संजय राऊत- 'आम्हाला ठार मारलं तरी आमची तयारी आहे, पण एक लक्षात घ्या...'

फोटो स्रोत, Getty Images
"केंद्रीय तपास यंत्रणेच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय करू शकतात? फारतर आम्हाला तुरुंगात पाठवू शकतात, माझी तयारी आहे. आमच्यावरती खुनी हल्ले करतील, आमची तयारी आहे. आम्हाला ठार मारतील, आमची तयारी आहे. पण लक्षात घ्या, यापुढे 25 वर्षं महाराष्ट्रात तुमचं सरकार येणार नाही, याची व्यवस्था तुमची तुम्हीच केली आहे," असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला आव्हान दिलं आहे.
ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांच्या काही मालमत्ता जप्त केल्या होत्या. त्यावेळी संसदेच्या अधिवेशनानिमित्तानं संजय राऊत दिल्लीत होते. ते आज (7 एप्रिल) मुंबईत परतले. मुंबई विमानतळावर संजय राऊत यांचं शिवसैनिकांकडून जंगी स्वागत करण्यात आलं.
यावेळी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
संजय राऊत यांनी म्हटलं, "आज आयएनएस विक्रांतचा जो घोटाळा महाराष्ट्रात समोर आलेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून आज अगदी गावपातळीवर शिवसैनिकांचं आंदोलन झालं आहे. ही पण चीड आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर, शिवसेनेवर केंद्रीय तपास यंत्रणेच्या खांद्यावर बंदूक ठेवून ज्यापद्धतीने हल्ले केले जात आहेत. त्याविरोधात हा उसळलेला आगडोंब आहे."
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बुधवारी (6 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीदरम्यान शरद पवारांनी संजय राऊतांवर ईडीने केलेल्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला.

फोटो स्रोत, BBC/Shardulkadam
याबद्दल विचारल्यावर "मी फक्त निमित्त आहे. महाराष्ट्रात माझ्यासारख्या असंख्य राजकीय कार्यकर्त्यांवर, मंत्र्यांवर, आमदारांवर, खासदारांवर, जे भारतीय पक्षाचे विरोधक आहेत, त्यांच्यावर याप्रकारे सूडाच्या कारवाया सुरू आहेत. शरद पवार यांनी माझ्यानिमित्ताने पंतप्रधानांकडे ती खंत व्यक्त केली असं मला वाटतंय," असं संजय राऊत यांनी म्हटलं.
राजकीय विरोधकला विचारांनी विरोध करायचा असतो, पण तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आम्हाला उद्ध्वस्त करू पाहात असाल तर तुम्हीही उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, असंही राऊत यांनी म्हटलं.
"आम्ही कालपासून आयएनएस विक्रांत घोटाळ्याबद्दल बोलत आहोत. भाजपमधले राष्ट्रभक्त लोक या घोटाळ्यात असलेल्या किरीट सोमय्यांविरुद्ध बोलतील अशी आम्हाला अपेक्षा होती, पण ते तर त्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. आज राज्यसभेत चर्चा झाली या विषयावर. ते लोक काहीही बोलले नाहीत. त्यांच्याकडे उत्तरच नाहीये. कारण मी पुराव्यासह भ्रष्टाचार समोर आणला आहे," असं म्हणत संजय राऊतांनी किरीट सोमय्या आणि भाजपवर टीका केली.
पीएमसी बँकेच्या माध्यमातून किरीट सोमय्यांनी कोट्यवधी रुपयांचं मनी लाँड्रिंग केलं असल्याचा आरोपही यावेळी राऊत यांनी केला.
दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करून राऊतांवर टीका केली आहे.
"काळा पैसा मिळवायचाय, अन् कारवाई झाली की बोंबलायचं... त्यानंतर केलेली पापं झाकण्यासाठी शक्ती प्रदर्शन करायचं. यातून जनतेने काय बोध घ्यावा? संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर," असं राणे म्हणाले आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








