव्हाच्या ज्येष्ठांचेही लेख त्यात होते.

फोटो स्रोत, Suhita Thattte
अंकाच्या दीर्घ संपादकीय लेखामध्ये यदुनाथ थत्तेंनी 'साधना'च्या 24 वर्षांच्या वाटचालीवर दृष्टिक्षेप टाकून, साने गुरुजींचा वारसा सांगितला होता. आणि अवचटांनी अंक काढण्यामागील भूमिका सांगणारे छोटे टिपणही लिहिले होते.
राज ढालेंच्या लेखात नेमकं काय होतं?
दलितांवरील वाढत्या अत्याचारांचा आढावा घेणारं आणि दलित समाजातील व्यक्तींच्या अनुभवावर असा हा विशेषांक होता. मात्र, तो गाजला राजा ढालेंच्या लेखामुळे.
'काळा स्वातंत्र्यदिन' या ढालेंच्या लेखावर महाराष्ट्रसह देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या.
या लेखातील तीन मुद्दे विशेषत: वादाचे कारण ठरले. एक - तिरंग्यावरील भाष्य, दोन - टिळकांवरील टीका आणि तीन - दुर्गा भागवतांवरील टीका.
मात्र, विशेषांक प्रसिद्ध झाल्यानंतर ढालेंवरील टीका आणि 'साधना'विरोधातील निदर्शनं यांचा रोख तिरंग्यावरील भाष्य हाच होता.
तिरंग्याबाबत - 'लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी स्वत:ला दलित म्हणून घेणं आणि प्रत्यक्षात दलित, उपेक्षित म्हणून जगणं नि लढ्याला सामोरं जाणं वेगळं. ब्राह्मणबाईचा कासोटा ब्राह्मणगावात सोडला जात नाही. सोडला जातो तो बौद्ध स्त्रीचा. नि याला शिक्षा काय तर, 50 रुपड्या दंड. राष्ट्रगीताचा अपमान केला तर 300 रुपये दंड. सालं राष्ट्रध्वज म्हणजे निव्वळ कापड. विशिष्ट रंगात रंगवलेलं प्रतीक. प्रतीकाचा अपमान झाला तर 300 रुपये दंड नि सोन्ना गावच्या सोन्यासारख्या प्रत्यक्षातील चालत्या-बोलत्या स्त्रीचं पातळ फेडलं तर 50 रुपये दंड! असल्या राष्ट्रध्वजाचा अपमान नि राष्ट्रध्वज काय कुणाच्या *** घालायचाय का? राष्ट्र हे लोकांचं बनतं. त्यातल्या लोकांचं दु:ख मोठं की प्रतीकाच्या अपमानाचं दु:खं मोठं? मोठं काय? आपल्या अब्रूची किंमत एका पातळाच्या एवढी?'

फोटो स्रोत, Bhagyesha Kurane
दुर्गा भागवतांबाबत - 'मराठीतले ललित साहित्यिक नि विचारवंत 'सखाराम बार्इंडर'च्या बाजूने बोंबा मारतात, पत्रकं काढतात! बौद्धांवरील अन्यायाबाबत हे का गप्प बसतात? की, चाललंय हे यांना मंजूर आहे? वेश्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून द्या. कारण ती समाजाची गरज भागवते, असं म्हणणाऱ्या भागवतबार्इंना वेश्यांना वेश्याच ठेवायचं आहे- हा यांचा 'पतितोद्धार'... तर अशी ही माणसं आपमतलबी.'
टिळकांबाबत - 'ना आगरकरांची सुधारणा आम्हाला सुधारून गेली, ना टिळकांचं स्वराज्य आम्हाला स्वातंत्र्य देऊन गेलं. आम्ही आंबेडकरांच्या मागे जाऊन सुधारलो, तर हे लोकच आम्हांवर बहिष्कार टाकून, आमच्या बायकांची अब्रू लुटतात.'
'काळा स्वातंत्र्यदिन' हा लेख 'साधना'नं नुकताच संकेतस्थळावर संपादित करून पुन्हा प्रकाशित केला आहे. तो तुम्ही इथे वाचू शकता.
या लेखानंतर काय झालं?
राजा ढालेंच्या या लेखावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पुण्यात तर 'साधना' साप्ताहिकाच्या कार्यालयावर काँग्रेस, जनसंघासह काही संघटनांनी मोर्चाही काढला. मोर्चात दीडशे ते दोनशे जण होते.
