राज ठाकरे नितीन गडकरी भेटीनंतर भाजप-मनसे युती चर्चेला उधाण

नितीन गडकरी, राज ठाकरे, मनसे, भाजप, मुंबई महापालिका

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर केलेलं भाषण चर्चेत असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांची भेट घेतली आहे.

राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्यात दोन तास भेट झाली. मात्र ही भेट वैयक्तिक असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

या भेटीनंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये गडकरी म्हणाले, "माझी ही राजकीय भेट नव्हती. माझे राज ठाकरे आणि त्यांच्या परिवाराशी गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहेत. त्यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस करायची होती आणि त्यांचे नवं घरंही पहायला त्यांनी मला बोलावलं होतं."

नितीन गडकरी पुढे म्हणाले, "परवा ह्रदयनाथ मंगेशकर यांना पुरस्कार मिळाला तेव्हा राज ठाकरे यांनी म्हटलं, एकदा घरी या. घरही पाहता येईल आणि आईची सुद्धा भेट होईल. या भेटीचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही. ही भेट पूर्णपणे व्यक्तिगत आणि पारिवारीक भेट होती. या भेटीचा राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही."

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यातच होणार आहेत. शनिवारी शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती.

राज ठाकरे यांनी केलेलं भाषण भाजपप्रेरित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मनसे भाजपचा ब संघ झालाय का अशा चर्चांना उधाण आलं होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज यांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबाच दिला होता. यावरून मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे एकत्र येणार का हे पाहणंही रंजक ठरणार आहे.

याआधीही भाजप-मनसे एकत्र येणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र पुढे काही निष्पन्न झालं नाही. 2019 विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजप-शिवसेना युती तुटली. शिवसेनेच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस यांनी सरकार तयार केलं. वारंवार प्रयत्न करूनही भाजपला महाविकास आघाडी सरकार पाडता आलेलं नाही.

नितीन गडकरी, राज ठाकरे, मनसे, भाजप, मुंबई महापालिका
फोटो कॅप्शन, मनसे अध्यक्ष राज ठाकरे

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला केलेल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह सरकार स्थापण्यावर त्यांनी जोरदार टीका केली.

शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जातीपातीचं राजकारण केलं असा आरोपही केला. अंडरवर्ल्डशी संबंध असलेले नेते तुरुंगात आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगारीसंदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

ज्या मशिदींवर भोंगे लागतील, त्यासमोर स्पीकरवर हनुमान चालिसा लावा असं राज ठाकरे म्हणाले. मी धर्मांध नाही, धर्माभिमानी आहे. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशांत दिसतात का?" असा प्रश्न त्यांनी केला.

मनसे-भाजपचे सूर जुळताना दिसत आहेत - संदीप प्रधान

राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर भाजप आणि मनसे एकत्र येतील का या चर्चांना उधाण आले आहे. युतीच्या शक्यतेबाबत ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांना माध्यमांनी विचारले.

लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हटले आहे की "राज ठाकरे आणि गडकरी यांचे वैयक्तिक संबंध चांगलेच आहेत हा एक मुद्दा आहे. त्याच बरोबर राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी जे भाषण केलं, त्यात त्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केले आहे."

"त्यावरून मनसे आणि भाजपचे सूर जुळताय की काय किंवा जी टीका भाजप महाविकास आघाडीवर करत आहे त्याला मनसे बळ देण्याचं काम करत आहे. आता हे लोक समोर येऊन युती करतील की नाही हे येणारा काळ ठरवेल. येत्या काळात महानगर पालिका निवडणुका आहे. प्रत्येक शहरातील परिस्थितीनुसार देखील निर्णय घेतले जाऊ शकतील. सांगायचं तात्पर्य असे की दोघांचे सूर मात्र जुळताना दिसत आहेत."

ही तर भाजपच्या प्रवक्त्यांची सभा - शिवसेनेची टीका

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला जे भाषण केले होते तेव्हा मनसे ही भाजपचीच भाषा बोलत असल्याची टीका शिवसेनेनी केली होती. गडकरी-राज ठाकरेंच्या भेटीनंतर आता पुन्हा शिवसेनेचा मुद्दा अधोरेखित केला जाऊ शकतो.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते, "भाजपच्या 'प्रवक्त्यांनी' केलेली सभा पाहिली. भाजपची बी टीम एमआयएम होती ते माहित होते, भाजपची सी टीमपण आहे हे आज दिसले. आधी आपला रंग ठरवा, मग दिशा ठरवा. भाजपची सुपारी घेऊन मराठी माणसाच्या मुळावर येऊ नका."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)