अनिल अवचटांनी 'साधना'तच लिहिलेल्या लेखातील माहितीनुसार, या मोर्चात काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक श्रीकांत शिरोळे, जयप्रकाश वाळके, कपोते आणि जनसंघ युवक आघाडीचे भीम बडदे हे पुढे होते. एमईएस कॉलेज आणि अभाविपचीही काही मंडळी दिसत होती.
याच लेखात अवचटांनी एक किस्साही सांगितलाय.
या मोर्चात सहभागी झालेल्या बऱ्याचजणांना लेखाचं प्रकरण नीट माहितीही नव्हतं. तिरंग्याचा अपमान केलाय, इतकंच त्यांच्या कानावर होतं. त्यातील एकाला वाटलं की, अभिनेत्री साधना हिनंच राष्ट्रध्वजाचा अपमान केला की काय. म्हणून तो म्हणे, "साला, काय नडलं होतं तिला असं करायचं? पण मग हा यदुनाथ थत्ते कोण? जाऊ दे. पुढं बघू काय होतंय ते."
अशी सगळी मंडळी या मोर्चात होती. मोर्चा साधनाच्या कार्यालयाच्या खाली पोहोचला आणि तिथं प्रतिकात्मक तिरडीची तयारी आंदोलकांकडून झाली. वातावरण थोडसं तणावपूर्ण बनलं.

फोटो स्रोत, Weekly Sadhana
यदुनाथ थत्तेंना खाली बोलवा, अशा घोषणा देण्यास सुरुवात झाली. थत्ते तिथेच बाजूला होते. कुणीतरी सांगितलं की, हेच थत्ते. तेव्हा त्या घोषणा देणाऱ्यांना विश्वासच बसेना.
जनसंघाचे भीम बडदे तिथं होतं. ते एस. एम. जोशींना उद्देशून म्हणाले, "राष्ट्रध्वजाचा असा अपमान आम्ही सहन करणार नाही."
तिथं बाजूलाच स्वातंत्र्यसेनानी आणि पत्रकार नरुभाऊ लिमये ते बडदेंना म्हणाले, "कोणाला तू हे सांगतोस? एसेमना? अरे, त्यांनी या राष्ट्रध्वजासाठी काय केले, हे माहीत आहे का?"
ते म्हणाले, "माहीत आहे. पण म्हणूनच आम्ही म्हणतो की, हा अपमान त्यांनी का केला? आमच्या भावना तुम्हाला समजत नाहीत."
नरुभाऊ म्हणाले, "या भावनाही आपल्याला एसेमनी शिकवल्यात."
त्यावर भीम म्हणाले, "म्हणूनच म्हणतो की, हा अपमान त्यांनी काय म्हणून केला?"
खरंतर या मोर्चाआधीच एस. एम. जोशींनी ढालेंच्या लेखाबाबत माफी मागितली होती. मात्र, या मोर्चानंतर संपादक यदुनाथ थत्तेंनी राजीनामा दिला, पाठोपाठ विशेषकांची जबाबदारी स्वीकारलेल्या अनिल अवचटांनीही राजीनामा दिला.
यदुनाथ थत्तेंनी राजीनामा देताना म्हटलं, 'साधनेच्या स्वातंत्र्यदिन रौप्य महोत्सव विशेषांकात दलितांचे स्वातंत्र्य हा एक विभाग देण्यात आला होता त्या अंकात श्री राजा ढाले यांचा एक लेख असून त्यात राष्ट्रध्वज, लोकमान्य टिळक आणि श्रीमती दुर्गा भागवत यांच्याबद्दल अभद्र अशी विधाने आली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून तिरंगी झेंड्याबद्दल मी परम आदर बाळगीत आलो. बेचाळीसच्या चळवळीत याच तिरंगी झेंड्याखाली इंग्रजी सत्तेविरुद्ध जी झुंज दिली गेली, त्यात माझाही खारीएवढा वाटा आहे. तोच तिरंगा स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज झाला याचा मी उरी अभिमान बाळगला. त्या राष्ट्रध्वजबद्दल अभद्र असे लिखाण माझ्या संपादकत्वाखाली निघत असलेल्या साधनेत दुर्दैवाने प्रसिद्ध झाले! राष्ट्रध्वज हे राष्ट्राच्या पुंजीभूत पुण्याईतून निर्माण झालेले प्रतीक असते. त्याचा शाब्दिक अधिक्षेप व अपमानदेखील होता कामा नये असे मला वाटते.
पण दलितांच्या ज्या व्यथा वेदना व्यक्त झाल्या आहेत, त्यांची उपेक्षा होऊ नये. गेली तेवीस वर्षे साधनेच्या सर्व चाहत्यांनी व मित्रांनी जो जिव्हाळा आणि जे प्रेम दिले त्यातून उतराई होणे शक्य नाही. माझ्या जडणघडणीत साधनेचा वाटा मोठा आहे. थोरा-मोठ्यांचे साधनेशी जे नाते आहे, त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडल्या त्याचे समाधान आहे. चार-पाच प्रसंगी संपादकाची जबाबदारी पार पाडण्यात कसूर झाल्यामुळे वाचकांचा रागही ओढवला, पण त्यांचे प्रेम आणि विश्वास एवढा अथांग की त्यात सर्व राग आणि किल्मिष वाहून गेले. सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून संपादकपदाचा राजीनामा मी विश्वास्तांकडे पाठवत आहे.'
तर अनिल अवचटांनी राजीनाम्यावेळी म्हटलं की, '15 ऑगस्टच्या साधना अंकात दुर्गा भागवत यांचा वैयक्तिक उल्लेख राजा ढाले यांच्या लेखात आला आहे. तो अत्यंत गलिच्छ आणि अपमानास्पद आहे. या विभागाचे संपादन मी केले होते. सदर वाक्य माझ्या नजरेतून निसटले. त्या चुकीची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. त्याबद्दल दुर्गा भागवत यांना त्वरीत दिलगिरीचे पत्र मी पाठविले. मुंबईस त्यांना भेटायलाही गेलो, पण त्या तेव्हा पुण्याला आल्या होत्या. राष्ट्रध्वजाबद्दलचे वाक्य अवमान करण्याच्या हेतूने लिहिले असे मला वाटले नाही. जिवंत माणसांचे पावित्र्य हे मी सर्वश्रेष्ठ मानतो. पण त्या वाक्यातली अभिव्यक्ती बरी नव्हती. झाल्या प्रकारामुळे मी माझ्या साधनेतील संपादकीय विभागातील कामाचा राजीनामा देत आहे. मला साधनेनेच वाढविले. मी उतराई आहेच.'
यदुनाथ थत्ते आणि अनिल अवचट यांनी राजीनाम्यावेळी काय भूमिका मांडली, याबाबत तुम्ही इथे सविस्तर वाचू शकता.
थत्ते-अवचटांच्या समर्थनार्थ दलितांचा मोर्चा
'साधना'च्या समर्थनार्थही मोर्चा निघाला.
'दडपणाला बळी पडू नका. थत्ते, अवचट यांचे राजीनामे स्वीकारू नका,' अशी मागणी करत दलित समाजाचा मोर्चा निघाला. यात अरुण शेंडगे, जयदेव गायकवाड, भीमराव पाटोळे यांसह दोनशे-एक लोक होते. या मोर्चाचं साधना कार्यालयासमोर सभेत रुपांतर झालं.

फोटो स्रोत, Samakalin Prakashan
जयदेव गायकवाड म्हणाले, "ही साधना आमची आहे. आमचा आवाज उठवीत आहे. ती बंद करणारा जन्माला यायचाय."
शेवटी एस. एम. जोशी उभे राहिले आणि म्हणाले, "साधना ही दलितांचा आवाज उठवायला निघाली आहे. हा आवाज कोणी बंद पाडू शकणार नाही. तुम्ही तिरडी जाळाल, साधना प्रेस जाळाल. पण आमचे विचार तुम्ही जाळू शकणार नाही. एक वेळ साधना बंद पडली तरी चालेल, पण दलितांचा आवाज उठवण्याचे कार्य आम्ही सोडणार नाही."
आणि या भाषणाच्या शेवटी एस. एम. जोशींनी जाहीर केले की, संपादकांचे राजीनामे स्वीकारणार नाही. यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
संदर्भ -
- दलित पँथर : अधोरेखित सत्य - अर्जुन डांगळे
- दलित पँथर - डॉ. शरणकुमार लिंबाळे
- महाराष्ट्राचे शिल्पकार : यदुनाथ थत्ते - डॉ. मु. ब. शहा
- साप्ताहिक साधना (अंक - 3 ऑगस्ट 2019)
- साने गुरुजींचा साधना - अनिल अवचट
- ढाले प्रकरणातील फुले आणि काटे - साधना संपादकीय
- साधनातील अनिल अवचट - विनोद शिरसाठ
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








